भित्यापाठी ब्रह्मराक्षस !

Category:

प्रतिक्रीया 

निलेश चा फोन आला आणि तो म्हणाला "अब्बे,ब्रेकिंग न्यूज". मी म्हटलं काय झालं बाबा आता? नाहीतरी पोल्ट्री मध्ये एका कोंबडीने मान टाकली की इतर सगळ्या कोंबड्या पटापट माना टाकतात त्याच गतीने आमचे मित्र कसली तरी लागण झाल्या प्रमाणे पटापट "कमिट" होत होते. मला वाटलं आता आणि कोण गेलं??...मनात पटकन उरलेल्या मित्रांचे चेहरे येवोनी गेले. पण त्यातल्या कुणा नराचे (पर्यायने नगाचे) अफेअर होईलसे असे कोणी शिल्लक नव्हते. मग मीच धीर न धरवल्याने विचारलं पटकन सांग बाबा कोणाचं ठरलं?
तो म्हणाला "अबे ठरलं नाही कोणाचं." मी म्हटलं मग? तसा तो म्हणाला "दिवा चा ऍक्सिडेंट झालाय !" मी जरा आश्चर्य चकित झालो आणि थोडा बेफिकिरही. कारण दिवाचा कसा काय ऍक्सिडेंट होणार? शक्यच नव्हतं ते. मला वाटलं खरचटलं बिरचटलं असेल. पण निलेश म्हणाला पायाचं हाड तुटलंय! रॉड टाकलाय. मग मात्र मी ते कसं शक्य असेल याचा विचार करु लागलो.
दिवा म्हणजे आमचा मित्र दिवाळकर. त्याचं नाव आम्ही दिवा ठेवलं होतं. अशाच शॉर्टफॉर्म्स चा एक किस्सा म्हणजे मी इंडियाला गेल्यावर कोणाला कधी भेट्णार आहे याचं वेळापत्रक बनवलं होतं.त्यात मी Nov 17th-Mala असं लिहून ठेवलं होतं. आमच्या मोठ्या बंधुराजांना आणि मित्रांना ती फाईल पाठवली. लोकांना माला कोण हा प्रश्न पडला. साल्याने कुठे सूत तर जुळवले नाही ना असे मित्र बोलू लागले. लाभले भाग्य आम्हास न ते..हे आमचे मित्र काही समजून घ्यायला तयार नव्हते. आमचा खुलासा Mala म्हणजे माझा इंजिनिअरिंगचा मित्र "माळाकोळीकर". त्याचं अख्खं नाव कुठे लिहित बसा म्हणून फक्त Malaच लिहिलं. या थेअरीवर कोणी विश्वास ठेवेना. होता होता त्यांना ते मान्य झाले.

