हॅमिल्टनस्य कथा

Category:

शिकागो डाउनटाऊन मधून चालताना अनेक वेळा मला हे CIBC थिएटर दिसायचं. त्या पोस्टरवरचा स्टारवरचा माणूस दिसायचा. थिएटर बाहेर नेहमीच गर्दी असायची. उंची उंची गाड्या,अनेक चांगले पोशाख परिधान केलेले लोक तिथे दिसायचे. टायटॅनिक चित्रपट पुन्हा पाहतोय की काय अस वाटायच. त्या थिएटर बाहेर ललनांची सेल्फीज साठी झुंबड उडायची. त्यामुळे हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाळवली होती. दर वेळी आता गुगल करू नंतर करू असं म्हणून ते राहून  जात होत.

नंतर  हॅमिल्टन कोण होता हे विकी पिडियावरून समजले जरी असले तरी हे हॅमिल्टन म्युझिकल काय आहे हे काही कळत नव्हतं. विमानात आयल सीटवर  बसलेलो असताना माझ्या शेजारी बसायला एक कॉलेजवयीन कन्या आली. तिला आत जाण्यासाठी जागा करून देताना मला तिच्या स्वेटशर्टवर तेच हॅमिल्टनच पोस्टर दिसलं. ती हेडफोन्सवर सतत काहीतरी ऐकत होती. ते ऐकताना तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद  दिसत होता. नंतर बोलण्यातून तिच्याकडून कळालं की  हॅमिल्टन हे एक खूप चांगल संगीत नाटक आहे.  पुढच्या वेळी शिकागोला गेल्याबरोबर पाहून टाकायचं असा विचार केला. तद्वत पुढच्याच शिकागोखेपेला नाटक  पाहावे या हेतू ने तिकीट काढायचा एक क्षूद्र प्रयत्न मी करून पाहिला. पण शंभर-दोनशे डॉलर्स वगरे तिकिटदर पाहून एवढे पैसे एका नाटकाला द्यावेत का? असा विचार मनात आला. पुन्हा केव्हा तरी स्वस्त तिकिट मिळाल्यावर पाहू असा मध्यमवर्गीय विचार करून तो बेत मी रद्द केला.  नंतर शिकागो किंवा न्यूयॉर्कला जाणे झाले नाही आणि हॅमिल्टन पाहायचे राहून गेले.

रोजच्या जीवनात पैसे, वस्तू, कपडेलत्ते जमा करण्याऐवजी अनुभव गोळा करावेत या कुठे तरी वाचलेल्या उक्तीनुसार हा अनुभव आपल्या पोतडीत टाकावा या उद्देशाने ते तिकीट घ्यायचे ठरवले. एखादा  तरुण आपल्याला आवडणाऱ्या मुलीला पहिल्यांदा मेसेज  पाठवताना जसा सगळा  धीर एकवटून  एकदाच तो सेंड करतो, तास अगदी धावत्या हृदययाने डोळे बंद करून मी Purchase वर क्लिक केले व ते महागडे तिकिट घेतले. हुश्श. आता जायचे तर ठरले. पण ऑफिसात प्रचंड काम होते. अचानक काही आडवे आले तर काय करावे अशी चिंता होतीच. जबरदस्त पाऊस आणि ट्रॅफिक मला आव्हान देऊ पहात होते. क्षणात भिजवून टाकेल असा पाऊस कोसळत होता.  मी पण काही कच्च्या गुरूचा चेला नव्हतो. एवढे महागडे तिकीट काढल्यावर अक्षरश: रस्त्यावर तळे जरी साचले असते तरीही मी त्यात पोहून गेलो असतो!

अशा नाटकाला वगैरे जायचं म्हणजे पूर्व तयारी हवी. मग त्या नुसार अभ्यास सुरु केला. विकिपीडिया वाचून काढला. हॅमिल्टनच्या आयुष्यातली ठळक प्रसंग  पाहून  घेतले. संवाद समजले नाहीत तर उगाच गडबड नको व्हायला. साधारण किती मिनिट आधी जावे लागते? कशा प्रकारचे कपडे परिधान करावे लागतात? इथल्या नाटकांमध्ये इंटर्वल होतो का? आणि झालाच तर खायला काही मिळते की आपण आधीच क्षुधाशांती केलेली बरी? असे बरेच प्रश्न पडले होते. त्याबद्दल प्राथमिक माहिती काढून घेतली.  त्यात असे कळले की ड्रेस कोड नसला तरी आपण चांगले दिसण्याचा शक्यतो प्रयत्न करावा त्यामुळे मी चांगले जॅकेट त्यात शोभेलसा कडक इस्त्रीचा शर्ट घालून तयार झालो.  पावसामुळे लिफ़्ट उबर चे भाव कडाडले होते पण आता काहीही करून वेळेत पोचायचेच होते. पोचलो तेव्हा पाऊस चालुच होता. थिएटर समोर  सेल्फीजचा लखलखाट सुरु होता. आत गेलो तर केवळ मला वाट दाखण्यासाठी एक तरुणी मंद हसत  माझ्या सोबत माझ्या सीट पर्यंत चालत आली. माझ्या  हातात तिने नाटकाचे पत्रक दिले.  तत्क्षणी भारतातले थिएटरच्या मिट्ट अंधारात इथेच आहे इथेच आहे असं म्हणून जवळपास ढकलून देणारे आपले गेटकिपर आठवले.  फार गयावया केल्या तर तर एखादवेळी बॅटरी चमकवून आपली सीट दाखवायचे व पुढच्या व्यक्तिकडे वळायचे. नंतर अंधारात परत ती सीट  शोधायची कशी हे ज्याचं त्याने पार पाडायचं दिव्य होत. भारतीय पालकांचं पॅरेंटिंग ह्यांच्याकडून स्फुरित असेल असं मला फार वाटत.  जुजबी मदत व लगेचच  स्वावलंबनाचे धडे!  असो.
पत्रकात सर्व पात्रांची नाव , नाटकाचे लेखक दिग्दर्शक इतर माहिती व जाहिराती छापल्या होत्या.

माझ्या आजू बाजूला मी नाटकाला एकटा आलो आहे ही जाणीव तीव्रतेने करून देण्यासाठी इतर प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केले आहे की काय असे वाटले. डेटवर आलेले लोक इतरांना जुन्या आठवणींची उजळणी करून देत होते. एकदाचे नाटक सुरु झाले.  "ऍलेक्झांडर हॅमिल्टन" या पदाने  नाटकाची सुरुवात होते. या गाण्यातच थोडा पात्र परिचय समाविष्ट आहे. हे पहिल गाणं मी पूर्वतयारी म्हणून ऐकलं होत त्यामुळे ते प्रत्यक्ष साकारल जात असताना छान वाटलं व संदर्भही लक्षात आले.


हे नाटक वेगळं का आहे?
हे एक संगीतनाटका प्रमाणे नाटक आहे. पण यात मध्ये संवाद नाहीत. संपूर्ण नाटकच पदांमध्ये बसवलेले आहे.  रॅप या संगीत प्रकारात ही गाणी आहेत. म्हणजे कल्पना छान आहे. ऐतिहासिक नाटक पण तेव्हा अस्तित्वात नसलेल्या संगीत प्रकारात हे मांडलं आहे . हा मेळ नाटककारांनी उत्तम साधला आहे. जवळपास २२ कलाकार यात आहेत. अनेक प्रसंगामध्ये हे सगळे कलाकार एकाच वेळी या दुमजली रंगमंचावर उपस्थित असतात. प्रत्येक जण काही ना काही करत असतो त्यामुळे ते हे सर्व एकाचवेळी पाहताना कोणाला पाहू आणि कोणाला नको अशी अवस्था होते. काही जलद नृत्य दृश्ये खूपच कमाल साकारली आहेत. हे प्रत्यक्ष पाहायलाच पाहिजे. यात फिरत्या रंगमंचाने एका  नवीन मितीची नाटकात भर पडते. इंगलंडचा राजा हे एक विनोदी पात्र सुद्धा या नाटकात आहे.
उत्तम संगीत, विनोद, खिळवून ठेवणारे नृत्य, भव्य दुमजली रंगमंच, ऐतिहासिक कालखंड, २२ पात्रे यामुळे हे नाटक पाहणे हा वेगळा अनुभव ठरतो.


नाटक दोन भागामंध्ये आहे. प्रत्येक पदाचा शेवट भव्य दिव्य नृत्य, फिरत्या रंगांमंचाची कमाल, गायकी व  अनुरूप प्रकाशयोजनेमुळे फारच प्रभावी ठरतात.

आपल्या मराठी मध्ये सुद्धा "घाशीराम कोतवाल" हे नाटक काहीसे या नाटकाशी जवळीक साधणारे आहे.  अर्थात यातल्या कथा वेलवेगळ्या आहेत.   पण राजकीय पार्श्वभूमी थोडेसे राजकारण यातही आहे.

जॉर्ज वॉशिंग्टन चे पात्र एका कृष्णवर्णीय धिप्पाड नटाने साकारले. क्षणभर मला समजलेच नाही हा वॉशिंग्टन कोण?  ऐतिहासिक पात्र असूनही गोऱ्या माणसाचे पात्र कृष्णवर्णीयाने  साकारले  ही लवचिकता मला आवडली.  अशी अनेक पात्रे वर्णभेदाच्या पलीकडे साकारलेली होती. यावर काही नाकारात्मक चर्चा झाल्या आहेत. पण मला ते वावगे वाटले नाही. या नाटकाचा मुख्य संच न्यू यॉर्क चा असला तरीही शिकागोचा संच मला आवडला.
शिकागोतल्या नाटकाचे जवळपास १४०० प्रयोग झाले आहेत. आठवड्याला  ४-५ शो ते ही फुल जातात.

मुख्य पात्र ऍलेक्झांडर हॅमिल्टन बद्दल काही. तो अमेरिकेबाहेर जन्माला होता. इमिग्रंट म्हणून अमेरिकेत आलेला. अनाथ असूनही अमेरिकेत येऊन तो अमेरिकेचा फाउंडिंग फादर बनला.  त्याचा अवेळी झालेला मृत्यु चटका लावणारा आहे. तो कदाचित अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष  सुद्धा झाला असता. ट्रेजरी नॅशनल बँक असे बरेच काम त्याने केले आहे. कितीही महान असला तरी त्याचे पाय मातीचेच होते. त्याचे विवाहबाह्य अफेअर त्याची प्रतिमा मलीन करणारे होते. हे प्रसंग सुद्धा नाटकात आले आहेत. जास्त विचार ना करता वा अभ्यास न करताही नाटकाला गेलात तरीही चालते. कथा छान उलगडत जाईल.तुम्हाला शिकागो वा न्यूयॉर्कला जाण्याचा योग आला तर हे नाटक नक्की  पहा.

आता  पुढच्यावेळी त्या थिएटर समोरून जाताना माझ्या कुतुहलाची जागा आठवणींनी घेतलेली असेल.


https://en.wikipedia.org/wiki/Hamilton_(musical)
(छायाचित्रे जालावरून साभार )







सूर संगत

Category:




कधी कधी अगदी एखदी छोटी गोष्ट मोठी गोष्ट घडवून आणते.  तबलावादक श्री संजय देशपांडे यांच्या फेसबुकवरच्या एका कमेंटमुळे ही गोष्ट सुरु झाली झाली व त्याची सांगता परवा आमच्या घरी अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांची मैफल पार पडण्यात झाली. डॅलसला मैफल होणार होती पण विज़ाच्या अडचणी मुळे ती होऊ शकली नाही.  तरी पण पुन्हा एकदा डॅलसला मैफल करता येईल का अशी विचारणा मी केली व तत्परता दर्शवून संजय देशपांडे यांनी  घडवून आणली त्याबद्दल त्यांचे व सर्व कलाकारांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.  ५ नोव्हेंबर तारीख ठरली.  फ्ल्यायर बनवायला घेतले. सर्व रसिकांना फेसबुक व ईमेल वर कार्यक्रमाबद्दल कळवले.  बघता बघता ५ तारीख उजाडली. घरात एखादे कार्य ठरावे तसा उत्साह संचारला होता.  जया दाते यांच्या कडून व्यासपीठ आणले. ५० लोक बसतील अशी आसन व्यवस्था केली. ऑस्टिन होऊन भूषण नानिवडेकर
अर्ध्या रस्त्या पर्यंत  कलाकारांना  घेऊन येणार होते व तिथून पुढे मी आणणार होतो.  सकाळी डॅलसहून निघालो. मला थोडा उशीर झाला. नानिवडेकरांनी अर्ध्याहून अधिक अंतर कापून माझे काम सोपे केले. भूरभूर पावसात परतीचा प्रवास सुरु झाला. अभिषेकी बुवांचे, वसंतरावांचे गाणे ऐकत व गाण्यावरच्या गप्पांमध्ये प्रवास सुरु होता. तास दिड तासात डॅलसला पोचलो. घरी पोचल्यावर गरमा गरम जेवण केले. वैदेही ने केलेली कढी खूप छान झाल्याचे सर्वांनी सांगितले.  मी अर्थातच आमच्य नवविगनत्वामुळे कढीचा मोह टाळला. नया नया मौला ज्यादा अल्ला अल्ला करता है या उक्तीस छेद देत मी मौन बाळगून होतो पण विगनत्वाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरता मौन सोडावे लागले. असो आता  थेट मैफली बद्दल.


अपूर्वा  गोखले व पल्लवी जोशी यांच्या गाण्याबद्दल बरच ऐकून होतो.  त्यांच्या अमेरिका दौ-याबद्दल  झळकणाऱ्या पोस्ट्स वाचत होतो त्यामुळे उत्सुकता खूप होती. श्रोते मंडळींमध्ये सुभाष गायतोंडे, नारायण सरदेसाई, दिलीप राणे, किरण व कालिंदी साठ्ये, संजय व कल्याणी भट, जया दाते ही फाउंडिंग मेम्बर्स  असलेली जाणकार मंडळी उपस्थित होती.  क्षीरसागर मंडळी खास ओक्लाहोमा हून आली होती. शरद जांभेकरां  सारखे गायकही मैफलीला उपस्थित होते.  स्व. दिनेश कागलांची कमी जाणवत होती.

गायक व वादक स्थानापन्न झाले. श्री रागाची नोम तोम चीआलापी सुरु झाली. लगेच मनात सी आर व्यासांचा श्री ऐकू येऊ लागला. कोणाचाही श्री ऐकला की मला हाच श्री आठवतो. आलापी फुलावण्यातला दोन्ही गायिकांचा समन्वय पहिल्या मिनिटातच जाणवला.  हे खरे तर खूप अवघड आहे. दोन कलाकारांनी मिळून चित्र काढण्या सारखे आहे. एकाने काही फटकारे मारायचे व कुंचला दुस-याच्या हातात  द्यायचा. दुस-यानेही पहिल्या फटकाऱ्याशी सुसंगत पण आपला वेगळा फटकारा मारायचा. पण शेवटी चित्र एकच  काढायचे! अनेक वर्षांच्या एकत्र प्रवासाने व साधनेनेच हे शक्य आहे.  आलापीतून श्री रागाचा उठाव दाखवून "वारी जाउं रे" हा विलंबित तिलवाड्यातला गजानन बुवांनी रचलेला  खयाल सुरु केला.  संथ लयीत होणार विस्तार हळू हळू रंग भारत होता.  अधून मधून संवादिनीवर असलेले चिन्मय कोल्हटकर यांचे एखादे सुंदर आवर्तन येई.  स्वच्छ सूर, शुद्ध भाव प्रकट होत होते. सूर्यास्ताचा राग असला तरीही मला सूर्योदयाची उपमा द्यावीशी वाटत आहे. पहाटे रविकिरणे फाकत  जाऊन जसे हळू हळू जग दिसू लागते ताशा श्री रागाच्य छटा वातावरण उजळ करत होत्या.  वारी जाउं रे च्या  काही रोचक जागा दोघींच्या गायनात येत होत्या.  म प नी सां रें रें गं रें सां  चे सूर मनात घर करत होते.  ड्युअल इफेक्ट  खरंच छान होता.  लय जशी जशी वाढत होती तशी रंगात वाढत होती. आता संजय देशपांडेंचा तबला बोलू लागला होता व श्रोते हि डोलू लागले होते. "वाह वाह",  "क्या बात है" अशी दाद मिळू लागली. ताना, बोलबनाव, बोलाबाट व लयीला हाताळत  बंदिश पुढे सरकत होती.  नंतर "एरी हुतो आस" या तीन तालातल्या बंदिशीने रंगत  आणली.  पल्लवी जोशी यांचे वरचे स्वर लावण्याचे कसब दिसले.  दोन्ही गायिका कठीण जागा इतक्या सहजतेने लावत होत्या कि पहाणा-याला त्यात काय अवघड आहे असेच वाटावे.

