चला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही ! (अध्याय २ -अंतिम)

Category:

प्रतिक्रीया 


अध्याय १- येथे वाचा.


आमच्या घरात मत्कुणांचा उत्पात झाला होता या संकटविमोचनासाठी मत्कुणोपद्रवनिवारक कंपनीला आम्ही पाचारण केले. त्यांनी “गर्भार महिलेसाठी घ्यावयाच्या काळाज्या” छाप सूचना एका कागदावर लिहुन अम्हाला दिल्या.


घरातले सगळेच्या सगळे कपडे धुवायला सांगितले. कंपनीवाला कोकणस्थ असता तर "लंगोटी सुद्धा शिल्लक ठेवूं नका बरे!" असं सुद्धा सांगितलं असत. बुधवार पर्यंत सगळे कपडे धुवून ४० मिनिटे ड्रायर मध्ये सुकवून प्लॅस्टिकच्या थैल्यांमध्ये सील करुन ठेवा, असा आदेश (बांदेकर नव्हे !) आम्हाला त्यांनी दिला. त्यानंतर ते संपूर्ण घरात फवारणी करणार व मत्कुणाचा नायनाट होणार होता. पण एवढं सगळं करुन चुकुनही एक जरी आनंदी जोडपं त्यातून सुटलं तरी नवी मिलिट्री उभी करायला त्यांना फारसा वेळ लागत नाही. गोष्ट सिरिअस होती. आम्ही सुद्धा "मत्कुणाचे उच्चाटन केल्या शिवाय केसांना जेल लावणार नाही !" असे प्रतिज्ञा केली असल्याने पेटलो होतो.


मंगळावारी संध्याकाळी ऑफिसातून आल्यानंतर कार्यारंभ जाहला. सगळे कपडे चादरी, जॅकेट्स गोळा केले. एक चिरगुटही शिल्लक ठेवले नाही. जपानी ट्रेन मध्ये तिथेल पोलीस जशी माणसे कोंबतात तसे कपडे मिळतील त्या बॉक्स मधे बॅग मध्ये कोंबले. आमचा एक रुम पार्टनर घरी नसल्याने त्याचे सर्व कपडे आम्हलाच पॅक करणे भाग होते. घरात एक मोठा बॉक्स होता. त्यात त्याचे सगळे कपडे बसवले. वर चार वेळा नाचलो. (तो माझा ब्लॉग वाचत नाही त्यामुळे भ्यायचा प्रश्न नाही !) प्रश्न उरला होता तो सुटांचा. सूट साध्या लॉडरी मशीन मध्ये टाकता येण्या सारखे नव्हते. हा एक फार डोक्याला ताप झाला होता. सूटाची अगदी सासुरवाडी सारखी गत असते. कामाला कधी तरीच येणार पण सांभाळणेच जास्त ! अनुभवाशिवाय लिहितोय पण, “विष खाल्ल्यावर माणूस यमसदनी जातो” ही काही स्वत: केल्याशिवाय कळत नाही अशी गोष्ट नव्हे. डोळे उघडे ठेवून जगणा-या कोणत्याही सुजाण व्यक्तीस हे सत्य सहज उमगेल. सुटाचा प्रश्न जास्त गहन होता. महिन्याला एक दोन फोन बाबांच्या तब्येतीची चौकशी एवढ्यावर ते प्रकरण सुटणारं नव्हतं. सुटांच्या ड्राय क्लिनिंग साठी आख्खे ३० डॉलर खर्च होणार होते. एवढ्या पैशात देशात नव्या सुटाची शिलाई सुटली असती. सूट कव्हर फाडून आत घुसून अंडे देण्याची ढेकणाची एवढी प्रबळ इच्छा होईल असे वाटत नव्हते. म्हणून आम्ही सूट धुवायचा कार्यक्रम बस्तानात व सूट ट्रॅशबॅगमध्ये गुंडाळून ठेवला. कपड्यांच्या गठ्ठ्यांचे धूड वाहून नेताना भिजलेला कापूस वाहून नेणा-या गोष्टीतल्या गर्धभासारखी अवस्था झाली होती. कार पर्यंत कसे बसे ओझे वाहून नेले. कपड्यांचा एक मोठा बॉक्स आम्ही दोघे (दोघे म्हणजे रुममेट आणि मी) मिळून उचलून नेताना, शेजारीपाजारी बघायला लागले. समोरच्या बाल्कनीत पण मंडळी जमा झाली. काही जण तर आपण क्राईम सीन चे साक्षीदार झालो आहोत अशी मुद्रा घेऊन आमच्या कडे संशयाने बघायला लागले.


