शनिवार पेठ

Category:

प्रतिक्रीया 

पुण्याबाहेरुन येवून पुण्यात घर शोधण्याची वाईट वेळ अनेकांवर दैवदुर्विलासाने येते. त्यातलेच आम्ही एक. शिक्षण संपल्यानंतर पुढच्या जीवनक्रमणासाठी पुण्यनगरीत येणे क्रमप्राप्त होते ! तत्प्रमाणे आम्ही पुण्यात पाऊल टाकले. पण पुण्यात आल्यावर रहायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न तात्पुरता जरी अभियांत्रिकीच्या सिनिअर मित्रांनी सोडवला असला तरी स्वत:ची व्यवस्था करणे भाग होते. काही मित्रांना मूळ पुण्यात रहायचे होते (ज्याचे त्याचे नशिब असते दुसरे काय!). मलाही ज्ञानप्रबोधिनीच्या जवळपास रहायचे होते पण सदाशिवपेठवाले काही पाड लागू देत नव्हते. घर शोधणे हे आमचे प्रथम कर्तव्य बनले होते. सकाळ मधल्या छोट्या जाहिराती धुंडाळणे, ब-या वाटतील तेवढ्या जाहिराती मार्क करणे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष जागा पहायला जाणे हा आमचा नित्यक्रम बनला. बरेच दिवस मनासारखी जागा मिळत नव्हती. एके दिवशी राव्हल्या एक जाहिरात नाचवत आमच्याकडे आला. एरव्ही घर पहायला जायचं म्हटलं की अजगरासारखा पडून रहाणारा राव्हल्या एवढा इंटरेस्ट घेतोय म्हणजे जागा चांगलीच असणार असं मला वाटलं. पे. कालीन वाड्यात हवेशीर ३०० चौ फुटांची प्रशस्त जागा. विज, पंखा, गरमपाणी यांची उत्तम सोय. फक्त सुशिक्षित व चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी. शनवार मारुती जवळ शनि. फक्त सं ५ ते ७. नोकरदार, एजंट व वेळ न पाळणा-यांचा अपमान केला जाईल.

जाहिरात पाहून जरासा चमकलोच. ३०० चौरस फूट आणि प्रशस्त? पे. कालीन म्हणजे पेशवेकालीन म्हणजे वाडा तसा जुनाटच असणार. विज पंखा आणि गरम पाणी अशा चैनीच्या वस्तू उपलब्ध करुन दिल्यामुळे वाडामालक/मालकीण अगदीच उदारमतवादी मनोवृत्तीचे वाटले. सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी? अक्षर ओळख होई तोवर पहिल्या एक दोन इयत्ता जातात. त्या पहिल्या एक दोन इयत्तेचे विद्यार्थी सोडले तर अशिक्षित विद्यार्थी कधी असतो का असा प्रश्न कोणालाही पडेल. पुढे जाहिरातित लिहिलं होतं फक्त चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी....
समजा ही जाहिरात एखाद्या लौकिकार्थाने वाईट घरातील मुलाने वाचली तर तो म्हणणार आहे का, नको बा आपण कशाला? फक्त चांगल्या घरच्यांसाठी असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना आपण कशाला जायच तिकडे? अशी जाहिरातिची खिल्ली उडवत उडवत मी जाहिरातिचं जाहिर वाचन सगळ्य़ांसमोर केलं. सगळे फिसकारुन हसत होते. राहुल म्हणाला "फक्त शनिवारी जा बरं का नाही तर अपमान करेल घरमालक". जाहिरातीतला शेवटचा शनि वाराचा नसून पेठेचा आहे हे जाहिरात वाचण्यात कम अनुभवी असलेल्या राहुलला मी समजावलं, "सदा,शनी,भवानी,रास्ता,नारा, नवी, घोर, निगो असले शॉर्ट फॉर्म वापरतात इकडे". राहुलने अज्ञान दाखवत विचारलं, "निगो पेठ? आयला ही कोणती पेठ आहे?" मी त्याला सांगितलं, "अरे गाढवा निगो म्हणजे पेठ नाय काय. निगोशिएबल". शब्द मर्यादा वाढूनही शेवटचं वाक्य छापायला दिलंय म्हणजे घरमालक एकतर शेट माणूस असायला हवा किंवा पूर्वानुभवातून बरीच पीडा सहन करुन कावलेला असावा, असा निष्कर्ष आम्ही काढला. जाहिरातीवरुन घरमालक कसा असेल ही उत्सुकता चाळावल्याने मालक भेटीस उद्याच दिलेल्या वेळेत जायचं ठरलं.

मी आणि राहुल तयारच होतो. सागर आला की आम्ही वाडामालकांना (वामांना) भेटायला जाणार होतो. साडे चारला सागर आला. इतर कोणी जायच्या आत ५ वाजता बरोबर टपकून घर पाहून घ्यावे असा विचार मनात होता. त्या प्रमाणे लगेचच आम्ही घर शोधायला निघालो. शनवार मारुती लगेचच सापडला. पण यांचा पे. कालीन वाडा काही केल्या सापडेना. घरमालकाने फोन नंबरही दिला नव्हता. मग काय पुण्यात पत्ता विचारण्याचं जोखमीचं काम आमच्यावर ओढवलं. पुण्यात पत्ता विचारला की विचारणारा आपोआपच केविलवाणा व बिचारा होतो. पत्ता ज्याला विचारला जातो तो प्रस्थापित बनतो व आपल्याकडे "हे कोण परप्रांतीय इथे आलेत" या अविर्भावात पाहतो. अगदी कोथरुडला राहणा-या माणासाने पेठेत जाऊन पत्ता विचारला तर तो पुणेकरांच्या दृष्टीने पुण्याचा असूनही पुण्याबाहेरचा ठरतो. पत्ता सांगणारे कधी उत्तर न देता तर कधी मुद्दाम चुकीचं उत्तर देऊन निघून जातात. अशाच एका महाभागाने मला लकडीपुलावर दुचाकी चालवायला लावून १०० रुपयांचा चुना लावला होता. लकडी पुलासमोरुन जाताना आजही तो कटु प्रसंग आठवतो.

पत्ता सांगण्याचा असाच एक सत्य प्रसंग आठवला. मी एकदा पिएमटीने डेक्कन हून वनाज कॉर्नर ला निघालो होतो. बसमध्ये बरीच गर्दी असल्याने व कंडक्टरला विचारणे शक्य नसल्याने मी शेजारी बसलेल्या एका वृद्ध गृहस्थांना वनाज कॉर्नर चा स्टॉप माहित आहे का? असं विचारलं. "काही कल्पना नाही बुवा" म्हणून म्हातारबुवा खिडकी बाहेर पहायला लागले. थोड्या वेळाने मी इतर दोन तीन लोकांना विचारुन स्टॉपबद्दल माहिती काढली. स्टॉप वर उतरल्यावर पाहतो तर काय...हातात पिशव्या घेऊन ते गृहस्थ त्याच स्टॉप वर उतरले. माझं डोकं गरम झालं, मनात विचार आला वनाज कॉर्नरला उतरता उतरता म्हाता-याची हाडं झिजली असतील पण लोकांना मदत करायची म्हणजे यांची जीभ झिजते. तेवढ्यावर न थांबता मी त्या गृहस्थांना जाऊन जाब विचारला, "काहो वनाज माहित नाही म्हणालात आणि तिथेच कसे काय बरोबर उतरलात?" ते गृहस्थ क्षणभर वरमले पण तेवढ्यात सावरून घेत म्हणाले, "अच्छा तुम्ही वनाज म्हणालात का मला नीट ऐकू आले नसावे. अरेच्चा माझा मुलगा बोलावतोय वाटतं!" असं म्हणून निटसं ऐकू येत नसतानाही न मारलेली हाक ऐकून म्हातरबुवांनी पिशव्या बखोटीला मारुन रस्ता क्रॉस करुन पळ काढला सुद्धा!