या नंतर तिलक कामोद रागची सुरुवात झाली. माझ्या मनात मुकुलजींचा "बमना एक सुगन" सुरु झाला होता.  "सूर संगत" ही रूपकातली जयपूर वाल्यांची मध्यलयीतील बंदिश सुरु झाली.  श्रोत्यांना श्री  मधून बाहेर यायला वेळ  लागला असावा. पण थोड्याच अवधीत श्रोते  तिलक कामोदात हरवून  गेले.  दोन्ही गायिकांनी एकत्र गायल्याचा अप्रतिम इफेक्ट अजून मनात रुंजी घालत आहे. तदनंतर  "ता नुम  तनन" हा एकतालातला तराणा सुरु झाला.  कसलेल्या तानांनी तो अधिकच  सजला.
त्यानंतर  मध्यंतर झाला. मध्यंतरात  रसिकांनी चहाचा व चविष्ट समोस्यांचा आस्वाद  घेतला. अनेकांनी समोसे कोठून आणल्याची पृच्छा केली. पुढच्या मैफलीला  लोकांनी यावे म्हनून ते रहस्य उलगडले नाही.

मध्यंतरानंतर गौड मल्हार या रागाची सुरुवात झाली. गौड सारंग व मल्हार (बहुतेक शुद्ध) यांचा हा मिश्र राग.  "काहे हो" या मध्यलयीतील एकतालातल्या बंदिशीने राग मांडायला सुरुवात झाली.  कुमारजींच्या म्हणण्याप्रमाणे हा चलन प्रधान राग असल्याने चलनाला खूप महत्त्व आहे.  गौड मल्हाराचे छान झोकदार चलन यातून दिसत होते.  माझ्या आवडीचा राग असल्याने मला ऐकताना अंगावर काटे येत होते. तदनंतर "सैंय्या मोरया रे" ने  मैफिलीला कळस चढवला.  इतकी सुंदर मांडणी होती कि सांगता येत नाही.  केवळ अनुभवायची गोष्ट होती.  दोन्ही गायिकांच एकत्र गाणं , संजय देशपांडेंचा जोरकस तबला, व चिन्मय यांची लीलया फिरणारी संवादिनी पूर्ण फॉर्म मध्ये होते.  हि बंदिश आधी कुमारजींची ऐकून परिचयाची असली तरीही  नव्याने सापडल्या सारखी वाटली.  संदर्भासाठी खालील लिंक देत आहे.



त्यानंतर "अवधू माया ताजी न जाय" हे कबीरांचा निर्गुणी भजन पेश केलं.  चार वर्षांपूर्वी हे भजन मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं होत तेव्हांच माझी ब्रह्मानंदी टाळी लागली होती.  ते प्रत्यक्षात ते हि घरी ऐकण्याचा  योग्य येईल असं वाटलं नव्हत.  ज्यांनी पहिल्यांदा ऐकलं त्यांना सुद्धा खूप आवडल. त्याची सुरावटच खूप सुंदर आहे. हे भजन म्हणजे कळसावरचा फडफडणारा झेंडाच जणु.  त्याचा अर्थही खूप गहन व ज्याचा त्याने  लावायचा.  याला तबल्याची व संवादिनीची अप्रतिम साथ मिळाली. सुंदर संवादिनी, धा  तीं ता डा  ता तीं ता डा चे तबल्याचे आक्रमक बोल, सुभाषकाकांनि दिलेली टाळेची साथ  याने बहार आणली.  हो मोहक चाल अपूर्वा गोखले यांनींच बांधली आहे.
या नंतर "जसोदा तेरो लाल" ही  भैरवीतील डॉ. सुचेता बिडकर यांची रचना मांडली  गेली.  भैरवी सुरु झाली  आणि आता मैफल संपणार या भावनेने थोडा खट्टू झालो.  उणीपुरी पाच मिनिटांची भैरवी झाली पण मनात अजुन घुमत आहे. खाली याच रचनेची लिंक देत आहे. १:०६:०२ वर पाहावी.





एकूणच मैफलीत दोहोंचा समन्वय दिसून आला. एकमेकिंना संधी देऊन गायन केले जात होते. कित्येक वेळा षटकाराचे चेंडू सहज दुस-याला देऊ केले जात होते. चिन्मय कोल्हटकर यांनी खूप तन्मयतेने पेटी वाजवली. अप्रतिम संगत. संजय देशपांडे यांनी १२०% देऊन परफॉर्मन्स  दिला. काही तांत्रिक कारणांनी तबल्याचा माईक बंद पडला. संयोजकांचा (म्हणजे मीच) ढिसाळ कारभार दुसरं काय :).  मुख्य म्हणजे ब-याच जणांना तबल्याचा माईक बंद आहे हे माहित नव्हत इतका तुफान तबला वाजवला गेला. हे होऊनही कलाकारांनी समजून घेतला यात त्यांचा मोठेपणा आहे.

मी प्रत्येक मौफलीचं कौतुकच करतो असे काही जणांना वाटेल.  ते  काही अंशी बरोबर पण आहे. या मैफली खरंच कौतुक करण्या सारख्या असतात.  यात फक्त कलाकाराचे कौतुक नसून पिढ्यानपिढ्या  चालत आलेल्या त्या संगीत परंपरेचा त्यांच्या गुरूंचा तो एक प्रकारे आदर आहे. पारंपारिक संगीत एक खळाळत येणारा पाण्याचा प्रवाह आहे अस मला वाटत. कलाकार त्या प्रवाहाला दिशा देणारा दगड ठरू शकतो. काही कलाकार आपला रंगही त्या पाण्यात मिसळतात.  असा प्रत्येक  कलाकार जो या प्रवाहाच्या वाटेत येऊन त्याचा डबकं करत नाही त्याच्या बद्दल मला  नितांत आदर आहे. असो.

भैरवी लवकर संपल्याची चुटपुट  श्रोत्यांना लागली.  अजुन तासभर गाणं ऐकायची तयारी सर्वांची होती. एका मैफलीने समाधान झाले नसल्याने पुन्हा एकदा डॅलसला मैफिलीचा योग घडावा या प्रतीक्षेत आहोत.

५ नोव्हेम्बर २०१६
गायिका:अपूर्वा  गोखले व पल्लवी जोशी
तबला: संजय देशपांडे 
संवादिनी: चिन्मय कोल्हटकर

(बंदिशीच्या शब्दामध्ये काही बदल अपेक्षित आहेत. ते झाले कि हा कंस उडवेन  )


राग श्री: वारी जाऊँ रे (विलंबित तिलवाडा)
वारी जाऊँ रे सावरिया 
तुमपे वारना रे तुमपे वारना रे ।
तन मन धन सब तुमपे वारूं
जान जिगर तुमपे ॥
 
राग श्री: एरी हुतो आस (द्रुत तीन  ताल )
एरी हुं तो आस न गैली पास न गैली
लोगवा धरे मैका नाम ।
जबतें पिया परदेस गवन किनो
तबतें देहरी न दीनो पाव ॥

राग तिलक कामोद:सूर संगत (मध्यलय रूपक )
सूर संगत राग विद्या 
संगीत प्रमान जो कंठ कर दिखाये 
वाको जाने गुनि ग्यानी ।
अणु द्रुत लघु गुरु प्लुत 
ताल मूल धर्म राखिये 
सुअंछर सुधबानी ग्यानी ॥

ता नुम  तनन (एकताल) 


राग गौड मल्हार: काहे हो (मध्यलय एकताल)
काहे हो हम सो प्रीतम 
आंखे फेर डारी ।
का मोपे चूक परी
सुधार ले हो सदारंग 
तुम पर वारी ॥

राग गौड मल्हार: सैंय्या मोरया रे (मध्यलय तीनताल )
सैंया मोरा रे मैं तो 
वारी वारी रे गरवा म्हारे डारे ।
एक हाथ मोरी भरी सुरैया 
ढीट लंगरवा तोरा 
ज्यो ज्यो री मन माने मोरा
त्यों त्यों देऊ प्रान मै तो वारी हारे ॥

निर्गुणी भजन: अवधू माया ताजी न जा (भजनी ठेका )
अवधू, माया तजी न जाई। गिरह तज के बिस्तर बॉंधा, बिस्तर तज के फेरी।। काम तजे तें क्रोध न जाई, क्रोध तजें तें लोभा। लोभ तजे अहँकार न जाई, मान-बड़ाई-सोभा।। मन बैरागी माया त्यागी, शब्द में सुरत समाई। कहैं कबीरा सुनो भाई साधो, यह गति बिरले पाई।।

राग भैरवी: जसोदा तेरो लाल (मध्यलय तीनताल )
जसोदा तेरो लाल देखो मनात नाही
फोरे मोरी गगरी, भिगोदी सारी चुनरी
धीट बनावारी करे बरजोरी ।
हारी हारी दैय्या पकर मोरी बैय्या
चारचा करे सब घर  के लुगैय्या 
जेठ जेठानी दोरनी सांस ननंदिया मोरी
कैसे सहे मुरारी देत सब गारी ।।
राखो मोरी लाज जाने दे घर काज
झगर ना करो मोसे बात मानले आज
लपट झपट कर बैंया मोरी मरोडी
रोको नाही डगरी गिरिवर धारी  ।।


संस्मरणीय मैफल

Category:

संस्मरणीय मैफल

गायन: भुवनेश कोमकली
तबला: संजय देशपांडे
पेटी: व्यासमूर्ती कट्टी

भुवनेश कोमलली डॅलसला येणार हे कळाल्यापासून या मैफिली बद्दल खूप उत्सुकता होती.  खरं तर या पूर्वीच म्हणजे इंटरनेटवर त्यांचं गाणं जेव्हा ऐकलं होत तेव्हापासूनच प्रत्यक्ष मैफीलीचा योग केव्हा येतो याची मी वाट पहात होतो. भुवनेशजी वैदेहीच्या आवडत्या गायकांपैकी असल्याने ही उत्सुकता अधिकच होती. शेवटी आज ११ सप्टेबर २०१५ ला हा योग डीएफडब्ल्यू मैफिलीमुळे आला. अगदी घरगुती वातावरणात आजची मैफल पार पडली. 

(छायाचित्र अक्षय रिसबुड)
मैफिलीच्या सुरुवातीलाच तंबो-यांचे सुंदर स्वर घुमत होते. उत्तम ध्वनी योजने मुळे त्यांचा प्रभाव छान जाणवत होता (संजय दाते यांचे आभार). अगदी पहिल्या रांगेत मी सरसावून बसलो. भुवनेशजी व सर्व कलाकार स्थानापन्न झाले. तबल्यावरती श्री संजय देशपांडे व पेटीवरती श्री व्यासमूर्ती कट्टी हे उत्तम कलाकार साथीला होते. भुवनेशजींनी डोळे मिटून पहिला स्वर असा काही लावला की पुढे काय येणार आहे याची कल्पना आली. 




तेवढ्यावरती जरी मैफल संपली असती तरी मी तृप्त होवून टाळ्या वाजवल्या असत्या. काही क्षणातच ही नंद रागाची आलापी कानावर आली.  "ढूंड बन सैंया तोहे सकल बन बन" ही विलंबित तीन तालातील बंदिश सुरु झाली.  सचिन तेंडुलकर पिचवर आल्यावर आपल्या जशा अपेक्षा वाढलेल्या असतात अगदी तसं वाटत होतं. अगदी सुरेख मांडणी, बढत, अनेक सुंदर जागांनी ही बंदिश सजवलेली होती. एकेका जागेमागे किती मेहनत, किती विचार असेल हे जाणवत होतं. अत्यंत स्वाभाविकपणे राग पुढे सरकत होता. जे काही पुढे येतंय ते सगळं आपोआप व नैसर्गिकरित्या येत होतं. त्यात कुठेही ओढाताण जाणवली नाही. गायकीत कमालीची सहजता जाणवत हो्ती. काही अश्चार्याचा सुखद धक्का देणा-या जागा अगदी सहज आल्या. सचिन फॉर्मात आल्यावर जसे आत्मविश्वासाने फटके मारायला लागतो तसा रागाचा विस्तार होत होता. "ढूंड बन सैंया" मधील एखादा मधूनच येणारा जोरकस "सैंया" सुखकारक होता. आपण काय गातोय हे गायकाला उत्तम प्रकारे माहित असल्यावर गाण्यात जी स्वाभाविकता येते ती पदोपदी दिसत होती. साधारण राग सुरु झाला की रागाच्या मांडणीकडे मी जास्त लक्ष देतो. जेणेकरुन आपल्याला चार गोष्टी जास्त समजतील हा हेतू असतो. नंतर नंतर हे लक्ष बिक्ष देणं मी आपोआप विसरून नुसतं कधी ऐकू लागलो हे समजलंच नाही. सर्वात पुढच्या रांगेत असल्याने मैफिल फक्त माझ्यासाठीच चालू आहे असं वाटत होत. तदनंतर "अजहून आये श्याम बहुत दिन बीते" ही द्रुत तीन तालातील बंदिश सुरु झाली. "राजन.." गाणार नाहीत की काय असं वाटून थोडा खट्टू झालो पण या बंदिशीचा आनंद लुटला. यात संजय देशपांडे व व्यासमूर्ती कट्टी यांनी उत्तम संगत करून रंगत आणली होती. "राजन अब तो आजा" ही आवडती बंदिश सुरु झाल्यावर तर विचारायलाच नको. मन प्रसन्न प्रसन्न. यातल्या ब-याच जागा महित असल्याने ओळखीच्या जागा अल्या तर ओळखीचं कुणी भेटल्याचा आनंद तर नवीन अनपेक्षित जागा अल्या तर नाविन्याचा आनंद असा दुहेरी आनंद ही बंदिश देऊन गेली. तद नंतर गौरी बसंत मधील "आज पेरीले" ही मध्य लय तीनतालातील बंदिश गायली. या जोड रागाचे स्वरूप मला माहित नसल्याने फारसे काही बोलता येणार नाही पण बसंतवर जाणा-या सुरावटी छान होत्या.  त्यानंतर "अवधूता कुदरत की गत न्यारी" हे निर्गुणी भजन ते गायले. इथे कुमारजींची खूप आठवण आली. यानंतर मध्यंतर झाला.


मध्यंतरामध्ये गरमागरम बटाट्यावड्यांवर ताव मारला. सोबतीला जिलबी व वाफाळता चहा होताच. जया दाते व संजय दाते यांचे विशेष आभार. दर वेळी मेन्यु झकास असतो. चहा घेताना भुवनेशजींशी गप्पा झाल्या. मी हेमंत पेंडसेंकडे शिकतो हे सांगितल्यानंतर त्यांनी आपुलकीने चौकशी केली. पूर्वीची काही ओळख नसतानाही खूप मनमोकळे पणाने बोलले. छान वाटल.
मध्यंतरामध्ये अनेक ज्येष्ठ रसिकांनी कुमारजींच्या व वसुंधराताईंच्या आठवणी जागवल्या. दिनेशजींचे डोळे पाणवले. त्यांनी भुवनेशजींना जवळ घेऊन भावना मोकळ्या केल्या. वातावरण थोडे जड झाले होते. यामुळेच की काय मध्यंतरा नंतरच्या मैफिलीला मालकंसाने सुरुवात झाली. विलंबित एकतालातली "काहे री धन जागी" ही बंदिश ते खूप खुबीने गायले.  गाताना मान हलवण्याची विशेष पद्धत मध्ये मध्ये कुमारजींची आठवण करुन देत होती. अधुन मधुन मधुपजींचं गाणं ऐकत असल्याचा भास होत होता. संयत गायकीने मालकंसाच्या खोलीची जाणीव करुन दिली. नंतर द्रुत तीनतालातल्या "फूल बेदाग" ने मैफिलीत रंगत आणली. सुंदर लयकारी व ताना यांनी एक चैतन्य आणले. तदनंतर उतरा कल्याण रागातील "बैरन कैसा जादू डारा" ही कृष्णलीलांच वर्णन करणारी बंदिश गायले. या रागाबद्दल काही माहिती नसल्याने काही बोलता येणार नाही. यानंतर सर्वांची आवडती "सांवरे ऐजय्यो" ही बंदिश ’भुवनेश कोमकली’ स्टाईल ने गाऊन मैफिली मध्ये रंगत आणली. तबला व पेटीची उत्तम संगत एखाद्या गाण्याला किती छान सजवते हे पहायला मिळाले. द्रुत लयीत अंगावर कोसळणारे सुरांचे धबधबे व लयकारी मनाला रोमांचित करत होते. सांवरे प्रत्यक्षात ऐकायची खूप इच्छा होती. ती साध्य झाली. कुठल्याही सुरांवर/ शब्दांवर अनावश्यक जोर न टाकता ते गात होते.  गायक स्वत:च गाणं जेव्हा खरं एन्जॉय करतो तेव्हा ते श्रोत्यांपर्यंत जास्त पोचतं असं मला वाटतं. मानेची विशिष्ट लकबीत होणारी हालचाल ते स्वत: गाणं एन्जॉय करत होते हे दर्शवित होती. 

