आजि म्या डबा नेईयला !
Category: ललित
डबा म्हटल्यावर कुणाच्या डोक्यात काय येईल हे सांगता येत नाही. मुंबईकरांना लोकलचा, पुणे मुंबई प्रवास करणा-यांना इंद्रायणी एक्स्प्रेसचा, शाळेत जाणा-या एखद्या गंपूस लाडावाचा, बायका (व काही अभागी पुरुषांना) मसाल्याचा तर काहींच्या रिकाम्या डब्यात (डोक्यात!) दूरचित्रवाणी संचही येण्याची शक्यता आहे. पण आज आम्हाला ज्यावर भाष्य करायचे आहे तो आहे सकलजनक्षुधापरिहारक, वामकुक्ष्यामंत्रक व आलसोद्दीपक दुपारच्या जेवणाचा डबा !
आता मी मुंबईच्या डबे वाल्यांविषयी काही तरी लिहिणार अशा अटकळी तुम्ही बांधायला लागला असाल तर तिथेच थांबा. तिथुनच मागे फिरा. कुटुंबवत्सल गृहिणिंनो "मुलांना डब्यात काय द्यावे" असलं काही अपेक्षित असेल तर तुम्हि सुद्धा थांबायला हरकत नाही. डबेवाल्यांवरच्या पुष्कळ डॉक्युमेंट-या, लंडनच्या राजाच्या भेटीच्या बातम्या, सिक्स सिग्माचे फन्डे, डबे वाल्यांचं मॅनेजमेंट भारी असल्याच्या गोष्टी, झालंच तर भरत जाधवचा "मुंबै चा डबेवाला" हा स्वत:च्या नावाला जागणारा डब्बा सिनेमा वगैरे गोष्टींचा मारा झाल्याने तुम्ही एव्हाना त्या बाबतीत सज्ञान झाला असाल. बरे झाले तो सिनेमा हिंदीत डब नाही केला अन्यथा निर्माता आणि प्रेक्षकांचे पेशन्स *डबघाईला आले असते !
(* डबघाई म्हणजे अंताजवळ पोचणे. डफघाई या शब्दावरुन हा शब्द प्रचारात आला! )
प्रत्येक गोष्टीचं एक चक्र असतं. आपल्याला लहानपणी सोडुन गेलेलं, साधंवरण भाताचं जेवण आयुष्यात कधी तरी पुन्हा येउन भेटतं. अर्थातच म्हातारपणी. वय झाल्यामुळे, काही जड पचवता न येण्यामुळे मंडळी साध्या भातावर आली की एक चक्र पूर्ण झाले असे समजावे. आपले वय फार झाले आहे याचा तो अलार्म.
डब्याची अशीच एक सायकल असते असा आमचा समज आहे. लहानपणी शाळेत आपण डबा न्यायचो. ते अगदी दहावी पर्यंत. शाळेतला डबा म्हणजे मला एक प्रकारे चैतन्याचे प्रतीक वाटतो. आमची शाळा चांगली मधल्या सुटीसाठी ऐसपैस वेळ द्यायची, त्याचा पुरेपुर उपयोग आम्ही वर्गात/मैदानावर किंवा जागा मिळेल तिथे क्रिकेट खेळून, शाळेच्या गच्चीवर एमआरएफ च्या त्या लाल क्रिकेटच्या रबरी बॉल ने फुटबॉल खेळून घ्यायचो. हा खेळ आमच्या शाळेत अगदी इल्लिगल होता!
शाळेतल्या कट्ट्यावर एकत्र बसून डबा खाणे म्हणजे मजा असायची. वेगवेगळ्या प्रकारच्या, चविच्या भाज्या खायला मिळायच्या. मला इतरांच्या घरची लोणचीच जास्त आवडायची. त्यामुळे डबा म्हटलं की मधली सुटी आठवते आणि मधली सुटी आठवली की तो आनंदाचा, चैतन्याचा काळ आठवतो.
