भारतीय पारपत्र कार्यालयातील काही तास !

Category: ,

शाळेत असताना "मी पाहिलेली रम्य पहाट" किंवा तत्सम निबंध लिहिण्याचे काही कटु प्रसंग प्रत्येकाच्याच वाट्याला आलेले असतात. एरव्ही सूर्यनाराणाचे द्वितीय प्रहारा आधी दर्शन न घेणारे आपण कोण्या क्वाचित्क हेतुसाठी निद्राभंग करुन अंथरुणत्याग करुन घराबाहेर पडलो, असे दाखवावे लागायचे. या आदिकारणाची जुळवाजुळव करण्यातच बरीच बुद्ध्युर्जा खर्ची पडायची. नाना प्रकाराच्या सबबी कितीही ख-या वाटल्या तरी त्यात नाट्यमयता नसेल तोवर त्या आमच्या गुरुजनांच्या पचनी पडायच्या नाहीत. वानगी दाखल, "मामाच्या गावाला जावयाचे असल्याने आईने उठविले", हे कारण लिहिल्यामुळे माझ्या वर्गमित्राची, "का रे ईयत्ता दहावी ना तू? आणि मामाच्या गावाला जातोस? हाच का तुझा कल्पनाविलास?" असं म्हणत गुरुजनांनी समस्त वर्गबंधु व भगिनींसमोर कुचेष्टा केली होती.

कारणाचा ऊहापोह झाल्यावर निबंधात बळं बळंच निसर्गाचं जाम कवतिक करायला लागायचं. आता आमच्याकडे पहाटेची जी दृष्ये दिसायची ती तशीच्या तशी वर्णन करण्या सारखी नसायचीच. उदा. रस्त्याच्या कडेने नक्षीकाम करण्यात गुंतलेले बालकारागीर, मखमलाच्या गादीवर ऐटित लोळणा-या राजभार्येगत मलपंकात लोळणारी वराहस्त्री व तिची अपत्ये, त्यात चाललेला त्यांचा वात्सल्यपूर्ण क्षीरप्राशनाचा कार्यक्रम, निष्कारण मागे लागून हृदयस्पंदन वाढवणारे श्वानमित्र वगैरे वगैरे. पण हे सगळं वास्तव बाजुला सारुन आम्हाला पहाटेचा गार वारा वहावावा लागे, नसणारे डोंगर उभे करुन त्यांच्या शिखरावर सोनेरी किरणं सोडावी लागत, किलबिल करणारी पाखरं शोधून आणावी लागत, शिवाय एखाद दोन वांड वासरांना पकडून दुडक्या मारायला लावाव्या लागत. हे सगळे वर्णनरुपी वाळूचे कण रगडिल्याशिवाय गुणांचे तेल गुरुजनांच्या लेखणीतून गळायचे नाही. या उपर निबंधात झुंजुमुंजु, पूर्व दिशेची लाली, पाऊलवाटा, माळरान, धुके हे शब्द नसले की काही गुण आपोआपच वजा व्हायचे. पाहाटेचं वर्णन मला वाटतं कोणत्याही शालेय नैबंधिक इतिहासात फक्त पौष माघातल्याच पहाटेचं सापडेल. थंडी शिवाय पहाट निसर्गरम्य होऊच शकत नाही अशी साधारण धारणा असावी. या धारणेस छेद देण्याचा प्रयत्न करुन आम्ही गुणच्छेद ओढवून घेतला होता.

असो. शालेय निबंधाचा संदर्भ यासाठी की मी त्याप्रमाणेच हा निबंध लिहिणार आहे. निबंधाचं नाव आहे "भारतीय पारपत्र कार्यालयातील काही तास!". भारत सरकारने दहा वर्षांसाठी केलेली कृपा संपुष्टात येत असल्याने पुढील दहा वर्षांची तजवीज करण्यासाठी जवळच्याच भारतीय पारपत्र कार्यालयात/वकिलातीत जाण्याचा योग आला. परदेशात राहून भारतीय कार्यालयानुभवांना मुकलेल्या मला हा अनुभव काही अंशी का होईना मिळेल अशी आशा होती. वकिलाती ऐवजी पारपत्र कार्यलयात आधी जाऊन कागदपत्रे द्यावी लागतात तद्वद मी तिकडे गेलो.