प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत असतो. त्या प्रमाणे भैरवीचा आलाप सुरु झाल्यावर मैफल संपत आल्याची जाणीव झाली. "धुन सुनके मनवा मगन हुवा जी" हे कबीराचं भजन भैरवीत गायलं. मनात खूप खोलवर रुजणारं भजन मनात घर करुन राहिलं. मैफल संपली पण ती संपू नये असंच वाटत होतं.

एक लक्षात राहिल अशी ही मैफल झाली. मैफिली नंतर काय बोलावं कोणाला काही सुचत नव्हतं. स्पीचलेस, अद्वितीय अशा प्रतिक्रिया काही रसिकांनी दिल्या. आवरा आवर केल्यावर भुवनेशजींची थोड्या गप्पा मारल्या. खूपच मोकळे पणाने व आपुलकीने बोलले. वैदेही नेमकी फिनिक्स ला गेलेली असल्याने तिला या मैफलीला येता आलं नाही याचं मला जास्त वाईट वाटल. तिच्या सांगण्यावरुन भुवनेशजींची सही घेतली. घरी निघालो. गाडी सुरु करुन निघालो खरा पण मनात संपूर्ण मैफल घोळत होती. 


नंद: विलंबित तीनताल
ढूंड बन सैंया तोहे सकल बन बन ।
बिधना तिहारी कोउ ना जाने
दे हो दरस मोरे प्यारे ॥

नंद: द्रुत तीनताल
अजहून आये श्याम 
बहुत दिन बीते ।
पलकन डगर बुहारू
और मग झारू सुहावे धाम॥


नंद: द्रुत तीनताल
राजन अब तो आजा रे 
थिर न रहत कजरा आंखन में।
अब ना सहूं रे पिया
छब तोरी आगयी आंखन में ।।

गौरी बसंत: मध्यलय तीनताल
आज पेरीले रंग बसंतीचीरा
आय रितुराज, कोयलरिया कूके
रंगादे रंगादे आरे रंगरेजा
आय रितुराज, कोयलरिया कूके


निर्गुणी भजन:
अवधूता, कुदरत की गत न्यारी
रंक निवाज करे वो राजा, भूपति करें भिकारी
येथे लवंगहि फल नहिं लागे, चंदन फूले न फूले
मच्छ शिकारी रमे जंगल में, सिंध समुद्रहि झूले
रेडा रूख भया, मलयागर चहूं दिशी फूटी बसा |
तीन लोक ब्रह्मांड खंड में, देखे अंध तमाशा ||
पंगुल मेरू सुमेल उलंघे, त्रिभुवन मुक्ता डोले |
गूंगा ग्यान विग्यान प्रकाशे, अनहद बाणी बोले ||
बांधी आकाश पताल पठावै, शेष स्वर्ग पर राजै |
कहे कबीरा रामु है राजा, जो कछू करें सो छाजै ||

मालकंस: विलंबित एकताल
काहे री धन जागी हो
ऐसन रात अंधियारी, जियरा नाहिं डरे हो तोरा ॥
आज मोरा रे पिया आंखन में आयो रे
निंदिया हराय, शोक उभराय गयो रे मोरा ॥

मालकंस: द्रुत तीनताल
फूल बेदाग ये बन
बन घन भरे खिरै सुंदर ॥
तरू पर लागे सोहे
बेलरिया खिरै फरै सुंदर ॥

उतरा कल्याण: अध्धा
बैरन कैसा जादू डारा
तू ने मोहा शाम हमारा ॥
कुवरी के संग आना जाना
हमसो करत बहाना ॥

सांवरे अई जइयो
जमुना किनारे मेरो गांव
जमुना किनारे मेरी ऊंची हवेली
भई बृज की गोपिका नवेली
राधा रंगीली मेरो नाम
बंसी बजा के जइयो
सांवरे आ जइयो सांवरे

मली मली के असनान करावहु
घिस घिस चन्दन कोर लगाऊ
पूजा करून सुबह शाम
माखन खाके जइयो सांवरे

खस खस रो महलों बनावहु
चुन चुन कलियन सेज बिछाऊँ
धीरे धीरे अईजइयो सांवरे


भैरवी भजन:
धुन सुनके मनवा मगन हुवा जी 
लागी समाधी गुरु चरणकी
अंत सखा दुख दूर हुवा जी ॥
सार शब्द एक कोई लागे
एचरा हंसा पाल हुवा जी ॥
शून्य शिखर पर झालर झलके
बरसत अमरित प्रेम छुवा जी ॥
कहे कबीर सुनो भई साधो
चाख चाख अल मस्त हुवा जी ॥

आंग्लमनाची भाषांतरे

Category:

स्थळ: सुप्रसिद्ध "अवॉर्डविनिंग ट्रान्सलेटर्स" इंडिट्रान्सचं ऑफिस. (आमचे येथे कूल आणि कॅची व्हर्न्याकुलर अ‍ॅड्स करुन मिळतील.)

पात्र: मार्केटिंग विभागात नव्या जाहिरातींवर काम करायला न मिळालेले, केवळ आडनावाने मराठी असल्याने मराठी जाहिरातींच काम करावं लागणारे दोन कॉन्व्हेंटसंस्कृत सजीव.

सजीव क्र.१ सुमित: आज काय काम दिलंय जयेश सरांनी?
सजीव क्र.२ प्रिया: अरे चार पाच अ‍ॅड्स ट्रान्स्लेट करायच्यात. मी जरा ईमेल बघते. मग बघु.
स.क्र.१ सुमित: चलेगा ना. नो प्रॉब्स.
स.क्र.२ प्रिया: ए सुमित मेरा हो गया इमेल देख के. चल कॉफी लेते है. मेरा तो काम ही कॉफी के बिना शुरु नही हो सकता.
सुमित: तुम चलो. मै बॅज लेके आता हूं.
(कॉफी यंत्रापाशी)
सुमित: आज काय आरामसे का काम?
प्रिया: हां रे. वो ट्रान्सलेशनका बोला था ना मैने. हां. अरे मराठीही है तो कर देंगे आजही.
सुमित: टेंशन नाय. करुन टाकू आजच. मिटिंग रुम बुक केली ना तू?
प्रिया: हो रे चल आता तिकडेच मग.
(मिटिंग रुम मध्ये)
सुमित: हां जरा पहिली वाली प्ले कर. काय आहेत हिंदी शब्द?
प्रिया: "पैरी पौना ताऊजी".
सुमित: आयला इसको मराठी मे ट्रान्स्लेट कैसा करने का? थोडा डिफिकल्ट है यार.
प्रिया: "पाया पडतो काका” नाही यार हे "काका" बसत नाही इथे !
सुमित: हो ना. मुलगी पहायला गेल्यावर मुलगा मुलीच्या वडिलांना काका नाही म्हणणार.
प्रिया: मग काय बसवायचं? अंकल?
सुमित: अंकल थोडी मराठी शब्द आहे?
सुमित: ते बुक कुठे गेलें मराठी ट्रान्सलेशनचं. वो आपटेजीने बनायाथा ना वो लेको आओ. त्यात त्यांनी दिया था ना वो. वाजिब म्हणजे माफक, मुफ्त म्हणजे मोफत वगैरे त्यात असेल ताऊजी.
प्रिया: (पुस्तक चाळत) अरे यार या बुक मध्ये पण ताऊजीचं काही ट्रान्सलेशन नाही.
प्रिया: हो ना काही सुचतच नाही. बघु बघु हे नंतर बघु. आधी पुढची वाक्य करुन टाकू.
प्रिया: पुढचं वाक्य काय आहे?
सुमित: "दिदि शर्ट देखा कितनी टाईट पेहेनता है".
प्रिया: याचं, "दिदि शर्ट पाहिलास किती टाईट पेहेनतो." असं करुन टाकू.
सुमित: ए वेडी का तू? पेहेनना म्हणजे परिधान करणे, घालणे असं आपटेबुक मध्ये लिहिलंय. थोडं तरी मराठी राहू दे यार.
प्रिया: "दिदि शर्ट पाहिलास किती टाईट घालतो". आता ठिक आहे?
सुमित: अमम....ठीक है पण दिदि ऐवजी ताई घेतलं तर?
प्रिया: छे रे ! "ताई" फारच मराठी वाटतं ते. छे छे. दिदिच मस्त आहे.
सुमित: अगं पण ही अ‍ॅड मराठीच आहे ना ही?
प्रिया: चुकतोयस मित्रा. आपल्याला ही अ‍ॅड मराठी नाही, आधी कूल बनवायची आहे.
सुमित: बर बाबा. जैसा आप ठीक समझो. बर मग त्या हिशोबाने टाईट चं तंग न करता तसंच ठेवायचं. बरोबर?
प्रिया: अब आया ना समझ. आपल्याला मराठी वाटणारी कूल अ‍ॅड करायची आहे. चल चल पुढचं वाक्य सांग.
सुमित: "आपने आप को कुछ ज्यादाही कुल समझता है".
प्रिया: ज्यादाही ला मराठीत काय म्हणतात?
सुमित: ज्यादा मराठीच आहे. फक्त ज वर जोर दिला की झाली हिंदीचं मराठी. आपण असं करु "स्वत:ला जरा ज्यादाच कुल समजतो”.
प्रिया:: वा वा. क्या बात है. चलेगा.
सुमित: पुढे काय आहे? "कुछ मीठा हो जाए".
प्रिया: याचं काय करता येईल?
सुमित: "काही गोड होऊन जाऊ द्या" चालेल का?
प्रिया: नाही रे. समथिंग डझन्ट साऊंड गुड. एक मिनिट हां मी त्या राधिकाला फोन करुन विचारते. हाय राधिका अगं कशी आहेस? अगं एक पटकन हेल्प कर ना.  कुछ मीठा हो जाए ला मराठीत काय म्हणतात? काही नाही गं एका कलिग ला मदत करतेय. यांना साधं ट्रान्सलेशन जमत नव्हतं. सगळं केलं मी एवढं एकच अडलं होतं. अच्छा ठिक आहे. करते तुला नंतर. थॅंक्स यार.
प्रिया: सुमित लिहून घे. "चला तोंड गोड करुया".
सुमित: वा वा. क्या बात है. हे तर आपटेंना पण जमलं नसतं. झालं आता फक्त पैरी पौना ताऊजी राहिलं.
प्रिया: मी काय म्हणते एक झकास आयडिया आहे. हे असंच्या असंच ठेवूया. कोणाला काय कळणार आहे?
सुमित: असं कसं? पैरी पौना बरोबर नाही वाटत. जयेश सरांना विचारु या?
सुमित: जयेश सर एक क्यू क्यू आहे सर.
जयेश: येस गो अहेड.
प्रिया: सर पैरी पौना ताऊजी चं ट्रान्सलेशन करायचं होतं, मला वाटतं की ट्रान्सलेशन करत बसण्यापेक्षा ते तसंच ठेवलं तर?
सुमित: पण सर माझं म्हणणं होतं की मराठी मुलगा मुलीच्या आई वडिलांना पैरी पौना ताऊजी कशाला म्हणेल?
जयेश: हेच हेच तर तुम्हाला सुचत नाही. आऊट ऑफ द बॉक्स विचार करा. गुड जॉब प्रिया. अरे. मुलगा मराठी असावा अशी काही अट नाही. आजकाल मराठी मुली नॉर्थवाल्यांशी ब-याच प्रमाणात लग्न करत आहेत. तेव्हा मुलगा मुलीच्या वडिलांना पैरी पौना म्हणू शकतो. आणि ते कूल पण दिसतं. ओके करा हे आणि करा अ‍ॅड फायनल. हाय काय आणि नाय काय !

भारतीय पारपत्र कार्यालयातील काही तास !

Category: ,

शाळेत असताना "मी पाहिलेली रम्य पहाट" किंवा तत्सम निबंध लिहिण्याचे काही कटु प्रसंग प्रत्येकाच्याच वाट्याला आलेले असतात. एरव्ही सूर्यनाराणाचे द्वितीय प्रहारा आधी दर्शन न घेणारे आपण कोण्या क्वाचित्क हेतुसाठी निद्राभंग करुन अंथरुणत्याग करुन घराबाहेर पडलो, असे दाखवावे लागायचे. या आदिकारणाची जुळवाजुळव करण्यातच बरीच बुद्ध्युर्जा खर्ची पडायची. नाना प्रकाराच्या सबबी कितीही ख-या वाटल्या तरी त्यात नाट्यमयता नसेल तोवर त्या आमच्या गुरुजनांच्या पचनी पडायच्या नाहीत. वानगी दाखल, "मामाच्या गावाला जावयाचे असल्याने आईने उठविले", हे कारण लिहिल्यामुळे माझ्या वर्गमित्राची, "का रे ईयत्ता दहावी ना तू? आणि मामाच्या गावाला जातोस? हाच का तुझा कल्पनाविलास?" असं म्हणत गुरुजनांनी समस्त वर्गबंधु व भगिनींसमोर कुचेष्टा केली होती.

कारणाचा ऊहापोह झाल्यावर निबंधात बळं बळंच निसर्गाचं जाम कवतिक करायला लागायचं. आता आमच्याकडे पहाटेची जी दृष्ये दिसायची ती तशीच्या तशी वर्णन करण्या सारखी नसायचीच. उदा. रस्त्याच्या कडेने नक्षीकाम करण्यात गुंतलेले बालकारागीर, मखमलाच्या गादीवर ऐटित लोळणा-या राजभार्येगत मलपंकात लोळणारी वराहस्त्री व तिची अपत्ये, त्यात चाललेला त्यांचा वात्सल्यपूर्ण क्षीरप्राशनाचा कार्यक्रम, निष्कारण मागे लागून हृदयस्पंदन वाढवणारे श्वानमित्र वगैरे वगैरे. पण हे सगळं वास्तव बाजुला सारुन आम्हाला पहाटेचा गार वारा वहावावा लागे, नसणारे डोंगर उभे करुन त्यांच्या शिखरावर सोनेरी किरणं सोडावी लागत, किलबिल करणारी पाखरं शोधून आणावी लागत, शिवाय एखाद दोन वांड वासरांना पकडून दुडक्या मारायला लावाव्या लागत. हे सगळे वर्णनरुपी वाळूचे कण रगडिल्याशिवाय गुणांचे तेल गुरुजनांच्या लेखणीतून गळायचे नाही. या उपर निबंधात झुंजुमुंजु, पूर्व दिशेची लाली, पाऊलवाटा, माळरान, धुके हे शब्द नसले की काही गुण आपोआपच वजा व्हायचे. पाहाटेचं वर्णन मला वाटतं कोणत्याही शालेय नैबंधिक इतिहासात फक्त पौष माघातल्याच पहाटेचं सापडेल. थंडी शिवाय पहाट निसर्गरम्य होऊच शकत नाही अशी साधारण धारणा असावी. या धारणेस छेद देण्याचा प्रयत्न करुन आम्ही गुणच्छेद ओढवून घेतला होता.