पुण्यातल्या पत्ता सांगण्याच्या अशा अनुभवांना व एसटिडी वरच्या "पत्ता विचारण्याचे पैसे पडतील" अशा स्वरूपाच्या पाट्यांना मी फारसा भीक घालत नसे. वयोवृद्ध लोक शक्यतो टाळून कोणा तरुणाला पत्ता विचारता येईल का म्हणून मी इकडे तिकडे पहात होतो. शेवटी मनाचा हिय्या करुन एका जवळच्या दुकानात शिरलो. "काहो इथे शनवार मारुती जवळच्या कुठल्या वाड्यात भाड्याने जागा देतात का?" असा प्रश्न त्यांना विचारला. दुकानातल्या गृहस्थांनी आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं "काय हो? सुशिक्षित आहात ना?" एखादी पाटी वाचायची राहिली काय असा विचार मनात चमकून गेला. मी पाट्या शोधू लागलो. ते पाहून गृहस्थ म्हणाले, "शनवार मारुती जवळ शेकडो वाडे आहेत. तुम्हाला कुठला हवाय? नाव काय आहे मालकांचं? मी म्हटलं "काही कल्पना नाही. सकाळला जाहिरात आहे". गृहस्थ म्हणाले," आहो मग त्यांनाच फोन करुन का नाही विचारत?", मी म्हटलं, "अहो फोन नंबर नाही दिला जाहिरातीत". त्यावर ते दुकानदार बडबडले, "च्यायला ह्यांचा ताप वाचावा म्हणून हे आमच्या सारख्यांच्या मागे ताप लावतात. बघु जाहिरात." मी व्हिजा ऑफिसरने डॉक्युमेंट मागितल्यावर ज्या तत्परतेने आपण कागद पत्रं देऊ त्या तत्परतेने आणि अदबीने त्यांच्या कडे जाहिरातीचा पेपर दिला. मी आशाळभूत नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागलो. "ही तर बळवंत जोशीबुवांची जाहिरात आहे. जाहिरातीत एखादा शब्द वाढवून ब. जोशी एवढं सुद्धा टाकणार नाही हा *&%$##*" असं म्हणून त्यांनी बळवंतबुवांच्या वंशातील पूर्वजांचा उद्धार केला. "हे इथंच पलिकडे आहे, डावी कडे वळा", असा हात दाखवून दुकानदार कामाला लागले. दुकानदाराने सांगितल्या प्रमाणे आम्ही निघालो पण ते "हे इथंच पलिकडे" न सापडल्याने परत त्या दुकानात आलो. सांगून सुद्धा पत्ता न सापडणं म्हणजे सारंच संपलं ! हे म्हणजे घोर पातकच अशा नजरेने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. ’काका एकवेळ मुस्काटात मारा पण ते तसल्या नरजरेनं पाहू नका’, असं सांगाव वाटलं. दुकानदार वैतागून बोलले, "अहो काय तुम्ही इथेच पलीकडे जो जुन्या संडासासारखा दरवाजा दिसतोय तो जोशांच्या वाड्याचा दरवाजा". दुकानदाराने संडासाचे दार म्हणून जरी अवहेलना केलेली असली तरी जोशांच्या वाड्याचे द्वार म्हणजे जणु स्वर्गाचे दार असल्यागत आमच्या चेह-यावर हसू पसरले व समाधानाने आम्ही तिकडे निघालो.



दारावरची लोखंडी कडी वाजवणार इतक्यात राव्हल्याने माझा हात धरला व म्हणाला, "अबे वेडा बिडा झाला कि काय?". मी एकदम चपापलो. पुन्हा एकदा पाटी वगैरे वाचायची राहिली काय असं वाटलं. मी राहुलला विचारलं काय झालं? त्यावर तो म्हणाला, "अबे, ५ वाजायला ५ मिनिटं कमी आहेत. जोशा उगाच अपमान करायचा". "ठीक आहे" म्हणत शेवटी पाच वाजायची वाट पहात आम्ही तिथेच दाराशी थांबलो. आम्ही दाराशी घुटमळत असलेलं वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी पाहिलं आणि तो चेहरा अदृष्य झाला. मला वाटलं आता ती व्यक्ति येवून दार उघडेल पण कसचं काय? काहिच हालचाल दिसेना. शेवटी एकदाचे पाच वाजले व राव्हल्याने पुढे जाऊन दरवाज्यावर ठकठक केली. ठक ठक मधला दुसरा ठक वाजायच्या आतच दरवाज्याच्या वरच्या अंगाची एक खिडकी उघडली गेली व त्यातून एक केस उडालेला, गंध लावलेला चेहरा डोकावला व त्याने तुम्ही पेठेत आहात याची जाणिव करुन देणा-या स्वरात विचारलं "काय हवंय?" घरमालक आतल्याबाजुने बहुधा दारातच उभे होते. राव्हल्याला हे अनपेक्षित होतं. तो तर पहिल्यांदा घाबरुन मागे सरला नंतर सावरून म्हणाला "रुम हवी आहे". मालकांनी म्हटलं "नाव काय तुमचं". राव्हल्याने लगेच "राहुल" असं उत्तर दिलं. "राहुल काय? द्रविड की गांधी?" म्हाता-याला आडनाव अपेक्षित असावं म्हणून मी त्याचं राहुल जोशी पूर्ण नाव सांगुन टाकलं ते ऐकून मालक वदले "रुम वगैरे काही नाही. आमच्याकडे एक प्रशस्त जागा आहे भाड्याने देण्यासाठी." काही तरी गफलत हो असावी म्हणून मी जाहिरातीचा पेपर पुढे केला. मालक म्हणाले, "हो आमचीच जाहिरात आहे ती". मालक दरवाजा न उघडता खिडकितून आमच्याकडे पहात बोलत होते व खिडकीच्या खाली आम्ही, असा हा इंटर्व्हूव्ह सुरु होता. आम्हाला टाचा उंचावून न्याहळत वामा म्हणाले "कुठुन आलात?" "एबीसी चौकातून" राहुल्या वदला.
वामा: "एबीसी? ते काय?" मी: "अप्पा बळवंत चौक म्हणायचं असेल त्याला".
वामा: "अरे कुठुन आलात म्हणजे पुण्यात कुठून आलात?" मी: "काका आम्ही औरंगाबादहून आलो आहोत."
वामा: "अच्छा. कशाला?" मी नोकरी म्हणालो असतो तर वामाने दरवाजा उघडला नसता म्हणून मी "पुढिल शिक्षणासाठी" असं सांगितलं.
वामांनी ठीक आहे. एवढंच म्हणून आमच्याकडे पहिलं. काहीही न बोलता दरवाजा उघडला व कुणिही दोघांनी आत या असं फर्मान सोडलं. च्यामारी आम्ही तिघे आलेलो असताना फक्त दोघांनी आत या म्हणणं म्हणजे कहर होता. तरी पण सागराने समजूतदारपणा दाखवला व तो बाहेर थांबला. मी आणि राहुल आत गेलो. बळवंतराव जोशी यांची देहयष्टी त्यांच्या नावाला पूर्णपणे विसंगत व आडनावाला साजेशी होती. गोरेपान, कपाळी गंध, केस उडालेले, काका कसले आजोबाच शोभावेत असे. खाली मळखाऊन खाऊन स्वरंग, स्वजात विसरलेले धोतर वर एखाद्या पारशीबुवा प्रमाणे अडकवलेली बंडी त्यातून डोकावणारे कळकट जानवे,कानात भिकबाळी सारखे काही तरी घातलेले होते. थंडीचे दिवस नसताना पायात लाल रंगाचे सॉक्स चढवले होते. ही वेषभूषा पाहून आपण पेठेत आलो आहोत याची खात्री पटली.




दरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. त्याच चौकोनातून एका कोप-यात एक जिना होता. वाड्याच्या वरच्या मजल्यावर २-३ खोल्या होत्या. त्यातलीच एखादी आम्हाला दाखवतील असे वाटले. दिवाणखाण्यात वामा गेले त्यांच्या मागोमाग आम्हीही निघालो. आम्ही मागेच येत असल्याचे पाहून वामा मागे वळाले व ताडकन म्हणाले, "वहाणा काढून पाय धुवूनच वर या. मी वाड्यातच आहे तुम्ही बाहेरून आलात तेव्हा पाय हे धुतलेच पाहिजेत". चौकात एका घंगाळात पाणी भरुन ठेवलं होतं. तिथे जाऊन आम्ही चपला काढून पाय धुतले व दिवणखाण्यात प्रवेशकर्ते झालो. हा आमच वाडा. वामांनी सांगायाला सुरु केलं. दिवाणखाणा अगदी पेशवाई थाटातला होता. वर झुंबर, केळकर संग्राहलयात शोभला असता असा गालिचा, दिवाणखाणाभर आजवर वाड्यावर राज्य करणा-यांच्या तसबिरी, कोणाकोणाच्या पुणेरी पगड्या, भिकबाळ्या मांडून ठेवल्या होत्या. एक जुनाट टिव्ही कोप-यात पडला होता.