सकाळी ९ ला कार्यालय उघडणार होते त्याप्रमाणे मी सकाळी ९:०० ची अपॉईंटमेंट घेतली होती. ९ ला म्हणजे ९ ला कार्यलय उघडलेले होते व तिथे काम करणा-या महिला कर्मचारी स्वस्थानी स्थनापन्न झालेल्या होत्या. आत प्रवेश करणारा मीच पहिला अर्जदार होतो. कार्यलय वेळेत उघडलेले व तिथे बसलेली कृष्णवर्णीय अमेरिकन महिला (यांना आपण जॉर्डनबाई म्हणूया) पाहून आपण दुस-याच देशाच्या पारपत्र कार्यालयात तर आलो नाही ना असे वाटले. आतमध्ये एकवार नजर फिरवली व इनक्रेडिबल इंडियाचे फलक दिसले आणि माझ्या जिवात जीव आला. अपॉंटमेंट घेतली आहे का हा प्रश्न जॉर्डनबाईंनी सवयीने विचारला व मला बसायला सांगितले. सगळी कागदपत्रे घेऊन तपासताना अधून मधून माझ्या चेह-याकडे विचित्र हास्य करुन जॉर्डनबाई पाहू लागल्याने मला भय वाटू लागले. कागद पत्रांची चांगली ३-४ मिनिटं छाननी करुन झाल्यावर जॉर्डनबाई "ओ नो, कॅन्ट बिलिव्ह दिस !" असं म्हणाल्या. मला काहीही कळेना. त्यांचे बोलणे ऐकून आतून एक भारतीय दिसणा-या कर्मचारी महिला (यांना आपण सौ. गर्ग म्हणूया) बाहेर आल्या. त्या दोघींचा काही तरी अगम्य संवाद झाला. गर्गबाई जावयाल पहावं अशा कौतुकाने माझ्याकडे पहात होत्या. न रहावून शेवटी त्यांनी मला त्यांच्या प्रसन्न्तेचं रहस्य सांगितलं. पूर्ण भरलेले फॉर्म्स व सर्व कागदपत्रे व्यवस्थित असलेला एकही अर्ज या आठवड्यात मिळणार नाही अशी त्या दोघींची पैज लागली होती, व माझ्या अर्जामुळे त्या गर्गबाई जिंकल्या होत्या. यात एवढं काही विशेष नाही, असं वाटून मी फक्त बेगडी हास्य दिलं. गर्गबाईंनी मला बसायला सांगितलं. इथून सुटून केव्हा निघता येईल याचे आडाखे मी बांधत होतो. १५-२० मिनिटांनंतर थोडीशी वर्दळ वाढली. गर्गबाई मला विसरल्या की काय असे वाटून त्यांना मी जाऊन विचारलं, "तुम्हाला काही आणखी कागद पत्रे लागणार आहेत का?" गर्गबाई उत्तरल्या, "तसं नाही तुम्हाला पारपत्र तात्काळ हवे आहे ना, त्यामुळे आधी वकिलाती कडून परवानगी लागते. ती मिळे पर्यंत तुम्हाला थांबावं लागेल." आलिया भोगासी असावे सादर असा विचार करुन, "हरकत नाही" असं म्हणत मी तिथल्या खुर्चीत विसावलो. थोडावेळ स्मार्टफोन उलटापालटा करुन झाल्यावर मी इकडेतिकडे पहायला लागलो.  इनक्रेडिबल इंडिया ची राजस्थानच्या वाळवंटात पाण्याची घागर डोक्यावर घेऊन जाणारी स्त्री, ताज महाल, काशी विश्वेशराचा घाट अशी चित्रे होती. चित्रे लावण्याचे काम अर्थातच थातुरमातुर झालेले होते. त्यातील निम्म्या चित्रांच्या कडा लोकल मध्ये डुलक्या देणा-या चाकरमान्यां सारख्या आपली मूळ जागा सोडून पुढे झुकलेल्या होत्या. टेबले व त्यावरचे संगणक त्यातून लोंबणा-या जोडतारा भारताची आठवण करुन देत होत्या. मी आता येणार जाणारांची वर्दळ पहात बसलो होतो.