आम्ही चहु बाजुने दगड खाणा-या लैलेचे स्मरण केले व आपलि परिस्थीती एवढी काही वाईट नाही अशी समजुत घालून कामाला लागलो. कार सुरु केली व अपार्टेमंटच्या लॉंडरी रुम पर्यंत आणली. सर्वात जड गठोडे आधी हातावेगळे करावा म्हणून ते उचलले. धापा टाकीत दारापाशी पोचलो तर दारावर काही तरी चिठोर चिकटवले होते. उद्या पहायला पाहुणे येणार आणि आज चेह-यावर मुरमाचा फोड उगवावा अशा तरुणी सारखं, “हे आजच व्हायचं होतं का?” हा आगतिक प्रश्न आम्ही तितक्याच क्लेषाने उच्चरला. कारण दारावरचा संदेशच तसा होता,

Sorry for the Inconvenience but the Laundry will be closed till Friday


आमचे फवारणी वाले फवारणी करायला उद्या येणार होते आणि आम्ही हतबलपणे कपड्यांचे गाठोडे घेउन लॉंड्री पाशी उभे होतो. फावरणी कार्यक्रम पुढे ढकलावा तर एवढे सगळे गाठोडे पुन्हा घरापर्यंत न्यायची आणि शनवारी ते पुन्हा आणायची कसरत करावी लागणार होती. शिवाय विकेन्डचा व ३ रात्रींच्या झोपेचा चुराडा होणार हे दिसु लागले. मग पर्यायाची शोधाशोध सुरु झाली. शेवटी दुस-या एका मित्राच्या अपार्टमेंट मधली लॉंड्री वापरण्याचा निर्णय घेतला. लॉंड्री रुमची चावी मागण्यासाठी त्याला कॉल केला. तो बाहेर गेला होता. पण सुदैवाने लवकर परत आला. व जास्त वेळ न ताटकळता आम्ही चावी हस्तगत केली. स्मार्ट कार्ड २०$ ने चार्ज केले. व आम्ही शूर शिपाई युद्धावर निघालो. एक एक मशिन भरता भरता नाकी नउ आले होते ! आमच्या कडे एवढे कपडे असतील असे वाटले नव्हते कारण एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल १५ लॉंडरी मशिन्स भरल्या. एवढं करुनही काही कपडे उरलेच होते. मग त्यांची कोंबाकोंबी केली. त्या रात्री त्या लॉंड्रीचे आम्ही सम्राट होतो. आम्ही एकही मशिन रिकामी ठेवली नव्हती. हे सगळी सेटिंग करे पर्यंत ९ वाजले होते. जेवणाच्या नवाने बोंब होती. एका मित्राला फोन करुन जबरदस्तीच “आम्ही आज तुमच्या कडे जेवायला येत आहोत बरं का !” असं लाडिकपणे सांगितलं. रणांगणात कपडे तसेच टाकून आम्ही जेवण्यास गेलो. जेवून परत आलो. आता कपडे सुकवण्याचे काम करायचे होते. ड्रायरचे एक चक्र एक तास चालते. त्यात वाळले तर नशीब नाही तर आणखी एक चक्र. १५ ड्रायर्स मिळणे अशक्यप्राय होते. जेमतेम ६ ड्रायर उपलब्ध होते. याचा अर्थ अम्हाला उशीर होणार आणि सगळं वेळेचं गणित बोंबलणार हे दिसायला लागलं होतं. शेवटी जमेल तेवढे कपडे कोंबायला सुरुवात केली. एक ड्रायर रिकामे झाले की त्यात दुसरे कपडे लावायचे. एक संपले की दुसरे आणि दुसरे संपले की तिसरे. ड्रायिंगच्या या चक्राचे चक्रव्यूह सांभाळता सांभाळता आमचा अभिमन्यू झाला होता. एक. रात्रीचे ११ वाजले आणि एवढ्या मेहनतीचं फळ होतं: अर्धे कपडे अर्धवट वाळलेले व अर्धे कपडे रामाच्या मळक्या गंगेच्या नायिके प्रमाणे चिंब ओले !


हे कमी होते की काय म्हणून आणखी एक सर्प्राईझ आमच्या साठी ठेवले होते, कपडे ड्रायरमध्ये टाकताना लॉंड्री मशिनने काय रक्तपात केला होता ते दिसायला लागले. माझे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच नवे फेवरेट टि शर्ट्स डागाळले गेले. कित्येक कपडे तिथेच फेकून द्यावे लागले. पांढ-या कपड्यांनी प्रेमात पडल्याप्रमाणे गुलाबी रंग धारण केला होता. त्यातून आमची गांधी टोपी ही सुटू शकली नाही. ती गुलाबी झाल्याने घालायची सोय राहिली नव्हती. (गुलाबी हा रंग गांधी या व्यक्तिमत्वाला शोभला असता पण टोपीला नव्हे !)


