भाकरी मी आणि ढेकर !

Category: ,



"आई, काय गं तू नेहमी भाकरी करतेस ?",असं म्हणून तडतड करणारा लहानपणीचा ’मी’ अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. आईला सगळं येतच असतं. आई स्वयंपाक करते त्यात विशेष काय असं तेव्हा वाटायचं. तिला कष्ट पडत असतील आपण काही मदत करावी किंवा निदान नावं तरी ठेवू नयेत हे माझ्या गावीही नव्हतं. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे भाकरी ! नाही नाही मित्रहो मागच्या वेळी सारखी मी भाकरीची रेसिपी सांगणार नाहीये. ती श्टोरीचा अनएव्हीटेबल पार्ट म्हणून आली तर येउ शकते इतकंच !

तर २००६ च्या जुलै महिन्यात मी अमेरिकेला आलो. (हे सांगताना ई- सकाळच्या "पैलतीर" सदरात "माझे अमेरिकेतील अनुभव" छाप मथळ्याचे लेख छापून आणण्यात धन्यता मानणार्या लोकांसारखी माझी छाती वगैरे काही फुगुन आलेली नाहीये ! या लोकांनी आपण भारताच्या वतीने किंवा सकाळचा जो वाचक वर्ग असले लेख वाचतो, त्या जनतेच्या वतीने अमेरिकेत आलेले पहिले वहिले नागरिक आहोत आणि इकडील अनुभव लेखन करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. असा स्वत:चा समज करुन घेतलेला असतो! ब्लॉगच्या आगामी अंकात त्या लोकांवर तोंडसुख घेण्याचा माझा मानस आहे!)असो. अमेरिकेस आलो ते सांगावे लागले कारण ष्टोरी चा तो अविभाज्य भाग आहे.

आमच्या विद्यापिठामध्ये बरीच मराठी मंडळी होती.(जिथे विद्येचा कीस पाडला जातो म्हणून कदाचित त्या ठिकाणास "विद्या-पीठ" महणत असावेत !) (असो. वाईट होता.) ७५% आंध्रजनांच्या मानाने ५% म-हाटी जनता आमच्यासाठी बरीच होती!सगळ्यांना मायभूमीची आठवण करुन द्यावी म्हणून मी सरप्राईज़ भाकरीचा बेत आखला. मस्त ५-६ वाट्या पीठ (अफकोर्स ज्वारीचं! मी पुण्या मुंबईच्या मुलींसारखा स्वयपाकात तेवढाही काही "ढ" नाहीये !) घेउन मळायला सुरुवात केली. आणि भाकरी थापायला घेतली आणि थापताच येईना. च्यायला आता काय करायचं? सगळे प्रयत्न करुन झाले थोडं पीठ मिसळलं, मग मिश्रण घट्ट झाल्याने त्यात थोडं पाणी मिसळलं.सहाजिकच पाणी जास्त झालं, त्यात पुन्हा पीठ टाक असे प्रकार सुरु झाले. पुन्हा एकदा पाणी टाकल्यावर लक्षात आले की राजा हे "फ्रिकी चक्रा" असेच सुरु राहिले तर सगळं पीठ संपून जाईल आणि हाती पिठाच्या गोळ्याशिवाय काही लागणार नाही.(तसंही आजवर हाती काही लागलं नाहीये, पण असो ते विषयांतर होईल.) गाजावाजा करुन मराठी जनतेला घरी बोलावलं होतं त्यामुळे त्यांना आयतीच संधी मिळाली. माझी यथेच्छ टिंगल करुन मंडळी निघून गेली. मीच पाय पुढे केला होता मग ते तर ओढणारच! एरव्ही मराठी लोकं पाय पुढे न करताही एकमेकांचे पाय ओढतात. इथे तर त्यांना चांगलं निमित्त होतं.
इतर मंडळी गेली असली तरी मी धीर सोडला नव्हता. न जाणो काही चमत्कार होउन यातून खाण्यायोग्य तरी भाकरी बनवता येईल असा माझा विश्वास होता. भाकरी थपता येत नव्हती यावर उपाय म्हणून डायरेक्ट तव्यावर गोळा ठेवून तो पसरवून पाहिला. थोडा गोल आकार आला. जरा समाधान वाटलं.

