नकार: थोडीशी पार्श्वभूमी व खुलासा

Category:


काल मिळालेल्या प्रतिक्रियेवरुन असं जाणवलं की थोडासा खुलासा करणं आवश्यक आहे. नेमका टोला कुठे लगवायचा होता किमान ते तरी सांगावं. हिंदुस्थानाने सामना हरल्यावर धोनी जसा वारंवार काही नाही कारणे देतो खरं म्हणजे त्याने काही होत नाही. गेलेला सामना गेलेलाच राहतो. काही जणांना थोडं बर वाटतं इतकंच. तद्वद कालच्या संवादाची थोडीशी पार्श्वभूमी मी सांगु इच्छितो:

संवाद गंभीर नसून उपरोधातून विनोद साधणारा होता.
हिंदुस्थानाबाहेर राहणा-या (मुख्यत्वे अमेरिकास्थित) अनिवासी भारतीय मुलांच्या लग्नाची आजकाल कशी गोची होवून राहिली आहे या परिस्थीतीवर थोडं फार काही तरी खुमासदार लिहायचा बेत होता. अमेरिकन मंदीवरच्या भरभरुन बातम्या सकाळ सारख्या वृत्तपत्रांनी छापून अमेरिकेतल्या मुलाचे स्थळ अगदी "डाउन मार्केट" करुन टाकले आहे. भारतातल्या मुली करिअरवर पाणी सोडून अमेरिकेत जायला तयार कशा नाहीत हे सांगण्यासाठी कालचा प्रपंच होता.

कालच्या संवादातील मुलगा अमेरिकेत राहत असल्याने तो त्याचा दोष असल्यागत भारतातल्या मुली तोंड फिरवत आहेत, ही सत्य परिस्थीती थोडी अतिरंजित करण्यासाठी संवादातला नायक, भारतात (म्हणजे पुण्यात) रहात असलेल्या मुलीबरोबर चॅटिंगवर संवाद साधतो व आपण बेंगलोर ला रहात असल्याचे खोटेच सांगातो. लग्न जमवण्यासाठी आता अमेरिकेतल्या मुलांना "मी भारतातच राहतो" असे खोटेच सांगावे लागते की काय या वात्रट कल्पनेने कालचा संवाद लिहिला गेला होता.

वास्तविक संवादातून हळूहळू वाचकासमोर परिस्थीती उलगडायला हवी होती. हे कसब अजून अंगी आले नाही हे जाणवले. पुढच्या वेळेला आणखी प्रयत्न करीन. धन्यावाद.

कालचा संवाद येथे वाचता येईल.



नकार

Category:

