तायडीचे पोहे २

Category:

आमची ही कांदे पोह्याची गोष्ट कथाकथन स्वरुपात उपलब्ध असून. ऐकण्यासाठी खाली टिचकी मारा.

व्हिडो चे पाच भाग आहेत व लेखाचे दोन. निवांत वेळ असेल तर कथाकथन ऐका, अन्यथा लेख आहेच!

व्हिडो: भाग १, भाग२, भाग ३, भाग ४,भाग ५
लेख: भाग १, भाग २ (हाच)

भाग २
अपेक्षाभंगाचं कारण अगदी वेगळं होतं. पोह्याची प्लेट हातात घेतली व अपेक्षेन वर पाहतो तर काय पोरीच्या ऐवजी पोमा पोहे घेवून आल्या होत्या. आमचा सपशेल पोपट झाला होता. पोहे संपल्यावर "चाs" घेवून तरी मुलगी येईल असा अंदाज आम्ही बांधाला व उत्कंठेपाई सर्वांच्या आधी प्लेट मधले पोहे बकाबका संपवले. कनवाळू पोमाच्या ध्यानी ते आल्याने लगबगीने त्या आणखी पोहे घेवून आल्या. व आम्ही कसे हातचे राखून वाढत नाही हे दाखवण्यासाठी सढळ हाताने प्लेट मध्ये पोहे ओतले. त्यामुळे आता दुसरी प्लेट संपवावी लागणार होती.

इकडे आपण मुलगी पहाण्याचा कार्यक्रमाला आलो आहोत हे विसरुन मंडळी नेहमीच्या गप्पांमध्ये रंगली होती. मुलगा वा मुलगी हे चर्चेचा विषय न राहता पोबाने कसे कष्टात दिवस काढले, ८० च्या दशकात कशी हालाखिची परिस्थिती होती, स्ट्रगल म्हणजे काय असतो, कष्टाला पर्याय कसा नसतो, योग्य वेळी स्वामींची कृपा झाल्यने आता कसे त्यांना सुखाचे दिन दिसत आहेत, म्हाता-या माणसांसाठी कमोड कसा उपयुक्त असतो वगैरे अगाध व विविध विषयांवर चर्चा सुरु झाली. चर्चेत सावळेश्वरांनी वाक्य टाकले " तुम्हाला म्हणून सांगतो हे आमचे कार्लेकर फार अभ्यासु आहेत हो, नोकरी करता करता त्यांनी लॉ चे शिक्षण पूर्ण केलं बघा" मी पोबाकडे पाहिलं, पोबाची छाती कौतुक ऐकून दीड इंच फुगून आली.

वकिल सोडून इतर लोक कडमडायला लॉ कशाला शिकायला जातात?, हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. कायद्याचा अभ्यास कुणी करावा? वकिल, न्यायाधीश, पोलीस व फार फार तर ज्यांना गुन्हे करायचे आहेत त्यांनी केला तर ठीक आहे पण बाकिच्यांना हे नस्ते उद्योग का करावेसे वाटतात कोण जाणे. आपण बांधकाम खाते किंवा एमएसईबीत अभियंते, पण लॉ ची डिग्री कशाला हवी? उद्या समजा असा काही प्रसंग गुदरलाच तर तिथे ते वकिली कोट चढवून स्वसंरक्षणासाठी उभे राहणार आहेत का? संगीत, नाट्य, चित्रकला या सारखे अनेक छंद उपलब्ध असताना वेळ जात नाही म्हणून कायद्याचा अभ्यास करणा-यांच्या रसिकपणाची कीव कराविशी वाटते? या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न म्हणजे कायदाच कशासाठी? लॉ गोड लागला म्हणून मुळासकट खायचा का? वेळ आहे म्हणून कुणी फावल्या वेळात व्हेटर्नरी डॉक्टर झालाय असे माझ्या तरी ऐकिवात नाही! असो.