वामांनी त्यांच्या व बहुतांश ज्येष्ठांच्या आवडीचा "ओळखी काढा" हा खेळ सुरु केला. मग आडनावे विचारणे, नातेवाईकांची आडनावे विचारणे, कोण नातेवाईक कुठे आहेत याची प्राथमिक चौकशी करुन झाली. कुठुनच ओळख लागत नसल्याचं पाहून वामा थोडे खट्टू झाले. त्यांनी मग स्वकुळाची बख्तरे आमच्यासमोर उलगडायला सुरु केलं. दिवाणखाण्यातील एकेका तसबिरीवर वामांनी भाष्य करायला सुरु केले. बळवंतराव, एकनाथराव, विष्णुपंत, हरिपंत, भिकाजीपंत अशी त्यांची वंशावलि त्यांनी संक्षेप वगैरे संकल्पनांना फाटा देत आम्हाला ऐकवली. त्यानंतर त्यांनी वाड्याचा इतिहास, वाडा बांधणारे पंत, त्यांचे पेशवे दरबारचे वजन व कर्तबगारी कथन केली. हे वर्णन ऐकून आम्ही पेशवे दरबारात विराजमान आहोत असा क्षणभर भास झाला. ही अगाध माहिती ऐकून झाल्यावर राहण्याच्या जागे संबंधी जाणून घेण्यासाठी आमची चुळबुळ सुरु झाली. आम्ही काकुळतीला येऊन म्हणालो थोडं राहण्याच्या जागे विषयी सांगता का?
वामा: "हो सांगतो की. माझ्याकडे सगळं नियमांनुसार होतं इथे रहाणा-याला नियमांचं पालन हे अत्यावश्यक आहे. अन्यथा गच्छंती अटळ आहे. सर्व नियम तुम्हाला समजावून सांगतो. पण सर्वात महत्त्वाचे सर्वात आधी. तर सांगा आपण घर भाड्याने कशासाठी देतो?"
मी: "सोबत व्हावी, जागा वापरात रहाते वगैरे वगैरे".
वामा: "सोबत वगैरे ते ठिक आहे हो पण मुख्य कारण म्हणजे घरभाडं. त्यासाठी आम्ही घर भाड्याने देतो. तेव्हा तिथे कुचराई मान्य नाही. नियम क्रमांक १: महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे इथे सदरेवर आणून दिले पाहिजेत".
मी: "हो चालेल ना. काही अडचण नाही".
वामा: "अहो बाकी नियम पुढे आहेत ते सर्व ऐका आणि मग काय ते ठरवा".
मी: "ठिक आहे. सांगा".
वामा: "हां तर मग भाड्यानंतर येते ती वाड्याची शिस्त. वाड्याची शुचिर्भूतता कायम राहील असे वर्तन ठेवावे लागेल".
राहुल: (वाड्याकडे नजर फिरवत) "हो राहिल ना. शुचिर..चिर..शुचिरब्रूता कायम राहिल ना".
शुचिर्भूतता उच्चारताना होणारा राव्हल्याचा चेहरा पाहून मला हसू आवरेना. हा शब्द त्याला पहिल्यांदाचा पुस्तकाबाहेर भेटला असावा. मनतल्या मनात मी मला उच्चार करता येतो का ते पाहून घेतले.
वामा: "नियम क्रमांक २:जाता येता दिंडी दरवाजा लोटून कडी लावून मगच आत येणे किंवा बाहेर जाणे".

कडकट्ट कुजलेल्या व लाथ घातली तर कोसळेल असा तो लाकडाचा सापळा म्हणजे दिंडि दरवाजा !!! हे जरा अतिच होत होतं. हा सापळा जर दिंडी दरवाजा होवू शकतो तर खुद्द वामाही स्वत:ला राघोभरारी समजत असतील असा विचार मनात येवून गेला.


