चला दोस्तहो मत्कुणांवर बोलु काही ! (अध्याय १)

Category:

सकाळच्या पाचाला फोन खणाणला. भारतातले मित्रच ते अवेळी फोन करायचेच ! त्याचं आता फारसं काही वाटत नव्हतं, पण तरीही सकाळची झोपमोड झाल्यामुळे विशेष कारण नसणा-याने फुलटू शिव्या खाल्ल्या असत्या. फोन उचलला तिकडून रंग्या किंचाळलाअबे अभ्या ऊठ एक न्यूज आहे!”, आजकाल रंग्याच्या न्यूज मध्ये काही दम राहिला नव्हता म्हणून मी त्याला लाईट घेतलं, तो जेवढा जास्त एक्साईट होतो तेवढी बकवास न्यूज असणार हे माहित होतं. तरी डोळे चोळत बेड मध्ये उठून बसलो आणि पाहतो तर काय, रात्रीची शिफ्ट संपवून घरी परतणारी बिपीओ मधली पोरं जशी बाईक उंडारतात त्याच गतीनेसाहेबघाई घाईत घराकडे निघाले होते. त्यांना पाहून आमची पाचावर धरण बसली. रंग्याला सांगितलंतुझी न्यूज गेली खड्ड्यात इथे माझ्या पोटात खड्डा पडायचीवेळ आली आहे! नंतर फोन करतोउत्तराची अपेक्षा करता फोन बंद केला आणि साहेबां कडे जरा लक्ष दिलं. साहेब जरा ओळखीचे वाटत होते. मागे एकदा फार फार वर्षांपूर्वी गाठ पडली होती. ती कटू आठवण आठवून मनातमी प्रार्थना सुरु केली की हे साहेब ते जुने साहेब नसावेत! पण दैवदुर्विलासाने आमचे साहेब जुने साहेबच निघाले ! किचन मध्ये पळत जाउन एक टिश्यू आणला. साहेबांना त्यात उचललं. गॅलरित नेवून कागद पेटवून अगदीआगतिक मनाने साहेबांचे अंत्यसंस्कार केले. आपण कोणत्या संकटात सापडलो आहोत आणि पुढे काय कायवाढून ठेवले आहे याचा विचार करायला लागलो. एवढ्या सुंदर आपार्ट्मेंट मध्ये हे असे काही घडेल असेल वाटले नव्हते.


एकूण विषयाचं गांभीर्य अनुभवी वाचकांच्या ध्यानात आलं असेल. आमचेसाहेबम्हणजे आद्य घड्याळजी नव्हेतर सर्वजनांत अप्रिय कीटकरक्त्बीजऊर्फमत्कुणऊर्फखटमलऊर्फढेकूणहोत ! ढेकणावर कोणी कधीलेख लिहितं का? असं तुम्हाला वाटलं असेल. राईट बंधुंनाहीमाणूस कधी उडू शकतो का?” असं म्हणून लोकांनी वेड्यात काढलं होतं ! म्हणून संकुचित मनोवृत्तीच्या लोकांकडे दुलर्क्ष करीत आम्ही जिद्दीने हा विषय येथे मांडणार आहोत. लोक कुत्र्यावर, मांजरावर, पोपटावर, हॅमस्टरवर, उंदरावर अगदी कहर म्हणजे बायकोवरही लिहितात मग ढेकणाने कोणाचे घोडे मारले आहे? शिवाय हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असल्याने यावर सखोल विवेचन होणे आवश्यक आहे असे आमचे मत आहे. ज्यांना शीssss इय्यूsss याकssss !!” या पैकी काही वाटत असेल त्यांनी आल्या मार्गी बॅक बटन दाबुन परत जावे!


प्रश्न गंभीर होता पण उपाययोजना करणे तेवढेच आवश्यक होते. प्राथमिक धक्क्यातून बाहेर आलो. बेड रुम मध्ये शिरलो! एकेका गनिमाला शोधायचे ठरवले. आता आमच्या अंगी बुश संचारला होता. लादेनसाठी बुशने अफगाणिस्तानाला कसा त्राही त्राही करुन सोडला होता तसा आम्ही आमच्या बेडरुमचा अफगाणिस्तान करुन सोडला होता. अचानक छापा टाकाण्याचं तंत्र सुरुवातीला चांगलंच यशस्वी झालं चार पाच निद्रिस्त गाफिल गनिम एकाच ठिकाणी गावले. विलास (राव नव्हे !) हे विनाशाचे कारण आहे याची प्रचीती आली. त्या प्रणयी मत्कुणांना तशी प्रचीती येण्याच्या अवस्थेत ते नव्हते. ६० च्या दशाकात अमेरिकेत मनुष्य जातीत अशी स्नेहसम्मेलने होत असत. (शहाण्यांना वरुन ताकभात लक्षात आला असेलच!)


आमच्यावर हल्ला झाला आमच्यावर हलला झाला अशी बोंब ठोकत बुश जगभर सुटला तसे आम्ही गुगलवर बोंबलत सुटलो. एवढे गुगल केले तरीही ढेकणांना आवरावे कसे हे बिंग काही फुटले नाही! (बिल महाराष्ट्रात जन्मला असता तर लोकांची बिंगे फोडणारी प्रॉडक्ट्स बाजारत आणतो म्हणून त्याला मराठी मिडियाने चावट ठरवला असता ! असो.) मी नेट्वर मिळतील ते रिसर्च पेपर्स आर्टिकल्स वाचत सुटलो.