इकडे मुलगी बाहेर यायचे काही चिन्ह दिसेनात. एवढा सातसमुद्र ओलांडून मी इथे जिला पहायला मी आलो होतो ती तिच्याच घरातल्या मधल्या खोलीचे भिताड ओलांडून बाहेर यायला तयार नव्हती. पोहे खाताना जरा पडदा हलला की डोळ्याच्या कोप-यातूनच काही दिसते का ते मी पहात होतो. एरव्ही नायिकेच्या पडद्यावरच्या हालचाली टिपण्यास आपण उत्सुक असलो तरी आज मी ह्या नायिकेच्या पडद्यामागच्या हालचालींकडे लक्ष देवून होतो.

त्यांच्या गप्पांना मी कावलोय हे पोबाच्या लक्षात आले असावे कारण आता त्यांनी विषय कन्येकडे वळवला होता. पोबा वदले "आमची तायडी फार शांतय बर का" मी "हो का?" पोबा: "तायडी तशी लहानपणापासून लाजाळू आहे" मी "छान" म्हणून पावती दिली. "तायडी छान सैपाक करते, तायडी कॉलेज मध्ये फर्स्ट येते, तायडी पेंटिंग करते, तायडी फार आध्यात्मिक आहे" अशी तायडी टेपच पोबाने लावली. मी तायडी टेपकडे साफ दुर्लक्ष करुन पोहे खाण्यात गुंतलोय हे लक्षात आल्यवर पोबा माझं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणाले "हे पोहे आमच्या तायडीनेच बनवलेत बरं का !" "हो का? खरंच, ताई छान बनवातात पोहे" हे तोंडात आलेलं वाक्य कसं बसं पोह्यासकट गिळलं व नुसतंच एक स्मित मी पोबाच्या दिशेने भिरकावलं.

तेवढ्यात एक सात आठ वर्षांचा झगा हॉल मध्ये आला व क्षणभर चौफेर नजर फिरवून मी दिसताच खुदकन हसून अगदी तोंडावर हात ठेवून पळत आत गेला. हेराने आत जाऊन "अव्वा ! तायडे तू ह्याच्याशी लग्न करणार" अशी बातमी दिली असणार, असा विचार करत मी बसून होतो. आता मात्र धीर संपत चालला होता. एवढे एक तासाचे सद्वर्तन, आपण इतर विषयातही कसे ज्ञानी आहोत हे दाखवण्यासाठी त्यांच्या चर्चांमध्ये घेतलेला सहभाग. हे सगळं सत्कारणी लागणार की वाया जाणार हे सगळं त्या मुलीवर अवलंबून होतं.

पोबा काही त्या विषयाकडे वळायला उत्सुक नव्हते. आता सावळेश्वरांना चेव चढले होता. माझ्या कडे पाहून " ते सगळं ठीक आहे. पण अमेरिकेच्या हेल्थ इंशुरन्सवर लोकसत्तेत लेख आला होता. फार पैसे भरावे लागतात म्हणे तुम्हाला !" सावळेश्वर माझा अंदाज घेत म्हणाले. मला एकदम स्वदेस मधले गाववाले व त्यांना उतरे देणा-या मोहन भार्गवाची आठवण झाली. फक्त प्रश्न "सुना है वहां बहुत अमीर लोग रेहते है" असे नसून थोडे वरच्या पातळीचे व मराठीत होते. मी त्यांना फारशी माहिती नसेल म्हणून समजेल अशा शब्दात हेल्थ इंशुरन्स समजवायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात लोकसत्तेची तलवार माझ्यावर उपसून सावळेश्वर म्हणाले " ते ठाऊक आहे हो आम्हाला, पण ओबामांच्या हेल्थकेअर रिफॉर्म विषयी काय मत आहे तुमचं?"