वामा: "हा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. इथल्या शेवटल्या भाडेकरुनी या नियमाचं पालन करण्यात कुचराई केली म्हणून त्यांना हा वाडा सोडावा लागला. वेळेवेळी बजावूनही दरवाजा उघडा ठेवायचे व कहर म्हणजे वरुन असत्य बोलायचे. दरवाजा आम्ही उघडा ठेवला नाही म्हणून मलाच दटावून सांगायचे. पाहिले पाहिले आणि दिले एक दिवस घालवून".
मी: "बरोबर आहे. नियम तर पाळायलाच हवेत".
वामा: "आता नियम क्रमांक ३: आमचे कडे पहिल्या प्रहरी सडा संमार्जन होते. त्यामुळे वाडा पवित्र होतो. त्यामुळे सडा संमार्जनानंतर झोपून राहणे नाही".
वर खोलीत झोपून राहिलेलं ह्यांना काय कळणार आहे असं मी मनातल्या मनात विचार करत आहे हे ओळखूनच वामांनी पुढचा नियम सांगितला.
वामा: "नियम क्रमांक ४: सकाळच्या आरतीला वाड्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी हजर रहायचे".
नियम ऐकून मी जरा चपापलोच!
वामा: "त्याचं काय आहे हा नियम करावा लागला. अहो व्हायचं काय की आमची आरती सुरु असताना जुने भाडेकरु उठायचे आणि आळसावलेलं तोंड घेऊन दारात तोंड धुण्याकरित उभे रहायचे. अजिबात चालायचं नाही ते. अपवित्र वाटतं".
मी: "अहो, ती मुलं वर रहायची ना मग खाली कशाला येतील तोंड धुवायला?"
वामा: "अहो, ते पुढच्या नियमात कळणारच आहे. गडबड कशाला करता?"
मी: "बर".
वामा: "हां तुम्ही काढलाच आहात विषय तर सांगतो. नियम क्रमांक ५:
वर शौच व स्नानाची सोय नाही. वरच्या मुलांनी हे वापरायचे", असं म्हणून वामांनी दोन कवाडांकडे बोट केले.
मी: "इथे? खाली?"
वामा: "हो मग. त्यात काय? वाड्याचे ऐतिहासिक स्वरुप जपून रहावे म्हणून आम्ही वर शौचालय बनवले नाही".
मी मनात म्हटलं, ’अहो ऐतिहासिकच रुप जपायचे होते तर हे तरी शौचालय कशास बांधले? जायचे होते नदिपात्र रस्त्याच्याकडेला सकाळी सकाळी’. पण काय करणार? गरजवंताला अक्कल नसते या उक्ति नुसार मी मुकाट्याने पुढचे नियम ऐकण्यास सज्ज झालो.
वामा: "नियम क्रमांक ६: जिने चढताना धावत पळत जिने चढायचे नाहीत. धावत गेल्याने जिन्यांचं आयुष्य कमी होतं. पाय न वाजवता सावकाश जिने चढायचे, कितीही घाईत असाल तरिही".
हा नियम ऐकून एखाद्या रात्री हतोडी घेऊन त्या खिळखिळ्या जिवाला एकदाची शांती द्यावी असा विचार मनात येवून गेला. हा विचार जिना व वामा राघोबादादा पेशवे दोघांसाठी येवून गेला होता. पण इरिटेशन फेज संपून आता मला म्हातारा इंटरेस्टिंग वाटु लागला होता. श्रीमंतांनी पुढचे नियम सांगावेत म्हणून आता पर्यंतच्या नियमांना सहमती दर्शवणे भाग होतं. मी मुद्दाम चेहरा आनंदी ठेवला होता. वाडा मस्त असल्याचे मधून मधून मी श्रीमंतांना सांगत होतो.
वामा:
"नियम क्रमांक ७: कमीत कमी ८ महिने रहाण्याचा लिखित करार करावा लागेल. करार मोडल्यास पुढील भाडेकरु येईपर्यंतचा जाहिरात खर्च व भाड्याची रक्कम, करार मोडणा-यास देणे बंधनकारक राहिल. त्याचं काय होतं, आहो भाडं राहिलं एकिकडे. जाहिरात खर्चातच अर्धे भाडे निघून जाते. त्यात वर नुसतीच माहिती घेऊन येतो येतो म्हणणा-या उपटसुंभामुळे वेळ दवडला जातो. रात्री अपरात्री येणारे महाभागही काही कमी नाहित. त्यामुळे भेटायची वेळ छापावी लागते. तो खर्च वाढतो. एवढे करुनही काही हरामखोर अपरात्रीच यायचे. तुम्ही त्यातले वाटत नाही म्हणूनच एवढी सखोल माहिती देतोय".
पेशवे आता आम्हाला त्यांच्या गटात ओढू पहात होते.
राहुल: "तुम्ही त्याची काही काळजी करु नका. आम्ही एक वर्ष तरी कमीत कमी राहूच".
वामांनी राहुलकडे समधानाने व मी रागाने पाहिलं. वामांनी नियमावली चालूच ठेवली होती.
वामा: "नियम क्रमांक ८: दिंडि दरवाजा रात्रौ ९ नंतर बंद राहील. एकदा दरवाजा बंद झाला की बंद. गाडी पंक्चर झाली होती, रिक्षा मिळाली नाही, बस वेळेवर आली नाही अशी कारणे चालणार नाहीत. पोचायला उशीर होत आहे असे लक्षात आले तर वाड्यापर्यंत येण्याचे कष्ट घेऊ नका. बाहेरच कुठे तरी सोय बघा व दुस-या दिवशी वाड्यावर या.
नियम क्रमांक ९: रात्रौ ११:०० नंतर दिवे घालवले पाहिजेत. दिवे न घालवल्यास वरच्या खोल्यांचा फ्य़ूज काढण्यात येईल
नियम क्रमांक १०: कोणत्याही प्रकारचे मद्यपान धुम्रपान निषिद्ध. सिगारेटची थोटुके लपवण्याचा प्रयत्न करु नये. मी सिगारेट पिणारा मनुष्य एक मैलावरुन ओळखू शकतो".
वामासमोर बसलेला राहुल्या एका वेळी पाच बोटात पाच सिगरेटी धरून ओढतो हे वामांना सांगितले असते तर वामा झीट येवून पडले असते. मैलभराहून ओळखण्याची थाप आम्ही वामांचे वय पाहता पचवून घेतली. वामा आता थांबायला तयार नव्हते.
वामा: "नियम क्रमांक ११: वाड्यावर मुलींना आणण्यास तीव्र मनाई आहे. मग ती सख्खी बहीण का असेना. मागे एक मुलगा होता रहायचा एकटाच पण इथे येणा-या गोपिका पाहून लोक आमच्या वाड्याची चारचौघात नालस्ती करायला लागले. शनिवाराचा बुधवार केला म्हणू लागले. जेव्हा केव्हा त्याला टोकलं की मामे बहिण आहे, आते बहिण आहे, चुलत बहिण आहे, मावस बहिण आहे असे बहाणे करायचा. एका भल्या पहाटे त्याच्या दारावर थाप मारुन तुझ्या पुण्यातल्या बहिणिचा फोन आला आहे असे सांगितले. झोपेत असल्याने "पुण्यात कोणी बहिण रहात नाही" असं तो गाफिलपणे म्हणाला. दिला त्याच दिवशी घालवून त्या नीच माणसाला. तेव्हा आताच सांगतो मुलींना वाड्यात प्रवेश नाही".
या अटीमुळे सागराची थोडी पंचाईत होणार होती. पण काही तरी मॅनेज करता आले असते.
वामा: "नियम क्रमांक १२: वाहने फक्त रात्री वाड्यात घेण्याची परवानगी आहे. सकाळी सडासंमार्जना आधी वाहने बाहेर काढलीच पाहिजेत. दिवसा दुचाक्या बाहेरच राहतील.
नियम क्रमांक १३: वाड्यात कसल्याही प्रकारचे अभक्ष्य बाहेरुन आणून खायचे नाही. तसे काही आढळल्यास ते जप्त केले जाईल".
अभक्ष्य जप्त करुन बळवंतबुवा त्यावर ताव मारणार की काय अशी शंका मनाला चाटून गेली.
वामा पुढे वदले, "नियम क्रमांक १४: वाड्यात स्वयंपाकाचे प्रयत्न करायचे नाहीत. स्वयंपाक करायचा प्रयत्न केल्यास शेगडी व इतर साहित्य जप्त केले जाईल".
नियम क्रमांक १५: "वाड्याचे बाह्य सौंदर्य अबाधित रहावे यासाठी कसल्याही प्रकारची वस्त्रे वा अंतवस्त्रे राहत्या जागेच्या बाहेर वाळत घालू नयेत".
या नियमा चा भंग केल्यास वामा जप्तीची धमकी देतात की काय असे वाटून गेले पण त्यांच्या सुदैवाने ते तसं काही बोलले नाहीत. आमच्याकडे पाहुणे येतात व ते खूप वाईट दिसतं एवढंच सांगून त्यांनी नियमाचं महत्त्व विषद केलं.
वामा: "नियम क्रमांक १६: मित्रांचा गोतावळा आणून चकाट्या पिटत बसायचे नाही. घरात दोनच्या वर व्यक्ती राहता कामा नयेत. मी अधून मधून याची पडताळणी करत असतो. मागच्या वेळी अशीच पडताळणी केली तेव्हा डझनभर जोडे व बाथरुम मध्ये ५ टूथ ब्रश सापडले. मला फसवू पहात होते लफंगे. दिले घालवून बोडकिच्यांना".
आम्हाला तिघांना रहायचे होते. सागराचा टूथ ब्रश पाहून वामा आम्हालाही एकदिवस हाकलणार असे वाटून गेले. पण पकडले न जाण्यासाठीचा उपाय वामाच सुचवून गेले होते.
वामा: "नियम क्रमांक १७: खाली आम्ही रहात असल्याने वरती जोरजोरात चालणे आदळ आपट धांगड धिंगा चालणार नाही".
नियम क्रमांक १८: "मोठ्या आवाजात टेप वगैरे लावल्यास फ्य़ुज काढला जाईल. रात्र भर अंधारात बसावे लागेल".
नियम क्रमांक १९: "भाडे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इथे राहणा-या प्रत्येक व्यक्तिच्या छायाचित्रांच्या २ प्रती पोलीस चौकीत देण्यासाठी लागतील. शिवाय पुण्यातील ओळखणा-या दोन व्यक्तिंचे कायम स्वरुपी पत्ते दूरध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे.
नियम क्रमांक २०: कच-यासाठी घंटागाडी येते. घरात खिडकीत कुठेही कचरा ठेवू नका. बुद्धिचा वापर करा.
नियम क्रमांक २१: कुलुप लावून बाहेर जाताना दिवे व पंखा बंद करुन जाणे.
नियम क्रमांक २२: उन्हाळ्यात फ्रिजमध्ये पाण्याची बाटली ठेवण्यास आग्रह करु नये.
नियम क्रमांक २३: पाच हजार रुपये डिपॉजिट म्हणून जमा करावे लागतील. जागा सोडताना काही नुकसान झालेले असल्यास त्याची भरपाई डिपॉजिट मधून वसूल केली जाईल.
नियम क्रमांक २४: शेजा-यांशी काही वाद भांडण झाल्यास तुम्ही एकटे नाही हे ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सर्व नियम शिरोधैर्य मानत असाल तरच तुम्हास इथे प्रवेश दिला जाईल".

हा शेवटला अपवादात्मक नियम सांगून वामा शमले. एवढे नियम सांगत बसण्यापेक्षा वामांनी लिहून ते बाहेर लावावेत असं मला वाटत होतं. वामांचं बोलणं ऐकून वाटलं एवढे नियम लक्षात ठेवायचे असते तर च्यायला चांगला वकील झालो असतो. इंजिनिअर होवून कशाला असे हाल सोसले असते? पेशव्यांनी आतापर्यंत आमच्यावर नियमांचे चार राऊंड म्हणजे २४ गोळ्या झाडल्या होत्या. आता तरी पेशव्यांची मॅगझीन रिकामी झाली असेल या विचाराने आम्ही आवराआवरीच्या हालचाली सुरु केल्या. मी पेशव्यांनाच विचारले,
"नियम संपले असतील तर आम्ही येतो, आता उशीर होतोय".
वामा: "ठीक आहे. पण शौचालया संबंधी आणखी काही नियम आहेत ते मी तुम्ही रहायला आल्यावर सांगेन".
शौचालयात पण नियम ! आधी उजवा पाय ठेवा मग डावा, कडी लावा पाणी टाका असले नियम वामा सांगतात की काय वाटायला लागले. जे काय असेल ते सगळे हलाहल आजच पचवून घ्यावे म्हणून मी म्हणालो, "नको नको जे काय असेल ते आताच सांगा".
वामा: "नियम क्रमांक २५: रात्रीच्या वेळी वाड्यात शांतता असते. रात्री शौचालयाचा वापर करायचा झाल्यास तो उभ्या ने करु नये".
मी हा नियम ऐकून मी उभ्या उभ्या उडालो! पेशव्यांची इच्छा काही उमजेना.
मी: "म्हणजे"?
वामा: "स्पष्ट सांगायचे म्हणजे उभ्याने शौचालयाचा वापर केला असता रात्रीच्या शांततेत वाड्यात विचित्र आवाज होतो व घरात लेकी सुना असल्याने ते चांगले वाटत नाही".
बळवंतरावांच्या वाड्यात निसर्गाच्या हाकेला मोकळ्या मनाने ओ देण्याची चोरी होती. तिथे पण नियम होते. अशा नियमांच्या दडपशाहीने वाड्यात राज्य करणा-या या पेशव्यास मी गारदी बनून ठार मारण्यास मागे धावतो आहे व वामा दिंडी दरवाजा उघडून धोतर सावरत बाहेर पळ काढत आहेत असे चित्र मनासमोर तरळून गेले.

