अवलिया

Category: ,

प्रतिक्रीया 

फ्रॅंक पापा या माणसाची माझी पहिली गाठ झाली ती ऑफिस मध्ये. बरेच दिवस आमच्या टीम मध्ये एक कॉन्ट्रॅक्टर येणार येणार अशी चर्चा रंगत होती आणि एक दिवस माझ्या शेजारच्या क्यूबवर पाटी लागली. फ्रॅंक पापा. नाव वाचून थोडं हसू आलं. मनात म्हटलं बघुया किती दिवस टिकतो? कॉन्ट्रॅक्टर आला की सगळे आधी संशयाच्या नजरेनेच पाहतात. बरेच देसी कॉन्ट्रॅक्टर्स नवीन प्रोजेक्ट्वर थोडं दबकत दबकतच काम सुरु करतात. हे प्रकरण जरा निराळंच दिसलं. दुस-याच दिवशी सकाळपासूनच बाजुच्या क्यूब मधून फोनवर विविध संभाषणे आणि गंभीर चर्चा ऐकायला यायल्या लागल्या. "मी सगळं काही हँडल करतो, चिंता नसावी" अशी वाक्ये फारच आत्मविश्वासपूर्वक ऐकायला यायला लागली. फार मोठा माणूस दिसतो हा पापा म्हणत मी आपले नेमीच्या कामाला लागलो. त्याच दिवशी कॉफी पिताना ह्या माणसाची पहिली भेट व दर्शन झाले. काळ्या पांढ-या रंगाचं समबाहुल्य मिश्रण असलेले कुरळे केस, खुरटी काळी पांढरी दाढी, ना धड मेक्सिकन ना अमेरिकन पण काहिशी युरोपियन झाक त्याच्या दिसण्यात होती. पिवळ्या व लाल चट्ट्यांचा शर्ट थोडा बसकट बांधा आणि चेह-यावरचं हसू पाहून सिरिअस टोन मध्ये बोलणारा हाच का तो यावर विश्वास बसत नव्हता. कॉफी घेता घेता नावांची देवाण घेवाण झाली व आम्ही एकाच टीम मध्ये आहोत हा साक्षात्कार सुद्धा झाला. अवलिया दिसतोय एवढीच छाप घेवून मी क्यूब पशी परत आलो. रोजच्या भेटण्या चालण्यात मिनिटा मिनिटाला बदलणा-या त्याच्या फोन वरचा टोन ऐकून हा नक्कीच अवलिया आहे हा विश्वास पक्का होत चालला होता. बॉसशी बोलताना, कलिगशी बोलताना, बायकोशी बोलताना अशी बहुरंगी संभाषणे व बदलणारे टोन्स मला ऐकू येत असत. बॉसशी बोलताना हा प्रोजेक्ट कसा काय कॉंप्लेक्स आहे. आपल्याला डिझास्टर करायचे नसेल तर काय केले पाहिजे अशा गंभीर विषयांवर चर्चा करायचा, थोड्याच वेळ्यात बायकोचा फोन आला की, "काही नाही गं, मी माझ्या बॉसची टरकवतोय असं म्हणून खी खी हसायचा" अशा प्रसंगामुळे साहेब फोन वर बोलायला लागले की कुतुहलामुळे आपोआपच माझे कान टवकारले जाऊ लागले.

त्या प्रोजेक्ट्वर दोन एक महिन्यापासून काम करणारी माणसे सोडून आल्या दिवसापासून या माणासाला कसा काय एवढा भाव मिळतोय हा प्रश्न मला पडत असे. शेजारीच बसत असल्याने हाय हॉलोवरुन ओळख वाढून एकत्र कॉफी प्यायला जाणे गप्पा टप्पा मारणे चालायचे. दिवसही सरत गेले व ओळखही वाढत गेली. सुरुवातीचा एक महिना पापाजींनी काहीच काम केले नसल्याचे त्यांनी स्वत:च मला सांगितले. मॅनेजरने किती काम झाले असे विचारले तर पापा जड जड टेक्निकल शब्द मॅनेजरच्या अंगावर भिरकावून द्यायचा व मॅनेजरलाच काही तरी गूढ प्रश्न विचारून गुंगारून टाकायचा. तो पण चारचौघात आपली विज्जत वाचवण्यासाठी होयहोय करायचा. लोकांना घुमवण्यात पापाजी एकदम माहिर होते. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना विषय असा काही भरकटवत की मूळ प्रश्न कोणाच्याही लक्षात राहणार नाही. एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर न देता इतरांच्या कामाबद्दल पिल्लू सोडून द्यायचा पापाचा आवडाता गेम होता. मॅनेजराला ही चाल कळायला महिनाभर लागला तो पर्यंत भाईंकडे दुसरी चाल तयार असायची. पाच दहा मिनिट स्टेटस कॉल वर बडबडा करायचा शेवटी म्यूट करुन फिस्स करुन हसायचा. माझ्याशी ब-याच वेळा बोलताना काही सिरिअस बोलला की आता फिस्स्स करुन हसतो की काय असे वाटायचे. त्यामुळे गडी किती खरं बोलतोय याचा अंदाजच यायचा नाही. सगळंच एकंदरित गूढ प्रकरण होतं.