अशा अग्रलेखाधारित प्रश्नांची पूर्वकल्पना मला अजिबात नव्हती. त्यामुळे त्यांना खेळीयाडी उत्तरे देवून भागणार नव्हतं. अमेरिकेतल्या हेल्थकेअरविषयीचे ज्ञान यांना इथे बसून काय करायचेय? उगाच नसत्या चौकशा, आपल्या मनपाच्या नळाला पाणी का येत नाही, कार्पोरेशन मधला भ्रष्टाचार, फार फार तर नगरसेवक कसा लुच्चा आहे अशा चर्चांमध्ये सहभाग घ्यावा. पण नाय. गडी ऐकायला तयार नव्हते. त्यांना माझ्याकडून खरंच काही तरी उत्तर अपेक्षित होतं. "प्रिइक्सिस्टिंग कंडिशन्स कव्हर होतील पण डेमोक्रॅट्स जे कवहरेज टू ऑल महणतायत त्या फंड्ची लायबिलिटी कोणावर आहे ते क्लिअर करत नाहीएत. बट आय स्टिल थिंक द रिपब्लिकन्स शुड सपोर्ट द बिल" या एक दोन वाक्यांनी अपेक्षित परिणामस साधला होता. कार्लेकर व सावळेश्वर गप्प बसले. कोण रिपब्लिकन अन कोण डेमोक्रॅट्स असल्या भानगडीत आपलं पितळ उघडं पडेल असा विचार त्यांनी केला असेल. पोमा मात्र मला बोलण्याचा काही फारशा प्रयत्न करत नव्हत्या. एक तर मी त्यांना आवडलो नव्हतो अथवा काकूंचा तायडीवर सार्थ विश्वास असावा ते ठावूक नाही.

आता सगळेच कंटाळले होते. माझ्या बहिणीची चुळबुळ सुरु झाली होती. संध्याकाळाच्या स्वागत समारंभासाठी तिला घरी जाऊन नट्टापट्टा करायचा होता. त्यामुळे लवकर निघा असं ती मला खुणवू लागली होती. मी महाडेश्वरांकडे पाहून भुवया उंचावून खूण केली. पोबाला माझी ही खूण दिसावी याची योग्य ती काळजी मी घेतली.
पोबाने माझ्याकडे पहात व किंचित हसत विचारले, "मुलीला बोलवायच का?" च्यायला हा काय प्रश्न झाला का? "नाय काका इथे मी तुमचा ८०चा स्ट्रगल, लॉचं ज्ञान व ओबामाची क्रांती या विषयांअर बोलायला आलो होतो ! उगाच मुलीला मध्ये कशाला आणता, तुमचे अगाध ज्ञान पाहून माझं मन आदरानं भारून गेलं आहे. सासरा करीन तर तुम्हालाच अशी मी खूणगाठ बांधली आहे. तेव्हा फक्त मुहूर्त काढा, मुलीला पाहण्याचे सोपस्कार कशाला" असं बोलून दाखवावं असा विचार होता. तेवढ्यात महाडेश्वर मदतीला धावून आले व म्हणाले "बोलवा बोलवा आम्हाला जरा उशीर होतोय"

अचानक पोबा माझ्याकडे पाहून म्हणाले "उठा", मी म्हटलं च्यायला काय झालं पोग्राम संपला की काय. ह्यांना राग बिग आला की काय. पोबा उठले व मला हातानी उठण्याची खूण करु लागले. मी गोंधळून गेलो. मला म्हणाले "अहो उठा म्हणजे उठा व इकडे बसा". मला काही कळेना. मी म्हटलं "असू दे मी इथे कंफर्टेबल आहे". पोबा ऐकायला तयार नव्हते. महाडेश्वर म्हणाले "सांगतायत तसं करा". मी निमूटपणे उठून सांगितलेल्या ठिकाणी बैलाप्रमाणे जाऊन बसलो. च्यायला लग्न करायचे म्हणजे काय काय करायला लागते. असा विचार करत मी चरफडत बसलो. पोबा वदले. "अहो शुभकार्यासाठी तुम्ही पूर्वाभिमूख असणं महत्त्वाचं ! आमच्या गुरुजिंनी सांगितलंय." मनातल्या मनात गुरुजींचे मी आभार मानले. कारण फक्त पूर्व दिशेकडे तोंड करुन बसण्यावर भागलं होतं नाही तर गुरजींनी मुलाला डावा हात कमरेवर व उजवा हात शिखेवर ठेवून उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभे रहायला सांगितलं असतं तर कार्ल्यानी मला तसा उभा केला असता.