५-६ शर्ट युद्धात कामी आले तरी अंतिम विजयासाठी आम्ही लढाई सुरुच ठेवली. पाहता पाहता रात्रीचे १२ वाजले. आमच्या आशा ज्या ड्रायिंवर चक्रावर अवलंबून होत्या त्याने दगा दिला होता. कपडे अर्धवट ओले राहिले होते. त्यामुळे आणखी एक चक्र लावावे व उद्या दुपारी येवून कपडे घेवून जावे असे ठरले. मिशन अर्धवट सोडून सर्व ड्रायर लावून आम्ही घरी परतलो. दुसर-या दिवशी जाउन कपडे घ्यायचा प्लान होता. त्यानुसार तेथे पोचलो तर तिथे वेगळाच गहजब सुरु होता. सगळे ड्रायर अडवले म्हणून लोक तक्रारी करायला लागले होते. कोणाचे आहेत एवढे कपडे असे विचारु लागले. मित्राच्या बाईकवर मागे बसून फिरताना अनपेक्षितपणे पिताश्री समोर यावेत अशा कन्ये प्रमाणे आम्ही अगदी शरमेने मान खाली घालून तिथून कपडे आवरुन काढता पाय घेतला. कहर म्हणजे रात्रीच्या एक्स्ट्रा ड्रायिंग सायकल नंतरही कपडे ओलोच राहिले होते. पण तिथे जास्तवेळ थांबण्यात रिस्क होती. उगाच ऑफिस मध्ये तक्रार गेली तर मित्र गोत्यात यायचा. म्हणून कपडे असेच गोळा करुन आम्ही निघालो.आता पर्यंत तब्बल ४० $ चा चुराडा झाला होता.


इकडे घरात फवारणी झाली होती. व शत्रुचा नि:पात झाला होता. पण रिस्क नको म्हणून कपड्यांचे बोचके कार मध्येच ठेवले होते. व्हायचे तेच झाले. सर्व कपड्यांनी विचित्र दर्प धारण केला. आणखी एकदा धुतल्याशिवाय तो जाणार नव्हता. त्यामुळे आणखॊ ४०$ चे चंदन लागणार हे पाहून मनाला यातना झाल्या. २४ तास कार मध्ये राहिलेले कपडे आम्ही तीनमजले चढून घरात आणले. आणि वाळवण्यासाठी गॅलरी मध्ये पसरवून ठेवले. ही लॉंड्री किती महागात पडली ते हळूहळू कळायला लागले होते. घालण्यासाठी म्हणून जो जो शर्ट काढत होतो तो तो आकसून गेल्यामुळे किंवा डिटर्जंट चे किंवा रंग सुटल्याचे डाग लागल्यामुळे अशा काही न काही कारणामुळे घालायच्या लायकिचा राहिला नव्हता.


एक एक वीर रणांगणात पडत असताना रावणाची काय तगमग झाली असेल ते आम्हाला समजले. फरक एवढाच होता की तिथे शत्रूपक्षी वानरसेना होती व इथे मत्कुणसेना. पण आम्ही कुणा गो-या सीतेचे अपहरण केले नव्हते ! माझ्या मते सीता व जटायू वेडेच होते. सरळ सरळ ९११ ला कॉल करायचा सोडून उगीच आरडाओरडा करत बसले. जटायूला तर फुकट प्राण गमवावे लागले. असो विषयांतर नको ! लंकेत कुठलं आलंय ९११ असं म्हणून तुम्ही माझा पोपट कराल ! पोपाट झाल्याने नाविलजाने माझ्यावर कदचित महाराष्ट्राच्या एका प्रसिद्ध सेनेच्या कार्याध्यक्षपद पदाचा भार पडेल. मग मला शेतक-यांचे प्रश्न समजतात वगैरे असा आव आणावा लागेल, त्या पेक्षा इथेच थांबलेले बरे.


तर आमची एवढी सगळी वाताहत ४ मत्कुणांमुळे झाली. कपड्यांची नासधूस कमी होती की काय आम्ही सगळ्या रजया (कंफर्टर्स) , उश्या फेकून दिल्या ! आतंकवादाचा पूर्ण खात्मा झाल्या शिवाय पाकिस्तानशी चर्चा नाही अशा भारत सरकारच्या रोज बदलणा-या मिळमिळित खाक्याचा अवलंब न करता खरोखरीच ढेकणांचा खात्मा झाल्या शिवाय नवे बिछाने घेणार नाही अशी ठाम भूमिका आम्ही घेतली. त्यामुळे दररात्री कोचावर झोपावे लागत होते.


विधिस्तु कमले शेते हरि: शते महोदधौ हरो हिमालये शेते मन्ये मत्कुण शंकया।।

पुढे मागे या जुन्या सुभाषिता मध्ये “मन्ये मत्कुण शंकया” च्या आधी कोणी तरी “काउचे शेते अभि:” हे तीन शब्द चिकटवेल व आम्ही श्लोक रुपाने तरी अजरामर होवू असे वाटल्याने काउचवर झोपायचे फारसे दु:ख नव्हते !