ऑफिसात काम जमत नसेल तर ते टाळण्यात पापाचा हात कोणी धरु शकत नव्हे. आज माझी पाठ दुखत आहे उद्या पर्यंत बरी होईल तो पर्यंत मी सुरु केलेले कार्य तडिस न्यावे असे इमेल टाकून पापा हापिसातून पळ काढत असे. पाठदुखी उद्या पर्यंत बरी होईल ही सगळी गणिते त्याला कशी काय माहित याचं मला आश्चर्य वाटे! एकदा सोमवारी डेमो देण्याची जबाबदारी पापावर टाकली होती. दिलेल्या कामात काही विशेष प्रगती केली नसल्याने पापांनी मी ब-याच दिवसात सुटी घेतली नाही असे म्हणत सोमवार मंगळवार अशी दोन दिवसांची सुटी काढून इतर कंत्राटदरांना डेमोच्या शुभेच्छा दिल्या व साहेब सासुरवाडीस पाहुणचारास रवाना झाले. जमत नसलेले काम अंगावर शेकू नये म्हणून पापा नाना क्लृप्त्या करत असे. असेच एकदा दोन कंत्राटदारांमध्ये काम वाटून देण्याची मिटिंग चालू होती. वरुनवरुन सोपी भासणारी गोष्ट पापाने मोठ्या चतुराईने आपल्या पदरी पाडून घेतली. पण जस जसे काम सुरु झाले तेव्हा पापाला आपली चूक लक्षात आली. आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला असे त्याला जाणवले असावे. पापाने यातून मार्ग कसा काढला असेल? पापाने अवघड काम सोपे कसे आहे व सोपे काम अवघड कसे आहे व तिथे स्वत: सारख्या सिनिअर माणसाची कशी आवश्यकता आहे यावर एक प्रबंध मॅनेजरबाबाला वाचून दाखवला. आपले बोलणे ऐकणा-याला कसे गुंगवायचे हे पापांना खूप छान ज्ञात होते. याची परिणती अशी होती की पापाचे राहिलेले काम दुस-या कंत्राटदाराने केले.
पापा अवलिया आहे हे आता मी पुरते ओळखले होते. एक दिवस शेजारच्या क्यूब मधून काही संवाद ऐकायला आले, "वि विल डिसकस थिस आफ्टर वर्क", "टेल यूर मदर टू स्टे होम, ऍंट नॉट टू गो टू द कॉप्स" अशी वाक्यं ऐकू आली. कॉप्स म्हटल्यावर माझे विचार सुरु झाले म्हटल भाई ने काही गफला केला की काय. कसं विचारावं, विचारावं की नको म्हणत म्हणत मी नाक खुपसलेच. म्हट्लं "काय रे मगाशी पोलिसांबद्दल काय बोलत होतास, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला". मला पापा म्हणातो, "काही नाही रे माझी सासू पोलिसांकडे जाणार होती तक्रार करायला" मी म्हटलं कसली? पापा म्हणाला, "अरे तिला परवा ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट न वापरल्याबद्दल टिकिट लागलं होतं. मग? मग काय तिला ट्रॅफिक अधिका-यांचा इमेल आला की सिनिअर नागरिकांकडून हे अजिबात अपेक्षित नाही, ज्येष्ठांनी तरी नियम पाळलेच पाहिजेत. आणि बरंच लेक्चर झाडून, पुन्हा असं केल्यास वयाचा विचार केला जाणार नाही अशी धमकी दिली होती. मी म्हटलं असं कसं करु शकतात ते. जाऊ द्यायचं होत ना तिला तक्रार करायला. पापा म्हणातो अरे कसंच काय अरे म्हातारीची चेष्टा करायला मीच फेक इमेल आयडी बनवून पाठवला होता तो इमेल, ती पोलिसात गेली असती तर माझी नसती का लागली वाट ! धन्य आहात म्हणत मी पापा पुढे हात जोडले. ब्रॅडमनची बॅटिंग पाहता आली नाही असं दु:ख जसं आजकालाच्या पिढीतल्या क्रिकेट प्रेमी मुलांना असतं तसंच पापा बाबांच्या महान लीला प्रत्यक्षात बघायला मला का मिळाल्या नाहीत याचं दु:ख मला तेव्हा वाटलं.

