लाल बैलाची ढुसणी !!

Category:

हां तर मी गोष्ट सांगणारे एका केळीची ! आमच्या हापिसातली केळी. तिचं नाव Kelly, पण आम्ही तिला केळीच म्हणायचो. तिला कुमारी, युवती, कन्या, बाई या पैकी काहीही ठामपणे म्हणता येत नाही ! अविवाहित असली तरी कुमारी म्हणता येत नाही, यौवनात नसल्याने युवती म्हणता येत नाही, ती स्वत: दोन कन्यांची माता असल्याने कन्या म्हणता येत नाही व बाई सारखी वागत नाही म्हणून बाईदेखील म्हणता येत नाही !! साधारण तिशी पस्तिशीतली असेल, नाव केळी असलं तरी अंगापिंडानं अगदी कोबीचा गड्डा ! त्यामुळे "केळीचे हे बाग" काही सुकलेले नव्हते ! बुटकीशी कशी बशी ५ फूट असेल, डिझाईनर चष्मे घालणारी केळी जाता येता पहावं तेव्हा कोकच्या दीड लिटर बाटलीत तोंड घातलेलं ! नसलेली मान तिने वर काढून कध्धी कोणाकडे पाहिलं नाही ! कामाचं तर काही बोलूच नये. जेमतेम काम करुन रग्गड पैसे मिळवणा-यातलीच ती एक. तिला थोडं काम दिलं की माझंच काम कसं महत्त्वाचं आहे असा दर्प येणारे इमेल पाठवायची. असो.

तर त्या दिवशी सकाळी, रोजच्या प्रमाणे नको नको करत मन मारून हापिसात जाण्यासाठी तयार झालो. हापिसात जाण्यासाठी ८ म्हणता म्हणता ८:३० झालेच. माझ्या जागोवर आलो. चलसंगणक उघडून इसकाळ, जीमेल व लोकांच्या ब्लॉगवरच्या कालच्या प्रतिक्रियां मध्ये काही खुमासदार भर पडलीये का पहाव म्हणून पाहत बसलो होतो. इतक्यात धाडकन काही तरी पडल्याचा आवाज आला ! वजन वाढल्याने कोणाची तरी खुर्ची तुटली असणार म्हणून फिदिफिदी हसावे म्हणून मी जागचा उठलो ! काही दिसेना. तेवढ्यात एक क्षीण आवाज आला. "हेल्प !" इकडे तिकडे बघितले काही दिसेना म्हणून खाली बसलो. तेवढ्यात बाजुच्या खुराड्यातून पुन्हा आवाज आला "हेल्प प्लिज". मी तिकडे गेलो तर तिथलं दृष्य एकदम भयंकरच होतं ! केळीची सोलपटं कोणी तरी अर्धवट काढून ठेवल्यगत ही खरी केळी आवासून छताकडे बघत पडली होती. तोंडाला फेस. सा-या अंगाला घाम. मी (मदतीसाठी) पटकन जवळ गेलो. मला म्हणाली मला श्वास घेता येत नाहिए, प्लिज मदत कर. बहुतेक मला हार्ट अ‍ॅटॅक आलाय. माझी पण टारकन फाटली ! काय करावं काही कळेना.

८:३० एक ची मिटिंग असल्याने बहुतेक जण तिकडे गेले होते. आजूबाजूला कोणीच नाही. लगेच ९११ ला फोन केला. रुग्ण्वाहिका येई पर्यंत काय करायचं ते विचारुन घेतलं. मी तिला विचारलं आधी कधी आला होता का अ‍ॅटॅक ? तिने मानेनेच नकार दर्शवला. मी तिला मोठे मोठे श्वास घेऊन खोकायला सांगितले. "इथे श्वास घेता येत नाहिए खोकायला काय सांगतोस " असं माझ्यावर खेकसली. खरं तर ती व्यवस्थित श्वास घेत होती व बोलायला ही लागली होती. पण म्हटलं कशाला तिच्या नादाला लागा. पुन्हा एकदा सांगून पाहिलं. ती ऐकत नाही पाहून मीच तिच्यावर डाफरलो. म्हटलं मरायचं असेल तर मर, जर मरायचं नसेल तर सांगतो ते कर. मोठे श्वास घेत खोकायला लाग. फोन वर बोलणं चालूच होतं सी.पी.आर. बद्दल माहिती आहे का असं ९११ वाल्यांनी विचारलं. मी नाही म्हणून सांगितलं. त्यांच्या सांगण्या प्रमाणे आमच्या फर्स्ट एड खोक्यातून अस्पिरीन घेऊन आलो व तिला बळजबरी घ्यायला लावली. तेवढ्यात आमचा सँटा क्लॉज आला. पांढ-या झुपकेदार मिशा व पांढरे शुभ्र केस असल्याने त्याला आम्ही खाजगीत सँटा क्लॉजच म्हणायचो. तो आला व सगळं काही पाहून आपली अनुभवाचं गाठोडं सोडत म्हणाला "हा नक्कीच हार्ट ऍटॅक आहे. मला आला होता तेव्हा असंच झालं होतं मला". झालं ! कमीत कमी तिच्या समोर तरी हे सांगायला नको होतं, पण साहेब बोल्ले. पण घाबरलेले जीव म्हणजे आम्ही दोघेच. मी आणि सँटा क्लॉज ! बाकी ती आमच्या एवढी घाबरलेली दिसत नव्हती.