इसम क्रमांक १ श्रीयुत होयबा:
कार्यालयाचं दार उघडून एक तरुण गृहस्थ आत आले. दार तसंच धरुन ते उभे होते त्यातून त्यांच्या पत्नी प्रवेशकर्त्या झाल्या. ते दोघे आत आल्यानंतर जॉर्डनबाईंची नेहमीची प्रश्नावली झाली व दोघेही प्रतिक्षालयात स्थनापन्न झाले. नवरा ज्या अदबिने बायकोशी वागत होता त्यावरुन लग्नाला दोन तीन वर्षे झाली असावित असा अंदाज मी लावला. त्यांच्या नावाचा पुकारा झाल्यावर सगळी कागद पत्रे घेऊन नवरा जॉर्डनबाईंकडे गेला. बाईसाहेब जागीच बसून होत्या. कागदपत्रे पाहून जॉर्डनबाईंनी पहिला प्रश्न विचारला.
जॉर्डनबाई: "आर यू मिस शीतल?"
नवरा: "नो, (तिच्या कडे बोट दाखवून) शी इज."
जॉर्डन बाई: "इज देअर एनी रिजन शी इज नॉट एबल टू सबमिट डॉक्युमेन्ट्स बाय हरसेल्फ",
नवरा: (खजिल होवून) "नो, नो पर्टिकुलर रिजन."
जॉर्डन बाई: "आय मीन यू कॅन सबमिट ऑन हर बिहाफ, बट यू हॅव टू साईन द फॉर्म अ‍ॅज अ रेप्रेझेन्टिटिव्ह."
हे ऐकून नव-याने इशा-यानेच बायकोला बोलावून घेतले. उरलेल्या कागद पत्रांचा पसारा बाजुला ठेवत त्रासिक मुद्रेने बाई साहेब जॉर्डनबाईं समोर जाऊन बसल्या. नवरोबा आता प्रतिक्षालयात येवून बसले पण नजर काउन्टरपाशीच होती. नवरोबांच्या चेह-यावर कमालीची बेचैनी होती. कागदपत्रांची सगळी कामं बहुदा नवरोबांनी केलं असल्यामुळे ’बायकोला सगळी कागदपत्रे सापडतील का? सगळा क्रम नीट समजेल का’, अशी चिंता त्यांना भेडसावत असावी. न राहवून जागच्या जागी उभे रहाणे पुन्हा खाली बसणे असा प्रकार सुरु होता. तिकडे बायकोने एक दोन कागद शोधल्या सारखं केलं की नवरोबा जागेवर उभं राहून "अरे वहीं तो है, ड्रायवर लायसन्स के नीचे" असं प्रॉम्प्टींग करु लागले. त्यावर त्या तिकडून त्रस्त होत "अरे कहां है यार, तुम ने कुछ भी ढंग से रखा नाही है" असे म्हणत. अशा प्रकारचे त्यांचे प्रेमळ संवाद सुरु झाले. त्यांचा हा खेळ समस्त प्रतिक्षालयात बसलेली जनता फुकटात पहात होती. जॉर्डनबाई पण मख्ख चेह-याने त्रस्त बाईंकडे पहात होत्या. नवराबायकोतील संवादांचे तापमान हळू हळू वाढू लागले. पण नवरोबा जमेल तेवढ्या नरम स्वरात उत्तर द्यायचा प्रयत्न करत होते.