पडदा हलला. माझं लक्ष तिकडे गेलं आणि एकदाचा तो महान क्षण उगवला. कन्या खाली मान घालून चालत येताना दिसली. ती येवून समोरच्या खुर्चीवर जावून बसली. म्हणजे मी खोलीच्या एका टोकाला व मुलगी खोलीच्या दुस-या टोकाला एकमेकांकडे तोंड करुन बसलो. जास्त डोळे फाडून बघतोय असं वाटू नये म्हणून तिच्याकडे बघायचे टाळत होतो. तेवढ्यात महाडेश्वर बोलले "मुली पेक्षा मुलगाच जास्त लाजतोय वाटतं ! हॉ हॉ हॉ" हा त्यांचा बाष्कळ विनोद कसा बसा पचवला. मुलीकडे धीर एकवटून पाहिले. ती मला स्माईल देत होती. आयला स्माईल ! "स्माईल दिली म्हणजे पोरगी फसली" हे ज्यूनिअर कॉलेज मधले गणित आठवले. पण इथे स्थळ काळ वेगळा होता. मी ही जबरदस्तीची एक स्माईल मुलीला फेकून मारली.

एक दोन मिनिट शांतता पसरली. कोणी काहीच बोलेना. पोबाने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाले "हं करा सुरुवात !" मी चपापलो. सुरवात? ही काय मिरवाणूक आहे की शर्यत? सुरुवात करा म्हणजे काय करा? पोबा माझ्याकडे पाहून म्हणाले "विचारा काय विचारायचे ते." मी थोडा हपकलोच च्यायला हे असं? अशा वातावरणात आपण काय विचारणार आणि ती तरी काय उत्तरे देणार. मी म्हटलं, "मला असां काही विचारायचं नाही !" तेवढ्यात महाडेश्वर सावरुन बसले. "मी विचारतो" म्हणाले. मी म्हटलं विचारा.

झालं काकांनी जंगलात आरोळी ठोकावी किंवा कॉपी करतना पकडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षक विचारतो तसं खडसावून विचारलं "हं, नाव सांगा?". या जोरदार प्रश्नाने मुलगी बिचारी एकदम भेदरून गेली. अगदी मंद आवाजात तिने आपलं नाव सांगितलं "कु. श्रद्धा कार्लेकर". कुमारी !!! इथे काय शाळेच्या गृहपाठाच्या वहिवर नाव टाकतेय की काय ही? असा विचार आला पण एकंदरित तिची भेदरलेली अवस्था पाहता ते मी फारसं मनावर घेतलं नाही. तिचं उत्तर येतं न येतं तेच महाडेश्वरांनी तोफेतून दुसरा प्रश्न त्याच ढंगात डागला "शिक्षण?", मुलीने तसंच भेदरलेल्या अवस्थेत "B.E. फ्रॉम अबकड इंजिनिअरिंग कॉलेज" असं उत्तर दिलं. मला काही हस्तक्षेप करु न देता काकांनी तिसरा प्रश्न सोडला "छंद काय काय आहेत?" अशा टेन्स वातावरणात काय छंद सांगणार कप्पाळ. सगळे जण मुली कडे पहायला लागले. मुलगी माझ्याकडे पहायला लागली. मी आता अस्वस्थ झालो होतो. न रहावून मी म्हणालो "छंद नसले तरी मला चालेल. आणि सध्यासाठी एवढे प्रश्न मला वाटतं पुरे आहेत". माझा तो पवित्रा पाहून सगळे जरा थंड पडले. कुठून दुर्बद्ध झाली व महाडेश्वरांना सोबत नेले असं झालं होतं.

