बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

Category:

प्रतिक्रीया 

हे काय नवं प्रकरण
म्हणून कुतुहलाने पहा
नवं खातं उघड
मित्रांना मैत्रिणिंना ऍड कर
शाळेचे जुने सवंगडी शोध
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

या प्रोफाईल वरुन त्या प्रोफाईलवर
फुलपाखराप्रमाणे फिर
प्रत्येक प्रोफाईल मधे फोटो बिनदास टिप
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

एखाद्या सुंदर पोरीला
फ्रेन्डस रिक्वेस्ट टाक
हळूच जिमेल आयडी विचारुन
चॅटिंग सुरु कर
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

शे दिडशे कम्युनिट्या जॉईन कर
कम्युनिटी मध्ये कुणालातरी शोधत शोधत
एखाद्या मस्त प्रोफाईलवर जा
तिथल्या ४५० फोटोंना घातलेलं कुलूप पहा
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

"फार फ्रेन्डस रिक्वेस्ट येतात नाही"
म्हणत म्हणत हळू हळू काढता पाय घे
पण अधून मधून लॉग इन करत रहा
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

फेसबुक वर जा
कूल हो !
लोकांच्या बडबडीला "लाईक" कर
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

लोकांच्या भिंती बघून कंटाळलास की
शेती करायला लाग
शेजारी बनव
स्ट्रॉबे-या पिकव
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

ते ही करुन झालं की
माफिया बन
मन रमत नसेल तर
क्विझा खेळ
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

सारं काही करुन झालं
की ढोंगी बाबाला भविष्य विचार
तो काही तरी नर्रथक बडबडेल
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

फेसबूक सोडून नवा पक्षी धर
काय लिहावं कळत नसलं तरी
दोन चार शब्द खरड
इसकाळ वाचून
थरुरला फॉलो कर
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

पक्ष्याचा ही गळा दाबून
बझ वर ये
खरड खरड वाटेल ते खरड
लोक छान म्हणतील
काही लोक शिव्या घालतील
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

भिंती वाचून झाल्यावर
ट्विटून ट्विटून थकल्यावर
बझून बझून दमल्यावर
बघ....
बघ जुन्या ऑर्कुटची आठवण येते का?

~निल्या