तर दिवाचा ऍक्सिडेंट होणे म्हणजे एखादा चवथी पाचवीतला मुलगा "भलत्या" आरोपांसाठी पकडला जाण्या सारखे होते! आता का? दिवा तसा एकदम पापभीरु वगैरे कॅटेगरी मधाला पोरगा. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग च्या आमच्या वर्गात होता. त्याला पाहून तो मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग करणार यावर विश्वासच बसत नसे. एकदा आम्ही असेल आमच्या कॅन्टिन जवळ कटिंग पीत उभे होतो. तिथे काही ऍटलस सायकली "पार्क" केल्या होत्या. (लहानपणी मला NO Parkingच्या बोर्डचा अर्थ उद्यानात खेळण्यास मनाई आहे असाच वाटायचा!असो). तर आम्ही असेच बोलता बोलता कोणाचा तरी धक्क लागला आणि एका ऍटलस चे स्टँड निघाले. ते मेन स्टँड असते ना ते. म्हणजे जे लावण्या साठी सायकल ओढावी लागते ते. दिवा जवळच उभा होता. मी म्हटलं दिवाला "अरे मी धरलीये सायकल तू स्टँड लाव". यावर दिवाने जे काही उत्तर दिलं होतं ते अगदी ऐतिहासिक होतं! म्हणजे कॉलेज च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग च्या इतिहासात बोल्ड अक्षरांनी लिहून ठेवावं असं. आमच्या कडे असाही एक विद्यार्थी होवोनी गेला!! काही अंदाज करायला जाउ नका. त्याचं ते ऐतिहासिक उत्तर होतं "मला स्टँड लावता येत नाही ..."
ऐकणारे सगळे गार झाले.मला वाटलं लेकराची ऐकण्यात काही गडबड झाली असेल म्हणून पुन्हा सांगितलं..अबे सायकलचं स्टँड म्हणतोय मी. त्यावर पठ्ट्याचं उत्तर अगदी मंद आवाजात "अरे मला येत नाही"!! काय रिऍक्शन द्यावी हेच कळेना.मी मग भनकलो. अबे मेकॅनिकल ला आला ना तू साधं सायकलचं स्टँड लावता येत नाही.
त्या प्रसंगापासून मी नेहमी त्याची शाळा घ्यायचो. प्रश्न विचारायचो आणि फुकटात ज्ञानदान करायचो. टपल्या मारायचो त्याला डिवचायचो. त्याची रिऍक्शन एकच यायची. "निल्या तू जरा व्यवस्थित रहा!!!"
सांगायचा उद्देश. आमचा दिवा हा असा होता. त्याचा आणखी एक गुण म्हणजे त्याला कुठचीही टू व्हिलर येत नसे. अजूनही येत नाही. इंजिनिअरींग ची चारही वर्षे तो कोणाच्यातरी पाठकुळीला बसून येत असे. एकदा तर मी त्याला पल्लवीच्या स्कूटी मागे बसून जाताना पाहिलंय. अगदी विलोभनीय होतं ते चित्र. हा गोंडस सभ्य बाळ तिच्या मागे त्याचं ते टिपिकल दप्तर घेउन बसलेला.
दिवाने अयुष्यात कधी गाडी चालवली नाही आणि आपल्याला येत नाही याचं फारसं काही वाटत नव्हतं. या जनरेशन मध्ये गाडी न येणं म्हणजे दुसर्यावर किती डिपेंडंसी. पण मामा कडे वगैरे जाताना हा रिक्षाकरुन जायचा.त्याला सगळे मित्र डिवचायचे त्यामुळे शिकण्याचा निर्धार करुन त्याने एक दिवस स्कूटी चालवायचे ठरवले. अनुराग पत्क्याने आपल्या स्कुटीची तमा न बाळगता त्याला शिकवण्यासाठी व्हॉलंटिअर केलं. त्या दिवशी दिवा स्कूटीला घेउन धडपडला. पतक्याच्या गाडीची नुसकानी झाली आणि दिवाची गाडी शिकण्याची शेवटली संधी पण हुकली.

दिवा एकदम सरळ मनाचा निष्कपट माणूस.कसलीही डिमांड नसलेला. त्यामुळेच तो आमचा खास बनला. फर्स्ट इयर ला आमच्या ड्रॉईंगशीट पण बनवून द्यायचा. जमेल त्याला जमेल तशी मदत तो करायचा. नंतर नोकरी लागल्यावर साहेबांच्या घरी कंपनीची बस यायची. अगदी स्कूलबस जशी पोरं गोळाकरत फिरते तशी यांच्या कंपनीची बस फिरायची म्हणून साहेबांचं भागत होतं. मग औरंगाबाहून दिवा पुण्याला चांगला जॉब मिळाला म्हणून आला होता.
इकडे पण तो पेम्टी (PMT)नेच फिरायचा. त्याचा ऍक्सिडेंट व्ह्यायचा म्हणजे पेम्टीच पलटायला हवी होती. काही समीकरण लागत नव्हतं.नक्की काय झालंय हे विचारावं म्हणून त्याला फोन केला.