असो. शालेय निबंधाचा संदर्भ यासाठी की मी त्याप्रमाणेच हा निबंध लिहिणार आहे. निबंधाचं नाव आहे "भारतीय पारपत्र कार्यालयातील काही तास!". भारत सरकारने दहा वर्षांसाठी केलेली कृपा संपुष्टात येत असल्याने पुढील दहा वर्षांची तजवीज करण्यासाठी जवळच्याच भारतीय पारपत्र कार्यालयात/वकिलातीत जाण्याचा योग आला. परदेशात राहून भारतीय कार्यालयानुभवांना मुकलेल्या मला हा अनुभव काही अंशी का होईना मिळेल अशी आशा होती. वकिलाती ऐवजी पारपत्र कार्यलयात आधी जाऊन कागदपत्रे द्यावी लागतात तद्वद मी तिकडे गेलो.
सकाळी ९ ला कार्यालय उघडणार होते त्याप्रमाणे मी सकाळी ९:०० ची अपॉईंटमेंट घेतली होती. ९ ला म्हणजे ९ ला कार्यलय उघडलेले होते व तिथे काम करणा-या महिला कर्मचारी स्वस्थानी स्थनापन्न झालेल्या होत्या. आत प्रवेश करणारा मीच पहिला अर्जदार होतो. कार्यलय वेळेत उघडलेले व तिथे बसलेली कृष्णवर्णीय अमेरिकन महिला (यांना आपण जॉर्डनबाई म्हणूया) पाहून आपण दुस-याच देशाच्या पारपत्र कार्यालयात तर आलो नाही ना असे वाटले. आतमध्ये एकवार नजर फिरवली व इनक्रेडिबल इंडियाचे फलक दिसले आणि माझ्या जिवात जीव आला. अपॉंटमेंट घेतली आहे का हा प्रश्न जॉर्डनबाईंनी सवयीने विचारला व मला बसायला सांगितले. सगळी कागदपत्रे घेऊन तपासताना अधून मधून माझ्या चेह-याकडे विचित्र हास्य करुन जॉर्डनबाई पाहू लागल्याने मला भय वाटू लागले. कागद पत्रांची चांगली ३-४ मिनिटं छाननी करुन झाल्यावर जॉर्डनबाई "ओ नो, कॅन्ट बिलिव्ह दिस !" असं म्हणाल्या. मला काहीही कळेना. त्यांचे बोलणे ऐकून आतून एक भारतीय दिसणा-या कर्मचारी महिला (यांना आपण सौ. गर्ग म्हणूया) बाहेर आल्या. त्या दोघींचा काही तरी अगम्य संवाद झाला. गर्गबाई जावयाल पहावं अशा कौतुकाने माझ्याकडे पहात होत्या. न रहावून शेवटी त्यांनी मला त्यांच्या प्रसन्न्तेचं रहस्य सांगितलं. पूर्ण भरलेले फॉर्म्स व सर्व कागदपत्रे व्यवस्थित असलेला एकही अर्ज या आठवड्यात मिळणार नाही अशी त्या दोघींची पैज लागली होती, व माझ्या अर्जामुळे त्या गर्गबाई जिंकल्या होत्या. यात एवढं काही विशेष नाही, असं वाटून मी फक्त बेगडी हास्य दिलं. गर्गबाईंनी मला बसायला सांगितलं. इथून सुटून केव्हा निघता येईल याचे आडाखे मी बांधत होतो. १५-२० मिनिटांनंतर थोडीशी वर्दळ वाढली. गर्गबाई मला विसरल्या की काय असे वाटून त्यांना मी जाऊन विचारलं, "तुम्हाला काही आणखी कागद पत्रे लागणार आहेत का?" गर्गबाई उत्तरल्या, "तसं नाही तुम्हाला पारपत्र तात्काळ हवे आहे ना, त्यामुळे आधी वकिलाती कडून परवानगी लागते. ती मिळे पर्यंत तुम्हाला थांबावं लागेल." आलिया भोगासी असावे सादर असा विचार करुन, "हरकत नाही" असं म्हणत मी तिथल्या खुर्चीत विसावलो. थोडावेळ स्मार्टफोन उलटापालटा करुन झाल्यावर मी इकडेतिकडे पहायला लागलो.  इनक्रेडिबल इंडिया ची राजस्थानच्या वाळवंटात पाण्याची घागर डोक्यावर घेऊन जाणारी स्त्री, ताज महाल, काशी विश्वेशराचा घाट अशी चित्रे होती. चित्रे लावण्याचे काम अर्थातच थातुरमातुर झालेले होते. त्यातील निम्म्या चित्रांच्या कडा लोकल मध्ये डुलक्या देणा-या चाकरमान्यां सारख्या आपली मूळ जागा सोडून पुढे झुकलेल्या होत्या. टेबले व त्यावरचे संगणक त्यातून लोंबणा-या जोडतारा भारताची आठवण करुन देत होत्या. मी आता येणार जाणारांची वर्दळ पहात बसलो होतो.

इसम क्रमांक १ श्रीयुत होयबा:
कार्यालयाचं दार उघडून एक तरुण गृहस्थ आत आले. दार तसंच धरुन ते उभे होते त्यातून त्यांच्या पत्नी प्रवेशकर्त्या झाल्या. ते दोघे आत आल्यानंतर जॉर्डनबाईंची नेहमीची प्रश्नावली झाली व दोघेही प्रतिक्षालयात स्थनापन्न झाले. नवरा ज्या अदबिने बायकोशी वागत होता त्यावरुन लग्नाला दोन तीन वर्षे झाली असावित असा अंदाज मी लावला. त्यांच्या नावाचा पुकारा झाल्यावर सगळी कागद पत्रे घेऊन नवरा जॉर्डनबाईंकडे गेला. बाईसाहेब जागीच बसून होत्या. कागदपत्रे पाहून जॉर्डनबाईंनी पहिला प्रश्न विचारला.
जॉर्डनबाई: "आर यू मिस शीतल?"
नवरा: "नो, (तिच्या कडे बोट दाखवून) शी इज."
जॉर्डन बाई: "इज देअर एनी रिजन शी इज नॉट एबल टू सबमिट डॉक्युमेन्ट्स बाय हरसेल्फ",
नवरा: (खजिल होवून) "नो, नो पर्टिकुलर रिजन."
जॉर्डन बाई: "आय मीन यू कॅन सबमिट ऑन हर बिहाफ, बट यू हॅव टू साईन द फॉर्म अ‍ॅज अ रेप्रेझेन्टिटिव्ह."
हे ऐकून नव-याने इशा-यानेच बायकोला बोलावून घेतले. उरलेल्या कागद पत्रांचा पसारा बाजुला ठेवत त्रासिक मुद्रेने बाई साहेब जॉर्डनबाईं समोर जाऊन बसल्या. नवरोबा आता प्रतिक्षालयात येवून बसले पण नजर काउन्टरपाशीच होती. नवरोबांच्या चेह-यावर कमालीची बेचैनी होती. कागदपत्रांची सगळी कामं बहुदा नवरोबांनी केलं असल्यामुळे ’बायकोला सगळी कागदपत्रे सापडतील का? सगळा क्रम नीट समजेल का’, अशी चिंता त्यांना भेडसावत असावी. न राहवून जागच्या जागी उभे रहाणे पुन्हा खाली बसणे असा प्रकार सुरु होता. तिकडे बायकोने एक दोन कागद शोधल्या सारखं केलं की नवरोबा जागेवर उभं राहून "अरे वहीं तो है, ड्रायवर लायसन्स के नीचे" असं प्रॉम्प्टींग करु लागले. त्यावर त्या तिकडून त्रस्त होत "अरे कहां है यार, तुम ने कुछ भी ढंग से रखा नाही है" असे म्हणत. अशा प्रकारचे त्यांचे प्रेमळ संवाद सुरु झाले. त्यांचा हा खेळ समस्त प्रतिक्षालयात बसलेली जनता फुकटात पहात होती. जॉर्डनबाई पण मख्ख चेह-याने त्रस्त बाईंकडे पहात होत्या. नवराबायकोतील संवादांचे तापमान हळू हळू वाढू लागले. पण नवरोबा जमेल तेवढ्या नरम स्वरात उत्तर द्यायचा प्रयत्न करत होते.
बायको: "अरे यार ये मॅरेज सर्टिफिकेट मांग रही है, कहां रख्खा है तुमने?"
नवरा: "वहीं होगा, फिर से देखो."
बायको: "मै क्या झूठ बोल रही हूं?, तुम भूल तो नही गए?"
नवरा:"नही नही. लाया है, पक्का लाया है, रुको शायद मेरे पास है.."
बायको: "लो. कर लो बात. तुम तो किसी काम के नही हो"
अशी निर्वाणवाणी झाली. नवरोबा घाम टिपत मॅरेज सर्टिफिकेट घेऊन काउन्टरपाशी गेले. सगळी कागदपत्रे दिल्यांनंतरही बाई साहेबांचा राग कायम होता. शेवटी एकदा त्यांचं काम झालं. बाईसाहेब तडक दरावाजापाशी जाउन थांबल्या. "रुको तो सही" असं म्हणत एका हातात सुटी कागदपत्रे, फोल्डर, पिशव्या, बायकोचा सेलफोन असा सगळा संसार कसाबसा गोळा करुन नवरोबा पत्निमागे पांथस्थ झाले. प्रतिक्षालयातले लोक फुकटात शो पहायला मिळाल्याने भलतेच खूष झाले होते.

वकिलातीत फोन लागत नसल्याने. माझं काम अजूनही लटकलेलंच होतं. सकाळी ९ वाजता उघडणा-या वकिलातीत १० वाजून गेले तरी कोणी फोन उचलत नव्हतं. एवढ्या लवकर वकिलातीतील लोक कामात इतके व्यस्त झाले असावेत की त्यामुळे फोन घेता येत नसावा अथवा अजून कार्यलयात झुंजुमुंजु झालं नसावं. पैकी दुसरी शक्यता जास्त रास्त होती. त्यामुळे मी लोकावलोकनाचं माझं काम चालू ठेवलं. यात बरेच लोक मला दिसले. सरळमार्गी येवून जास्त लक्ष न वेधून घेता कागदपत्रे देऊन काही पापभीरु माणसे निघून गेली, पण ज्यांची नोंद घ्यावी असे काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक होते.




त्यातलेच एक इसम क्रमांक २ श्रीयुत ढिसाळ.

साहेब घाई घाईत आत आले. जॉर्डनबाई समोर बसलेल्या व्यक्तिची कागदपत्रे घेत होत्या. आल्या आल्या ढिसाळांनी त्यांना विचारले. " भारतीय पासपोर्टसाठी कागदपत्रे द्यायची जागा हीच का?" जॉर्डनबाईंनी नेहमीचा प्रश्न त्यांना विचारलं "डू यू हॅव अ‍ॅन अपॉइंटमेंट?" ढिसाळांनी होय असं सांगितलं. जॉर्डनबाईंनी विचारलं "व्हॉट टाईम इज यूवर अपॉइंटमेंट?". या प्रश्नावर मात्र ढिसाळ गडबडले, "मला आठवत नाही, पण अपॉइंटमेंट असलीच पाहिजे का?" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. जॉर्डन बाईंनी "होय" असं सांगितल्यावर थोडंसं त्रस्त होवून ढिसाळांनी परत विचारलं, "इथे कोणीच नाही. व्हाय कान्ट यू जस्ट टेक माय डॉक्युमेंट्स आय हॅव टू गो बॅक टू वर्क."  ढिसाळांच्या या वाक्यावर जॉर्डन बाई जरा चिडूनच म्हणाल्या "आम्हा सगळ्यांनाच
काम आहे सर. तुमचा वेळ इतका महत्त्वाचा असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती".  असा खणखणीत अपमान होवूनही ढिसाळांच समाधान झालं नाही. जॉर्डनबाईंनी समोरचा संगणक वापरुन ढिसाळांना अपॉइंटमेंट घ्यायला लावली. ती घेवून झाल्यावर श्री ढिसाळ त्रागा करु लागले. "इथे कोणीच नसताना मला ११ वाजताची अपॉइंटमेंट देत आहात. तो पर्यंत बसुन रहायचं की काय?", जॉर्डनबाईंनी त्यांचे बोल ऐकून न ऐकल्या सारखे करुन सोडून दिले. ११ वाजायला अजून १५ मिनिटे बाकी होती. ढिसाळांचा जीव टांगणीला लागला होता. अकराच्या आधी कागदपत्रे घेणार का? अशी एक निष्फळ विचारणी त्यांनी करुन पाहिली. शेवटी एकदाचे ११ वाजले व हे महाशय कागदपत्रे द्यायला स्थनापन्न झाले. जॉर्डनबाईंनी कागदपत्रे पाहता पाहता कपाळावर आठ्या घालायला सुरु केल्या. जॉर्डनबाई आधीच या गृहस्थांवर वैगागलेल्या होत्या. वैतागूनच त्या म्हणाल्या, "सर तुमचा अर्ज अपूर्ण आहे. फॉर्म मध्ये अनेक गोष्टी भरलेल्याच नाहीत, शिवाय अनेक कागदपत्रे गहाळ आहेत, मुख्य म्हणजे तुम्ही फोटो लावलेले नाहीत अर्जावर."
ढिसाळ लगेच सावरुन, "फोटो आहेत ना, हे काय !" खिशातून फोटो बाहेर काढून त्यांनी जॉर्डनबाईंच्या हातावर ठेवले.
जॉर्डनबाई चिडून उद्गारल्या, "माझ्य हातात काय देताय फोटो? हा फॉर्म आहे ना त्यावर चिकटवायचे आहेत ते.  हे घ्या आणि चिकटवून आणा.  समोर नमुना अर्ज भरुन ठेवला आहे तो पाहून अर्ज पूर्ण करा" असं म्हणत बाईंनी  ढिसाळांना दटावून परत पाठवून दिलं. इकडे ढिसाळांची अपेक्षा अशी होती की बाईंनीच सगळ्या गोष्टी दुरुस्त करुन घ्याव्यात. चिकटवायचे म्हटले की मग डिंक लागणार. मग प्रतिक्षालयातल्या प्रत्येकाला डिंककांडी मागत ढिसाळ फिर फिर फिरले. आता डिंककांडी घेऊन कोण कशाला येईल? पण जस्ट इन केस आपण लावलेला फोटो निघाला तर म्हणून डिंकाची कांडी घेऊन आलेले एक मिस्टर परफेक्ट त्यांना भेटलेच. कुठल्याश्या कप्प्यात दडवून ठेवलेली डिंककांडी अक्खी इस्टेट दिल्याच्या अविर्भावात त्यांनी ढिसाळांना दिली. ढिसाळांनी फुकटचा डिंक यथेच्छ ओरबाडून पटापटा फोटो चिकटवून टाकले. आता फॉर्म भरण्यासाठी पेन लागाणार. तो ही ढिसाळांकडे नव्हताच. तो त्यांनी मिस्टर परफेक्टांकडून उसनवारीवर घेऊन फॉर्म कसाबसा भरला. आणि जॉर्डन बाईंच्या पुढ्यात नेऊन आदळला. जॉर्डनबाईंनी दोन चार मिनिटं फॉर्म पाहून. "ही चार कागदपत्रे दबीरीकृत (नोटराईज्ड) नाहीत" असं म्हणून सगळे कागद परत दिले. ढिसाळांना काय दबीरीकृत (नोटराईज) करायचे, कसे करायचे आणि कोणाकडून करून घ्यायचे? काही कळेना. चार पाच मिनिटं गोंधळलेल्या अवस्थेत गेल्यावर त्यांनी जॉर्डनबाईंना विचारलं. "कुठे करायचं हे दबीरीकृत?"
जॉर्डन बाई: "जवळपासच्या एखाद्या युपीएस स्टोअर मध्ये दबीरीकृत करुन मिळेल. एका कागदपत्राचे अंदाजे ५ डॉलर घेतील ते". ढिसाळांनी लगेच गुणाकार करुन "वीस डॉलर !" ही रक्कम वीस हजार डॉलर सांगितल्यासारखी आश्चर्याने सर्वांसमोर म्हणून दाखवली. वीस डॉलरचा खर्च अनिच्छेनं का होईना ढिसाळांना करावा लागणार होता आणि त्या बद्दलची नाखुषी त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होती. ढिसाळांनी तुम्हीच नाही का नोटराईज करुन देत असं म्हणून पृच्छा करुन पुन्हा प्रतिक्षालयातल्या समस्त भारतीय जनतेस लाज आणली. नोटराईज करायला गेलेले ढिसाळ मस्त जेवण वगैरे चोपून नंतर आरामात उगवले व कागदपत्रे टाकून निघाले. जॉर्डनबाईंनी त्यांना सह्या राहिल्यामुळे परत बोलावले. जॉर्डनबाईंच्या दर्शनाच्या रांगेत वारंवार लागून शेवटी एकदाचा ढिसाळांना मोक्ष प्राप्त झाला! त्यांची कागपत्रे स्विकृत होऊन ते तिथून चालते झाले.

मी गर्गबाईंना शोधत होतो. वकिलातीत फोन लागला होता ही सुवार्ता सांगायला गर्गबाई प्रतीक्षालयात आल्या. वकिलातीची परवानगी मिळाल्यानंतर माझा अर्ज स्वीकारला जाणार होता. आणखी वेळ लागणारच होता त्यामुळे मी दुपारचे जेवण उरकून घ्यावे म्हणून तिथून बाहेर पडलो. जवळपास भारतीय रेस्ट्रा नव्हते. शिवाय जास्त दूर जाण्यात गम्मत वाटेना म्हणून जेवणाचा प्रश्न जवळपासच्याच चिलीज मध्ये जाऊन मिटवला. पारपत्र कार्यालयात परत येऊन बसतो तर आत मध्ये बरीच गर्दी जमली होती. त्यात एक सौथइंडिअन जोडपं आपल्या अपत्यासह बसलं होतं त्यातले यजमान म्हणजेच आपले श्रीयुत स्थितप्रज्ञ.