सी.पी.आर. चे विधी करायला सुरु करे पर्यंत म्हणजे फोन केल्या पासून पाचव्या मिनिटाला खाली रुग्णवाहिका आली. नेमके त्यांना वर कसे यायचे समजेना. मी जिने उतरुन पळत खाली गेलो व त्यांना वर घेऊन येण्यासाठी एलेव्हेटर चे बटण दाबले. १ मिनिट झाला तरी एलेव्हेटर काही येईना. मी अस्वस्थ झालो. हे लोक तोपर्यंत दुस-या गप्पा मारायला लागले. मी म्हटलं राजांनो प्रसंग काय गप्पा काय मारताय? तरीही काही फरक पडला नाही. मी म्हटलं जिने चढून जाऊया का? तेवढ्यात त्यांच्या पैकी एकाने "अजून कुणाला तरी अ‍ॅटॅक यायचा" असा बाष्कळ विनोद केला. शेवटी एकदाचे वर पोचलो. दोनच लोक आत आले. त्या दोघांच्याने केळी उचलेना म्हणून शेवटी मी हातभार लावला व तिला स्ट्रेचर वर घेतले. तिला खाली नेताना त्या लोकांचे विनोद चालूच होते. ती सुद्धा स्ट्रेचर वर पडल्या पडल्या आपल्या पोराला फोन करुन बोलू लागली. मी तिला म्हटलं मुलाला कशाला सांगतेस तो बिचारा लहान असेल तो काय करणार व दवाखान्यात कसा येणार? तशाही अवस्थेत हसत म्हणाली लहान नाही घोडमा १९ वर्षांचा आहे ! तिशी पस्तिशीच्या बाईला १९ वर्षांचा मुलगा कसा असेल असा विचार मी करायला लागलो ! मनातल्या मनात (३५-१९) ही आकडेमोड करुन झाली. तरिही माझ्या चह-यावरचे प्रश्नचिन्ह जाईना.

तिला खाली नेऊन एकदाचं रुग्ण्वाहिकेत टाकलं. हद्द म्हणजे बयेने आय फोन वर गाणी लावली. गाणी ऐकल्यावर मला बरं वाटेल म्हणाली. मग तिथे प्रश्नोत्तरे व प्राथमिक उपचार सुरु झाले. मी तेवढ्यात वर येऊन मिटिंग मध्ये घुसून सर्वांना सांगितले की असं असं झालं. तिचा घोडमा येणार असल्याने मला दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नव्हती. आमची एक मॅनेजर बाई दवाखान्यात जाणार होती. तिला काय झालं व पुढे काय होणार हे सगळं आम्हाला नंतरच कळणार होतं.

दिवसाची सुरुवात अशी झाल्याने कामात लक्ष लागत नव्हतं. एरव्ही असंही लागत नसतं. आज कारण होतं. कसा बसा दिवस ढकलला. घरी आलो. नेहमी प्रमाणे पुढचा दिवस उगवला व आठाला आम्ही हापिसात हजर झालो. आमच्या मॅनेजरला काही कारणास्तव दवाखान्यात जाता आले नाही. त्यामुळे केळीबद्दल काही कळाले नाही.