पोबाने परिस्थिती ओळखून "तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही दोघे आत बसा" असं सांगितलं. पोबा तायडीस उद्देशून वदले "तायडे, यांना घेवून जा आत". तायडी माझ्याकडे न पाहता तडक चालायला लागली. मी तायडीच्या मागोमाग आतल्या खोलीत गेलो. तायडी अजूनही टेंशन मध्येच होती. तिला हलके करण्यासाठी मी म्हणालो "काका जाम सुटले होते ना बाहेर!" तायडी हसेल अशी माफक अपेक्षा होती. ती माझ्या या बोलण्यानेच भेदरल्य़ा सारखी वाटली. "काकांना असं कसं बोलतो हा !!!" असे भाव तिच्या चेह-यावर दिसायला लागले."नाही तसं काही नाही. सवय आहे मला अशा प्रश्नांची, मोठी माणसं असंच विचारत असतात" असा पाठ तायडीने आम्हाला पढवला. प्रत्यक्ष प्रश्नाला हात घालण्यापेक्षा. इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात म्हणून मी आपणहून स्वत:ची माहिती दिली. इथे वाढलो, अमुक कॉलेजात शिकलो, इथे इथे नोकरी करतो. तायडी काहीच बोलेना. माझं बोलणं संपलं. मग एक मिनीट शांतता. पुन्हा वातावरण टेन्स. अशा प्रसंगांमध्ये संवाद टिकवणे लय अवघड. खंड पडला की मुद्दाम विषय उकरुन काढल्या सारखे वाटते व वातावरण उगीच गंभीर बनते. ती अजून भेदरलेली दिसत होती. व स्वत:च्याच घरात इकडे तिकडे बघत होती. तिला प्रश्न विचारले तर अजून घाबरायची म्हणून मी इकडच्या तिकडच्य गप्पा मारल्या. मी कॉलेज मध्ये काय काय (अर्थात चांगल्या) गोष्टी केल्या ते तिला सांगितलं. एक दोन धमाल प्रसंग सांगितले. तरी तायडी अक्षरश: माठा सारखी बसून होती. चेह-यावरची एक रेष हालली नाही तिच्या. थोडा वेळ गेला होता. आता थोडं विचारायला हरकत नाही म्हणून मी जरा प्रश्न विचारायला सुरु केले. "(बयो)तुला विकांताला काय करायला आवडतं" तायडी: "मी लेक्चरर आहे. म्हणून फक्त रविवारची सुटी असते. त्यात मी सोम्मारच्या लेक्चरसाठी अभ्यास करते." मी म्हटलं ते ठीकाय गं पण कामाचं सोडून तुला समजा दोन आठवडे मोकळा वेळ दिला तर काय करशील? ’चक्रम आहे का हा?’ असे भाव घेवून तायडी माझ्याकडे पहायला लागली. माझी पहिलीच वेळ असल्याने आपण चुकीचे चेंडू तर टाकत नाही ना असं वाटायला लागलं. मी प्रश्न बदलला "कॉलेज मधे असताना काही ऑदर ऍक्टिव्हिटीज वगैरे?" तायडी ढिम्म मग एक मिनिटाचा पॉज घेवून "काही नाही". मी म्हटलं ठीके. "तुला काही छंद वगैरे". तायडी पुन्हा ढिम्म. मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. ती मख्खपणे म्हणाली "नाही. मला काही छंद नाही". मला काय बोलाव कळेना. सगळेच चेंडू हिच्यासाठी वाईड तर मग च्यायला विचारायचं तरी काय? "तुला आवडते अशी एकही गोष्ट नाही?" तायडी "नाही." आता मात्र कमाल झाली असं मला वाटायला लागलं. मी म्हटलं "काही तरी करत असशील ना"? तायडी "हो करते ना, बाबा जेव्हा स्वामींचं पारायण करतात तेव्हा मी पण जप करते". मी तायडीच्या माईशी तर बोलत नाही ना असा भास झाला. क्षणात देवासमोर बसलेलं ते भक्तिमय कुटुंब नजरे समोर आलं. हातात चिपळ्या घेवून मी त्यांना सामील झालोय हे चित्र मनात उमटताच घाबरून मी ते पुसून टाकल. मी म्हटलं तुला काही विचारायचं असेल तर विचार. तायडीने एक दोन मिनिटं विचार केला व धीर एकवटून विचारलं "तुम्हाला कोणता देव आवडतो?" तिला "कपिल देव" असं उत्तर द्यावं असं मनात आलं होत. कुजकट विनोद करुन कशाल तिचा हिरमोड करावा म्हणून मीच तिला उलट प्रश्न केला "देव डी पाह्यलायस का?" ह्यावर कन्येचा चेहरा अगदी कोरा. "बरं ते जाऊ दे, तुझ्या मैत्रीणी काय करतायत, कुठे असतात त्या" विषय बदलायचा म्हणून मी म्हणालो कन्या वदली "मला फारशा कुणी मैत्रीणी नाहीत. एक होती मग नंतर पाचवीला आमच्या शाळा बदलल्याने नंतर तिचा फारसा संबंध आला नाही." पोरीकडून अशी मिळमिळीत उत्तरे आल्याने आपण इथून गाशा गुंडाळून लवकरात लवकर निघालेलं बरं असं मी ठरवलं. स्वागत समारंभाला तरी वेळेत उपस्थित रहावं असा विचार करुन मी एकदम कल्टी मारण्याच्या पवित्र्या मध्ये तिला म्हणालो "एका भेटीत व्यक्ति कळणं तसं खूप कठिण, आपण आजच भेट्लोय तेव्हा तुला उरलेले प्रश्न फोन वर विचारतो " असं म्हणून मी जागचा उठलो. तिने माझ्याकडे पाहिलं. मी लगेच "निघुया का?" असा प्रश्न केला व उत्तराची वाट न पाहता चालायला लागलो. बाहेर आलो तेव्हा यांच्या चर्चा झडत होत्या. मी चालायचं का असं विचारताच महाडेश्वर म्हणाले. अरे दोन मिनिटं बसं असं लगेच निघता येत नसतं असं म्हणून आपल्या गप्पांकडे वळाले. मी निमूट पणे बसलो.