ज्युनिअर कॉलेज मध्ये हे चैतन्य मिळेनासे झाल्याने आमच्यातले काही जण चैतन्य कांडीत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचे! त्या काळात खिशात थोडे फार पैसे खेळु लागलेले असत, त्यामुळे कॉलेज च्या कॅंटिनमध्ये चोचले चालत(आमच्या साठी केवळ जिभेंचे इतरंसाठी एसी किंवा फॅमिली रुम मध्ये चालायचे ते निराळे !)
इंजिनिअरिंग कॉलेजला असताना कॅंटिन आणि मेस मध्ये खाणे व्हायचे. त्यामुळे ४ वर्षांत डब्याचा प्रसंग येणे कठिण होते. अशा प्रकारे सुखेनैव आयुष्य कंठित आम्ही शिक्षणाची जोखीम संपवली. शिक्षण संपवता संपवता कुणा मध्यम वर्गिय सुंदर मुलिला बड्या घरचे स्थळ यावे त्या प्रमाणे आम्हाला एका बड्या कंपनीची नोकरी आली. कंपनी मल्टिबिलिअन डॉलर आहे म्हणून बडी नव्हे तर आमच्या सारख्या नतद्रष्टास मोठ्या मनाने नोकरी दिली म्हणून ती आम्हाला बडी वाटते. "जामातो दशम ग्रह:।" हि उक्ती ठाउक असुनही आम्हाला जो स्वत:चा दशमग्रह बनवुन घेईल असा बडा माणुस फक्त गवसायचा बाकी आहे!
राहत्या घरापासून पाच मिनिटांवर, म्हणजे बगलमेच आमचे कार्यालय असल्याने दुपारी हुंदडायला घरी येणे जमायचे. दहा मिनिटांत जेवण आटपून उरलेला वेळ भारतात फोन करणे किंवा अंतरजालावर काथ्याकूट करण्याचा कार्यक्रमांमध्ये आम्ही घालवायचो. सध्या काथ्याकुट मधल्या काथ्याची जागा ऑर ने घली आहे! हरकत नाही, "स्थळांचे संकेत" देणा-या संकेतस्थळांवर जाण्यापरिस आम्ही ऑर्कुटाशी मेतकुट जमवले होते. नंतर ते अति झाल्याने दुपारी लॅपटॉप उघडायचा नाही असा नियम आम्ही आमलात आणला होता. त्यामुळे पुस्तक वाच किंवा वामकुक्षी घे असा ऐष आराम चालायचा.
या आमच्या ऐष आरामाचे भारतातील मित्रांना अतिवर्णन करुन सांगितल्याने लवकरच अपेक्षित परिणाम झाला! आमच्याच कोणा तरी मित्र ग्रहाची वक्र दृष्टी पडल्यामुळे आमचे ऑफिस राहत्या घरापासून ७ मैलांवर गेले. त्यामुळे लवकर उठा, इंटरस्टेट रस्ता घ्या, ट्रॅफिक मध्ये अडाका, हे पूर्वी कधी न मिळालेले अनुभव यायला लागले. सुरुवातीला गोड वाटले. गुगलवर रोज सकाळी व संध्याकाळी परतताना वाहतूक पाहून मार्ग ठरवणे, अपघातझालेले रस्ते टाळणे हे सर्व करु लागलो. अमेरिकन लेबर फोर्स मध्ये आपण आलो असा अनुभव येउ लागला. वेलकम टू अमेरिका असे म्हणून स्वत:चे अभिनंदन पण करवून घेतले.