बायको: "अरे यार ये मॅरेज सर्टिफिकेट मांग रही है, कहां रख्खा है तुमने?"
नवरा: "वहीं होगा, फिर से देखो."
बायको: "मै क्या झूठ बोल रही हूं?, तुम भूल तो नही गए?"
नवरा:"नही नही. लाया है, पक्का लाया है, रुको शायद मेरे पास है.."
बायको: "लो. कर लो बात. तुम तो किसी काम के नही हो"
अशी निर्वाणवाणी झाली. नवरोबा घाम टिपत मॅरेज सर्टिफिकेट घेऊन काउन्टरपाशी गेले. सगळी कागदपत्रे दिल्यांनंतरही बाई साहेबांचा राग कायम होता. शेवटी एकदा त्यांचं काम झालं. बाईसाहेब तडक दरावाजापाशी जाउन थांबल्या. "रुको तो सही" असं म्हणत एका हातात सुटी कागदपत्रे, फोल्डर, पिशव्या, बायकोचा सेलफोन असा सगळा संसार कसाबसा गोळा करुन नवरोबा पत्निमागे पांथस्थ झाले. प्रतिक्षालयातले लोक फुकटात शो पहायला मिळाल्याने भलतेच खूष झाले होते.

वकिलातीत फोन लागत नसल्याने. माझं काम अजूनही लटकलेलंच होतं. सकाळी ९ वाजता उघडणा-या वकिलातीत १० वाजून गेले तरी कोणी फोन उचलत नव्हतं. एवढ्या लवकर वकिलातीतील लोक कामात इतके व्यस्त झाले असावेत की त्यामुळे फोन घेता येत नसावा अथवा अजून कार्यलयात झुंजुमुंजु झालं नसावं. पैकी दुसरी शक्यता जास्त रास्त होती. त्यामुळे मी लोकावलोकनाचं माझं काम चालू ठेवलं. यात बरेच लोक मला दिसले. सरळमार्गी येवून जास्त लक्ष न वेधून घेता कागदपत्रे देऊन काही पापभीरु माणसे निघून गेली, पण ज्यांची नोंद घ्यावी असे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक होते.




त्यातलेच एक इसम क्रमांक २ श्रीयुत ढिसाळ.

साहेब घाई घाईत आत आले. जॉर्डनबाई समोर बसलेल्या व्यक्तिची कागदपत्रे घेत होत्या. आल्या आल्या ढिसाळांनी त्यांना विचारले. " भारतीय पासपोर्टसाठी कागदपत्रे द्यायची जागा हीच का?" जॉर्डनबाईंनी नेहमीचा प्रश्न त्यांना विचारलं "डू यू हॅव अ‍ॅन अपॉइंटमेंट?" ढिसाळांनी होय असं सांगितलं. जॉर्डनबाईंनी विचारलं "व्हॉट टाईम इज यूवर अपॉइंटमेंट?". या प्रश्नावर मात्र ढिसाळ गडबडले, "मला आठवत नाही, पण अपॉइंटमेंट असलीच पाहिजे का?" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. जॉर्डन बाईंनी "होय" असं सांगितल्यावर थोडंसं त्रस्त होवून ढिसाळांनी परत विचारलं, "इथे कोणीच नाही. व्हाय कान्ट यू जस्ट टेक माय डॉक्युमेंट्स आय हॅव टू गो बॅक टू वर्क."  ढिसाळांच्या या वाक्यावर जॉर्डन बाई जरा चिडूनच म्हणाल्या "आम्हा सगळ्यांनाच