इसम क्रमांक ३ श्रीयुत स्थितप्रज्ञ

श्रीयुत स्थितप्रज्ञ यांच्याकडे पाहिल्यावरच हा माणूस स्थितप्रज्ञ असला पाहिले असा अंदाज मी लावला होता. कसलाही प्रसंग न घडता मी हे विशेषण त्यांना देऊ केले होते ते फक्त त्यांच्या झुपकेदार मिशा व स्थिर नजरेकडे पाहून. श्रीयुत स्थितप्रज्ञ व त्यांच्या कुटुंबियांच्या हालचाली मला व्यवस्थित दिसतील अशा अंदाजाने मी एका रिकाम्या खुर्चित बसलो. त्यांचा मुलगा  कार्तिक साधारण ३-४ वर्षांचा असेल. कार्तिक "नाना, नाना" करुन जन्मदात्याचे कर गदागदा हलवून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. सौ. सौथइंडियन नव-याच्या कानात जुन्या रेल्वेइंजिना प्रमाणे आपल्या भाषेत शब्दरुपी अखंड वाफा सोडत होत्या. पण श्रीयुत स्थितप्रज्ञांची साधना फार उच्च कोटीची होती. आपल्या सभोवती काही घडत आहे याची जराही दखल न घेता त्यांची नजर समोर म्हणजे गर्गबाईंकडे तशी च्या तशी होती. सौ. सौथइंडियनना याची सवय असावी. तोडांचा पट्टा त्यांनी अखंड सुरु ठेवला होता. भाषा तर कळत नव्ह्तीच पण अधून मधून येणा-या इंग्रजी शब्दांवरुन मी हा एकतर्फी संवाद कोणत्या विषयावर चालला असेल याचा अंदाज घेत होतो. ’पासपोर्ट मिळाल्यावर आता लगेच भारतात पळू नका, खर्च वाढले आहेत. भारतात जाताना पैशाचं सोंग आणून सगळ्यांना गिफ्ट घ्यावी लागतात. नातेवाईकांच्या कटकटी असतात. आमच्या कडे आला नाहीत आम्हाला विसरलात अशी गा-हाणी वर्षानुवर्ष ऐकावी लागात. त्यापेक्षा सुटी साठी आपण आपले युरोपात जाऊ’ असला काहिसा तो संवाद असावा.

चि. कार्तिक आता नानांचा नाद सोडून प्रतिक्षालयात बागडायला लागला होता. खुर्चीवर चढून एका खुर्चीवरुन दुस-या खुर्चीवर उडी मारण्याचा खेळ आईच्या नजरेआड त्याने सुरु केला होता. खुर्चीच्या हातात त्याचा पाय अडकून कार्तिकच्या चेह-याचा शिक्का जमिनिवर उमटता उमटता राहिला होता. ते पाहूनही स्थितप्रज्ञ जागचे हलले नाहीत, की कार्तिकास रागावले नाहीत. सुरुवातीला थोडासा व्रात्य वाटलेला कार्तिक भलताच वांड निघाला. दर दोन मिनिटाला आई कडे येवून कसला ना कसला हट्ट करु लागला. मोठ मोठ्याने ओरडू लागला. तरिही अपत्याशी आपले काही देणेघेणे नसल्यागत श्रीयुत स्थि.प्र. बसुन राहिले. अजुबाजुचे लोक त्याच्या ओरडण्याने अस्वस्थ होऊ लागले पण यांच्या चेह-याची रेषही हलत नव्हती. ब-याच लोकांनी आई बापाकडे विचित्र नजरेनं पाहिल्याने जरा ओशाळून सौ. सौथइंडियन कार्तिकास शांत करायचा प्रयत्न करु लागल्या. त्यांनी कार्तिकास जवळ ओढून कसलेसे आमिष देण्याचा प्रयत्न केला. पण जवळ ओढल्यामुळे तो मुलगा अजुनच बिथरला. तो आता थेट काउंटरच्या दिशेने पळू लागला. त्याने आता मेजेवरच्या संगणकाच्या तारांना जाऊन झोंबाझोंबी सुरु केली. एक दोन मिनिट झाले तरी कुणी येत नाही हे पाहून जॉर्डनबाई चिडूनच ओरडल्या, "हे कुणाचं पोर आहे? लवकर ताब्यात घ्या अन्यथा मला सुरक्षा रक्षकांना पाचारण करावं लागेल". हे ऐकल्यानंतर स्थितप्रज्ञ शेवटी एकदाचे हलले. एका हाताने दुर्वा खुडावी तसा मुलाला त्या तारांपासून खुडला व बाजुच्या खुर्चीत आणून बसवला. हे पुन्हा नजर खिळवून बसून राहिले. कार्तिकाने एक दोन मिनिट शांतता पाळून त्याच्यापरिने आईबापाचा मान राखला. नंतर हळूच लोकांच्या फायली ओढ, बायकांच्या पर्स ओढा असा कार्यक्रम त्याने सुरु केला. पुन्हा काऊंटरपाशी जाऊन संगणकांच्या तारांशी झोंबाझोंबी सुरु केली. एखादे जागरुक पालक असते तर पळत पळत गेले असते. पण स्थितप्रज्ञ अजूनही बसून होते. सौ. सौथइंडियननाच लोकलज्जेस्तव शेवटी उठावे लागले. त्यांनी चि. कार्तिकचा हात धरताच पोराने शिमगा करुन वातावरण दुमदुमुन सोडले. त्याला शांत करायचे आईच्या प्रयत्नात स्थितप्रज्ञांची कसलीही साथ नव्हती. एकदाचा सौथइंडियन कुटुंबाचा नंबर आला. त्यांनी कागदपत्रे जमा केली. त्यातही कार्तिकचा गोंगाट चालूच होता. शेवटी एकदाचे हे कुटुंब आपल्या भोंग्यासह तिथून चालते झाले. दिवाळीच्या सुट्या संपल्यावर गल्लीतली पोरे शाळेत गेल्यावर जशी गल्ली शांत वाटू लागते तसं प्रतीक्षालय एकदम शांत वाटू लागले.

माझ्या कामाचं गाडं पुढ सरकत नव्हतं असं दिसत होतं. मी गर्गबाईंना नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे ते विचारलं. त्यावर काही अधिकारी सुटीवर असल्याने आज वकिलातीचं कामकाज थोडं स्लो आहे इतकंच उत्तर मिळालं. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आतला फोन खणाणला. फोन वर माझा पारपत्रक्रमांक सांगितला जात असल्याने मला हर्ष जाहला. आता आपले काम संपणार या आशेने मी डोळे लावून बसलो. गर्गबाईंनी मला बोलवून घेतले. पारपत्र तात्काळ का हवे आहे असं त्यांनी विचारलं. कारण सांगितल्यावर गर्गबाईंचं समाधान झालेलं दिसलं नाही. ह्या कारणासाठी पारपत्र तात्काळ देता येणार नाही असं त्या मला म्हणाल्या. झालं म्हणजे सकाळपासून ज्या कामासाठी मी एवढी प्रतीक्षा केली होती ते सगळं पाण्यात गेल्या सारखं दिसू लागलं. तात्काळसाठी वकिलातीतून मी पूर्व परवानगी घेतलेली असली तरी त्याचा काही फायदा होताना दिसत नव्हता. शेवटी वकिलातीत जाऊन शर्मा सरांना जाऊन व्यक्तिश: भेटा व परवानगी काढा असा सल्ला मला गर्गबाईंनी दिला. मग हे सकाळीच का नाही सांगितलं असं म्हणून त्यांच्यावर मी जवळपास डाफरलोच. जो भारतीय कार्यलयानुभव घेण्यास मी सकाळी उत्सुक होतो त्याचा दणका मला बसला होता. इतका वेळ गोडी गुलाबीत वाट पाहणा-या माझा संताप झालेला पाहून गर्गबाईंनी पुन्हा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं. वकिलातीत पुन्हा फोनाफोनी झाली. त्यात अर्धा तास गेला. गर्गबाईंनी येवून मला एक शपथपत्र वजा अर्ज लिहावयास सांगितला. तो लिहून होईतो पुन्हा अर्धा तास गेला. ते झाल्यानंतर सगळं कागदपत्रांचं धूड मी गर्गबाईंच्या समोर ठेवलं त्यांनी एकेक करुन कागदपत्रे पुन्हा तपासून अर्ज स्वीकृत केला व आमचं घोडं गंगेत नहालं. सकाळी ९:०० ला कार्यलय उघडताक्षणी प्रवेशकर्ता झालेलो मी दुपारी ४ म्हणजे कार्यालय बंद होण्याच्या वेळेला तिथून बाहेर पडलो. दिवस तसा खर्ची पडला पण जमेची बाजू एवढीच की माझं काम झालं होतं. शिवाय घरुन फोटो चिकटवून न आणणारे, डिंकाची शोधाशोध करणारे, कागदपत्रांची प्रिंट मारत बसलेले, घरी फोन करुन बायकोला कागदपत्र शोधायला लावणारे, लेकरांशी घेणं देणं नसलेले, इतकी वर्ष इतर देशात राहूनही गुणांनी व नागरिकत्वाने भारतीय राहिलेले असे अनेक सच्चे देशबांधव पहायला मिळाले, यातच धन्यता मानत मी तिथून चालता झालो.


शनिवार पेठ

Category:

पुण्याबाहेरुन येवून पुण्यात घर शोधण्याची वाईट वेळ अनेकांवर दैवदुर्विलासाने येते. त्यातलेच आम्ही एक. शिक्षण संपल्यानंतर पुढच्या जीवनक्रमणासाठी पुण्यनगरीत येणे क्रमप्राप्त होते ! तत्प्रमाणे आम्ही पुण्यात पाऊल टाकले. पण पुण्यात आल्यावर रहायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न तात्पुरता जरी अभियांत्रिकीच्या सिनिअर मित्रांनी सोडवला असला तरी स्वत:ची व्यवस्था करणे भाग होते. काही मित्रांना मूळ पुण्यात रहायचे होते (ज्याचे त्याचे नशिब असते दुसरे काय!). मलाही ज्ञानप्रबोधिनीच्या जवळपास रहायचे होते पण सदाशिवपेठवाले काही पाड लागू देत नव्हते. घर शोधणे हे आमचे प्रथम कर्तव्य बनले होते. सकाळ मधल्या छोट्या जाहिराती धुंडाळणे, ब-या वाटतील तेवढ्या जाहिराती मार्क करणे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष जागा पहायला जाणे हा आमचा नित्यक्रम बनला. बरेच दिवस मनासारखी जागा मिळत नव्हती. एके दिवशी राव्हल्या एक जाहिरात नाचवत आमच्याकडे आला. एरव्ही घर पहायला जायचं म्हटलं की अजगरासारखा पडून रहाणारा राव्हल्या एवढा इंटरेस्ट घेतोय म्हणजे जागा चांगलीच असणार असं मला वाटलं. पे. कालीन वाड्यात हवेशीर ३०० चौ फुटांची प्रशस्त जागा. विज, पंखा, गरमपाणी यांची उत्तम सोय. फक्त सुशिक्षित व चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी. शनवार मारुती जवळ शनि. फक्त सं ५ ते ७. नोकरदार, एजंट व वेळ न पाळणा-यांचा अपमान केला जाईल.

जाहिरात पाहून जरासा चमकलोच. ३०० चौरस फूट आणि प्रशस्त? पे. कालीन म्हणजे पेशवेकालीन म्हणजे वाडा तसा जुनाटच असणार. विज पंखा आणि गरम पाणी अशा चैनीच्या वस्तू उपलब्ध करुन दिल्यामुळे वाडामालक/मालकीण अगदीच उदारमतवादी मनोवृत्तीचे वाटले. सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी? अक्षर ओळख होई तोवर पहिल्या एक दोन इयत्ता जातात. त्या पहिल्या एक दोन इयत्तेचे विद्यार्थी सोडले तर अशिक्षित विद्यार्थी कधी असतो का असा प्रश्न कोणालाही पडेल. पुढे जाहिरातित लिहिलं होतं फक्त चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी....
समजा ही जाहिरात एखाद्या लौकिकार्थाने वाईट घरातील मुलाने वाचली तर तो म्हणणार आहे का, नको बा आपण कशाला? फक्त चांगल्या घरच्यांसाठी असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना आपण कशाला जायच तिकडे? अशी जाहिरातिची खिल्ली उडवत उडवत मी जाहिरातिचं जाहिर वाचन सगळ्य़ांसमोर केलं. सगळे फिसकारुन हसत होते. राहुल म्हणाला "फक्त शनिवारी जा बरं का नाही तर अपमान करेल घरमालक". जाहिरातीतला शेवटचा शनि वाराचा नसून पेठेचा आहे हे जाहिरात वाचण्यात कम अनुभवी असलेल्या राहुलला मी समजावलं, "सदा,शनी,भवानी,रास्ता,नारा, नवी, घोर, निगो असले शॉर्ट फॉर्म वापरतात इकडे". राहुलने अज्ञान दाखवत विचारलं, "निगो पेठ? आयला ही कोणती पेठ आहे?" मी त्याला सांगितलं, "अरे गाढवा निगो म्हणजे पेठ नाय काय. निगोशिएबल". शब्द मर्यादा वाढूनही शेवटचं वाक्य छापायला दिलंय म्हणजे घरमालक एकतर शेट माणूस असायला हवा किंवा पूर्वानुभवातून बरीच पीडा सहन करुन कावलेला असावा, असा निष्कर्ष आम्ही काढला. जाहिरातीवरुन घरमालक कसा असेल ही उत्सुकता चाळावल्याने मालक भेटीस उद्याच दिलेल्या वेळेत जायचं ठरलं.

मी आणि राहुल तयारच होतो. सागर आला की आम्ही वाडामालकांना (वामांना) भेटायला जाणार होतो. साडे चारला सागर आला. इतर कोणी जायच्या आत ५ वाजता बरोबर टपकून घर पाहून घ्यावे असा विचार मनात होता. त्या प्रमाणे लगेचच आम्ही घर शोधायला निघालो. शनवार मारुती लगेचच सापडला. पण यांचा पे. कालीन वाडा काही केल्या सापडेना. घरमालकाने फोन नंबरही दिला नव्हता. मग काय पुण्यात पत्ता विचारण्याचं जोखमीचं काम आमच्यावर ओढवलं. पुण्यात पत्ता विचारला की विचारणारा आपोआपच केविलवाणा व बिचारा होतो. पत्ता ज्याला विचारला जातो तो प्रस्थापित बनतो व आपल्याकडे "हे कोण परप्रांतीय इथे आलेत" या अविर्भावात पाहतो. अगदी कोथरुडला राहणा-या माणासाने पेठेत जाऊन पत्ता विचारला तर तो पुणेकरांच्या दृष्टीने पुण्याचा असूनही पुण्याबाहेरचा ठरतो. पत्ता सांगणारे कधी उत्तर न देता तर कधी मुद्दाम चुकीचं उत्तर देऊन निघून जातात. अशाच एका महाभागाने मला लकडीपुलावर दुचाकी चालवायला लावून १०० रुपयांचा चुना लावला होता. लकडी पुलासमोरुन जाताना आजही तो कटु प्रसंग आठवतो.

पत्ता सांगण्याचा असाच एक सत्य प्रसंग आठवला. मी एकदा पिएमटीने डेक्कन हून वनाज कॉर्नर ला निघालो होतो. बसमध्ये बरीच गर्दी असल्याने व कंडक्टरला विचारणे शक्य नसल्याने मी शेजारी बसलेल्या एका वृद्ध गृहस्थांना वनाज कॉर्नर चा स्टॉप माहित आहे का? असं विचारलं. "काही कल्पना नाही बुवा" म्हणून म्हातारबुवा खिडकी बाहेर पहायला लागले. थोड्या वेळाने मी इतर दोन तीन लोकांना विचारुन स्टॉपबद्दल माहिती काढली. स्टॉप वर उतरल्यावर पाहतो तर काय...हातात पिशव्या घेऊन ते गृहस्थ त्याच स्टॉप वर उतरले. माझं डोकं गरम झालं, मनात विचार आला वनाज कॉर्नरला उतरता उतरता म्हाता-याची हाडं झिजली असतील पण लोकांना मदत करायची म्हणजे यांची जीभ झिजते. तेवढ्यावर न थांबता मी त्या गृहस्थांना जाऊन जाब विचारला, "काहो वनाज माहित नाही म्हणालात आणि तिथेच कसे काय बरोबर उतरलात?" ते गृहस्थ क्षणभर वरमले पण तेवढ्यात सावरून घेत म्हणाले, "अच्छा तुम्ही वनाज म्हणालात का मला नीट ऐकू आले नसावे. अरेच्चा माझा मुलगा बोलावतोय वाटतं!" असं म्हणून निटसं ऐकू येत नसतानाही न मारलेली हाक ऐकून म्हातरबुवांनी पिशव्या बखोटीला मारुन रस्ता क्रॉस करुन पळ काढला सुद्धा!