कॉफी विथ पापा च्या एका सेशन मध्ये जुन्या आठवणी सांगता सांगता पापा रंगात आला. तो कॉलेज मध्ये असतानाची गोष्ट. त्यांच्या कॉलेज मध्ये सायकल रेसिंगची स्पर्धा होती. अगदी आपली जो जिता वही सिकंदर टाईप्स. बरेच दिवस हे त्या रेस साठी सराव करत होते. स्पर्धा जिंकायचीच या आवेशाने त्यांनी सायकल वर मुठी आवळल्या. सुरुवातीला सर्वात पुढे असलेले पापा थोडे गाफिल झाल्याने मागे पडले होते. अटीतटीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक गमवायचा नाही या उद्देशाने पापा प्राण पणाला लावून पेडल हाणू लागले. शेवटचा उपाय म्हणून शॉर्टकट मारायच्या नादात कुठल्यातरी पायवाटेने पापाने सायकल दामटली. वेगात सायकल पळवता पळवता रस्ता चुकला. मग परतीची वाटही सापडेनाशी झाली. रस्ता शोधता शोधता ह्या न्यूटनला, एक सफरचंदाने लगडलेले झाड दिसले. हिरवे,लाल सफरचंद पाहून याला पुढे जाववेना. गड्याने तिथेच सायकल थांबवून फलाहार केला व सायकल स्पर्धा वगैरे असल्या क्षुल्लक बाबींचा बाऊ न करता झाडाखाली मस्त ताणून दिली. स्पर्धा संपूनही एक स्पर्धक न पोहचल्याचे पाहून सर्च अ‍ॅंड रेस्क्यू टीमचे स्वयंसेवक जेव्हा शोध घेत आले तेव्हा तेथे त्यांना हा विसोबा खेचर सायकलीवर पाय टाकून झोपलेला आढळला! असल्या काही प्रसंगांनी पापाच्या अंगीचे विरक्तीचे सुप्त गुण मला दाखवून दिले. पापा भारतात जन्मला असता व त्याने अध्यात्मिक क्षेत्रात पंचतारांकित प्रगती केली असती तर याच सफरचंदांच्या झाडा खाली पापा बांबांना सिद्धी प्राप्त झाली अशी हूल मी उठवली असती.

तुझ्या सासुचा अन सायकलिंगचा किस्सा माझ्या मित्रांना लय आवडला असे सांगितल्याने गडी लय खुलला व हसायला लागला. पापाची हसायची त-हाही निराळीच होती. वरचा जबडा व खालचा जबडा यांना बिलकूल विलग न होऊ देता ओठ मागे ताणून तो हसायचा. तसा तो हसायला लागला की पापा बाबांच्या पोटली मधून अजून एक कहाणी सुटणार याची मला खात्री वाटायला लागली. मो थोडा आग्रह केल्यावर पापा सास-याची कहाणी सांगू लागला. एकदा सास-याच्या वाढदिवसाला पापाने हार्ट वगैरेची चित्रं असलेले लाल ग्रिटिंग कार्ड घेवून त्यावर How can I forget your birthday dear. I still remember the sweet memories of your birthday we spent together in 1945. असा मजकूर लिहून दर गुरुवारी फ्लोरिडाला फ्लाय करणा-या एका मित्रा करवी फ्लोरिडाहून पोस्ट करवले. त्या ग्रिटिंग वरून सासूबाईंनी सास-यांना असे सडकावून काढले की बास. फ्लोरिडाचा स्टॅंप पाहून सासू अजूनच भडकली होती. म्हातारा लग्ना आधी फ्लोरिडात रहायचा हा बारकावा पापाने खुबीने वापरला होता. घरात मस्त धुराळा उडवून पापा त्यांची गम्मत पहात बसला. स्वत:च्या बायकोलाही त्याने यात त्याचा हात असल्याचा थांगपत्ता लागू दिला नव्हाता. शेवटी संतापाच्या भरात म्हातारी दगावते कि काय असी परिस्थिती आल्यानंतर पापाने तिला शांत करुन सगळा खुलासा केला.