कन्या: (तावातावाने) तू मला असं फसवशील असं वाटलं नव्हतं !
मुलगा: अगं असं का समजतेस? मी तुला कुठे फसवतोय?
कन्या: इतकं मोठं सत्य तू माझ्या पासून लपवून ठेवलंस?
मुलगा: अगं मी तुला गमावून बसेन अशी भीती होती म्हणून....
कन्या: म्हणून तू खोटं बोललास?
मुलगा: अगं खोटं नाही बोललो फक्त खरं थोडंसं लपवलं.
कन्या: पण आता ते सत्य सांगितल्याने तू मला गमावणार नाहीस असं वाटतं का तुला?
मुलगा: प्रेम अंधळं असतं मधु..
कन्या: लाडात यायचं काम नाही. माझी एवढी फसगत झाली आहे. यातून काय मार्ग काढायचा ते माझं मला ठरवू दे.
मुलगा: अगं असं काय एवढं आभाळ कोसळल्या सारखी बोलतेस. फक्त एवढीशी तर गोष्ट आहे.
कन्या: फक्त? तुझ्या साठी असेल फक्त. मला तर अगदी कुठे येऊन अडकले असं झालंय?
मुलगा: हेच का तुझं प्रेम? एवढ्यात बदललीस?
कन्या: हो. तू तरी कुठे खरा वागलास? का मला फसवलंस बेंगलोर ला असतोस म्हणून? तरीही माझ्या मैत्रीणी, "बेंगलोर ला आहे तो १०० वेळा विचार कर" म्हणत होत्या.
पण मीच म्हटलं एवढं सगळं जुळून येतंय आपलं माणूस थोडंसं चुकणारच. बेंगलोर तर बेंगलोर. फार फार तर एक दोन वर्षात पुण्या मुंबईला नोकरी शोधता येईल.
मुलगा: अगं मग तसंही मी सध्या पुण्या मुंबईला यायला तयार आहे की दोन तीन वर्षांनी
कन्या: ते काही नाही तू मला फसवलंयस. ज्या नात्याची सुरुवात फसवाफसवीने होते ते नातंच मला नको. (हाताची घडी घालून मुलाकडे पाठ फिरवत)
मुलगा: अगं माझं ऐकून तरी घेशील..
कन्या: काही ऐकायचं नाहीए. तुझा आणि माझा मार्ग वेगळा समज.
मुलगा: मधु असं का टोकाला जातेस. मला समजून घेण्याचा प्रयत्न कर.
कन्या: परक्या लोकांनी मला एकेरी आणि लाडाची संबोधनं लावलेली मला आवडत नाहीत.
मुलगा: अगं मी क्षणात परका झालो तुझ्यासाठी? ४ महिने आपण चॅटिंग करत होतो ना?
कन्या: तोच मूर्खपणा झाला.
मुलगा: अगं पण ठरल्याप्रमाणे आलो ना मी तुला प्रत्यक्षात भेटायला?
कन्या: उपकारच केलेस जणू !
मुलगा: माझ्या दिसण्यात उंचीत, रंगात काही प्रॉब्लेम आहे का?
कन्या: नाही रे. तोच तर वांदा करुन ठेवलास तू. तसा काही प्रॉब्लेम असता तर मी इथे हा वाद घालत उभी नसते.
मुलगा: मग अडचण तरी काय आहे?
कन्या: तुझं काय जातं रे "अडचण काय आहे" म्हणायला. माझ्याशी इतकं खोटं वागलास तू? मला तुझं तोंडही पहायचं नाही.
मुलगा: ठीक आहे. तुला एवढाच जर त्रास होणार असेल तर नको जाऊया आपण पुढे. पण माझ्या समोर दुसरा कोणताच मार्ग शिल्लक नव्हता.
कन्या: मला इमोशनली अडकवून नंतर खरं सांगून फसवायचा डाव होता ना तुझा?
मुलगा: (चिडून) हो होता. आता मुलगी मिळत नाही म्हटल्यावर मला हाच डाव खेळावा लागला.
कन्या: मीच सापडले का रे तुला? मी एकुलती एक. इथे चांगल्या एमएनसीत मॅनेजर. चार लोक मला रिपोर्ट करतात. तिकडे आल्यावर माझ्या करिअरचं काय? एवढी मेहनत घेतेय करिअर साठी त्यावर पाणी सोडू?
मुलगा: मग करिअर महत्त्चाचे की लग्न तूच ठरव.
कन्या: ठरवायचंय काय त्यात? करिअर सांभाळून लग्न करता येतं म्हटलं ! तुझ्या सारखे ५६ प्रोग्रामर इथे वाट पाहत आहेत माझ्या एका इशा-याची.
मुलगा: तुमचे दिवस आले आहेत ना. करा माज.
कन्या: हो करणार. तुम्ही नाहीत का केलेतइतके दिवस स्त्रियांवर अत्याचार? आता जरा आमच्या बाजुने वारा वाहिला की यांना जड जातं.
मुलगा: आमच्या दृष्टीने जरा विचार कर.
कन्या: अरे तुम्ही केला का कधी आमचा विचार? जा जा. यूएस चा रस्ता सुधार. आलाय मोठा खोटारडा. म्हणे बेंगलोरला असतो. जा तिकडे तुमच्या अमेरिकेत शोधा पोरगी, मिळते का पहा.
मुलगा: (नि:शब्द होवून पुणे मुंबई एसी वोल्वोच्या तिकीटाची चौकशी करायला जातो)



* पात्र, त्यांची नावे व प्रसंग पूर्णत: काल्पनिक, हा संवाद नीटसा कळला नसेल तर खुलासा येथे वाचता येईल.