महाडेश्वर: "आहो ती काळ्यांची मुलगी आहे ना ती तिकडे महाजनांकडे दिली आहे. आमचे साडूचे सख्खे चुलत भाऊ आहेत ते. ते लग्न मीच जमवलं होतं. मीच होतो तिकडे मध्यस्त. इथंच पलिकडाच्या बोळात घर आहे त्याचं. हो आता परवाच घेतलं त्यांनी. तो प्लॉट आमच्या ऑफिस मधले व्हवहारेसाहेब आहेत ना त्यांचा होता. मीच मध्यस्ती केली तिकडे" महाडेश्वरांची बडबड काही थांबत नव्हती हे पाहून
अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे |
इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजं ॥

या सुभाषिताप्रमाणे मे मे करणा-या महाडेश्वररुपी बोकडाचा मीच बळी घेतो आहे असा भास मला झाला. एव्हाना सगळे कंटाळले होते. उशीर झाल्याने बहिणाबाई तर आता चिडून लाल झाल्या होत्या. शेवटी एकदाचा नमस्कार चमत्कार करुन आम्ही तिथून काढता पाय घेतला. सावळेश्वर सोडायला येतो म्हणाले पण मी रिक्षा करुन जातो म्हणून सांगितलं व घराबाहेर पळतच बाहेर पडलो. रिक्षात बसल्या बसल्या हास्याचे स्फोट झाले. व आत घडलेली हकीकत मी सगळ्यांना सांगितली. स्वागत समारोह कसा बसा गाठला. तो व्यवस्थित पार पडला व दोन दिवसांनी मी घरी परत आलो.