काम आहे सर. तुमचा वेळ इतका महत्त्वाचा असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती".  असा खणखणीत अपमान होवूनही ढिसाळांच समाधान झालं नाही. जॉर्डनबाईंनी समोरचा संगणक वापरुन ढिसाळांना अपॉइंटमेंट घ्यायला लावली. ती घेवून झाल्यावर श्री ढिसाळ त्रागा करु लागले. "इथे कोणीच नसताना मला ११ वाजताची अपॉइंटमेंट देत आहात. तो पर्यंत बसुन रहायचं की काय?", जॉर्डनबाईंनी त्यांचे बोल ऐकून न ऐकल्या सारखे करुन सोडून दिले. ११ वाजायला अजून १५ मिनिटे बाकी होती. ढिसाळांचा जीव टांगणीला लागला होता. अकराच्या आधी कागदपत्रे घेणार का? अशी एक निष्फळ विचारणी त्यांनी करुन पाहिली. शेवटी एकदाचे ११ वाजले व हे महाशय कागदपत्रे द्यायला स्थनापन्न झाले. जॉर्डनबाईंनी कागदपत्रे पाहता पाहता कपाळावर आठ्या घालायला सुरु केल्या. जॉर्डनबाई आधीच या गृहस्थांवर वैगागलेल्या होत्या. वैतागूनच त्या म्हणाल्या, "सर तुमचा अर्ज अपूर्ण आहे. फॉर्म मध्ये अनेक गोष्टी भरलेल्याच नाहीत, शिवाय अनेक कागदपत्रे गहाळ आहेत, मुख्य म्हणजे तुम्ही फोटो लावलेले नाहीत अर्जावर."
ढिसाळ लगेच सावरुन, "फोटो आहेत ना, हे काय !" खिशातून फोटो बाहेर काढून त्यांनी जॉर्डनबाईंच्या हातावर ठेवले.
जॉर्डनबाई चिडून उद्गारल्या, "माझ्य हातात काय देताय फोटो? हा फॉर्म आहे ना त्यावर चिकटवायचे आहेत ते.  हे घ्या आणि चिकटवून आणा.  समोर नमुना अर्ज भरुन ठेवला आहे तो पाहून अर्ज पूर्ण करा" असं म्हणत बाईंनी  ढिसाळांना दटावून परत पाठवून दिलं. इकडे ढिसाळांची अपेक्षा अशी होती की बाईंनीच सगळ्या गोष्टी दुरुस्त करुन घ्याव्यात. चिकटवायचे म्हटले की मग डिंक लागणार. मग प्रतिक्षालयातल्या प्रत्येकाला डिंककांडी मागत ढिसाळ फिर फिर फिरले. आता डिंककांडी घेऊन कोण कशाला येईल? पण जस्ट इन केस आपण लावलेला फोटो निघाला तर म्हणून डिंकाची कांडी घेऊन आलेले एक मिस्टर परफेक्ट त्यांना भेटलेच. कुठल्याश्या कप्प्यात दडवून ठेवलेली डिंककांडी अक्खी इस्टेट दिल्याच्या अविर्भावात त्यांनी ढिसाळांना दिली. ढिसाळांनी फुकटचा डिंक यथेच्छ ओरबाडून पटापटा फोटो चिकटवून टाकले. आता फॉर्म भरण्यासाठी पेन लागाणार. तो ही ढिसाळांकडे नव्हताच. तो त्यांनी मिस्टर परफेक्टांकडून उसनवारीवर घेऊन फॉर्म कसाबसा भरला. आणि जॉर्डन बाईंच्या पुढ्यात नेऊन आदळला. जॉर्डनबाईंनी दोन चार मिनिटं फॉर्म पाहून. "ही चार कागदपत्रे दबीरीकृत (नोटराईज्ड) नाहीत" असं म्हणून सगळे कागद परत दिले. ढिसाळांना काय दबीरीकृत (नोटराईज) करायचे, कसे करायचे आणि कोणाकडून करून घ्यायचे? काही कळेना. चार पाच मिनिटं गोंधळलेल्या अवस्थेत गेल्यावर त्यांनी जॉर्डनबाईंना विचारलं. "कुठे करायचं हे दबीरीकृत?"