एवढे सहज पाळण्याजोगे सामान्य नियम ऐकल्यावर मी काय किंवा कुणीच बुद्दि जाय न झालेली व्यक्ति इथे राहणार नाही हे स्वच्छ होते. पण एवढा वेळ घातला होता असे मधेच उठून जाता येईना. मला हे असे नेहमी होते. जिथे गोष्ट पटत नाही तिथून निघणं जरा अवघड होतं. कपड्यांच्या दुकानात मना सारखे कपडे नाही मिळाले तर सगळे कपडे पाहून काहीच न घेता त्या दुकानातून निघताना जरा अवघडल्या सारखंच होतं तसं मला होत होतं.

’वाडा आम्हाला तर खूप आवडला आहे. आम्हाला लवकरात लवकर यायचे आहे’, असे असत्य वचन सांगून निघावे व पुढले काही महिने शनिवाराचे नावही काढायचे नाही अशा विचारात मी होतो. राहुल्याचा निघण्याचा काही बेत दिसत नव्हता. पेशव्यांच्या वाड्यावर आतल्या खोलीत त्याला लाल तांबडे काही तरी फडफडताना दिसले. तिकडेच त्याचे लक्ष लागून राहिले होते. लाल तांबड्याचीही राहुलशी नजरानजर झालेली दिसली. असले अघटित पेशवांच्या नजरेखाली चाललेले पाहून मलाच धस्स झाले. ह्या नियमांचे जोखड घेऊन इथे राहण्यासाठी राहुल्या आम्हाला कनव्हिन्स करतो की काय असं वाटून मी हवालदिल झालो. ’आम्ही कळवतो नंतर’ असं म्हणून निघायच्या विचारात असताना राव्हल्याने "आम्ही रहायला येतोच आहोत ऍडव्हान्स कधी देऊ?" असं विचारुन बॉंबच टाकला. तिथून निघून आम्ही रुमवर परतलो. राहुल आणि लाल तांबडा यांची काही तरी ष्टोरी सुरु होणार असे दिसु लागले होते. राहुल्या तिथे जाण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला होता. राव्हल्याचा मूड वेगळाच दिसत होता. माझा लाल तांबडा किंवा कुठल्याही रंगाशी संबंध नसल्याने व अजून बुद्धिभेद झालेला नसल्याने शनिवारातल्या त्या घाशीराम कोतवालाच्या घरात रहायला जाण्याचा अजिबात मानस नव्हता. पुढचे काही दिवस राहुलबाबा कागदपत्रे जमवणे, करार तयार करणे, फोटो काढणे असल्या कामात होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यात त्याला ओळखणा-या (पक्षी ओळख दाखवण्या-या) दोन पुण्यात्म्यांच्या शोधात तो बरेच दिवस होता. शेवटी ज्यांच्या कडे इमाने इतबारे वडे खात होता त्या जोशी वडेवाल्यांनी ह्या राहुल जोश्याला जोशी वाडेवाल्यांकडे राहण्यासाठी मदत केली. राहुल्याचा दुसरा पुण्यात्मा मलाच बनावे लागले होते. शेवटी एकदाचे त्याचे घोडे गंगेत न्हाले.

एके दुपारी निवांत बसलो असताना एका क्षणभरात आजवर झालेल्या सगळ्या गोष्टी भराभर माझ्या डोळ्या समोरून तरळून गेल्या. थोडा वेळ विचार केला आणि माझं मलाच हसू आलं. आता मला राव्हल्याच्या चेह-यावरचा ओसांडून वाहणारा आनंद, राहुल्यानेच दाखवलेली जाहिरात, राव्हल्या आधीपासूनच तासनतास जिच्याशी गुलुगुलु बोलायचा ती व्यक्ति व जुन्या भाडेकरुंकडून सतत उघडा रहाणारा दिंडी दरवाजा या सगळ्य़ा गोष्टींचा क्षणात उलगडा झाला! गेमर राव्हल्या आता भावी सासुरवाडीत ऑफिशिअली रहायला जाणार होता. आम्ही मात्र छोट्या जाहिरातीची कात्रणे काढून त्यावर लाल तांबड्या रेषा मारत भर उन्हात भर पेठांमधून घर शोधत वणवण हिंडत होतो.

अवलिया

Category: ,

प्रतिक्रीया 

फ्रॅंक पापा या माणसाची माझी पहिली गाठ झाली ती ऑफिस मध्ये. बरेच दिवस आमच्या टीम मध्ये एक कॉन्ट्रॅक्टर येणार येणार अशी चर्चा रंगत होती आणि एक दिवस माझ्या शेजारच्या क्यूबवर पाटी लागली. फ्रॅंक पापा. नाव वाचून थोडं हसू आलं. मनात म्हटलं बघुया किती दिवस टिकतो? कॉन्ट्रॅक्टर आला की सगळे आधी संशयाच्या नजरेनेच पाहतात. बरेच देसी कॉन्ट्रॅक्टर्स नवीन प्रोजेक्ट्वर थोडं दबकत दबकतच काम सुरु करतात. हे प्रकरण जरा निराळंच दिसलं. दुस-याच दिवशी सकाळपासूनच बाजुच्या क्यूब मधून फोनवर विविध संभाषणे आणि गंभीर चर्चा ऐकायला यायल्या लागल्या. "मी सगळं काही हँडल करतो, चिंता नसावी" अशी वाक्ये फारच आत्मविश्वासपूर्वक ऐकायला यायला लागली. फार मोठा माणूस दिसतो हा पापा म्हणत मी आपले नेमीच्या कामाला लागलो. त्याच दिवशी कॉफी पिताना ह्या माणसाची पहिली भेट व दर्शन झाले. काळ्या पांढ-या रंगाचं समबाहुल्य मिश्रण असलेले कुरळे केस, खुरटी काळी पांढरी दाढी, ना धड मेक्सिकन ना अमेरिकन पण काहिशी युरोपियन झाक त्याच्या दिसण्यात होती. पिवळ्या व लाल चट्ट्यांचा शर्ट थोडा बसकट बांधा आणि चेह-यावरचं हसू पाहून सिरिअस टोन मध्ये बोलणारा हाच का तो यावर विश्वास बसत नव्हता. कॉफी घेता घेता नावांची देवाण घेवाण झाली व आम्ही एकाच टीम मध्ये आहोत हा साक्षात्कार सुद्धा झाला. अवलिया दिसतोय एवढीच छाप घेवून मी क्यूब पशी परत आलो. रोजच्या भेटण्या चालण्यात मिनिटा मिनिटाला बदलणा-या त्याच्या फोन वरचा टोन ऐकून हा नक्कीच अवलिया आहे हा विश्वास पक्का होत चालला होता. बॉसशी बोलताना, कलिगशी बोलताना, बायकोशी बोलताना अशी बहुरंगी संभाषणे व बदलणारे टोन्स मला ऐकू येत असत. बॉसशी बोलताना हा प्रोजेक्ट कसा काय कॉंप्लेक्स आहे. आपल्याला डिझास्टर करायचे नसेल तर काय केले पाहिजे अशा गंभीर विषयांवर चर्चा करायचा, थोड्याच वेळ्यात बायकोचा फोन आला की, "काही नाही गं, मी माझ्या बॉसची टरकवतोय असं म्हणून खी खी हसायचा" अशा प्रसंगामुळे साहेब फोन वर बोलायला लागले की कुतुहलामुळे आपोआपच माझे कान टवकारले जाऊ लागले.