पण लग्नाच्या वेळी सुबक वाटाणार्या बायका एका बाळंतपणानंतर जशा आपला शेप सोडून अस्ताव्यस्त पसरायला लागतात तशी माझी भाकरीही हळूहळू शेप सोडू लागली.आकराशी काय करायचे चवीने समाधान झाले म्हणजे झाले, अशी त्या नवर्यांप्रमाणे आपली समजूत काढीत (भाकरीबद्दल हां !!!) मी पुढे आणि काय होतंय ते पाहू लागलो.शेवटी व्हायचे तेच झाले. भिजलेल्या खपटाप्रमाणे तयार झालेल्या पदार्थांच्या त्या अनौरस अपत्याचे नामकरणा न केलेलेच बरे असे मला वाटले. कुमारीमाता आपल्या अर्भकास अनाथाश्रमाच्या दाराशी किंवा हिंदी सिनेमाप्रमाणे कच-याच्या पेटीत टाकून लोकांच्या नजरा चुकवून चोरट्या अंगाने जशा पळ काढतात तसं हे पिठाचं लोढणं कुठे तरी दडपून आपणही किचनच्या बाहेर पळ काढावा असं वाटत होतं! पण मी काही कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. त्या पदार्थास काही तरी भविष्य द्यावे म्हणून मी आता त्याच पिठातून थालीपीठ करायच्या प्रयत्नाला लागलो. आणि माफक प्रमाणात यशस्वीही झालो.

पण भाकरी जमली नाही हा आरोप जो माथी लागला तो लागलाच. इंडियातून निघताना मला चांगली जमली होती हे आठवत होतं. नेमकं इकडे काय बिनसलं होतं काय जाणे. पण तिकडे पीठ कालवाताना पाणी किती टाकायचे हे सांगायला आई होती. पण इकडे मी पहिल्यांदाच सत्ता हाती आलेल्या जवाहरलाल नेहरु सरकार सारखा धडपडत होतो!

तर सांगायचा हेतू हा की त्या दिवसापासून मी भाकरीचा धसकाच घेतला. कधी कधी भाकरी खाण्याची लहर येई पण पुढे मागे बायको आल्यावर करेल ती, अशी मनाची समजूत घालत होतो. मध्ये थोरल्या बंधुंचं शुभमंगल असल्याच्या योगानं देशावर एकदा वारी झाली पण जेमतेम दहा दिवस घरी होतो आणि त्यात लग्न. या धांदलीत लक्षात असून सुद्धा भाकरी खायचं विसरुन गेलो. एकूणात आज दोन वर्षात भाकरी खायचा योग आला नव्हता.शेवटी तब्बल जवळपास दोन वर्षांनंतर मी पुन्हा एकदा भाकरी करण्याची हिंमत केली. माझा रुममेट गावाला गेलेला. त्यामुळे जे काही बरंवाईट होईल ते आपल्यावरच होईल. हे माहिती होतं. इतरांचं टेंशन नव्हतं. आज यशस्वी होउनच बाहेर यायचं अशी मनाशी गाठ बांधून मी किचन मध्ये शिरलो.