प्रश्न येउ लागला तो दुपारच्या जेवणचा. दुपारी पुन्हा तेवढे अंतर पार करुन फक्त जेवण्यासाठी घरी या हे म्हणजे चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला असा मामला झाला होता.(म्हणीतल्या कोंबडीची स्वस्ताई पाहता खरं तर त्या काळाच्या नागरी संस्कृतिचा हडाप्पा, मोहेंजोदरो सारखा आदराने उल्लेख करायला हवा. अशी संस्कृती अस्तित्वात होती हे महाराष्ट्रात कुठल्यातरी गावात उत्खनन करुन घरोघरी कोंबड्यांचे शेकडो अवशेष शोधून व न सापडल्यास, सापडले असे दाखवता येईल. यानंतरचा इतिहास तर सहज ओळखता येण्या सारखा आहे. कोंबड्या महाग झाल्या. त्यामुळे बामण व इतर कृपण लोक पटापट शाकाहारी झाले! शाकाहारची ही लाट प्रथम महाराष्ट्रातील बे एरियात उगम पावल्याची आख्यायिक आहे !! (काही सनातन लोक त्यास कोकण म्हणतात). भिक्षुकित मिळणा-या दिडकित भागेनासे झाले आणि घरातली काट्टी ऐकेनाशी झाली होती. काही तरी उपांय करणे गरजेंचे होतें. त्या मुळे विवंचनेत सापडलेल्या शास्त्र्यांनी विद्वत्सभा आयिजोत करुन त्या निष्पाप द्विजास अभक्ष्य ठरवून टाकले. तिथुन पुढे ती चळवळ (पैसे वाचवणारी असल्याने) फोफावत गेली.ज्यांना परवडे त्यांचा दु:स्वास केला जाउ लागला!
तर प्रश्न होता माझ्या दुपारच्या जेवणासाठी होणा-या १४ मैलांच्या रपेटीचा. शिवाय आजचा शुक्रवार खुनशी होता. सकाळी ८ पासून साडे पाचा पर्यंत मान खाली घालून सहस्त्रावधी क्लिक्स व काही शे शब्दांचा खडखडाट करुन काही तरी साधायचे होते.
त्यामुळे घरी जाण्यास वेळ मिळणार नव्हता. त्यामुळे सकाळच्या पारी उठुन लवकर आटोपून मी आज डबा भरला. आफिसात प्रथमच डबा नेल्यामुळे गृहस्थाश्रमात प्रवेश केल्या सारखे वाटत होते. माथी पुन्हा डबा आला म्हणजे आपले एक चक्र पूर्ण झाले, सुख की दिन गयो रे भैय्या याची जाणिव झाली! बायका नव-याला डबा भरुन देतात आणि तो न सांडता ऑफिसात घेउन जाणारा इमानी नवरा केवळ डोंबिवली फास्ट किंवा तत्सम चित्रपट,दूरदर्शन मालिकांमध्येच पाहायचो. अंकुश चौधरीला सुद्धा दीपा परब डबा भरुन देते अशी बातमी कालच सकाळला वाचली. ही काय बातमी आहे का? दीपा परब त्याची बायको आहेना? मग तीच देणार ना डबा! लोकांच्या बायका कशाला देतील ?
सारांश काय? तर आमचा संदीप कुळकर्णी झाला आहे, तुम्हाला बॅट घेउन दुकाने फोडायची नसतील , तर तुमच्यात,
नाटक आवडत असेल तर अतुल, हिंदी सिनेमात जायचं असेल तर सोनाली, सितार वाजवत असाल तर समीप, थोडंफार क्रिकेट आवडत असेल तर निलेश (भारतीय संघात जाण्याची अपेक्षा करु नका), संगीतात वेड्यावाकड्या कोलांट उड्या मारायच्या असतील तर सलील, साहित्यात जि.ए., प्रथम व्यापार व नंतर बसपाचे राजकारण करायचे असेल तर डि.एस., चित्रपट काढायचा असेल तर चंद्रकांत, काही जाहिराती व माफक प्रमाणात मराठी चित्रपट करुन माफक प्रसिद्धी हवी असेल तर मृणाल, प्राध्यापक व्हायचे असेल तर अ ते ज्ञ पर्यंत जेवढी अद्याक्षरे मिळतील त्यातली तुमच्या आवडीची कुठलिही दोन अद्याक्षरे, चांगला नवरा मिळवायचा असेल तर सुधा, नसेल तर ममता, व अध्यात्मात रस असेल ज्ञानेश्वर हे सगळे कुलकर्णी जिवंत ठेवा म्हणजे झाले !