घरी विषय निघाल्यावर आईने मला विचारलं "काय रे तिकडे काही आगावू बोललास की काय तू?" मी म्हटलं "नाय ब्वा. का काय झालं?" आईचं उत्तर ऐकून मी उडालोच " चांगलं स्थळ घालवलंस बघ तू. त्यांनी नकार कळवलाय! " मी म्हणालो "काय? नकार? काही तरीच काय बोलतेस आई, तासाभरात कुठे काय कळतं आणि बरं झालं त्यांनी नकार दिला ते, सुंठीवाचून खोकला गेला." आईला माझ्याबद्दल काय वाटलं काय माहित आई म्हणाली. "अरे एवढं वाईट वाटून घेवू नको. तुला दुसरं एक स्थळ आलंय." मी: "हो का? कुठलंय?". आई म्हणाली "आटपाट नगरात राहतात. वडील एमएसईबीत अभियंते आहेत" मी विचारल, "काय नाव काय" आई "सावळेश्वर का असंच काही तरी आहे बघ" मी मोठ्याने चित्कारलो, "आई त्यांना लगोलग होकार कळवा !! जस्ट क्लोज यूवर आईज ऍंड टेल देम आय एम रेडी टू गेट मॅरिड!" आईने मला ताप बिप चढला की काय म्हणत माझ्या गळ्याला हात लावून पाहिला.

Comments (25)

हा हा.. खतरनाक लोक आहेत..
बर झाल अभ्या नाही तर तुझ्या घरात रोज भजन सुरू झाली असती...
आपले जुने दिवस विसरावे लागले असते..

ध..मा...ल...
बाकी काही शब्द सुचत नाहीयेत...नुसता हसतोय...

एकदम मस्त. Solid हसत खाल्ले तायडीचे पोहे.

Mala watata...taidi aani parivaar hyani 'Dev D' ha kuthala tari aadhyatmik chitrapat asawa ashi dharana karun CD aanun baghitali asawi...tu nakaracha kaaran vicharlas ka?

tumchya kade ulti paddhat aahe ka? mulgi kadle nakar kasa kalavtat? tu tithach nako mhanayla pahije hotas mag

Abhijit.....anubhav aikun vatale.."are baap re" !!!!! sankatatun sutka?!!! [:D]

सहीच न..!! धमाल वाटली ऐकून...
विडियो ऐकत ऐकत पूर्ण blog-post वाचली...

sahi sahi sahi....

सर्व नव्या वाचकांच ब्लॉगवर स्वागत !!

@Aniket अरे एकसे एक लोक भेटतात.
@प्रोफेट प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
@सोनाली केळकर तुम्हाला पोहे चवदार वाटले त्याबद्दल आभारी आहे.
@The Zeus कल्पना छान आहे ! कदाचित पाहिलाही असता.नकाराचं कारण नाय विचारलं रे. आमचा मोकळेपणा झेपला नसेल कदाचित.
@मनोज:आपण कशाला नकार कळवा. त्यांनी कळवला ना तेच बरं झालं ! कोण आधी बोलतो त्यात काय रे एवढं परिणाम तोच.
@गौरी: अशा आग्र्याहून अनेक सुटका आम्ही करुन घेतल्या आहेत. आता कायमचे कोण अटक करते ते पाहू !
@केदार: व्हिडो पाहिल्याबद्दल लय आभारी आहे. असेच वाचत ऐकत रहा.
@एबीएस प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

hehe bharpur prashn vicharales re tu!
1.wat answers wud u giv if gal wud hav asked u same questions?
.
2.does every1 giv true answers to such questions in first meet?
.
3. Wil u judge ya wud b fiancee by her answers / the way she reacts to ya questions?

LOLz

अभी ,
खतरनाक !! पोहे जबरी बनवलेत. केवळ मस्त
एक शंका -
एकूण विचार करता, मला वाटत नाही कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर कांदेपोहे खायला जायची वेळ तुझ्यावर आली असेल.
ते तुला रोजच्या रोज न मागता मिळत असणार !!!!!!