त्या प्रोजेक्ट्वर दोन एक महिन्यापासून काम करणारी माणसे सोडून आल्या दिवसापासून या माणासाला कसा काय एवढा भाव मिळतोय हा प्रश्न मला पडत असे. शेजारीच बसत असल्याने हाय हॉलोवरुन ओळख वाढून एकत्र कॉफी प्यायला जाणे गप्पा टप्पा मारणे चालायचे. दिवसही सरत गेले व ओळखही वाढत गेली. सुरुवातीचा एक महिना पापाजींनी काहीच काम केले नसल्याचे त्यांनी स्वत:च मला सांगितले. मॅनेजरने किती काम झाले असे विचारले तर पापा जड जड टेक्निकल शब्द मॅनेजरच्या अंगावर भिरकावून द्यायचा व मॅनेजरलाच काही तरी गूढ प्रश्न विचारून गुंगारून टाकायचा. तो पण चारचौघात आपली विज्जत वाचवण्यासाठी होयहोय करायचा. लोकांना घुमवण्यात पापाजी एकदम माहिर होते. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना विषय असा काही भरकटवत की मूळ प्रश्न कोणाच्याही लक्षात राहणार नाही. एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर न देता इतरांच्या कामाबद्दल पिल्लू सोडून द्यायचा पापाचा आवडाता गेम होता. मॅनेजराला ही चाल कळायला महिनाभर लागला तो पर्यंत भाईंकडे दुसरी चाल तयार असायची. पाच दहा मिनिट स्टेटस कॉल वर बडबडा करायचा शेवटी म्यूट करुन फिस्स करुन हसायचा. माझ्याशी ब-याच वेळा बोलताना काही सिरिअस बोलला की आता फिस्स्स करुन हसतो की काय असे वाटायचे. त्यामुळे गडी किती खरं बोलतोय याचा अंदाजच यायचा नाही. सगळंच एकंदरित गूढ प्रकरण होतं.

ऑफिसात काम जमत नसेल तर ते टाळण्यात पापाचा हात कोणी धरु शकत नव्हे. आज माझी पाठ दुखत आहे उद्या पर्यंत बरी होईल तो पर्यंत मी सुरु केलेले कार्य तडिस न्यावे असे इमेल टाकून पापा हापिसातून पळ काढत असे. पाठदुखी उद्या पर्यंत बरी होईल ही सगळी गणिते त्याला कशी काय माहित याचं मला आश्चर्य वाटे! एकदा सोमवारी डेमो देण्याची जबाबदारी पापावर टाकली होती. दिलेल्या कामात काही विशेष प्रगती केली नसल्याने पापांनी मी ब-याच दिवसात सुटी घेतली नाही असे म्हणत सोमवार मंगळवार अशी दोन दिवसांची सुटी काढून इतर कंत्राटदरांना डेमोच्या शुभेच्छा दिल्या व साहेब सासुरवाडीस पाहुणचारास रवाना झाले. जमत नसलेले काम अंगावर शेकू नये म्हणून पापा नाना क्लृप्त्या करत असे. असेच एकदा दोन कंत्राटदारांमध्ये काम वाटून देण्याची मिटिंग चालू होती. वरुनवरुन सोपी भासणारी गोष्ट पापाने मोठ्या चतुराईने आपल्या पदरी पाडून घेतली. पण जस जसे काम सुरु झाले तेव्हा पापाला आपली चूक लक्षात आली. आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला असे त्याला जाणवले असावे. पापाने यातून मार्ग कसा काढला असेल? पापाने अवघड काम सोपे कसे आहे व सोपे काम अवघड कसे आहे व तिथे स्वत: सारख्या सिनिअर माणसाची कशी आवश्यकता आहे यावर एक प्रबंध मॅनेजरबाबाला वाचून दाखवला. आपले बोलणे ऐकणा-याला कसे गुंगवायचे हे पापांना खूप छान ज्ञात होते. याची परिणती अशी होती की पापाचे राहिलेले काम दुस-या कंत्राटदाराने केले.
पापा अवलिया आहे हे आता मी पुरते ओळखले होते. एक दिवस शेजारच्या क्यूब मधून काही संवाद ऐकायला आले, "वि विल डिसकस थिस आफ्टर वर्क", "टेल यूर मदर टू स्टे होम, ऍंट नॉट टू गो टू द कॉप्स" अशी वाक्यं ऐकू आली. कॉप्स म्हटल्यावर माझे विचार सुरु झाले म्हटल भाई ने काही गफला केला की काय. कसं विचारावं, विचारावं की नको म्हणत म्हणत मी नाक खुपसलेच. म्हट्लं "काय रे मगाशी पोलिसांबद्दल काय बोलत होतास, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला". मला पापा म्हणातो, "काही नाही रे माझी सासू पोलिसांकडे जाणार होती तक्रार करायला" मी म्हटलं कसली? पापा म्हणाला, "अरे तिला परवा ड्रायव्हिंग करताना सीट बेल्ट न वापरल्याबद्दल टिकिट लागलं होतं. मग? मग काय तिला ट्रॅफिक अधिका-यांचा इमेल आला की सिनिअर नागरिकांकडून हे अजिबात अपेक्षित नाही, ज्येष्ठांनी तरी नियम पाळलेच पाहिजेत. आणि बरंच लेक्चर झाडून, पुन्हा असं केल्यास वयाचा विचार केला जाणार नाही अशी धमकी दिली होती. मी म्हटलं असं कसं करु शकतात ते. जाऊ द्यायचं होत ना तिला तक्रार करायला. पापा म्हणातो अरे कसंच काय अरे म्हातारीची चेष्टा करायला मीच फेक इमेल आयडी बनवून पाठवला होता तो इमेल, ती पोलिसात गेली असती तर माझी नसती का लागली वाट ! धन्य आहात म्हणत मी पापा पुढे हात जोडले. ब्रॅडमनची बॅटिंग पाहता आली नाही असं दु:ख जसं आजकालाच्या पिढीतल्या क्रिकेट प्रेमी मुलांना असतं तसंच पापा बाबांच्या महान लीला प्रत्यक्षात बघायला मला का मिळाल्या नाहीत याचं दु:ख मला तेव्हा वाटलं.

कॉफी विथ पापा च्या एका सेशन मध्ये जुन्या आठवणी सांगता सांगता पापा रंगात आला. तो कॉलेज मध्ये असतानाची गोष्ट. त्यांच्या कॉलेज मध्ये सायकल रेसिंगची स्पर्धा होती. अगदी आपली जो जिता वही सिकंदर टाईप्स. बरेच दिवस हे त्या रेस साठी सराव करत होते. स्पर्धा जिंकायचीच या आवेशाने त्यांनी सायकल वर मुठी आवळल्या. सुरुवातीला सर्वात पुढे असलेले पापा थोडे गाफिल झाल्याने मागे पडले होते. अटीतटीच्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक गमवायचा नाही या उद्देशाने पापा प्राण पणाला लावून पेडल हाणू लागले. शेवटचा उपाय म्हणून शॉर्टकट मारायच्या नादात कुठल्यातरी पायवाटेने पापाने सायकल दामटली. वेगात सायकल पळवता पळवता रस्ता चुकला. मग परतीची वाटही सापडेनाशी झाली. रस्ता शोधता शोधता ह्या न्यूटनला, एक सफरचंदाने लगडलेले झाड दिसले. हिरवे,लाल सफरचंद पाहून याला पुढे जाववेना. गड्याने तिथेच सायकल थांबवून फलाहार केला व सायकल स्पर्धा वगैरे असल्या क्षुल्लक बाबींचा बाऊ न करता झाडाखाली मस्त ताणून दिली. स्पर्धा संपूनही एक स्पर्धक न पोहचल्याचे पाहून सर्च अ‍ॅंड रेस्क्यू टीमचे स्वयंसेवक जेव्हा शोध घेत आले तेव्हा तेथे त्यांना हा विसोबा खेचर सायकलीवर पाय टाकून झोपलेला आढळला! असल्या काही प्रसंगांनी पापाच्या अंगीचे विरक्तीचे सुप्त गुण मला दाखवून दिले. पापा भारतात जन्मला असता व त्याने अध्यात्मिक क्षेत्रात पंचतारांकित प्रगती केली असती तर याच सफरचंदांच्या झाडा खाली पापा बांबांना सिद्धी प्राप्त झाली अशी हूल मी उठवली असती.

तुझ्या सासुचा अन सायकलिंगचा किस्सा माझ्या मित्रांना लय आवडला असे सांगितल्याने गडी लय खुलला व हसायला लागला. पापाची हसायची त-हाही निराळीच होती. वरचा जबडा व खालचा जबडा यांना बिलकूल विलग न होऊ देता ओठ मागे ताणून तो हसायचा. तसा तो हसायला लागला की पापा बाबांच्या पोटली मधून अजून एक कहाणी सुटणार याची मला खात्री वाटायला लागली. मो थोडा आग्रह केल्यावर पापा सास-याची कहाणी सांगू लागला. एकदा सास-याच्या वाढदिवसाला पापाने हार्ट वगैरेची चित्रं असलेले लाल ग्रिटिंग कार्ड घेवून त्यावर How can I forget your birthday dear. I still remember the sweet memories of your birthday we spent together in 1945. असा मजकूर लिहून दर गुरुवारी फ्लोरिडाला फ्लाय करणा-या एका मित्रा करवी फ्लोरिडाहून पोस्ट करवले. त्या ग्रिटिंग वरून सासूबाईंनी सास-यांना असे सडकावून काढले की बास. फ्लोरिडाचा स्टॅंप पाहून सासू अजूनच भडकली होती. म्हातारा लग्ना आधी फ्लोरिडात रहायचा हा बारकावा पापाने खुबीने वापरला होता. घरात मस्त धुराळा उडवून पापा त्यांची गम्मत पहात बसला. स्वत:च्या बायकोलाही त्याने यात त्याचा हात असल्याचा थांगपत्ता लागू दिला नव्हाता. शेवटी संतापाच्या भरात म्हातारी दगावते कि काय असी परिस्थिती आल्यानंतर पापाने तिला शांत करुन सगळा खुलासा केला.

