निशांत (१९७५)

Category:

प्रतिक्रीया 

निशांत (१९७५) (७/१०) * * * * * * *

दिग्दर्शक: श्याम बनैगल
कलाकार: गिरीष कर्नाड, शबाना आझमी,अनंत नाग, अमरीष पुरी, स्मिता पाटील, मोहन आगाशे, नसीरुद्दीन शाह, कुलभूषण खरबिंदा.
पद्मश्री आणि पद्मभूषण दिग्दर्शकाच्या चित्रपटाबद्दल आम्ही काय बोलणार? आणि चित्रपट असा की ज्याला १९७६ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवलं गेलेलं!
श्याम बनैगल यांनी या चित्रपटाद्वारे "अंकुर" सारख्या दर्जेदार चित्रपटांची परंपरा कायम राखली. एका पेक्षा एक नामवंत कलाकारंची फौज चित्रपटात असल्याने काही तरी अर्थपूर्ण पाहिल्याचा साक्षात्कार होतो. खरे अभिनेते यांना म्हणावं. कलाकारांची ही पिढीच निराळी होती.नाहीतर आज!! आता तर हिमेश रेशमिया सुद्धा नायक बनु शकतो. आपला सुरुर नामक त्याचा चित्रपट येतच आहे. असो. विषयांतर नको.
कथा १९४५ मध्ये घडते. गिरिष कर्नाड (शालेतील शिक्षक)आणि शबाना आझमी(सुशीला) बदली झाल्यामुळे एका गावामध्ये रहायला येतात. आणि गावाच्या जमीनदाराची(अमरीष पुरी) आणि
त्याच्या तीन भावांची गावावर जबर वचक असते. त्यातला विश्वम (नसीरुद्दीन शाह) हा इतर दोन भावांच्या (मोहन आगाशे आणि अनंत नाग) मानाने थोडासा मवाळ.
कथानक थोडंसं क्रूर जरूर आहे पण दु:खकारक नाही आहे. स्वत:च्या इंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी अख्ख्या गावाला स्वत:ची जहागीर समजणारे हे दोन भाउ सुशीलाला उचलून घेउन जातात. आणि इथे खरा चित्रपट सुरु होतो. सगळं कथानक सांगितलं तर ते योग्य ठरणार नाही.पण हा टिपिकल जमीनदार विरुद्ध शिक्षक किंवा गावकरी असा लढा वगैरे बनला नाही. आपण प्रत्यक्षात तिथे पोचतो आणि कथा नुसती पाहत नाही तर आपण ती अनुभवतो. मुलाला आणि नवऱ्याला सोडून जमीनदारा सोबत राहव्या लागणाऱ्या सुशीलाची हतबलता शबानाने मस्त उभी केली आहे.तिच्या हैदराबादी हिंदीची झाक असणाऱ्या भाषेमुळे वेगळेपणा जाणवतो.
विजय तेंडुलकरांच्या मूळ कथेवर आधारीत असलेला ह चित्रपट आणखी एका कारणामुळे महत्त्वाचा ठरला. स्मिता पाटील, मोहन आगाशे, नसीरुद्दीन शाह, कुलभूषण खरबिंदा या सर्व मात्तबर कलाकारांचा हा पहिला हिंदी चित्रपट!!!! एवढे उमदे कलाकार या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीला दिले!!
आर्ट मूव्हिज पहाण्याची आवड असणाऱ्यांनी अवश्य पहावा असा हा चित्रपट आहे!!!!

घाशीराम कोतवाल

Category:

प्रतिक्रीया 

घाशीराम कोतवाल- विजय तेंडुलकर
बरयाच वर्षांपासून मी या नाटकाबद्दल ऐकत आलो होतो. शेवटी आज योग आला.घाशीरामचा पहिला प्रयोग १९७२ ला झाला. या नाटकाला विरोध झाला आणि त्याचे प्रयोग बंद पाडण्याचे प्रयत्न झाले. त्यात राजकीय पक्षही सहभागी झाले. त्याला विरोध होण्याचे मुख्य कारण म्हणजे पेशवेकालीन एका विशिष्ट समाजाची टिंगल करण्यात आली असा काहींचा समज झाला. त्याच बरोवर नाना फडणवीस या ऐतिहासिक पात्राला खल स्वरूपात दाखवल्यामुळे नाटककार विजय तेंडुलकरांना प्रचंड विरोध सहन करावा लागला. पण त्यांच्या प्रयोगशीलतेला दाद द्याविशी वाटते.
मुळात हे ऐतिहासिक नाटक नाही. आणि त्यात संगीत असूनही हे संगीतनाटक नाही. एका नव्या धाटणीचं हे नाटक आहे. पण ७२ नंतरही ही धाटणी कुणी चालवली असं फारसं काही दिसत नाही.
एखाद्या व्यक्तिचा राजकारणात उपयोग कसा करवून घेतला जातो अगदी त्या व्यक्ति च्या नकळत हे या नाटकात विषेष पाहण्यासारखे झाले आहे.
काहींना नाटक पटणारही नाही. पण आपण नाटकाकडे कुठल्या दृष्टीने पाहतो ते महत्त्वाचं. नाटकाचा एक आगळा प्रकार कसा असू शकतो याची उत्सुकता असेल तर हे नाटक जरुर पहावं. संगीत या नाटकाचा मूळ आधार आहे. जर ते काढून घेतलं तर त्यातलं नाट्यच हरपतं. आजही घाशीराम देशोदेशी घडतात, घडवले जातात. हे त्रिकालाबाधित सत्या तेंडुलकरांनी ज्या लयीत मांडलय त्याला जबाब नाही. नाटकाची कथा इथे सांगणे नाटकाशी एक प्रकारची प्रतारणाच ठरेल.
तेंडुलकरांची अफाट शैली आणि भास्कर चंदावरकर यांचं संगीत यामुळे हे नाटक मैलाचा दगड ठरलं आहे. नाटक असं ही असू शकतं यावर कदाचित लोकांचा विश्वासही बसणार नाही.
एकूणच एक निराळा नाट्याविष्कार, वेगळं संगीत आणि राजकारण या तिन्ही गोष्टींमुळे नाटक वेगळी उंची गाठतं. घाशीराम सावळदासाचा अभिनय करणारे डॉ मनोज भिसे प्राण ओतून भूमिका करतात.
(मूळ नाटकात म्हणजे ७२ साली मोहन आगाशे यांनी नाना फडणवीसांची भूमीका साकारली होती. आणि ७६ साली याच नावाचा चित्रपट आला. ओम पुरी यांचा तो पहिला चित्रपट!!!)
निराळा नाट्यप्रकार असल्याने प्रत्येकाला पचेलच असे नाही. स्वजबाबदारीने नाटक पाहण्यास हरकत नाही!