>>>>> पोबाने माझ्याकडे पहात व किंचित हसत विचारले, "मुलीला बोलवायच का?" च्यायला हा काय प्रश्न झाला का? "नाय काका इथे मी तुमचा ८०चा स्ट्रगल, लॉचं ज्ञान व ओबामाची क्रांती या विषयांअर बोलायला आलो होतो ! उगाच मुलीला मध्ये कशाला आणता, तुमचे अगाध ज्ञान पाहून माझं मन आदरानं भारून गेलं आहे. सासरा करीन तर तुम्हालाच अशी मी खूणगाठ बांधली आहे. तेव्हा फक्त मुहूर्त काढा, मुलीला पाहण्याचे सोपस्कार कशाला" असं बोलून दाखवावं असा विचार होता. तेवढ्यात महाडेश्वर मदतीला धावून आले व म्हणाले "बोलवा बोलवा आम्हाला जरा उशीर होतोय"

च्यामारी पोरीचा बाप जर असा timepass करायला लागला तर मात्र पोह्यांच्या कार्यक्रमाला काय अर्थ उरतो की नाही? बर केल निल्याने मला सावध केला!!

अरे निल्या पुढचेही भाग येउ दे की पटपट!!!!!!!

वा पेशवे वा! लग्नाच्या या दिव्या युध्ाचे तुमचे अनुभव खतर्नाकच आहेत... तुम्ही आत्ता गनिमी काव्यात पटायीत झाला आहात! तुम्हास लवकरच अन्तीम
लढाईत यश मिळो ही कामना.

लेखा छान आहेत ऑडियो विषयी काही सूचना ना पातल्यास गोड मानून घ्याव्या! आवाजात सातत्त्याचा जरा अभाव वाटला तसेच आवाजात अजुन चढ उतार आले आसते तर छान वाटले आसते.

पण एक खूप छान प्रयत्ण.

"हे पोहे आमच्या तायडीनेच बनवलेत बरं का !" "हो का? खरंच, ताई छान बनवातात पोहे"

ब्लॉग वाचून इतका कधीही ह्सलो नाही. जबरदस्त!!!!!!!!!!!!!!!

:D majja ali vachun..

mala mazya taaila baghayala alaycha diwas athwala ...asach ..similar prasang hota..ani me lahan asalyaane maze kaam..khidakeechyaa kopryaatun pratyek prashanpathi "Mishter Groom" chya chehryavarche bhav kase badalatat..ani kandepohyatale (Muddam) laamb chirun ghatlele kande kase khato ..he sagal agdee savistarpane mazya"Tayadi" la varnan karane he hote.lolz..

मस्त आहे पोस्ट. सुटलं होतं वाचायचं.. :)

chan ahe - well done - keep it up and all the best, regards, unmesh bhome

मस्त मस्त मस्तच........लै भारी... :)

लईच भारी. विशेषतः शब्द भांडार खूपच व्यापक आणि समर्पक आहे. धन्यवाद!

निल्या, To be very frank......... पण हे जे काही विडंबन तू बनवले आहेस ते मला तरी काही फार से आवडलेले नाही.....

khoop diwasani ewdha hasat hoto :D
ekdam kadak! :)

:D :D :D
___/\__
khup ch late sapadala mala ha blog
apratim ahe :D :D

पोबाने माझ्याकडे पहात व किंचित हसत विचारले, "मुलीला बोलवायच का?" च्यायला हा काय प्रश्न झाला का? "नाय काका इथे मी तुमचा ८०चा स्ट्रगल, लॉचं ज्ञान व ओबामाची क्रांती या विषयांअर बोलायला आलो होतो ! उगाच मुलीला मध्ये कशाला आणता, तुमचे अगाध ज्ञान पाहून माझं मन आदरानं भारून गेलं आहे. सासरा करीन तर तुम्हालाच अशी मी खूणगाठ बांधली आहे. तेव्हा फक्त मुहूर्त काढा, मुलीला पाहण्याचे सोपस्कार कशाला" असं बोलून दाखवावं असा विचार होता.

agadi bhannat