पुण्यातल्या पत्ता सांगण्याच्या अशा अनुभवांना व एसटिडी वरच्या "पत्ता विचारण्याचे पैसे पडतील" अशा स्वरूपाच्या पाट्यांना मी फारसा भीक घालत नसे. वयोवृद्ध लोक शक्यतो टाळून कोणा तरुणाला पत्ता विचारता येईल का म्हणून मी इकडे तिकडे पहात होतो. शेवटी मनाचा हिय्या करुन एका जवळच्या दुकानात शिरलो. "काहो इथे शनवार मारुती जवळच्या कुठल्या वाड्यात भाड्याने जागा देतात का?" असा प्रश्न त्यांना विचारला. दुकानातल्या गृहस्थांनी आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं "काय हो? सुशिक्षित आहात ना?" एखादी पाटी वाचायची राहिली काय असा विचार मनात चमकून गेला. मी पाट्या शोधू लागलो. ते पाहून गृहस्थ म्हणाले, "शनवार मारुती जवळ शेकडो वाडे आहेत. तुम्हाला कुठला हवाय? नाव काय आहे मालकांचं? मी म्हटलं "काही कल्पना नाही. सकाळला जाहिरात आहे". गृहस्थ म्हणाले," आहो मग त्यांनाच फोन करुन का नाही विचारत?", मी म्हटलं, "अहो फोन नंबर नाही दिला जाहिरातीत". त्यावर ते दुकानदार बडबडले, "च्यायला ह्यांचा ताप वाचावा म्हणून हे आमच्या सारख्यांच्या मागे ताप लावतात. बघु जाहिरात." मी व्हिजा ऑफिसरने डॉक्युमेंट मागितल्यावर ज्या तत्परतेने आपण कागद पत्रं देऊ त्या तत्परतेने आणि अदबीने त्यांच्या कडे जाहिरातीचा पेपर दिला. मी आशाळभूत नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागलो. "ही तर बळवंत जोशीबुवांची जाहिरात आहे. जाहिरातीत एखादा शब्द वाढवून ब. जोशी एवढं सुद्धा टाकणार नाही हा *&%$##*" असं म्हणून त्यांनी बळवंतबुवांच्या वंशातील पूर्वजांचा उद्धार केला. "हे इथंच पलिकडे आहे, डावी कडे वळा", असा हात दाखवून दुकानदार कामाला लागले. दुकानदाराने सांगितल्या प्रमाणे आम्ही निघालो पण ते "हे इथंच पलिकडे" न सापडल्याने परत त्या दुकानात आलो. सांगून सुद्धा पत्ता न सापडणं म्हणजे सारंच संपलं ! हे म्हणजे घोर पातकच अशा नजरेने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. ’काका एकवेळ मुस्काटात मारा पण ते तसल्या नरजरेनं पाहू नका’, असं सांगाव वाटलं. दुकानदार वैतागून बोलले, "अहो काय तुम्ही इथेच पलीकडे जो जुन्या संडासासारखा दरवाजा दिसतोय तो जोशांच्या वाड्याचा दरवाजा". दुकानदाराने संडासाचे दार म्हणून जरी अवहेलना केलेली असली तरी जोशांच्या वाड्याचे द्वार म्हणजे जणु स्वर्गाचे दार असल्यागत आमच्या चेह-यावर हसू पसरले व समाधानाने आम्ही तिकडे निघालो.



दारावरची लोखंडी कडी वाजवणार इतक्यात राव्हल्याने माझा हात धरला व म्हणाला, "अबे वेडा बिडा झाला कि काय?". मी एकदम चपापलो. पुन्हा एकदा पाटी वगैरे वाचायची राहिली काय असं वाटलं. मी राहुलला विचारलं काय झालं? त्यावर तो म्हणाला, "अबे, ५ वाजायला ५ मिनिटं कमी आहेत. जोशा उगाच अपमान करायचा". "ठीक आहे" म्हणत शेवटी पाच वाजायची वाट पहात आम्ही तिथेच दाराशी थांबलो. आम्ही दाराशी घुटमळत असलेलं वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी पाहिलं आणि तो चेहरा अदृष्य झाला. मला वाटलं आता ती व्यक्ति येवून दार उघडेल पण कसचं काय? काहिच हालचाल दिसेना. शेवटी एकदाचे पाच वाजले व राव्हल्याने पुढे जाऊन दरवाज्यावर ठकठक केली. ठक ठक मधला दुसरा ठक वाजायच्या आतच दरवाज्याच्या वरच्या अंगाची एक खिडकी उघडली गेली व त्यातून एक केस उडालेला, गंध लावलेला चेहरा डोकावला व त्याने तुम्ही पेठेत आहात याची जाणिव करुन देणा-या स्वरात विचारलं "काय हवंय?" घरमालक आतल्याबाजुने बहुधा दारातच उभे होते. राव्हल्याला हे अनपेक्षित होतं. तो तर पहिल्यांदा घाबरुन मागे सरला नंतर सावरून म्हणाला "रुम हवी आहे". मालकांनी म्हटलं "नाव काय तुमचं". राव्हल्याने लगेच "राहुल" असं उत्तर दिलं. "राहुल काय? द्रविड की गांधी?" म्हाता-याला आडनाव अपेक्षित असावं म्हणून मी त्याचं राहुल जोशी पूर्ण नाव सांगुन टाकलं ते ऐकून मालक वदले "रुम वगैरे काही नाही. आमच्याकडे एक प्रशस्त जागा आहे भाड्याने देण्यासाठी." काही तरी गफलत हो असावी म्हणून मी जाहिरातीचा पेपर पुढे केला. मालक म्हणाले, "हो आमचीच जाहिरात आहे ती". मालक दरवाजा न उघडता खिडकितून आमच्याकडे पहात बोलत होते व खिडकीच्या खाली आम्ही, असा हा इंटर्व्हूव्ह सुरु होता. आम्हाला टाचा उंचावून न्याहळत वामा म्हणाले "कुठुन आलात?" "एबीसी चौकातून" राहुल्या वदला.
वामा: "एबीसी? ते काय?" मी: "अप्पा बळवंत चौक म्हणायचं असेल त्याला".
वामा: "अरे कुठुन आलात म्हणजे पुण्यात कुठून आलात?" मी: "काका आम्ही औरंगाबादहून आलो आहोत."
वामा: "अच्छा. कशाला?" मी नोकरी म्हणालो असतो तर वामाने दरवाजा उघडला नसता म्हणून मी "पुढिल शिक्षणासाठी" असं सांगितलं.
वामांनी ठीक आहे. एवढंच म्हणून आमच्याकडे पहिलं. काहीही न बोलता दरवाजा उघडला व कुणिही दोघांनी आत या असं फर्मान सोडलं. च्यामारी आम्ही तिघे आलेलो असताना फक्त दोघांनी आत या म्हणणं म्हणजे कहर होता. तरी पण सागराने समजूतदारपणा दाखवला व तो बाहेर थांबला. मी आणि राहुल आत गेलो. बळवंतराव जोशी यांची देहयष्टी त्यांच्या नावाला पूर्णपणे विसंगत व आडनावाला साजेशी होती. गोरेपान, कपाळी गंध, केस उडालेले, काका कसले आजोबाच शोभावेत असे. खाली मळखाऊन खाऊन स्वरंग, स्वजात विसरलेले धोतर वर एखाद्या पारशीबुवा प्रमाणे अडकवलेली बंडी त्यातून डोकावणारे कळकट जानवे,कानात भिकबाळी सारखे काही तरी घातलेले होते. थंडीचे दिवस नसताना पायात लाल रंगाचे सॉक्स चढवले होते. ही वेषभूषा पाहून आपण पेठेत आलो आहोत याची खात्री पटली.




दरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. त्याच चौकोनातून एका कोप-यात एक जिना होता. वाड्याच्या वरच्या मजल्यावर २-३ खोल्या होत्या. त्यातलीच एखादी आम्हाला दाखवतील असे वाटले. दिवाणखाण्यात वामा गेले त्यांच्या मागोमाग आम्हीही निघालो. आम्ही मागेच येत असल्याचे पाहून वामा मागे वळाले व ताडकन म्हणाले, "वहाणा काढून पाय धुवूनच वर या. मी वाड्यातच आहे तुम्ही बाहेरून आलात तेव्हा पाय हे धुतलेच पाहिजेत". चौकात एका घंगाळात पाणी भरुन ठेवलं होतं. तिथे जाऊन आम्ही चपला काढून पाय धुतले व दिवणखाण्यात प्रवेशकर्ते झालो. हा आमच वाडा. वामांनी सांगायाला सुरु केलं. दिवाणखाणा अगदी पेशवाई थाटातला होता. वर झुंबर, केळकर संग्राहलयात शोभला असता असा गालिचा, दिवाणखाणाभर आजवर वाड्यावर राज्य करणा-यांच्या तसबिरी, कोणाकोणाच्या पुणेरी पगड्या, भिकबाळ्या मांडून ठेवल्या होत्या. एक जुनाट टिव्ही कोप-यात पडला होता.

वामांनी त्यांच्या व बहुतांश ज्येष्ठांच्या आवडीचा "ओळखी काढा" हा खेळ सुरु केला. मग आडनावे विचारणे, नातेवाईकांची आडनावे विचारणे, कोण नातेवाईक कुठे आहेत याची प्राथमिक चौकशी करुन झाली. कुठुनच ओळख लागत नसल्याचं पाहून वामा थोडे खट्टू झाले. त्यांनी मग स्वकुळाची बख्तरे आमच्यासमोर उलगडायला सुरु केलं. दिवाणखाण्यातील एकेका तसबिरीवर वामांनी भाष्य करायला सुरु केले. बळवंतराव, एकनाथराव, विष्णुपंत, हरिपंत, भिकाजीपंत अशी त्यांची वंशावलि त्यांनी संक्षेप वगैरे संकल्पनांना फाटा देत आम्हाला ऐकवली. त्यानंतर त्यांनी वाड्याचा इतिहास, वाडा बांधणारे पंत, त्यांचे पेशवे दरबारचे वजन व कर्तबगारी कथन केली. हे वर्णन ऐकून आम्ही पेशवे दरबारात विराजमान आहोत असा क्षणभर भास झाला. ही अगाध माहिती ऐकून झाल्यावर राहण्याच्या जागे संबंधी जाणून घेण्यासाठी आमची चुळबुळ सुरु झाली. आम्ही काकुळतीला येऊन म्हणालो थोडं राहण्याच्या जागे विषयी सांगता का?
वामा: "हो सांगतो की. माझ्याकडे सगळं नियमांनुसार होतं इथे रहाणा-याला नियमांचं पालन हे अत्यावश्यक आहे. अन्यथा गच्छंती अटळ आहे. सर्व नियम तुम्हाला समजावून सांगतो. पण सर्वात महत्त्वाचे सर्वात आधी. तर सांगा आपण घर भाड्याने कशासाठी देतो?"
मी: "सोबत व्हावी, जागा वापरात रहाते वगैरे वगैरे".
वामा: "सोबत वगैरे ते ठिक आहे हो पण मुख्य कारण म्हणजे घरभाडं. त्यासाठी आम्ही घर भाड्याने देतो. तेव्हा तिथे कुचराई मान्य नाही. नियम क्रमांक १: महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे इथे सदरेवर आणून दिले पाहिजेत".
मी: "हो चालेल ना. काही अडचण नाही".
वामा: "अहो बाकी नियम पुढे आहेत ते सर्व ऐका आणि मग काय ते ठरवा".
मी: "ठिक आहे. सांगा".
वामा: "हां तर मग भाड्यानंतर येते ती वाड्याची शिस्त. वाड्याची शुचिर्भूतता कायम राहील असे वर्तन ठेवावे लागेल".
राहुल: (वाड्याकडे नजर फिरवत) "हो राहिल ना. शुचिर..चिर..शुचिरब्रूता कायम राहिल ना".
शुचिर्भूतता उच्चारताना होणारा राव्हल्याचा चेहरा पाहून मला हसू आवरेना. हा शब्द त्याला पहिल्यांदाचा पुस्तकाबाहेर भेटला असावा. मनतल्या मनात मी मला उच्चार करता येतो का ते पाहून घेतले.
वामा: "नियम क्रमांक २:जाता येता दिंडी दरवाजा लोटून कडी लावून मगच आत येणे किंवा बाहेर जाणे".

कडकट्ट कुजलेल्या व लाथ घातली तर कोसळेल असा तो लाकडाचा सापळा म्हणजे दिंडि दरवाजा !!! हे जरा अतिच होत होतं. हा सापळा जर दिंडी दरवाजा होवू शकतो तर खुद्द वामाही स्वत:ला राघोभरारी समजत असतील असा विचार मनात येवून गेला.