जॉर्डन बाई: "जवळपासच्या एखाद्या युपीएस स्टोअर मध्ये दबीरीकृत करुन मिळेल. एका कागदपत्राचे अंदाजे ५ डॉलर घेतील ते". ढिसाळांनी लगेच गुणाकार करुन "वीस डॉलर !" ही रक्कम वीस हजार डॉलर सांगितल्यासारखी आश्चर्याने सर्वांसमोर म्हणून दाखवली. वीस डॉलरचा खर्च अनिच्छेनं का होईना ढिसाळांना करावा लागणार होता आणि त्या बद्दलची नाखुषी त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. ढिसाळांनी तुम्हीच नाही का नोटराईज करुन देत असं म्हणून पृच्छा करुन पुन्हा प्रतिक्षालयातल्या समस्त भारतीय जनतेस लाज आणली. नोटराईज करायला गेलेले ढिसाळ मस्त जेवण वगैरे चोपून नंतर आरामात उगवले व कागदपत्रे टाकून निघाले. जॉर्डनबाईंनी त्यांना सह्या राहिल्यामुळे परत बोलावले. जॉर्डनबाईंच्या दर्शनाच्या रांगेत वारंवार लागून शेवटी एकदाचा ढिसाळांना मोक्ष प्राप्त झाला! त्यांची कागपत्रे स्विकृत होऊन ते तिथून चालते झाले.

मी गर्गबाईंना शोधत होतो. वकिलातीत फोन लागला होता ही सुवार्ता सांगायला गर्गबाई प्रतीक्षालयात आल्या. वकिलातीची परवानगी मिळाल्यानंतर माझा अर्ज स्वीकारला जाणार होता. आणखी वेळ लागणारच होता त्यामुळे मी दुपारचे जेवण उरकून घ्यावे म्हणून तिथून बाहेर पडलो. जवळपास भारतीय रेस्ट्रा नव्हते. शिवाय जास्त दूर जाण्यात गम्मत वाटेना म्हणून जेवणाचा प्रश्न जवळपासच्याच चिलीज मध्ये जाऊन मिटवला. पारपत्र कार्यालयात परत येऊन बसतो तर आत मध्ये बरीच गर्दी जमली होती. त्यात एक सौथइंडिअन जोडपं आपल्या अपत्यासह बसलं होतं त्यातले यजमान म्हणजेच आपले श्रीयुत स्थितप्रज्ञ.

इसम क्रमांक ३ श्रीयुत स्थितप्रज्ञ

श्रीयुत स्थितप्रज्ञ यांच्याकडे पाहिल्यावरच हा माणूस स्थितप्रज्ञ असला पाहिले असा अंदाज मी लावला होता. कसलाही प्रसंग न घडता मी हे विशेषण त्यांना देऊ केले होते ते फक्त त्यांच्या झुपकेदार मिशा व स्थिर नजरेकडे पाहून. श्रीयुत स्थितप्रज्ञ व त्यांच्या कुटुंबियांच्या हालचाली मला व्यवस्थित दिसतील अशा अंदाजाने मी एका रिकाम्या खुर्चित बसलो. त्यांचा मुलगा  कार्तिक साधारण ३-४ वर्षांचा असेल. कार्तिक "नाना, नाना" करुन जन्मदात्याचे कर गदागदा हलवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. सौ. सौथइंडियन नव-याच्या कानात जुन्या रेल्वेइंजिना प्रमाणे आपल्या भाषेत शब्दरुपी अखंड वाफा सोडत होत्या. पण श्रीयुत स्थितप्रज्ञांची साधना फार उच्च कोटीची होती. आपल्या सभोवती काही घडत आहे याची जराही दखल न घेता त्यांची नजर समोर म्हणजे गर्गबाईंकडे तशी च्या तशी होती. सौ. सौथइंडियनना याची सवय असावी. तोडांचा पट्टा त्यांनी अखंड सुरु ठेवला होता. भाषा तर कळत नव्ह्तीच पण अधून मधून येणा-या इंग्रजी शब्दांवरुन मी हा एकतर्फी संवाद कोणत्या विषयावर चालला असेल याचा अंदाज घेत होतो. ’पासपोर्ट मिळाल्यावर आता लगेच भारतात पळू नका, खर्च वाढले आहेत. भारतात जाताना पैशाचं सोंग आणून सगळ्यांना गिफ्ट घ्यावी लागतात. नातेवाईकांच्या कटकटी असतात. आमच्या कडे आला नाहीत आम्हाला विसरलात अशी गा-हाणी वर्षानुवर्ष ऐकावी लागात. त्यापेक्षा सुटी साठी आपण आपले युरोपात जाऊ’ असला काहिसा तो संवाद असावा.