थोडी कॉफी घ्यावी म्हणून मी ब्रेकरुम मध्ये गेलो. पाहतो तर काय कॉफीच्या रांगेत हसत खिदळत केळी उभी ! मी गारच झालो ! चपापलो व तिला काही झाले नाही हे पाहून बरं पण वाटलं व थोडा राग पण आला. मी म्हटलं काय गं काय झालं काल ? मला पाहून तिचा चेहराच उतरला. अगदी माझ्यामुळे तिचं लय नुकसान झाल्या सारखं माझ्या कडे बघायला लागली. मी पुन्हा एकदा प्रश्न केला. त्यावर बया उत्तरली "अरे जाऊ दे रे आठवण नको करुन देवूस. $४०० फक्त अँबुलन्स चे लागले. इमर्जन्सि असल्याने विम्यातून मिळात नाहीत ते पैसे. शिवाय तात्काळ सेवेचे वेगळेच. काल हजार दीड हजार $ गेले माझे ! आपण ९११ ला फोन करायला घाई केली!" ह्या तिच्या शेवटल्या वक्यावर तर मी उडालोच. मी मनात म्हटलं हे बरं आहे. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तिला उद्देशून मी म्हणालो "पण, खराच हार्ट ऍटॅक असता तर?" तिथे उभी असलेली तिची शहाणी मैत्रिण बरळली "तर ते पैसे सुद्धा वाचले असते !!" ह्यावर दोघी खदाखदा हसायला लागल्या. तेवढ्यात माझ्या मनात "शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड" या म्हणीचे नवे स्वरुप समोर आले.
"केळी जात नाही जिवानिशी, वाचवणा-याच्या डोक्यावर खापर !" पण तिला काय भाषांतर करुन सांगणार म्हणून मी गप्प बसलो. पण तिला झाले काय होते हा प्रश्न मनातून जाईना. म्हणून न रहावून मी तिला विचारलं, "पण तुला झालं तरी काय होतं?"
..
..
"काही नाही रे डॉक्टर म्हणे की मी रेडबुल चे दोन टीन काल सकाळी प्याले त्यामुळे असं झालं. ह्या डॉक्टरांना ना काहीच कळत नाही. वेडेच असतात. त्यांना खरं कारण नाही सापडलं की उगाच आपल्या सवयींकडे बोट दाखवतात. रेडबुल तर मी रोज पिते. एखाद्या दिवशी दोन प्याले तर त्यात काय एवढं !"

संवादकर्तीचे ज्ञान पाहून जास्त काही न बोलता मी आपल्या खुराड्यात परत जाऊन संगणक उघडून इसकाळ, जीमेल व लोकांच्या ब्लॉगवरच्या कालच्याच प्रतिक्रिया पुन्हा वाचायला लागलो.

Comments (20)

अप्रतिम. पहिल्या ओळीपासून म्हणजे kelly चं केळी केल्यापासून जे हसतोय ते थेट शेवटच्या बैलाच्या फोटो पर्यंत. एकदम छान झालीये पोस्ट. खुमासदार वर्णन.

भन्नाट जमलाय लेख!!! केळी. . वर्णन तर अफलातून आहे!!!

हा हा... मी हसून हसून वेडा झालो आहे....
३५-१९ एक नंबर होता तो जोक....

khoop divsani kahi tari chagle vachayla milae.last payarta lekh vachavasa vatla.

Majaa Ali

@हेरंब: धन्यवाद रे. तुझी पहिली प्रतिक्रिया होती. पहिली कोणतीही गोष्ट खूप उत्सुकुता वाढवणारी असते. :)
मजा आली ना? मला सुद्धा मजा येते आता वाचताना !
@मनमौजी ब्लॉगवर स्वागत! केळीच्या वर्णनात कशाला ओळी घालवायच्या म्हणून आवरतं घेतलं होतं. पुढची व्यकितरेखा अजून फुलवेन.
@अनिकेत, तू च आहेस रे एक जो नियमीतपणे माझ्या उठाठेवी कडे लक्ष ठेवून असतोस!
मी (३५-१९-०.७५) असं लिहिणार होतो ! म्हटलं जास्तच चावटपणा होतोय !
@वेदांत
तुमचा दूरध्वनी देत चला, आम्हाला अलिबागला कधी यावंसं वाटलं तर आम्ही उतरणार कुठे? सकाळवर पण तुम्ही दिसता. कल्पना छान आहे.
प्रतिक्रियेबद्दल आभार ! अशी प्रतिक्रिया खरंच सुखावून जाते !

Mast aahe lekh ! chhan lihitos ! vachun maja aali. Keep writing an keep sharing !

mast :)

mast re mitraa. :)

ग़ोष्ट खरोखर तुझ्या ऑफेीसात घडली असेल तर कसली मजा !!!

Red Bull Ekdam MAST Title

khup chan blog... tuzi lihinya chi style ekdum 'hat-ke' aahe

Very funny! Great!!

Sundar ! Abhya chaan lihitos leka.

ekdam zakkas...:)

kasla bhari lihitos re........AFLAAATOOOOOON!!!

kharach kup dhamal prasang hota.....lekh vachun 15 mint zali tari me hasat ahe.....aabhari ahe...!!!!!!

केळी हाहा भारी ! आमची एक US Client चा नाव Jenny होता आम्ही तिला जनी म्हणायचो ..

Thank god me ha blog lunch time madhe vachat ahe.. me yevdhi hasat ahe ki aas paas che sagle chinki lok mazya kade pahatayet.. mast lihilay blog.. maaja ali vachun..

mast re nilya........ekdam fresh zalo yaar

-abhi

Hi nilya,"Taydiche pohe" 1St good, 2 to 5 not up to expectation,should be re write or cut short..! Damlelya babanche vidamban v.V.
good,