पापांच्या लीला वर्णाव्या तेवढ्या थोड्या होत्या. श्रीकृष्णाच्या नटखट बाललीलांपासून बचावलेली एकही गोपिका द्वापारयुगी मथुरेत नसेल तद्वतच पापांच्या लीलांमधून बचावलेले त्याच्या नातलगांपैकी कुणी सुद्धा नव्हते. खुद्द त्यांचे पिताश्रीही यातुन सुटले नव्हते. आता या माणसाने काय प्रताप केले असतील? पापाजींनी आपल्याच पापाजींचे फेसबुक वर प्रोफाईल बनवले. इतक्यावर थांबतो तो पापा कसला? त्याने वडिलांच्या बॅच मध्ये कोण कोण होतं याचा इंटरनेटवर शोध घेतला. जे जे फेसबुकवर होते,त्यातल्या त्यात सगळ्य़ा मुलींना (म्हणजे त्या काळच्या मुलींना) प्रोफाईल मध्ये अ‍ॅड केले, इतकेच नव्हे तर मी मजेत दिवस घालवतोय. आमचा मुलगा आमची खूप काळजी घेतो, तुमचे कसे चालू आहे कॉलेजच्या दिवसांची खूप आठवण येते असे निरोप पाठवले. त्यातल्या काही मुलींनी आठवणींना दिलेल्या उजाळ्यांचे काही विशेष प्रसंग ह्या पट्ठ्याने जन्मदात्यास कथन करुन सांगितले. वडिलांनी संतापाने तिसरा डोळा उघडायच्या आत मी तुम्हाला सर्प्राईज देण्यासाठी हे करत होतो असे सांगून त्यांना शांत केले.

जितके आमचे कॉफी विथ पापा सेशन्स वाढले तितके ह्या माणसाबद्दल कुतुहलही. ऑफिसात आज काय होते ह्या पेक्षा पापा आज काय सांगेल याचेच कुतुहल जास्त असायचे. काम करुन करुन वैताग आला की मी पापा बाबांच्या क्यूब मध्ये तळ जमवू लागलो. आम्हाला पापांचे "ऑफिसात कसे वागावे" ह्या तत्त्वज्ञानाचे चाटण मिळाल्यामुळे बॉसनी केलेल्या बोच-या टीका फिक्या वाटायला लागल्या होत्या. बॉसनी आरोप केले तर प्रत्यारोप न करता हसत मुखाने उत्तर देणे. बॉस कितीही मूर्ख असला तरी त्यास तो विद्वान असून आपण त्याला मानतो असे सांगणे. बॉसला मला तुमच्या सारखे सक्सेसफुल व्हायचे आहे असे सांगून चढवणे. अशा काही जालीम मुळ्यांचा काढा त्याने मला पाजला होता. त्याचा मला बराच फायदा होत असे.

जसा जसा मी पापाला ओळखू लागलो तस तस मला समजू लागलं होतंकी पापा केवळ किस्स्यांचा बनलेला नाही. पापा म्हणजे एक जगण होतं. एक स्वच्छंदी प्रसन्न जिणं. अगदी उचकेपाचकेपणा नाही की अगदीच नाकासमोर चालणंही नाही. अगदी खिदळेगिरी नाही की भयाण शांतही नाही. कामाच्या दाबाने पिचलेला नाही की अगदी उनाड नाही. तत्ववेत्ताही नाही की उथळही नाही. त्याच्या हास्या मागे वेदना असेल किंवा नसेलही. पण पापाने मला खूष रहायला शिकवलं. तो सोबत होता म्हणून माझ्याही मिष्किलीचे मीच विसरलेले किस्से मला आठवले व मला हसवून गेले. पापाने माझं आयुष्य बदलवून टाकलं असंही नाही आणि सहज विसरला जाईल असंही नाही. मागच्या आठवड्यात ऑफिसच्या कामा निमित्त १५ दिवस बाहेर गावी गेलो होतो. परत आलो तेव्हा बरीच कामं पडली होती. इतर कुठल्या गोष्टी कडे लक्ष द्यायला वेळ नव्ह्ता. ऑफिसमध्ये काही तरी बदलले होते, पण ते लक्षात येत नव्हते. दुपारी पलीकडच्या क्य़ूब मधून नेहमीचा आवज न येता चेप्पू मामा, नेनु श्री माडलाडतुन्नानु असे अवाज ऐकायला येवू लागले. मी उठून पाहिले, शेजारच्या क्य़ूब वरची फ्रँक पापा ही पाटी निघून श्रीधर रेड्डी अशी पाटी लागली होती. पापा कंपनी सोडू गेला होता. तो पुन्हा भेटणार नाही याची भयंकर चुटपुट जाणवली. पण दुस-याच क्षणी त्या अवलियाची ठेंगणी मूर्ती मला आठवली. फ्रॅंक पापाच्या आठवणींच्या पुरचुंडीला एक गाठ मारुन मी मनाच्या आतल्या खणात ठेवली व ओठावर पसरलेली स्मिताची एक लकेर घेऊन मी माझ्या क्यूबकडे परतलो.

आमचे सांगितिक प्रयोग

Category:

प्रतिक्रीया 

तुम्ही कधी बिनलग्नाचा जावई पाह्यलाय का? नसेल पाहिला पण तसचं आमचं हे बिननाटकाचं नाट्यगीत पहा!
पाषाणभेदाचं "सोडा हाततल्या हाता" हे पद वाचून आपसूकच मनात एक चाल येवून गेली, गाणं गुणगुणता ती एकदम छान बसली सुद्धा! मग काय आम्हीही अस्तन्या मागे सारल्या घसा खाकरला आलापी वगैरे केली अन दिली चाल लावून.

पाषाणभेदाची कविता येथे पाहता येईल.आमची व सुरांची कुस्ती येथे खाली पहा. नाट्यगीताचा इफेक्ट यावा म्हणून जालावरील काही चित्रे ढापावी लागली कोणाचा आक्षेप असेल तर आम्हाला कळवा व कुठे सूर ढळला असेल तर तेवढं पदरात घ्या.


हे रोज कविता करणारे !!! (विडंबन- हे गंधित वारे फिरणारे )

Category:

प्रतिक्रीया 

हे रोज कविता करणारे (प्रेरणा: हे गंधित वारे फिरणारे )


लोकहो, सादर आहे नवे विडंबन "हे रोज कविता करणारे" ! गाणं संदीप खरे सलील कुलकर्णी यांचं असलं तरी विडंबनाचा रोख त्यांच्यावर नसून मराठी ब्लॉगविश्व मिम, मिपा सारख्या उपक्रमांवर घडणा-या घटनांवर आहे ! सदर विडंबन कोणासही उद्देशून नसून करमणूक म्हणून बनवले आहे.

आता विडंबनाचा आस्वाद कसा लुटावा? मागच्या वेळी प्रमाणे व्हिडो बनवला आहे. बघाच एकदा.


हे गाणं फारसं परिचित नाही त्यामुळे आधी मूळ गाणे ऐका


नंतर आमचे विडंबन येथे ऐका





आमचे विडंब

हे रोज कविता करणारे
जन झरझर पांचट लिहिणारे
अपरिचित सारे पूरवीचे
तरी आता झालेत ओळखीचे
बघ व्यनित कोणी कुजबुजते
कुणाकुणाला खरडवहीतून जोडे मिळतात रे
उमजत नाही तोंड पुन्हा वरकरुन लिहितात रे
हे परस्परांचे कवतिक करणारे, हे प्रतिक्रियांतून तोंडी लागणारे

कुठल्या दिवशी नकळत मी एक कॉंमेट दिधले रे
असूर कंपूचे कसे जोमाने मलाच भिडले रे

हे कॉमेंट जयातें मधु सुधा
कधी मारतात हा डंखसुध्दा
कधी करतील नावे शंख सुद्धा
कुणाकुणाची कंपूमधुनी फिल्डिंग लागतेय रे
उमजत नाही तंगडी कुणाची कोण कधी खेचेल रे

हे पाककृती लिहिणारे, हे वायफळ चर्चा करणारे

घरात जेजे पडून होते जाली कडमडले
कसे पोरींच्या फोटोंनी 'मीपा' झगमगते

स्त्री तरुण असो वा म्हातारी
हर लेखातून मळमळणारी
स्त्रीमुक्तीसाठी तळमळणारी

मीमराठी मिसळपावचे मैत्रिण होतंय रे
समजत नाही बाजू पुरुषांची इथे कोण ऐकतोय रे

हे गाण्याच्या भेंड्या खेळणारे, हे कॉमेंटसाठी नित्य छळणारे
.
.