वामा: "हा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. इथल्या शेवटल्या भाडेकरुनी या नियमाचं पालन करण्यात कुचराई केली म्हणून त्यांना हा वाडा सोडावा लागला. वेळेवेळी बजावूनही दरवाजा उघडा ठेवायचे व कहर म्हणजे वरुन असत्य बोलायचे. दरवाजा आम्ही उघडा ठेवला नाही म्हणून मलाच दटावून सांगायचे. पाहिले पाहिले आणि दिले एक दिवस घालवून".
मी: "बरोबर आहे. नियम तर पाळायलाच हवेत".
वामा: "आता नियम क्रमांक ३: आमचे कडे पहिल्या प्रहरी सडा संमार्जन होते. त्यामुळे वाडा पवित्र होतो. त्यामुळे सडा संमार्जनानंतर झोपून राहणे नाही".
वर खोलीत झोपून राहिलेलं ह्यांना काय कळणार आहे असं मी मनातल्या मनात विचार करत आहे हे ओळखूनच वामांनी पुढचा नियम सांगितला.
वामा: "नियम क्रमांक ४: सकाळच्या आरतीला वाड्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी हजर रहायचे".
नियम ऐकून मी जरा चपापलोच!
वामा: "त्याचं काय आहे हा नियम करावा लागला. अहो व्हायचं काय की आमची आरती सुरु असताना जुने भाडेकरु उठायचे आणि आळसावलेलं तोंड घेऊन दारात तोंड धुण्याकरित उभे रहायचे. अजिबात चालायचं नाही ते. अपवित्र वाटतं".
मी: "अहो, ती मुलं वर रहायची ना मग खाली कशाला येतील तोंड धुवायला?"
वामा: "अहो, ते पुढच्या नियमात कळणारच आहे. गडबड कशाला करता?"
मी: "बर".
वामा: "हां तुम्ही काढलाच आहात विषय तर सांगतो. नियम क्रमांक ५:
वर शौच व स्नानाची सोय नाही. वरच्या मुलांनी हे वापरायचे", असं म्हणून वामांनी दोन कवाडांकडे बोट केले.
मी: "इथे? खाली?"
वामा: "हो मग. त्यात काय? वाड्याचे ऐतिहासिक स्वरुप जपून रहावे म्हणून आम्ही वर शौचालय बनवले नाही".
मी मनात म्हटलं, ’अहो ऐतिहासिकच रुप जपायचे होते तर हे तरी शौचालय कशास बांधले? जायचे होते नदिपात्र रस्त्याच्याकडेला सकाळी सकाळी’. पण काय करणार? गरजवंताला अक्कल नसते या उक्ति नुसार मी मुकाट्याने पुढचे नियम ऐकण्यास सज्ज झालो.
वामा: "नियम क्रमांक ६: जिने चढताना धावत पळत जिने चढायचे नाहीत. धावत गेल्याने जिन्यांचं आयुष्य कमी होतं. पाय न वाजवता सावकाश जिने चढायचे, कितीही घाईत असाल तरिही".
हा नियम ऐकून एखाद्या रात्री हतोडी घेऊन त्या खिळखिळ्या जिवाला एकदाची शांती द्यावी असा विचार मनात येवून गेला. हा विचार जिना व वामा राघोबादादा पेशवे दोघांसाठी येवून गेला होता. पण इरिटेशन फेज संपून आता मला म्हातारा इंटरेस्टिंग वाटु लागला होता. श्रीमंतांनी पुढचे नियम सांगावेत म्हणून आता पर्यंतच्या नियमांना सहमती दर्शवणे भाग होतं. मी मुद्दाम चेहरा आनंदी ठेवला होता. वाडा मस्त असल्याचे मधून मधून मी श्रीमंतांना सांगत होतो.
वामा:
"नियम क्रमांक ७: कमीत कमी ८ महिने रहाण्याचा लिखित करार करावा लागेल. करार मोडल्यास पुढील भाडेकरु येईपर्यंतचा जाहिरात खर्च व भाड्याची रक्कम, करार मोडणा-यास देणे बंधनकारक राहिल. त्याचं काय होतं, आहो भाडं राहिलं एकिकडे. जाहिरात खर्चातच अर्धे भाडे निघून जाते. त्यात वर नुसतीच माहिती घेऊन येतो येतो म्हणणा-या उपटसुंभामुळे वेळ दवडला जातो. रात्री अपरात्री येणारे महाभागही काही कमी नाहित. त्यामुळे भेटायची वेळ छापावी लागते. तो खर्च वाढतो. एवढे करुनही काही हरामखोर अपरात्रीच यायचे. तुम्ही त्यातले वाटत नाही म्हणूनच एवढी सखोल माहिती देतोय".
पेशवे आता आम्हाला त्यांच्या गटात ओढू पहात होते.
राहुल: "तुम्ही त्याची काही काळजी करु नका. आम्ही एक वर्ष तरी कमीत कमी राहूच".
वामांनी राहुलकडे समधानाने व मी रागाने पाहिलं. वामांनी नियमावली चालूच ठेवली होती.
वामा: "नियम क्रमांक ८: दिंडि दरवाजा रात्रौ ९ नंतर बंद राहील. एकदा दरवाजा बंद झाला की बंद. गाडी पंक्चर झाली होती, रिक्षा मिळाली नाही, बस वेळेवर आली नाही अशी कारणे चालणार नाहीत. पोचायला उशीर होत आहे असे लक्षात आले तर वाड्यापर्यंत येण्याचे कष्ट घेऊ नका. बाहेरच कुठे तरी सोय बघा व दुस-या दिवशी वाड्यावर या.
नियम क्रमांक ९: रात्रौ ११:०० नंतर दिवे घालवले पाहिजेत. दिवे न घालवल्यास वरच्या खोल्यांचा फ्य़ूज काढण्यात येईल
नियम क्रमांक १०: कोणत्याही प्रकारचे मद्यपान धुम्रपान निषिद्ध. सिगारेटची थोटुके लपवण्याचा प्रयत्न करु नये. मी सिगारेट पिणारा मनुष्य एक मैलावरुन ओळखू शकतो".
वामासमोर बसलेला राहुल्या एका वेळी पाच बोटात पाच सिगरेटी धरून ओढतो हे वामांना सांगितले असते तर वामा झीट येवून पडले असते. मैलभराहून ओळखण्याची थाप आम्ही वामांचे वय पाहता पचवून घेतली. वामा आता थांबायला तयार नव्हते.
वामा: "नियम क्रमांक ११: वाड्यावर मुलींना आणण्यास तीव्र मनाई आहे. मग ती सख्खी बहीण का असेना. मागे एक मुलगा होता रहायचा एकटाच पण इथे येणा-या गोपिका पाहून लोक आमच्या वाड्याची चारचौघात नालस्ती करायला लागले. शनिवाराचा बुधवार केला म्हणू लागले. जेव्हा केव्हा त्याला टोकलं की मामे बहिण आहे, आते बहिण आहे, चुलत बहिण आहे, मावस बहिण आहे असे बहाणे करायचा. एका भल्या पहाटे त्याच्या दारावर थाप मारुन तुझ्या पुण्यातल्या बहिणिचा फोन आला आहे असे सांगितले. झोपेत असल्याने "पुण्यात कोणी बहिण रहात नाही" असं तो गाफिलपणे म्हणाला. दिला त्याच दिवशी घालवून त्या नीच माणसाला. तेव्हा आताच सांगतो मुलींना वाड्यात प्रवेश नाही".
या अटीमुळे सागराची थोडी पंचाईत होणार होती. पण काही तरी मॅनेज करता आले असते.
वामा: "नियम क्रमांक १२: वाहने फक्त रात्री वाड्यात घेण्याची परवानगी आहे. सकाळी सडासंमार्जना आधी वाहने बाहेर काढलीच पाहिजेत. दिवसा दुचाक्या बाहेरच राहतील.
नियम क्रमांक १३: वाड्यात कसल्याही प्रकारचे अभक्ष्य बाहेरुन आणून खायचे नाही. तसे काही आढळल्यास ते जप्त केले जाईल".
अभक्ष्य जप्त करुन बळवंतबुवा त्यावर ताव मारणार की काय अशी शंका मनाला चाटून गेली.
वामा पुढे वदले, "नियम क्रमांक १४: वाड्यात स्वयंपाकाचे प्रयत्न करायचे नाहीत. स्वयंपाक करायचा प्रयत्न केल्यास शेगडी व इतर साहित्य जप्त केले जाईल".
नियम क्रमांक १५: "वाड्याचे बाह्य सौंदर्य अबाधित रहावे यासाठी कसल्याही प्रकारची वस्त्रे वा अंतवस्त्रे राहत्या जागेच्या बाहेर वाळत घालू नयेत".
या नियमा चा भंग केल्यास वामा जप्तीची धमकी देतात की काय असे वाटून गेले पण त्यांच्या सुदैवाने ते तसं काही बोलले नाहीत. आमच्याकडे पाहुणे येतात व ते खूप वाईट दिसतं एवढंच सांगून त्यांनी नियमाचं महत्त्व विषद केलं.
वामा: "नियम क्रमांक १६: मित्रांचा गोतावळा आणून चकाट्या पिटत बसायचे नाही. घरात दोनच्या वर व्यक्ती राहता कामा नयेत. मी अधून मधून याची पडताळणी करत असतो. मागच्या वेळी अशीच पडताळणी केली तेव्हा डझनभर जोडे व बाथरुम मध्ये ५ टूथ ब्रश सापडले. मला फसवू पहात होते लफंगे. दिले घालवून बोडकिच्यांना".
आम्हाला तिघांना रहायचे होते. सागराचा टूथ ब्रश पाहून वामा आम्हालाही एकदिवस हाकलणार असे वाटून गेले. पण पकडले न जाण्यासाठीचा उपाय वामाच सुचवून गेले होते.
वामा: "नियम क्रमांक १७: खाली आम्ही रहात असल्याने वरती जोरजोरात चालणे आदळ आपट धांगड धिंगा चालणार नाही".
नियम क्रमांक १८: "मोठ्या आवाजात टेप वगैरे लावल्यास फ्य़ुज काढला जाईल. रात्र भर अंधारात बसावे लागेल".
नियम क्रमांक १९: "भाडे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इथे राहणा-या प्रत्येक व्यक्तिच्या छायाचित्रांच्या २ प्रती पोलीस चौकीत देण्यासाठी लागतील. शिवाय पुण्यातील ओळखणा-या दोन व्यक्तिंचे कायम स्वरुपी पत्ते दूरध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे.
नियम क्रमांक २०: कच-यासाठी घंटागाडी येते. घरात खिडकीत कुठेही कचरा ठेवू नका. बुद्धिचा वापर करा.
नियम क्रमांक २१: कुलुप लावून बाहेर जाताना दिवे व पंखा बंद करुन जाणे.
नियम क्रमांक २२: उन्हाळ्यात फ्रिजमध्ये पाण्याची बाटली ठेवण्यास आग्रह करु नये.
नियम क्रमांक २३: पाच हजार रुपये डिपॉजिट म्हणून जमा करावे लागतील. जागा सोडताना काही नुकसान झालेले असल्यास त्याची भरपाई डिपॉजिट मधून वसूल केली जाईल.
नियम क्रमांक २४: शेजा-यांशी काही वाद भांडण झाल्यास तुम्ही एकटे नाही हे ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सर्व नियम शिरोधैर्य मानत असाल तरच तुम्हास इथे प्रवेश दिला जाईल".

हा शेवटला अपवादात्मक नियम सांगून वामा शमले. एवढे नियम सांगत बसण्यापेक्षा वामांनी लिहून ते बाहेर लावावेत असं मला वाटत होतं. वामांचं बोलणं ऐकून वाटलं एवढे नियम लक्षात ठेवायचे असते तर च्यायला चांगला वकील झालो असतो. इंजिनिअर होवून कशाला असे हाल सोसले असते? पेशव्यांनी आतापर्यंत आमच्यावर नियमांचे चार राऊंड म्हणजे २४ गोळ्या झाडल्या होत्या. आता तरी पेशव्यांची मॅगझीन रिकामी झाली असेल या विचाराने आम्ही आवराआवरीच्या हालचाली सुरु केल्या. मी पेशव्यांनाच विचारले,
"नियम संपले असतील तर आम्ही येतो, आता उशीर होतोय".
वामा: "ठीक आहे. पण शौचालया संबंधी आणखी काही नियम आहेत ते मी तुम्ही रहायला आल्यावर सांगेन".
शौचालयात पण नियम ! आधी उजवा पाय ठेवा मग डावा, कडी लावा पाणी टाका असले नियम वामा सांगतात की काय वाटायला लागले. जे काय असेल ते सगळे हलाहल आजच पचवून घ्यावे म्हणून मी म्हणालो, "नको नको जे काय असेल ते आताच सांगा".
वामा: "नियम क्रमांक २५: रात्रीच्या वेळी वाड्यात शांतता असते. रात्री शौचालयाचा वापर करायचा झाल्यास तो उभ्या ने करु नये".
मी हा नियम ऐकून मी उभ्या उभ्या उडालो! पेशव्यांची इच्छा काही उमजेना.
मी: "म्हणजे"?
वामा: "स्पष्ट सांगायचे म्हणजे उभ्याने शौचालयाचा वापर केला असता रात्रीच्या शांततेत वाड्यात विचित्र आवाज होतो व घरात लेकी सुना असल्याने ते चांगले वाटत नाही".
बळवंतरावांच्या वाड्यात निसर्गाच्या हाकेला मोकळ्या मनाने ओ देण्याची चोरी होती. तिथे पण नियम होते. अशा नियमांच्या दडपशाहीने वाड्यात राज्य करणा-या या पेशव्यास मी गारदी बनून ठार मारण्यास मागे धावतो आहे व वामा दिंडी दरवाजा उघडून धोतर सावरत बाहेर पळ काढत आहेत असे चित्र मनासमोर तरळून गेले.

एवढे सहज पाळण्याजोगे सामान्य नियम ऐकल्यावर मी काय किंवा कुणीच बुद्दि जाय न झालेली व्यक्ति इथे राहणार नाही हे स्वच्छ होते. पण एवढा वेळ घातला होता असे मधेच उठून जाता येईना. मला हे असे नेहमी होते. जिथे गोष्ट पटत नाही तिथून निघणं जरा अवघड होतं. कपड्यांच्या दुकानात मना सारखे कपडे नाही मिळाले तर सगळे कपडे पाहून काहीच न घेता त्या दुकानातून निघताना जरा अवघडल्या सारखंच होतं तसं मला होत होतं.

’वाडा आम्हाला तर खूप आवडला आहे. आम्हाला लवकरात लवकर यायचे आहे’, असे असत्य वचन सांगून निघावे व पुढले काही महिने शनिवाराचे नावही काढायचे नाही अशा विचारात मी होतो. राहुल्याचा निघण्याचा काही बेत दिसत नव्हता. पेशव्यांच्या वाड्यावर आतल्या खोलीत त्याला लाल तांबडे काही तरी फडफडताना दिसले. तिकडेच त्याचे लक्ष लागून राहिले होते. लाल तांबड्याचीही राहुलशी नजरानजर झालेली दिसली. असले अघटित पेशवांच्या नजरेखाली चाललेले पाहून मलाच धस्स झाले. ह्या नियमांचे जोखड घेऊन इथे राहण्यासाठी राहुल्या आम्हाला कनव्हिन्स करतो की काय असं वाटून मी हवालदिल झालो. ’आम्ही कळवतो नंतर’ असं म्हणून निघायच्या विचारात असताना राव्हल्याने "आम्ही रहायला येतोच आहोत ऍडव्हान्स कधी देऊ?" असं विचारुन बॉंबच टाकला. तिथून निघून आम्ही रुमवर परतलो. राहुल आणि लाल तांबडा यांची काही तरी ष्टोरी सुरु होणार असे दिसु लागले होते. राहुल्या तिथे जाण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला होता. राव्हल्याचा मूड वेगळाच दिसत होता. माझा लाल तांबडा किंवा कुठल्याही रंगाशी संबंध नसल्याने व अजून बुद्धिभेद झालेला नसल्याने शनिवारातल्या त्या घाशीराम कोतवालाच्या घरात रहायला जाण्याचा अजिबात मानस नव्हता. पुढचे काही दिवस राहुलबाबा कागदपत्रे जमवणे, करार तयार करणे, फोटो काढणे असल्या कामात होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यात त्याला ओळखणा-या (पक्षी ओळख दाखवण्या-या) दोन पुण्यात्म्यांच्या शोधात तो बरेच दिवस होता. शेवटी ज्यांच्या कडे इमाने इतबारे वडे खात होता त्या जोशी वडेवाल्यांनी ह्या राहुल जोश्याला जोशी वाडेवाल्यांकडे राहण्यासाठी मदत केली. राहुल्याचा दुसरा पुण्यात्मा मलाच बनावे लागले होते. शेवटी एकदाचे त्याचे घोडे गंगेत न्हाले.

एके दुपारी निवांत बसलो असताना एका क्षणभरात आजवर झालेल्या सगळ्या गोष्टी भराभर माझ्या डोळ्या समोरून तरळून गेल्या. थोडा वेळ विचार केला आणि माझं मलाच हसू आलं. आता मला राव्हल्याच्या चेह-यावरचा ओसांडून वाहणारा आनंद, राहुल्यानेच दाखवलेली जाहिरात, राव्हल्या आधीपासूनच तासनतास जिच्याशी गुलुगुलु बोलायचा ती व्यक्ति व जुन्या भाडेकरुंकडून सतत उघडा रहाणारा दिंडी दरवाजा या सगळ्य़ा गोष्टींचा क्षणात उलगडा झाला! गेमर राव्हल्या आता भावी सासुरवाडीत ऑफिशिअली रहायला जाणार होता. आम्ही मात्र छोट्या जाहिरातीची कात्रणे काढून त्यावर लाल तांबड्या रेषा मारत भर उन्हात भर पेठांमधून घर शोधत वणवण हिंडत होतो.

