मोटार पहावी घेउन !!!

Category:

प्रतिक्रीया 
काल परवा पर्यंत कॅब करुन कुठे जायचं तर ६ डॉलर लागतात म्हणून जायला कंटाळा करणारा मी चक्क या आकड्यावर तीन पूज्ये चढवलेली रक्कम घेउन मोटार बाजारात उतरलो होतो. विश्वास बसायला थोडं जड जात होतं माझ्या विरोधकांना आणि थोडंसं मलाही.
कंपनीने बोनस देउ केला होता त्याचा सदुपयोग करावा आणि सार्वजनिक दळणवळणाच्या दृष्टीने भिकार असलेल्या या देशात जाण्या येण्याची सोय करावी या विचाराने मोटार घ्यायचं ठरलं. अमेरिकेत पहिल्यांदा आलो तेव्हा कंपन्याची नावं पण ठाउक नव्हती. होन्डा आणि फोर्ड हे दोन ब्रान्ड सोडले तर काही माहीत नव्हतं. विद्यार्थीदशेतल्या दीड वर्षात गाड्यांबाबत जाणून घेण्याची काही उत्सुकता वाटली नव्हती. नोकरी सुरु झाली आणि जाण्या येण्याचा प्रश्न भेडसावू लागला. या भागात बस वगैरे काही नसल्याने रोज सकाळी आठ वाजता आणणार कोण आणि संध्याकाळी सोडणार कोण हा प्रश्न होताच. सुरुवातीचा काही काळ अभिजीत सोबत राहत असल्याने त्याच्या गाडीतनं ये जा व्हायची. पण आता प्रश्न ऐरणीवर आला होता. आणि मी गाडी घ्यायचं ठरवलं (गाडी म्हणजे कार. पुणेकर दुचाकीला गाडी म्हणतात म्हणून हा खुलासा !!)
सुरुवात केली पण काय करा्यचं गाड्या कुठे पहायच्या ओ की ठो माहित नव्हतं. मग कुणी तरी सुचवलं की क्लासिफाईड्स मध्ये पहात चल. तिथे सेकंड हॅंड गाड्या चांगल्या मिळतात. तिकडे एक दोन जुनाट ट्रक महिनोन महिने नांदत होते. फारसं काही हाताला लागलं नाही. नंतर कोणा कडून तरी क्रेग्स लिस्ट बद्दल कळालं.
http://www.craigslist.org/ इथे गाड्यांचा मोठा खजाना हाती लागला. पण काय घ्यावं काय बघावं याचं काही अंदाज येत नव्हता.
जिएम आणि फोर्ड या अमेरिकन गाड्या सापडायला लागल्या. चिकार खूष झालो. झक्कास झक्कास गाड्या $४००० किंमतीला दिसायला लागल्या. आमच्या आनंदावर विरजण पडायला काही फार वेळ लागला नाही. इंटरनेट्वर फिरुन फिरुन कळालं की जॅपनीज गाड्या जास्त टिकाउ असतात. आणि अमेरिकन गाड्यांची १५०,००० माईल्स मध्ये वाट लागते. उलट जॅपनीज गाड्या २००,००० ते २५०,००० पर्यंत खेचता येतात. त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. हे ज्ञान आम्हाला नवीनच होते.
मग स्वस्तात चांगली गाडी घेण्याचा हुरुप मावळला आणि बजेट वाढवणे आवश्यक आहे हे कळले.
क्रेग लिस्ट वर लोक गाड्या पोस्ट करतात. काही फोटो सकट काही फोटो शिवाय. आणि लोक तिथे आपापल्या गाड्यांची वर्णनं करतात. आणि किंमती सांगतात. तिथे दोन प्रकारचे लोक पोस्ट करतात.

१. गाड्यांचे डिलर

२. स्वत: मालक

डिलर लोक खूप फसवतात हे कुठुनसं ऐकल्या मुळे फक्त प्रायव्हेट ओनर ची गाडी पहायची ठरवली. आणि आता फक्त जॅपनीज गाडी घ्यायचं ठरवल्या मुळे सर्च मध्ये फक्त होन्डा, टोयोटा आणि निसान या तीनच कंपन्यांच्या गाड्या पाहू लागलो. कंपनीला कंपनी न म्हणता हे लोक मेक म्हणतात. एखाद्या गोष्टीला जगन्मान्य नाव सोडून जगावेगळं काही तरी नाव द्यायचं ही अमेरिकन भाषेतली मेख आहे !! आता टॉयलेट्ला हे लोक रेस्टरुम म्हणतात. इकडे नवीननवीन आलो होतो तेव्हा या अजब संबोधनाने थोडं गडबडलो होतो. आता खरंच लोक रेस्ट घेण्यासाठी तिकडे जातात का? काहीच्या काही. लोक खरंच रेस्ट घेउ लागले तर बाहेर रांगा लागतील. रेस्ट रुमच्या अनेक गमती आहेत पण त्यातली एक सांगतो. कॅंपसजॉब (वेटरगिरिचं स्टॅंडर्ड नाव!) करतानाची. अम्ही असेच सगळे देसी लोक तिकडे काम करायचो. कसली तरी पार्टी होती. त्या पार्टीत एका बाईने आमच्यातल्या एकाले विचारले की Where is the rest room? आमचा हा बाळ्या त्याला काय माहीत रेस्टरुम कशाला म्हणतात. हा पठठ्या त्यांना म्हणतो कसा....You can Rest here !!!