तदनंतर नवरात्र आल्याने कोच सोडून आम्ही कार्पेट्वर आलो. हे म्हणजे खुद्द बुश ने अफगाणिस्तानात मुकाम ठोकल्यासारखे होते. पण अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे की नाही ही परीक्षा घेण्यासाठी स्वत:ला असं सावज म्हणून ठेवणं भाग होतं. एवढ्या मेहनतीचा निकाल चांगला दिसत होता. त्यांच्या अस्तित्त्वाच्या काही खुणा दिसत नव्हत्या. त्यामुळे जरा हायसं वाटत होतं. पण पलटवार केव्हाही होवू शकतो म्हणून आम्ही सदैव जागरुक होतो. कुणीही सांगितलं नाही तरी अधून मधून अमेरिका इराण इराकच्या बायो मेडिकल शस्त्रांची तपासणी करते तसं मी घरातला कोपरान कोपरा धुंडाळु लागलो. टिव्ही पाहत असताना अचानक उठून काउचला उलटं पालटं करण्याला आम्ही गनिमी कावा समजू लागलो होतो. माझ्या रुममेटला तर मला आता मानसोपचाराची गरज आहे असे वाटायला लागले होते.


पण एवढा मोठा आर्थिक फटका, आवडत्या कपड्यांची नासाडी, प्रचंड अंगमेहनत, एक महिना निद्रानाश व एवढा मनस्ताप होवूनही मनस्थिती चांगली होती ते केवळ विजयाच्या आनंदा मुळे! ढेकाणांना आम्ही माफ केलं होतं.

अंतिम परीक्षणासाठी फावरणी कंपनीला पाचारण केले व त्यांनी घराची शुद्धी झाल्याचा निर्वाळा दिला व आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. पेलिओन्टॉल्लॉजिस्ट जसे जगभर डायनोसॉर शोधत उत्खनन करत फिरतात तसंच आम्ही एक दिवस सहज कुतुहल म्हणून काउच चेक केला. मंगोलियाच्या गोबी वाळवंटात अमेरिकन संशोधकांना डायनोसोर ची अंडी सापडल्यावर जेवढा आनंद झाला असेल तेवढाच संताप आम्हाला मत्कुणाची अंडी सपडल्याने झाला. मरावे परी अंडीरूपे उरावे असे ढेकणांचे ब्रीद सार्थकी करत मरता मरता अनेक अंडी देउन गेले होते. एक दोन मिनिटातच राग गेला. आणि अचानक मी व माझा रुममेट कार्पेवर पडून गडबडा लोळून हसायला. राग यायच्या ऐवजी आमची केवढी घनघोर थट्टा झाली याचे हसू आम्हाला आवरले नाही !


४५ दिवसात नवे पाहुणे बाहेर अल्यावर त्यांच्या स्वागताच्या कार्यक्रमला कॉंग्रेसचे नेते राष्ट्रवादीच्या सभेला जसे अनुपस्थित राहतात तसं नुपस्थित कसं राहता येईल याचा विचार मी करु लागलो.


मारामारी, खून, विषारी द्रव्य फवारणे असं काही केल्याने प्रश्न सुटत नाहीत उलट ते अधिक गहन होता, हे आम्हाला उमगले. ”कुत्रा” हायर करुन मत्कुणांना शोधणे किंवा आणखी एकदा परंपरागत युद्ध छेडणे हे पर्यात होते.

पण एखाद्या मुत्सद्दी राजकाणा-या प्रमाणे आम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करुन सांमजस्याने नमते घेण्याचे ठरवले. पराभव तर मान्य होताच प्रश्न होता नामुष्किचा. शेवटी ढेकणांच्या येणा-या नव्यापिढीला व आम्हाला दोघांनाही गृहसौख्य लाभावे म्हणून आम्ही जुन्या वास्तुतून काढता पाय घेउन नव्या ठिकाणी घरोबा केला. आम्ही जित झालो होतो पण चतुर इंग्रजी इतिहासकारांप्रमाणे यास पराभव न संबोधता त्यास “कोव्ह अपार्टमेंटची यशस्वी माघार” असे नामाभिदान देउन आम्ही मोकळे झालो.


आता ते रात्रीचे अलार्म नाहीत, छापे टाकणे नाही, दचकून उठणे नाही, रात्र रात्र जागरण नाही, लॉंड्री कधीही केली तरी प्रॉब्लेम नाही, आर्थिक फटका नाही, कसलंच टेंशन नाही. सगळी वैतागवाडी संपली. पण आता मला चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागलंय. एवढं सुखी शांत आयुष्य जगायची सवय नाही ना ! त्यामुळे लवकरच लग्न करीन म्हणतो !!!


.