इकडे जे पीठ मिळतं ते ताजं नसल्याने भाकरी बिघडते. त्यासाठी गरम पाणी करुन ते पिठात मिसळावे असा अतिशय महत्व पूर्ण सल्ला देशपांडे काकूंकडून मिळाला. इकडे भाकरी थापायला परात नव्हती त्यामुळे त्यावर मी एक शक्कल शोधून काढली. सरळ कटिंग बोर्डवर भाकरी थापायची. थापताना एकाच दिशेने भाकरी फिरवायची म्हणजे तुटत नाही. हाताला पीठ लावत लावत प्रेमाने फक्त चार बोटाचा वापर करुन भाकरी थापली की आपोआप चांगली होते. तवा अगदी गरम असला पाहिजे. मग अलगद पिठाची बाजू वरच ठेउन भाकरी तव्यावर टाकायची. त्यावर पाणी टाकून हाताने फिरवून सारखे करुन घ्यायचे.वरचा भाग थोडासा कोरडा पडला की भाकरी पलटायची. चांगली भाजली की नंतर विस्तवावर धरायची. भाकरी आपोआप फुलते. हे थेरॉटिकल नॉलेज घेउन मी पुढे झालो. स्टेप्स तंतोतंत फॉलो केल्या.

सुंदर मुलीला आपण तासभर टापावं आणि काही अपेक्षा नसताना अचानक तिने स्माईल द्यावी तशी गत झाली हो!ध्यानी मनी नसताना भाकरी झक्कस बनली. दिसायला तर अगदीच भाकरीसारखी होती!! शेवटी भाकरी असो वा पोरगी दिसणे महत्वाचे !! पुढचे पुढे पाहता येतं. काय बरोबर आहे की नाही? :)

मला मग अगदी रहावेचना. आणि मी चक्क भाकरी लोणच्याबरोबर खाल्ली. आहाहाहा. ती चव म्हणजे अगदी अविस्मरणीय ! शाळेत शिकवणारे जुने मास्तर रस्त्यावर भेटावे आणि जुन्या आठवणी उफाळून याव्या तशी आमच्या मेंदूत भाकरीची जुनी चव चेतवली गेली. अगदी आई करते तशी चव झाली होती. येsssssss स्वत:ची पाठ थोपटून घेतली मी. आणि मग बेत एकदम फाकडूच करावा म्हणून भराभरा पिठले करायला घेतले. मी पिठले करायल जाउन बर्याच वेळा शेकून घेतलं आहे! दरवेळी पिठाच्या गुठळ्या व्हायच्या. घरी बसून या पदार्थांवर आयता ताव मारणार्यांना यातली कळकळ उमजायची नाही. पाणी गरम करुन पाहिलं, पीठ हळूहळू पेरुन पाहिल. पण नाही. शेवटी एक हमखास उपाय मिळाला. फोडणीत पाणी टाकून नंतर पीठ मिसळण्यापेक्षा आधीच थोडे गरम पाणी करुन त्यात हाताने पीठ मिसळावे. म्हणजे गुठळ्या होत नाहीत.

एकाचा एकेक दिवस असतो म्हणतात. तसा आजचा दिवस माझाच होता. सगळं व्यवस्थित झालं होतं.सगळी मेहनत करुन शेवटी तीन भाक-या आणि पिठलं घेउन जेवायला बसलो. याज साठी केला होता अट्टाहास असं वाटायला लागलं. काही तरी मिसिंग आहे असं लक्षात आलं. भाकरीवर मग चमचाभर तूप ओढलं. आणि स्वर्ग दोन बोटे राहिला! तसा स्वर्ग दोन बोटांच्या अतंरावर बसच्या प्रवासात, रांगेत बर्याच वेळा येउन गेलाय. पण हा स्वर्ग निराळा ! लागलीच इंडियात आईला फोन करुन माझा पराक्रम सांगितला. घरी फोन करुन स्वपराक्रम सांगण्याचे प्रसंग तसे विरळच ! नाही तर एरव्ही आमच्या प्रतापांनी त्रस्त झालेल्या लोकांनीच ते काम स्वत:वर घेतलं होतं ! फोनवर आईला पण भडभडून आलं. लेक नसल्याने जी कमी वाटत राहिलेली ती मी भरुन काढतोय असं वाटून तिला समाधान वाटलं.