मी "काय दिवा धडपडलास म्हणे ! कुठे आहेस आत्ता?" दिवा- "अरे संचेती मध्ये आहे. पायाचं हाड तुटलंय. रॉड टाकलाय. उद्या एक ऑपरेशन आहे." मी "होय काय. कसं आहे रे हॉस्पिटल? च्यायला नेहमी बाहेरनंच पाहायचो मी! सही आहे तू आत गेलास." दिवा अजिबात न चिडता हॉस्पिटल बद्दल सांगायला लागला. मग मी त्याला आजुबाजुला चांगल्या पेशंट्स कोणी असतील तर सूत जुळवून टाक असा सल्ला दिला. दिवा म्हणाला"अरे काय घेउन बसलायसं. हाड जुळवायला आलोय मी इथे सूत नाही". तर पहिली ५ मिनिटे अशा संवादात गेल्यानंतर मी विचारलं "अबे ते जाउ दे आता ऍक्सिडेंट कसा झाला ते सांग."

तर त्याचं असं झालं होतं की साहेब पिम्टी मधून जात होते. स्टॉप आला आणि दिवा उतरायला लागला. उतरुन एक सेकंद होतो ना होतो तोच समोरुन एक सुमो येउन याच्या पायावर धडकली. पायाच्या हाडाचे किटकॅट चॉकलेटच्या जाहिरातीत करतात तसे तुकडे झाले! लोक गोळा झाले. याला त्याच सुमो मध्ये टाकून हॉस्पिटलला नेण्यात आले. एक ऑपरेशन त्याच दिवशी झाले. दुसरे एक दोन दिवसात करायचे आहे. तो म्हणत होता "अरे हाड तुटलं ते दिसत होतं मला". मी म्हटलं अरे लेका मग मोबाईलच्या कॅमे-याने फोटो नाही का घ्यायचास !!


अशा मस्करी नंतर त्याला जगाचा न्यायच असा आहे हे समजावलं. आपण धावत पळत स्टॉप वर पोचल्यावर कळतं की बस अत्ताच गेली. आपण जेव्हा वेळेच्याआधी पोचतो नेमकी त्या दिवशी बस लेट असते. भरपूर अभ्यास केलेल्या सब्जेक्ट मध्येच कसेबसे ४० येतात. न अभ्यास केलेल्या विषयात मटका लागतो. नेमका आपण स्किप केलेले प्रॅक्टिकल (किंवा प्रोग्राम) आपल्याला परीक्षेमध्ये येतो मग बदलून घेण्याचे ५ गुण वजा होतात. अख्ख्या बॅच मध्ये असं करणारे नेमके आपणच असतो. परीक्षेमध्ये सर्रास चिठ्ठ्या मारणारे कधी न पकडले जाउन रिकाम्या जागा भरा मधली एखादी रिकामी जागा आपण कोणाला तरी विचारतानाच परीक्षकाचे लक्ष आपल्याकडे जाते. एखाद्या मुलीला शाळेत असताना आपण आवडत होतो हे आपले लग्न झाल्यावरच कळते.टिचिंग अस्टिंटशिपची जागा आपल्याच मित्राला मिळाल्यावर ती गेल्याचे कळते! आपण इंडियाचं तिकिट काढल्यावर नेमकं दोन चार दिवसांनीच ते २००$ नी स्वस्त होतं! इकॉनॉमी मधनं बिलियन्स ऑफ डॉलर्स आरामात नेणा-यांना काही होत नाही आणि एखाद्या रविवारी दुपारी बाबा झोपले आहेत हे पाहून त्यांच्या पाकिटातनं ५ रुपये काढताना आपणच पकडले जातो !

तर लोकहो स्कंध पुराणाचा हा अपघाताध्याय अम्ही इथेच संपवतो. तयाचे तात्पर्य हेच की कोणासोबत काहीही होउ शकते. हे आता आम्ही ध्यानात घेतले आहे.दिवा चा ऍक्सिडेंट होउ शकतो तर माझे पण एक दिवस लव्ह मॅरेज झाले तरी त्याचे फारसे आश्चर्य मानुं नयें !आपला(अभिलाषी)
अभिजित!