परत परत तेच म्हण्त होता..You can rest here !!! म्हातारबाई तीन ताड उडाली !!! (अजून एक ताड उडाली असती तर तिला रेस्टरुम मिळाली असती !!) असो अमेरिकन्स ना अम्ही वेगळे आहोत हे दाखवायची खाज आहे. असो आपला मुख्य विषय आहे गाडी.

सो Honda, Nissan , Toyota या गाड्यांवर शोध सुरु झाला. गाडी दिसायला चांगली पाहिजे. १००,००० मैल पेक्षा जास्त नको, जॅपनिज पाहिजे आणि बजेट तर कमी. हे म्हणजे स्वत: गल्लीतल्या संत तुकडोजी महाराज विद्यालयात शिकलेले असताना बायको शोधताना कॉनव्हेंटचीच पाहिजे असं म्हणण्या सारखं होतं ! एखाद दोन गाड्या हाती लागायच्या पण रंग काही मनात भरायचे नाहीत. काळ्या, जाड किंवा बारीक सुंदर असूनही जिच्या पराक्रमाच्या गाथा सर्वांना कळालेल्या असतात अशा मुलींना नवरा निवडण्यात जसा चॉईस नसतो तसाच होतकरु सेकंड हॅंड गाडीच्या भावी मालकास गाडीच्या रंगाचा चॉइस नसतो. त्यामुळे मन मारुन हिरव्या गडद रंगाच्या गाडिच्या मालकांनासुद्धा कॉल करायला मी डगमगायचो नाही. कॉल केल्यावर गाडी मालकाला विचारायचे काय? हा प्रश्न पडायचा. आपल्याला तर काही माहिती नसायची. आपला पहिलाच प्रसंग. सुरुवातीच्या एक दोन कॉल मध्ये त्यांनीच दिलेली गाडीची माहीती मी परत त्यांनाच सांगायचो! नाना प्रकारचे लोक भेटायचे. कुणी हसमुख कुणी वैतागलेले.
शेवटी मेक, मॉडेल, इयर, माईल्स, किंमत, अक्सिडेंट्स असतील तर किती आणि कशा स्वरुपाचे हे विचारायचं ठरलं. पहिले काही दिवस फक्त फोन करणे आणि फोटो पाहून ठरवणं चाललं होतं. अनेक बॉब, टॉम, बिल, एरिक भेटले. मला याचं कारण कळलं नाही पण बहुतेक कार मालक आणि डिलर याच नावाचे भेटायचे. मग काही वेळा प्रत्यक्ष गाडी पाहण्याचे योग आले. आपल्या कडे कसं वधुचं वर्णन स्मार्ट सावळी, पाककलेत पारंगत घरकामाची आवड वगैरे असं आलं की चतुर लोकांना मुलगी काळी, जास्तच स्मार्ट, आणि शिक्षण वगैरे फारसं झालेलं नाही हे जसं झटकन कळतं, तसं आम्हाला गाड्यांचे मालक एकही ऍक्सिडेंट नाही, वेल मेन्टेन्ड असं म्हणायला आणि जास्तच पुश करायला लागले की समजून यायचं की काही तरी लफडा आहे. मग आम्ही गोड बोलून काढता पाय घ्यायचो.

गाडिवाले पैसे कॅशिअर्स चेक ने द्या, वायर ट्रान्सफर करा किंवा फक्त कॅश द्या असं जेव्हा म्हणतात तेव्हा तिथे हमखास काही तरी फ्रॉड आहे हे कळले. हळू हळू एक एक गोष्टी कळत होत्या. आणि मी स्वत:ला जाणकार समजू लागलो होतो. CARFAX ने हा सगळा नशा उतरवला. प्रत्येक व्यक्तीचा जसा सोशल सिक्युरिटी नंबर असतो तसा प्रत्येक गाडीला एक VIN नंबर असतो. म्हणजे Vehicle Indentification Number. यावर त्या गाडीची सगळी कर्मकहाणी नोंदवलेली असते. म्हणजे गाडी तयार झाल्या दिवसापासून गाडी कुणी घेतली, कधी घेतली, कुठे घेतली, गाडीचे किती मालक आहेत. म्हणजे एकाने दुसर्याला विकली दुसर्याने तिसर्र्याला असं किती वेळा झालं, कुठे झालं कधी झालं. ही सगळी माहिती VIN नंबर वरुन मिळते.