तीन भाक-या बकाबका संपवल्यानंतर जी संपॄक्तता वाटली त्याला तोड नाही. इतके दिवस आपण या सुखाला पारखे राहिलो होतो हे जसं लग्नाच्या पहिल्या राती नव-याला जाणवतं तसंच मलाही वाटून गेलं! जेवण संपवून स्वयंपाक घरात परतलो. नुकतच एखादं महायुद्ध संपलेल्या रणांगणासारखी हालत झाली होती. जिकडे तिकडे अवशेष पडले होते. पीठ मळायला घेतलेलं भांडं त्याच्या आजूबाजूला सांडलेलं पीठ, खरकटा तवा, चिकट झालेला कटिंग बोर्ड, पाणी ओतण्यासाठी घेतलेल्या काचेच्या ग्लासवर, गॅस बंद करायच्या बटणावर लागलेली पिठाची बोटे, जमिनीवर सांडलेलं पायाला कचकच लागणारं पीठ हे सगळे झालेल्या घटनेची हकीकत ओरडून सांगत होते. त्यांना गप्प करणं भाग होतं. पोटात पडायचं ते पडलं होतं त्यामुळे सगळं आवरायला अगदी जिवावर आलं होतं. हे सगळं आवरायला रात्रीचे साडे दहा झाले.

सगळं आवरुन चकाचक करुन झोपण्याच्या तयारीत होतो आणि अगदी ध्यानी मनी नसताना अचानक ती आली !ती आली आणि मन अगदी तिच्या जुन्या आठवणीत रमुन गेलं, चेहर्यावर आपसूकच समाधान उमटलं. बर्याच दिवसात तिचं येणं झालं नव्हतं. तिच्या येण्याने आनंदलेल्या मनाने मी बेडरुमकडे वळलो. आपल्या वाचकांत बरीच वात्रट जनता भरली आहे आणि त्यातली अनेक मंडळी मला चांगल्याप्रकारे ओळखतात म्हणून जाता जाता शंकेला वाव नको म्हणून तिचं "नाव घेतो".









आपला ना कुणी वाली ना कुणी केअर टेकर
आणि जी आली होती
ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नव्हे
तर होती ढेकर !!!





-----------------------------------------------------------------------------------

Comments (13)

Good one Nilya..
Hope to see you more from you..

भन्नाट!

आपणही आता भाकरी करणार. . . बघू 'ती' येतीये का !

अमित

Aila mastach jamali re ... BHakar.

Aawadali mala.. ;-)

Mast Likhan...

apratim ani swadisht ! ! !

Lagnapurvi Resume madhe navkhi pan
atishay kamachi gosht add kelya baddhal abhnandan :)

मस्त जमलीय भाकरी:)

Hey Abhijit...fantastic story yaar...mind blowing words and structuring....did u really write this one...anyways i trust u...Good One...

Thanks Swati !
Ya its 110% me.I wrote it one sitting Thanks a lot for your comments!:)
I think I should write more.

खूप छान आणि चविष्ठ झाली आहे भाकरी! आणि उखाण्या बद्दल काय लिहायच? तुमच्या डोक्यावर पु.ल. दिशपांडे ह्यांनी हात ठेवला आहे वाटत. Count me in ur Blog Fan list!

शर्वाणी खरे.

धन्यवाद शर्वाणी. बेस्ट कमेंट कन्टेस्ट साठी कुठे SMS पाठवायचा असता तर अगदी आत्ताच्या आत्ता पाठवला असता !
बेस्ट कमेंट.
असे शर्वानी म्हतले तर तिति छान !

tumhi ethe MS vagere karat hota kaay? karan 75 % aandhra vaale aani 5 % marathi ethech bhettat aani he jevan karayache vaandhe vagere me pan anubhavale aahet. Mazi same story aahe kandyachi bhaji baabat. and super writing. it feels great .

Awesome !!! Keep writing...

खूप सुंदर !!!
really nice ,good humor !
i too hav same experience wid Bhakri & pitala ...literally i tried like u ..changed brand of atta ,water ,cutting board ,grill pan ,frying pan ..,thalpit..eveything..so nice..

आणि स्वर्ग दोन बोटे राहिला!

Apratim aahe