डिटीपी ने १९६० च्या काळात अमेरिकेत मत्कुण मरायचे हे कळाल्या नंतर ६०च्या दशकात अमेरिकेत नसल्याचा खेद वाटायला लावणारे अजुन एक कारण वाढले ! डिटीपी पचवायला शिकुन हे जीव अमेरिकेत आंध्रजनांप्रमाणेहळूहळू सर्वदूर पसरले. अगदी क्वचितच अगदी कळकट ठिकाणी वाढणारे हे अगदी पॉश पॉश घरात पण वाढु लागले. थोडक्यात काय तर त्यांचे रहणीमान सुधारले. त्यांची एवढी प्रगती झाली असेल असे वाटले नव्हते. गुगलायन केल्याने -याच गोष्टी कळाल्या, एक वर्ष खायला नाही मिळाले तरी हे व्यवस्थित जगु शकतात. आमच्या राजकारण्यांना सांगा कुणी तरी हे जरा !


अब बस एक ही बात, संपूर्ण स्वराज:

.मो.. गांधीं प्रमाणे आम्ही एकच ध्येय घेउन कामाला लागलो. (आज काल नुसतं गांधी म्हणून भागत नाही.कोणते गांधी ते सांगावं लागतं.नाही तर बीजेपी कॉंग्रेस दोघांनाही वाटायचं की त्यांच्याकडे बोट दाखवतोय.) मो.कंच फक्त ब्रीदच तेवढं घेतलं. "अहिंसा" हे तत्त्व घेतलं नाही ते बरं. मला चावून चावून एक दिवस आत्मसाक्षात्कार होवून ढेकूण स्वत:हून घर सोडून निघून गेले असते अशी सुतराम शक्यता नव्हती! त्यामुळे हिंसा अपरिहार्य होती. भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे मागवावीत त्या प्रमाणे आम्ही कम्युनिटी (एक संघ पणा कमी असल्याने, कम+युनिटी असा या शब्दाचा संधिविग्रह असु शकतो !) मालकांकडून मदत घ्यायची ठरवली. मालकांनी इन्स्पेक्शन करण्यास एक दूत धाडिला. शाळा तपासणी साठी इंस्पेक्टर यावा आणि पोरं गोंधळ करताना सापडावीत अगदी तसं झालं. तपासणीसाहेब आले आणि चक्क दिवसा ढवळ्या सहलीवर निघालेले दोनगनीम सापडले. त्यामुळे लगेचच एस्टिमेट्सचा आकडा मनातल्या मनात वाढवला असणार. तपासणी साहेबांनी अहवाल चाळमालकांकडे जमा केला. दुस-या दिवशी चाळामालक ट्रीट्मेंट करावीच लागेल म्हणाले. च्यायला ट्रीटमेंट करायला काही हरकत नव्हती पण त्यांनी जो आकडा सांगितला तो ऐकून आमचा बजेट प्लानच वाकडा झाला. ४२५ डॉलर्स !!!! म्हणजे ढेकणं मारायचे तब्बल २१००० रुपये !!! आमच्या घरात साधारण १० असतील. तर सरासरी एका गृहस्थाला घराबाहेर काढण्यासाठी २१०० रुपये?? च्यामारी आम्हाला घराबाहेर होण्यासाठी कुणीकधी पैसे नाही दिले. केवळ एकदा नवीनच लग्न झालेल्या मावस भावाने प्रायव्हसी मिळावी म्हणून मला घराबाहेर पिटाळण्यासाठी २० रुपये दिल्याचं आठवतं. आमचं तशी काही सिच्युएशन नसताना आम्ही ह्या साहेबांना घराबाहेर जाण्यासाठी २१००० रुपये??


घरात फावारणी होईपर्यंत तीन रात्री काढायच्या होत्या. त्या पण शत्रूचा फौज फाटा दांडगा असताना ! आम्ही गनिमी गनिमी कावा अवलंबायचा ठरवला. रात्री एक दीड अडीच चे अलार्म लावून झोपायचे अचानक छापा मारायचा. एक दोन वेळा वगळाता प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. झोपेचा मात्र बट्ट्याबोळ झाला होता. आमची अवस्था ख-यांच्या खालील कवितेतल्या पहिल्या "मी" सारखी झाली होती ! खरे प्रेम्यांची माफी मागुन चार ओळी खरडतो. (यात खरे आलेच हे एक गृहितक !)


मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो

तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो ।


मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी

तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी

मी बेड त्यजुनी काउचवर जाउनी बसतो

तो लंघून चौकट काउचावर याया बघतो ।


डोळ्यांत माझिया सूर्याहून संताप

दिसतात त्वचेवर चाव्यांचे मोजूनी, माप !

आमुचेच रक्त हे पिवुनी तो

घडवून लेकुरे रजईवरती झुलतो !!


मी पायी डसल्या ढेकणांवरती चिडतो

तो त्याच घेऊनी अंडी मांडून बसतो

मी डाव रडीचा खात बेगॉन मारतो अंती

तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने मरतो !


आमच्या घरातली ढेकणं मेली की तगली?, ट्रिटमेंट्साठी काय काय आटापिटा करावा लागला? प्रकरणआटोपले की कॉंग्रेसच्यागरिबी हटावघोषणे सारखे अनंतकाळासाठी लांबले? हे सर्व पुढच्या भागात !

अध्याय २ येथे वाचा.