CARFAX ही अशी कंपनी आहे की जी VIN नंबर वरनं गाडीचा सगळा इतिहास खास तुमच्या साठी ऑनलाईन उपलब्ध करुन देते. अमेरिकेत कुणी कुणासाठी फुकट काही करणार नाही. सो कारफॅक्स असतो ३० $ना. तो पण एकाच महिन्या साठी. तरी पण आम्ही देसी आहोत. तीन जणात एक अकांउट शेअर केले आम्ही. म्हणजे दरडोई १०$. CARFAX चे रिपोर्ट समजायला थोडा वेळ लागतो. गाडी किती महाभागांनी दामटवली आहे, त्यातल्या किती महाभागांनी गाडी ठोकली आहे. मागून ठोकली की पुढून. कधी कुठे केव्हा हे समजते. शक्यतो ऍक्सिडेंट असलेली गाडी टाळावी असं म्हणतात. आणि वन ओनर गाडी चांगली समजली जाते. मग काय सत्र सुरु झाले. Craigslist वर गाडी पहायची. बॉब टोम जो कुणी असेल त्याला कॉल करायचा. त्या कडनं VIN घ्ययचा. CARFAX रिपोर्ट पहायचा. आणि सगळं ठीक वाटलं तरच गाडी पहायला जायचं. हा दिनक्रम रोजचा होतो. रात्रंदिवस गाड्या आल्या का पहायचं. फोन करायचे आणि मग CARFAX. यात विरेंद्र सेहवाग सारख्या ९५% गाड्या बाद व्हायच्या. म्हणजे सुरुवातीला चांगल्या आहेत असं वाटायचं आपण काही बोलून पावती देण्याच्या आत गाडीचा काही तरी मेजर लफडा कळायचा.
तरीही न थकता विवाहोत्सुक मंडळी जसं रोज मॅट्रीमॉनिअल धुंडाळतात तसं मी रोज क्रेग लिस्ट पाहत होतो. यात
http://www.cars.com/ ची भर पडली होती.
अशीच एक सगळ्या क्रायटेरिया मध्ये उतरलेली एक गाडी पहायला आम्ही गेलो. 99 Toyota Camry LE होती ती. Toyota मधे Corolla आणि Camry या दोन गाड्या घेण्याजोग्या आहेत. Camry मध्ये CE, LE असे प्रकार आहेत. ते मी सांगत बसलो तर तुम्ही पळून जाल हे मला माहीत आहे!
एक अमेरिकन जोडपं होतं. बरे वाटले. गाडिच्या कामाची कागद्पत्रं पण होती त्यांच्याकडे. गाडी चालवून पण पाहिली. गाडीचे शेपूटदिवे (Tail Lights) खूपच चकाकत असलेले दिसले त्यामुळे खोदून विचारले असता काकूंनी गाडी मागून ठोकलेले असल्याचे व मागचं सगळं नवीन बसवलं असल्याचं कबूल केलं. तात्पर्य CARFAX मध्ये छोटे मोठे ऍक्सिडेंट्स येत नाहीत. ते फक्त ५०% स्टोरी सांगतं. जस्ट लाईक अ टेलर. पूर्ण चित्रपट तिकिट काढल्यावरच !!
असेच अनेक टप्पे टोणपे खाउन शेवटी कळालं की प्रायव्हेट ओनर कडून गाडी घेणं कटू अनुभव ठरु शकतं. कर्बस्टोनिंग च्या लफड्यात सापड्ण्याची शक्यता असते. कर्बस्टोनिंग म्हणजे ओनर सोडून तिसर्याच माणसाकडुन गाडी घेणं कायद्याने गुन्हा आहे. आणि बरेच प्रायव्हेट ओनर फसवे असतात. एवढं सगळं करुन प्रायव्हेट ओनरकडून गाडी घ्यायची असेल तर गाडीचं टायटल आणि लायसन्स वरचं नाव चेक करावं. टायटल आणि रजिस्ट्रेशन वेगळया गोष्टी आहेत.
हुश्श्श किती लफडी आहेत ना गाडी घेण्यात....
आठवडाभर गाड्यांची यादी बनवायची, फोन करायचे, VIN No. घ्यायचे, CARFAX पहायचा. टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी शनिवारी ६०-७० मैल फिरायचं. आणि एवढं सगळं करुन काही तरी कळायचं आणि पुन्हा पुढच्या आठवड्यात तेच चक्र.