चि. कार्तिक आता नानांचा नाद सोडून प्रतिक्षालयात बागडायला लागला होता. खुर्चीवर चढून एका खुर्चीवरुन दुस-या खुर्चीवर उडी मारण्याचा खेळ आईच्या नजरेआड त्याने सुरु केला होता. खुर्चीच्या हातात त्याचा पाय अडकून कार्तिकच्या चेह-याचा शिक्का जमिनिवर उमटता उमटता राहिला होता. ते पाहूनही स्थितप्रज्ञ जागचे हलले नाहीत, की कार्तिकास रागावले नाहीत. सुरुवातीला थोडासा व्रात्य वाटलेला कार्तिक भलताच वांड निघाला. दर दोन मिनिटाला आई कडे येवून कसला ना कसला हट्ट करु लागला. मोठ मोठ्याने ओरडू लागला. तरिही अपत्याशी आपले काही देणेघेणे नसल्यागत श्रीयुत स्थि.प्र. बसुन राहिले. अजुबाजुचे लोक त्याच्या ओरडण्याने अस्वस्थ होऊ लागले पण यांच्या चेह-याची रेषही हलत नव्हती. ब-याच लोकांनी आई बापाकडे विचित्र नजरेनं पाहिल्याने जरा ओशाळून सौ. सौथइंडियन कार्तिकास शांत करायचा प्रयत्न करु लागल्या. त्यांनी कार्तिकास जवळ ओढून कसलेसे आमिष देण्याचा प्रयत्न केला. पण जवळ ओढल्यामुळे तो मुलगा अजुनच बिथरला. तो आता थेट काउंटरच्या दिशेने पळू लागला. त्याने आता मेजेवरच्या संगणकाच्या तारांना जाऊन झोंबाझोंबी सुरु केली. एक दोन मिनिट झाले तरी कुणी येत नाही हे पाहून जॉर्डनबाई चिडूनच ओरडल्या, "हे कुणाचं पोर आहे? लवकर ताब्यात घ्या अन्यथा मला सुरक्षा रक्षकांना पाचारण करावं लागेल". हे ऐकल्यानंतर स्थितप्रज्ञ शेवटी एकदाचे हलले. एका हाताने दुर्वा खुडावी तसा मुलाला त्या तारांपासून खुडला व बाजुच्या खुर्चीत आणून बसवला. हे पुन्हा नजर खिळवून बसून राहिले. कार्तिकाने एक दोन मिनिट शांतता पाळून त्याच्यापरिने आईबापाचा मान राखला. नंतर हळूच लोकांच्या फायली ओढ, बायकांच्या पर्स ओढा असा कार्यक्रम त्याने सुरु केला. पुन्हा काऊंटरपाशी जाऊन संगणकांच्या तारांशी झोंबाझोंबी सुरु केली. एखादे जागरुक पालक असते तर पळत पळत गेले असते. पण स्थितप्रज्ञ अजूनही बसून होते. सौ. सौथइंडियननाच लोकलज्जेस्तव शेवटी उठावे लागले. त्यांनी चि. कार्तिकचा हात धरताच पोराने शिमगा करुन वातावरण दुमदुमुन सोडले. त्याला शांत करायचे आईच्या प्रयत्नात स्थितप्रज्ञांची कसलीही साथ नव्हती. एकदाचा सौथइंडियन कुटुंबाचा नंबर आला. त्यांनी कागदपत्रे जमा केली. त्यातही कार्तिकचा गोंगाट चालूच होता. शेवटी एकदाचे हे कुटुंब आपल्या भोंग्यासह तिथून चालते झाले. दिवाळीच्या सुट्या संपल्यावर गल्लीतली पोरे शाळेत गेल्यावर जशी गल्ली शांत वाटू लागते तसं प्रतीक्षालय एकदम शांत वाटू लागले.