पापांच्या लीला वर्णाव्या तेवढ्या थोड्या होत्या. श्रीकृष्णाच्या नटखट बाललीलांपासून बचावलेली एकही गोपिका द्वापारयुगी मथुरेत नसेल तद्वतच पापांच्या लीलांमधून बचावलेले त्याच्या नातलगांपैकी कुणी सुद्धा नव्हते. खुद्द त्यांचे पिताश्रीही यातुन सुटले नव्हते. आता या माणसाने काय प्रताप केले असतील? पापाजींनी आपल्याच पापाजींचे फेसबुक वर प्रोफाईल बनवले. इतक्यावर थांबतो तो पापा कसला? त्याने वडिलांच्या बॅच मध्ये कोण कोण होतं याचा इंटरनेटवर शोध घेतला. जे जे फेसबुकवर होते,त्यातल्या त्यात सगळ्य़ा मुलींना (म्हणजे त्या काळच्या मुलींना) प्रोफाईल मध्ये अ‍ॅड केले, इतकेच नव्हे तर मी मजेत दिवस घालवतोय. आमचा मुलगा आमची खूप काळजी घेतो, तुमचे कसे चालू आहे कॉलेजच्या दिवसांची खूप आठवण येते असे निरोप पाठवले. त्यातल्या काही मुलींनी आठवणींना दिलेल्या उजाळ्यांचे काही विशेष प्रसंग ह्या पट्ठ्याने जन्मदात्यास कथन करुन सांगितले. वडिलांनी संतापाने तिसरा डोळा उघडायच्या आत मी तुम्हाला सर्प्राईज देण्यासाठी हे करत होतो असे सांगून त्यांना शांत केले.

जितके आमचे कॉफी विथ पापा सेशन्स वाढले तितके ह्या माणसाबद्दल कुतुहलही. ऑफिसात आज काय होते ह्या पेक्षा पापा आज काय सांगेल याचेच कुतुहल जास्त असायचे. काम करुन करुन वैताग आला की मी पापा बाबांच्या क्यूब मध्ये तळ जमवू लागलो. आम्हाला पापांचे "ऑफिसात कसे वागावे" ह्या तत्त्वज्ञानाचे चाटण मिळाल्यामुळे बॉसनी केलेल्या बोच-या टीका फिक्या वाटायला लागल्या होत्या. बॉसनी आरोप केले तर प्रत्यारोप न करता हसत मुखाने उत्तर देणे. बॉस कितीही मूर्ख असला तरी त्यास तो विद्वान असून आपण त्याला मानतो असे सांगणे. बॉसला मला तुमच्या सारखे सक्सेसफुल व्हायचे आहे असे सांगून चढवणे. अशा काही जालीम मुळ्यांचा काढा त्याने मला पाजला होता. त्याचा मला बराच फायदा होत असे.

जसा जसा मी पापाला ओळखू लागलो तस तस मला समजू लागलं होतंकी पापा केवळ किस्स्यांचा बनलेला नाही. पापा म्हणजे एक जगण होतं. एक स्वच्छंदी प्रसन्न जिणं. अगदी उचकेपाचकेपणा नाही की अगदीच नाकासमोर चालणंही नाही. अगदी खिदळेगिरी नाही की भयाण शांतही नाही. कामाच्या दाबाने पिचलेला नाही की अगदी उनाड नाही. तत्ववेत्ताही नाही की उथळही नाही. त्याच्या हास्या मागे वेदना असेल किंवा नसेलही. पण पापाने मला खूष रहायला शिकवलं. तो सोबत होता म्हणून माझ्याही मिष्किलीचे मीच विसरलेले किस्से मला आठवले व मला हसवून गेले. पापाने माझं आयुष्य बदलवून टाकलं असंही नाही आणि सहज विसरला जाईल असंही नाही. मागच्या आठवड्यात ऑफिसच्या कामा निमित्त १५ दिवस बाहेर गावी गेलो होतो. परत आलो तेव्हा बरीच कामं पडली होती. इतर कुठल्या गोष्टी कडे लक्ष द्यायला वेळ नव्ह्ता. ऑफिसमध्ये काही तरी बदलले होते, पण ते लक्षात येत नव्हते. दुपारी पलीकडच्या क्य़ूब मधून नेहमीचा आवज न येता चेप्पू मामा, नेनु श्री माडलाडतुन्नानु असे अवाज ऐकायला येवू लागले. मी उठून पाहिले, शेजारच्या क्य़ूब वरची फ्रँक पापा ही पाटी निघून श्रीधर रेड्डी अशी पाटी लागली होती. पापा कंपनी सोडू गेला होता. तो पुन्हा भेटणार नाही याची भयंकर चुटपुट जाणवली. पण दुस-याच क्षणी त्या अवलियाची ठेंगणी मूर्ती मला आठवली. फ्रॅंक पापाच्या आठवणींच्या पुरचुंडीला एक गाठ मारुन मी मनाच्या आतल्या खणात ठेवली व ओठावर पसरलेली स्मिताची एक लकेर घेऊन मी माझ्या क्यूबकडे परतलो.