एव्हाना नवी गाडी घेण्याचा विचार मनात डोकावू लागला होता. ५००० डाउन पेमेंट घेउन झोकात गाडी घरी घेउन यावी असा विचार वारंवार येउ लागला. पण शैक्षणिक कर्ज, उधारी, क्रेडिड कार्ड वरील डेब्ट आणि H1 न होण्याची भीती या विष्णुरुपांनी मम गजेंद्राची नव्या गाडीच्या विचारातून सुटका केली.
एव्हाना गाडीतल्या बर्याच गोष्टी कळायला लागल्या होत्या. टाईमिंग बेल्ट, वॉटर पम्प, सील्स या गोष्टी चेंज केल्या आहेत का ते मी तपासू लागलो. होन्डाच्या गाड्या तर कधी सापडायच्या नाहीत. म्हणून मग आता मोर्चा Nissan Altima व Maxima कडे वळवला.
प्रायव्हेट ओनर चा नाद सोडून आता मी डिलर्स पहायला सुरुवात केली होती. डिलर कडून गाडी घ्यायची असेल तर अमेरिकेतला प्रत्येक डिलर खोटारडा आहे ही खूणगाठ मनाशी बांधा. तो तुम्हाला फसवणारच. आता तो क्वालिटी मध्ये फसवतो का प्राईस मध्ये हे तुमच्या नशीबावर आहे. पैशात फसवणारा देवमाणूस समजावा!
अशाप्रकारे अनुभव संपन्न होउन आम्ही गाडी धुंडाळत होतो आणि तोच नजर एका व्हाईट मॅक्सिमावर पडली. सगळं क्लिअर होतं. कारफॅक्स सही. लुक्स सही. नो अक्सिडेंट्स, वन ओनर.....मग आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेतली. गाडी एकदम पावर्फुल वाटली. आम्ही Pepboys या प्रोफेशनल मेकॅनिक कडे घेउन गेलो. त्याचा रिपोर्ट आला तेव्हा GRE चा स्कोर पाहताना जशी धाकधुक होते तशी धाकधुक होत होती. आणि त्यांनी गाडी चांगली असल्याचा निर्वाळा दिला.
हे म्हणजे इंजिनिअर, चांगल्या कंपनीत नोकरी असलेली, सुंदर आणि मनाने साधी मनमिळाउ डाउन टु अर्थ आणि फक्त एक अफेअर अशी मुलगी मिळण्यासारखं होतं !!!
योगायोगाने अशी खतरनाक डिल आम्हाला मिळाली आणि आम्ही गाडी ४०० जास्त देउन पदरात पाडून घेतली. झोकात गाडी घरी घेउन आलो. नेट्वर फोटो लावले. सगळ्यांनी नव्या नवरीचं कौतुक केलं. दोन दिवस सरले. परवा स्नो फॉल झाला. मस्त वातावरण होतं. सकाळी ऑफिस ला निघालो. चावी फिरवली. आणि काय आश्चर्य. नवी नवरी जशी अडून बसते तशी आमची ठमी अडून बसली. चालू व्हायचं नावच घेईना. आणि तुम्ही जेवढे प्रयत्न कराल तेवढं प्रकरण बिघडतं. आमच्या सततच्या प्रयत्नाने व्हायचं तेच झालं. गाडीची बॅटरी संपली. मग कळलं की यात दोन प्रॉब्लेम असु शकतात. एक तर बॅटरी किंवा स्टार्टर.
एवढ्याने भागलं नाही तर तुमच्या गाडीच्या फ्युअल इंजेक्टर मध्ये प्रॉब्लेम असू शकतो. त्यात नसेल तर निसान च्या इग्निशन कॉईल मध्ये प्रोब्लेम असतो!!!
यावर दोन उपाय आहेत. एक जम्प स्टार्ट किंवा चार्जर आणून बॅटरी चार्ज करणे.
आता सध्या गाडी जम्प स्टार्ट कशी कराची यावर सर्च करत आहे. जम्प स्टार्ट म्हणजे एका गाडीच्या बॅटरीने दुसरी गाडी स्टार्ट करणे. दोन केबल घ्यायच्या पॉझिटिव निगेटिव्ह बघायचं.
मृत बॅटरीचं +ve जिवंत बॅटरीला लावायचं. नंतर -ve केबल घ्यायची. आणि निल्याने एवढं पकवलं म्हणून त्याच्या गळ्यात अडकवायची आणि बेदम चोपायचं !!!!!