माझ्या कामाचं गाडं पुढ सरकत नव्हतं असं दिसत होतं. मी गर्गबाईंना नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे ते विचारलं. त्यावर काही अधिकारी सुटीवर असल्याने आज वकिलातीचं कामकाज थोडं स्लो आहे इतकंच उत्तर मिळालं. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आतला फोन खणाणला. फोन वर माझा पारपत्रक्रमांक सांगितला जात असल्याने मला हर्ष जाहला. आता आपले काम संपणार या आशेने मी डोळे लावून बसलो. गर्गबाईंनी मला बोलवून घेतले. पारपत्र तात्काळ का हवे आहे असं त्यांनी विचारलं. कारण सांगितल्यावर गर्गबाईंचं समाधान झालेलं दिसलं नाही. ह्या कारणासाठी पारपत्र तात्काळ देता येणार नाही असं त्या मला म्हणाल्या. झालं म्हणजे सकाळपासून ज्या कामासाठी मी एवढी प्रतीक्षा केली होती ते सगळं पाण्यात गेल्या सारखं दिसू लागलं. तात्काळसाठी वकिलातीतून मी पूर्व परवानगी घेतलेली असली तरी त्याचा काही फायदा होताना दिसत नव्हता. शेवटी वकिलातीत जाऊन शर्मा सरांना जाऊन व्यक्तिश: भेटा व परवानगी काढा असा सल्ला मला गर्गबाईंनी दिला. मग हे सकाळीच का नाही सांगितलं असं म्हणून त्यांच्यावर मी जवळपास डाफरलोच. जो भारतीय कार्यलयानुभव घेण्यास मी सकाळी उत्सुक होतो त्याचा दणका मला बसला होता. इतका वेळ गोडी गुलाबीत वाट पाहणा-या माझा संताप झालेला पाहून गर्गबाईंनी पुन्हा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. वकिलातीत पुन्हा फोनाफोनी झाली. त्यात अर्धा तास गेला. गर्गबाईंनी येवून मला एक शपथपत्र वजा अर्ज लिहावयास सांगितला. तो लिहून होईतो पुन्हा अर्धा तास गेला. ते झाल्यानंतर सगळं कागदपत्रांचं धूड मी गर्गबाईंच्या समोर ठेवलं त्यांनी एकेक करुन कागदपत्रे पुन्हा तपासून अर्ज स्वीकृत केला व आमचं घोडं गंगेत नहालं. सकाळी ९:०० ला कार्यलय उघडताक्षणी प्रवेशकर्ता झालेलो मी दुपारी ४ म्हणजे कार्यालय बंद होण्याच्या वेळेला तिथून बाहेर पडलो. दिवस तसा खर्ची पडला पण जमेची बाजू एवढीच की माझं काम झालं होतं. शिवाय घरुन फोटो चिकटवून न आणणारे, डिंकाची शोधाशोध करणारे, कागदपत्रांची प्रिंट मारत बसलेले, घरी फोन करुन बायकोला कागदपत्र शोधायला लावणारे, लेकरांशी घेणं देणं नसलेले, इतकी वर्ष इतर देशात राहूनही गुणांनी व नागरिकत्वाने भारतीय राहिलेले असे अनेक सच्चे देशबांधव पहायला मिळाले, यातच धन्यता मानत मी तिथून चालता झालो.