अवलिया

Category: ,

फ्रॅंक पापा या माणसाची माझी पहिली गाठ झाली ती ऑफिस मध्ये. बरेच दिवस आमच्या टीम मध्ये एक कॉन्ट्रॅक्टर येणार येणार अशी चर्चा रंगत होती आणि एक दिवस माझ्या शेजारच्या क्यूबवर पाटी लागली. फ्रॅंक पापा. नाव वाचून थोडं हसू आलं. मनात म्हटलं बघुया किती दिवस टिकतो? कॉन्ट्रॅक्टर आला की सगळे आधी संशयाच्या नजरेनेच पाहतात. बरेच देसी कॉन्ट्रॅक्टर्स नवीन प्रोजेक्ट्वर थोडं दबकत दबकतच काम सुरु करतात. हे प्रकरण जरा निराळंच दिसलं. दुस-याच दिवशी सकाळपासूनच बाजुच्या क्यूब मधून फोनवर विविध संभाषणे आणि गंभीर चर्चा ऐकायला यायल्या लागल्या. "मी सगळं काही हँडल करतो, चिंता नसावी" अशी वाक्ये फारच आत्मविश्वासपूर्वक ऐकायला यायला लागली. फार मोठा माणूस दिसतो हा पापा म्हणत मी आपले नेमीच्या कामाला लागलो. त्याच दिवशी कॉफी पिताना ह्या माणसाची पहिली भेट व दर्शन झाले. काळ्या पांढ-या रंगाचं समबाहुल्य मिश्रण असलेले कुरळे केस, खुरटी काळी पांढरी दाढी, ना धड मेक्सिकन ना अमेरिकन पण काहिशी युरोपियन झाक त्याच्या दिसण्यात होती. पिवळ्या व लाल चट्ट्यांचा शर्ट थोडा बसकट बांधा आणि चेह-यावरचं हसू पाहून सिरिअस टोन मध्ये बोलणारा हाच का तो यावर विश्वास बसत नव्हता. कॉफी घेता घेता नावांची देवाण घेवाण झाली व आम्ही एकाच टीम मध्ये आहोत हा साक्षात्कार सुद्धा झाला. अवलिया दिसतोय एवढीच छाप घेवून मी क्यूब पशी परत आलो. रोजच्या भेटण्या चालण्यात मिनिटा मिनिटाला बदलणा-या त्याच्या फोन वरचा टोन ऐकून हा नक्कीच अवलिया आहे हा विश्वास पक्का होत चालला होता. बॉसशी बोलताना, कलिगशी बोलताना, बायकोशी बोलताना अशी बहुरंगी संभाषणे व बदलणारे टोन्स मला ऐकू येत असत. बॉसशी बोलताना हा प्रोजेक्ट कसा काय कॉंप्लेक्स आहे. आपल्याला डिझास्टर करायचे नसेल तर काय केले पाहिजे अशा गंभीर विषयांवर चर्चा करायचा, थोड्याच वेळ्यात बायकोचा फोन आला की, "काही नाही गं, मी माझ्या बॉसची टरकवतोय असं म्हणून खी खी हसायचा" अशा प्रसंगामुळे साहेब फोन वर बोलायला लागले की कुतुहलामुळे आपोआपच माझे कान टवकारले जाऊ लागले.

त्या प्रोजेक्ट्वर दोन एक महिन्यापासून काम करणारी माणसे सोडून आल्या दिवसापासून या माणासाला कसा काय एवढा भाव मिळतोय हा प्रश्न मला पडत असे. शेजारीच बसत असल्याने हाय हॉलोवरुन ओळख वाढून एकत्र कॉफी प्यायला जाणे गप्पा टप्पा मारणे चालायचे. दिवसही सरत गेले व ओळखही वाढत गेली. सुरुवातीचा एक महिना पापाजींनी काहीच काम केले नसल्याचे त्यांनी स्वत:च मला सांगितले. मॅनेजरने किती काम झाले असे विचारले तर पापा जड जड टेक्निकल शब्द मॅनेजरच्या अंगावर भिरकावून द्यायचा व मॅनेजरलाच काही तरी गूढ प्रश्न विचारून गुंगारून टाकायचा. तो पण चारचौघात आपली विज्जत वाचवण्यासाठी होयहोय करायचा. लोकांना घुमवण्यात पापाजी एकदम माहिर होते. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना विषय असा काही भरकटवत की मूळ प्रश्न कोणाच्याही लक्षात राहणार नाही. एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर न देता इतरांच्या कामाबद्दल पिल्लू सोडून द्यायचा पापाचा आवडाता गेम होता. मॅनेजराला ही चाल कळायला महिनाभर लागला तो पर्यंत भाईंकडे दुसरी चाल तयार असायची. पाच दहा मिनिट स्टेटस कॉल वर बडबडा करायचा शेवटी म्यूट करुन फिस्स करुन हसायचा. माझ्याशी ब-याच वेळा बोलताना काही सिरिअस बोलला की आता फिस्स्स करुन हसतो की काय असे वाटायचे. त्यामुळे गडी किती खरं बोलतोय याचा अंदाजच यायचा नाही. सगळंच एकंदरित गूढ प्रकरण होतं.

ऑफिसात काम जमत नसेल तर ते टाळण्यात पापाचा हात कोणी धरु शकत नव्हे. आज माझी पाठ दुखत आहे उद्या पर्यंत बरी होईल तो पर्यंत मी सुरु केलेले कार्य तडिस न्यावे असे इमेल टाकून पापा हापिसातून पळ काढत असे. पाठदुखी उद्या पर्यंत बरी होईल ही सगळी गणिते त्याला कशी काय माहित याचं मला आश्चर्य वाटे! एकदा सोमवारी डेमो देण्याची जबाबदारी पापावर टाकली होती. दिलेल्या कामात काही विशेष प्रगती केली नसल्याने पापांनी मी ब-याच दिवसात सुटी घेतली नाही असे म्हणत सोमवार मंगळवार अशी दोन दिवसांची सुटी काढून इतर कंत्राटदरांना डेमोच्या शुभेच्छा दिल्या व साहेब सासुरवाडीस पाहुणचारास रवाना झाले. जमत नसलेले काम अंगावर शेकू नये म्हणून पापा नाना क्लृप्त्या करत असे. असेच एकदा दोन कंत्राटदारांमध्ये काम वाटून देण्याची मिटिंग चालू होती. वरुनवरुन सोपी भासणारी गोष्ट पापाने मोठ्या चतुराईने आपल्या पदरी पाडून घेतली. पण जस जसे काम सुरु झाले तेव्हा पापाला आपली चूक लक्षात आली. आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला असे त्याला जाणवले असावे. पापाने यातून मार्ग कसा काढला असेल? पापाने अवघड काम सोपे कसे आहे व सोपे काम अवघड कसे आहे व तिथे स्वत: सारख्या सिनिअर माणसाची कशी आवश्यकता आहे यावर एक प्रबंध मॅनेजरबाबाला वाचून दाखवला. आपले बोलणे ऐकणा-याला कसे गुंगवायचे हे पापांना खूप छान ज्ञात होते. याची परिणती अशी होती की पापाचे राहिलेले काम दुस-या कंत्राटदाराने केले.
पापा अवलिया आहे हे आता मी पुरते ओळखले होते. एक दिवस शेजारच्या क्यूब मधून काही संवाद ऐकायला आले, "वि विल डिसकस थिस आफ्टर वर्क", "टेल यूर मदर टू स्टे होम, ऍंट नॉट टू गो टू द कॉप्स" अशी वाक्यं ऐकू आली. कॉप्स म्हटल्यावर माझे विचार सुरु झाले म्हटल भाई ने काही गफला केला की काय. कसं विचारावं, विचारावं की नको म्हणत म्हणत मी नाक खुपसलेच. म्हट्लं "काय रे मगाशी पोलिसांबद्दल काय बोलत होतास, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला". मला पापा म्हणातो, "काही नाही रे माझी सासू पोलिसांकडे जाणार होती तक्रार करायला" मी म्हटलं कसली? पापा म्हणाला, "अरे तिला परवा ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट न वापरल्याबद्दल टिकिट लागलं होतं. मग? मग काय तिला ट्रॅफिक अधिका-यांचा इमेल आला की सिनिअर नागरिकांकडून हे अजिबात अपेक्षित नाही, ज्येष्ठांनी तरी नियम पाळलेच पाहिजेत. आणि बरंच लेक्चर झाडून, पुन्हा असं केल्यास वयाचा विचार केला जाणार नाही अशी धमकी दिली होती. मी म्हटलं असं कसं करु शकतात ते. जाऊ द्यायचं होत ना तिला तक्रार करायला. पापा म्हणातो अरे कसंच काय अरे म्हातारीची चेष्टा करायला मीच फेक इमेल आयडी बनवून पाठवला होता तो इमेल, ती पोलिसात गेली असती तर माझी नसती का लागली वाट ! धन्य आहात म्हणत मी पापा पुढे हात जोडले. ब्रॅडमनची बॅटिंग पाहता आली नाही असं दु:ख जसं आजकालाच्या पिढीतल्या क्रिकेट प्रेमी मुलांना असतं तसंच पापा बाबांच्या महान लीला प्रत्यक्षात बघायला मला का मिळाल्या नाहीत याचं दु:ख मला तेव्हा वाटलं.

कॉफी विथ पापा च्या एका सेशन मध्ये जुन्या आठवणी सांगता सांगता पापा रंगात आला. तो कॉलेज मध्ये असतानाची गोष्ट. त्यांच्या कॉलेज मध्ये सायकल रेसिंगची स्पर्धा होती. अगदी आपली जो जिता वही सिकंदर टाईप्स. बरेच दिवस हे त्या रेस साठी सराव करत होते. स्पर्धा जिंकायचीच या आवेशाने त्यांनी सायकल वर मुठी आवळल्या. सुरुवातीला सर्वात पुढे असलेले पापा थोडे गाफिल झाल्याने मागे पडले होते. अटीतटीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक गमवायचा नाही या उद्देशाने पापा प्राण पणाला लावून पेडल हाणू लागले. शेवटचा उपाय म्हणून शॉर्टकट मारायच्या नादात कुठल्यातरी पायवाटेने पापाने सायकल दामटली. वेगात सायकल पळवता पळवता रस्ता चुकला. मग परतीची वाटही सापडेनाशी झाली. रस्ता शोधता शोधता ह्या न्यूटनला, एक सफरचंदाने लगडलेले झाड दिसले. हिरवे,लाल सफरचंद पाहून याला पुढे जाववेना. गड्याने तिथेच सायकल थांबवून फलाहार केला व सायकल स्पर्धा वगैरे असल्या क्षुल्लक बाबींचा बाऊ न करता झाडाखाली मस्त ताणून दिली. स्पर्धा संपूनही एक स्पर्धक न पोहचल्याचे पाहून सर्च अ‍ॅंड रेस्क्यू टीमचे स्वयंसेवक जेव्हा शोध घेत आले तेव्हा तेथे त्यांना हा विसोबा खेचर सायकलीवर पाय टाकून झोपलेला आढळला! असल्या काही प्रसंगांनी पापाच्या अंगीचे विरक्तीचे सुप्त गुण मला दाखवून दिले. पापा भारतात जन्मला असता व त्याने अध्यात्मिक क्षेत्रात पंचतारांकित प्रगती केली असती तर याच सफरचंदांच्या झाडा खाली पापा बांबांना सिद्धी प्राप्त झाली अशी हूल मी उठवली असती.

तुझ्या सासुचा अन सायकलिंगचा किस्सा माझ्या मित्रांना लय आवडला असे सांगितल्याने गडी लय खुलला व हसायला लागला. पापाची हसायची त-हाही निराळीच होती. वरचा जबडा व खालचा जबडा यांना बिलकूल विलग न होऊ देता ओठ मागे ताणून तो हसायचा. तसा तो हसायला लागला की पापा बाबांच्या पोटली मधून अजून एक कहाणी सुटणार याची मला खात्री वाटायला लागली. मो थोडा आग्रह केल्यावर पापा सास-याची कहाणी सांगू लागला. एकदा सास-याच्या वाढदिवसाला पापाने हार्ट वगैरेची चित्रं असलेले लाल ग्रिटिंग कार्ड घेवून त्यावर How can I forget your birthday dear. I still remember the sweet memories of your birthday we spent together in 1945. असा मजकूर लिहून दर गुरुवारी फ्लोरिडाला फ्लाय करणा-या एका मित्रा करवी फ्लोरिडाहून पोस्ट करवले. त्या ग्रिटिंग वरून सासूबाईंनी सास-यांना असे सडकावून काढले की बास. फ्लोरिडाचा स्टॅंप पाहून सासू अजूनच भडकली होती. म्हातारा लग्ना आधी फ्लोरिडात रहायचा हा बारकावा पापाने खुबीने वापरला होता. घरात मस्त धुराळा उडवून पापा त्यांची गम्मत पहात बसला. स्वत:च्या बायकोलाही त्याने यात त्याचा हात असल्याचा थांगपत्ता लागू दिला नव्हाता. शेवटी संतापाच्या भरात म्हातारी दगावते कि काय असी परिस्थिती आल्यानंतर पापाने तिला शांत करुन सगळा खुलासा केला.

पापांच्या लीला वर्णाव्या तेवढ्या थोड्या होत्या. श्रीकृष्णाच्या नटखट बाललीलांपासून बचावलेली एकही गोपिका द्वापारयुगी मथुरेत नसेल तद्वतच पापांच्या लीलांमधून बचावलेले त्याच्या नातलगांपैकी कुणी सुद्धा नव्हते. खुद्द त्यांचे पिताश्रीही यातुन सुटले नव्हते. आता या माणसाने काय प्रताप केले असतील? पापाजींनी आपल्याच पापाजींचे फेसबुक वर प्रोफाईल बनवले. इतक्यावर थांबतो तो पापा कसला? त्याने वडिलांच्या बॅच मध्ये कोण कोण होतं याचा इंटरनेटवर शोध घेतला. जे जे फेसबुकवर होते,त्यातल्या त्यात सगळ्य़ा मुलींना (म्हणजे त्या काळच्या मुलींना) प्रोफाईल मध्ये अ‍ॅड केले, इतकेच नव्हे तर मी मजेत दिवस घालवतोय. आमचा मुलगा आमची खूप काळजी घेतो, तुमचे कसे चालू आहे कॉलेजच्या दिवसांची खूप आठवण येते असे निरोप पाठवले. त्यातल्या काही मुलींनी आठवणींना दिलेल्या उजाळ्यांचे काही विशेष प्रसंग ह्या पट्ठ्याने जन्मदात्यास कथन करुन सांगितले. वडिलांनी संतापाने तिसरा डोळा उघडायच्या आत मी तुम्हाला सर्प्राईज देण्यासाठी हे करत होतो असे सांगून त्यांना शांत केले.

जितके आमचे कॉफी विथ पापा सेशन्स वाढले तितके ह्या माणसाबद्दल कुतुहलही. ऑफिसात आज काय होते ह्या पेक्षा पापा आज काय सांगेल याचेच कुतुहल जास्त असायचे. काम करुन करुन वैताग आला की मी पापा बाबांच्या क्यूब मध्ये तळ जमवू लागलो. आम्हाला पापांचे "ऑफिसात कसे वागावे" ह्या तत्त्वज्ञानाचे चाटण मिळाल्यामुळे बॉसनी केलेल्या बोच-या टीका फिक्या वाटायला लागल्या होत्या. बॉसनी आरोप केले तर प्रत्यारोप न करता हसत मुखाने उत्तर देणे. बॉस कितीही मूर्ख असला तरी त्यास तो विद्वान असून आपण त्याला मानतो असे सांगणे. बॉसला मला तुमच्या सारखे सक्सेसफुल व्हायचे आहे असे सांगून चढवणे. अशा काही जालीम मुळ्यांचा काढा त्याने मला पाजला होता. त्याचा मला बराच फायदा होत असे.

जसा जसा मी पापाला ओळखू लागलो तस तस मला समजू लागलं होतंकी पापा केवळ किस्स्यांचा बनलेला नाही. पापा म्हणजे एक जगण होतं. एक स्वच्छंदी प्रसन्न जिणं. अगदी उचकेपाचकेपणा नाही की अगदीच नाकासमोर चालणंही नाही. अगदी खिदळेगिरी नाही की भयाण शांतही नाही. कामाच्या दाबाने पिचलेला नाही की अगदी उनाड नाही. तत्ववेत्ताही नाही की उथळही नाही. त्याच्या हास्या मागे वेदना असेल किंवा नसेलही. पण पापाने मला खूष रहायला शिकवलं. तो सोबत होता म्हणून माझ्याही मिष्किलीचे मीच विसरलेले किस्से मला आठवले व मला हसवून गेले. पापाने माझं आयुष्य बदलवून टाकलं असंही नाही आणि सहज विसरला जाईल असंही नाही. मागच्या आठवड्यात ऑफिसच्या कामा निमित्त १५ दिवस बाहेर गावी गेलो होतो. परत आलो तेव्हा बरीच कामं पडली होती. इतर कुठल्या गोष्टी कडे लक्ष द्यायला वेळ नव्ह्ता. ऑफिसमध्ये काही तरी बदलले होते, पण ते लक्षात येत नव्हते. दुपारी पलीकडच्या क्य़ूब मधून नेहमीचा आवज न येता चेप्पू मामा, नेनु श्री माडलाडतुन्नानु असे अवाज ऐकायला येवू लागले. मी उठून पाहिले, शेजारच्या क्य़ूब वरची फ्रँक पापा ही पाटी निघून श्रीधर रेड्डी अशी पाटी लागली होती. पापा कंपनी सोडू गेला होता. तो पुन्हा भेटणार नाही याची भयंकर चुटपुट जाणवली. पण दुस-याच क्षणी त्या अवलियाची ठेंगणी मूर्ती मला आठवली. फ्रॅंक पापाच्या आठवणींच्या पुरचुंडीला एक गाठ मारुन मी मनाच्या आतल्या खणात ठेवली व ओठावर पसरलेली स्मिताची एक लकेर घेऊन मी माझ्या क्यूबकडे परतलो.