हे रोज कविता करणारे ,जन झरझर पांचट लिहिणारे

~निल्या


तायडीचे पोहे २

Category:

प्रतिक्रीया 

आमची ही कांदे पोह्याची गोष्ट कथाकथन स्वरुपात उपलब्ध असून. ऐकण्यासाठी खाली टिचकी मारा.

व्हिडो चे पाच भाग आहेत व लेखाचे दोन. निवांत वेळ असेल तर कथाकथन ऐका, अन्यथा लेख आहेच!

व्हिडो: भाग १, भाग२, भाग ३, भाग ४,भाग ५
लेख: भाग १, भाग २ (हाच)

भाग २
अपेक्षाभंगाचं कारण अगदी वेगळं होतं. पोह्याची प्लेट हातात घेतली व अपेक्षेन वर पाहतो तर काय पोरीच्या ऐवजी पोमा पोहे घेवून आल्या होत्या. आमचा सपशेल पोपट झाला होता. पोहे संपल्यावर "चाs" घेवून तरी मुलगी येईल असा अंदाज आम्ही बांधाला व उत्कंठेपाई सर्वांच्या आधी प्लेट मधले पोहे बकाबका संपवले. कनवाळू पोमाच्या ध्यानी ते आल्याने लगबगीने त्या आणखी पोहे घेवून आल्या. व आम्ही कसे हातचे राखून वाढत नाही हे दाखवण्यासाठी सढळ हाताने प्लेट मध्ये पोहे ओतले. त्यामुळे आता दुसरी प्लेट संपवावी लागणार होती.

इकडे आपण मुलगी पहाण्याचा कार्यक्रमाला आलो आहोत हे विसरुन मंडळी नेहमीच्या गप्पांमध्ये रंगली होती. मुलगा वा मुलगी हे चर्चेचा विषय न राहता पोबाने कसे कष्टात दिवस काढले, ८० च्या दशकात कशी हालाखिची परिस्थिती होती, स्ट्रगल म्हणजे काय असतो, कष्टाला पर्याय कसा नसतो, योग्य वेळी स्वामींची कृपा झाल्यने आता कसे त्यांना सुखाचे दिन दिसत आहेत, म्हाता-या माणसांसाठी कमोड कसा उपयुक्त असतो वगैरे अगाध व विविध विषयांवर चर्चा सुरु झाली. चर्चेत सावळेश्वरांनी वाक्य टाकले " तुम्हाला म्हणून सांगतो हे आमचे कार्लेकर फार अभ्यासु आहेत हो, नोकरी करता करता त्यांनी लॉ चे शिक्षण पूर्ण केलं बघा" मी पोबाकडे पाहिलं, पोबाची छाती कौतुक ऐकून दीड इंच फुगून आली.

वकिल सोडून इतर लोक कडमडायला लॉ कशाला शिकायला जातात?, हे मला आजवर न उलगडलेलं कोडं आहे. कायद्याचा अभ्यास कुणी करावा? वकिल, न्यायाधीश, पोलीस व फार फार तर ज्यांना गुन्हे करायचे आहेत त्यांनी केला तर ठीक आहे पण बाकिच्यांना हे नस्ते उद्योग का करावेसे वाटतात कोण जाणे. आपण बांधकाम खाते किंवा एमएसईबीत अभियंते, पण लॉ ची डिग्री कशाला हवी? उद्या समजा असा काही प्रसंग गुदरलाच तर तिथे ते वकिली कोट चढवून स्वसंरक्षणासाठी उभे राहणार आहेत का? संगीत, नाट्य, चित्रकला या सारखे अनेक छंद उपलब्ध असताना वेळ जात नाही म्हणून कायद्याचा अभ्यास करणा-यांच्या रसिकपणाची कीव कराविशी वाटते? या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न म्हणजे कायदाच कशासाठी? लॉ गोड लागला म्हणून मुळासकट खायचा का? वेळ आहे म्हणून कुणी फावल्या वेळात व्हेटर्नरी डॉक्टर झालाय असे माझ्या तरी ऐकिवात नाही! असो.

इकडे मुलगी बाहेर यायचे काही चिन्ह दिसेनात. एवढा सातसमुद्र ओलांडून मी इथे जिला पहायला मी आलो होतो ती तिच्याच घरातल्या मधल्या खोलीचे भिताड ओलांडून बाहेर यायला तयार नव्हती. पोहे खाताना जरा पडदा हलला की डोळ्याच्या कोप-यातूनच काही दिसते का ते मी पहात होतो. एरव्ही नायिकेच्या पडद्यावरच्या हालचाली टिपण्यास आपण उत्सुक असलो तरी आज मी ह्या नायिकेच्या पडद्यामागच्या हालचालींकडे लक्ष देवून होतो.

त्यांच्या गप्पांना मी कावलोय हे पोबाच्या लक्षात आले असावे कारण आता त्यांनी विषय कन्येकडे वळवला होता. पोबा वदले "आमची तायडी फार शांतय बर का" मी "हो का?" पोबा: "तायडी तशी लहानपणापासून लाजाळू आहे" मी "छान" म्हणून पावती दिली. "तायडी छान सैपाक करते, तायडी कॉलेज मध्ये फर्स्ट येते, तायडी पेंटिंग करते, तायडी फार आध्यात्मिक आहे" अशी तायडी टेपच पोबाने लावली. मी तायडी टेपकडे साफ दुर्लक्ष करुन पोहे खाण्यात गुंतलोय हे लक्षात आल्यवर पोबा माझं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणाले "हे पोहे आमच्या तायडीनेच बनवलेत बरं का !" "हो का? खरंच, ताई छान बनवातात पोहे" हे तोंडात आलेलं वाक्य कसं बसं पोह्यासकट गिळलं व नुसतंच एक स्मित मी पोबाच्या दिशेने भिरकावलं.

तेवढ्यात एक सात आठ वर्षांचा झगा हॉल मध्ये आला व क्षणभर चौफेर नजर फिरवून मी दिसताच खुदकन हसून अगदी तोंडावर हात ठेवून पळत आत गेला. हेराने आत जाऊन "अव्वा ! तायडे तू ह्याच्याशी लग्न करणार" अशी बातमी दिली असणार, असा विचार करत मी बसून होतो. आता मात्र धीर संपत चालला होता. एवढे एक तासाचे सद्वर्तन, आपण इतर विषयातही कसे ज्ञानी आहोत हे दाखवण्यासाठी त्यांच्या चर्चांमध्ये घेतलेला सहभाग. हे सगळं सत्कारणी लागणार की वाया जाणार हे सगळं त्या मुलीवर अवलंबून होतं.

पोबा काही त्या विषयाकडे वळायला उत्सुक नव्हते. आता सावळेश्वरांना चेव चढले होता. माझ्या कडे पाहून " ते सगळं ठीक आहे. पण अमेरिकेच्या हेल्थ इंशुरन्सवर लोकसत्तेत लेख आला होता. फार पैसे भरावे लागतात म्हणे तुम्हाला !" सावळेश्वर माझा अंदाज घेत म्हणाले. मला एकदम स्वदेस मधले गाववाले व त्यांना उतरे देणा-या मोहन भार्गवाची आठवण झाली. फक्त प्रश्न "सुना है वहां बहुत अमीर लोग रेहते है" असे नसून थोडे वरच्या पातळीचे व मराठीत होते. मी त्यांना फारशी माहिती नसेल म्हणून समजेल अशा शब्दात हेल्थ इंशुरन्स समजवायचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात लोकसत्तेची तलवार माझ्यावर उपसून सावळेश्वर म्हणाले " ते ठाऊक आहे हो आम्हाला, पण ओबामांच्या हेल्थकेअर रिफॉर्म विषयी काय मत आहे तुमचं?"

अशा अग्रलेखाधारित प्रश्नांची पूर्वकल्पना मला अजिबात नव्हती. त्यामुळे त्यांना खेळीयाडी उत्तरे देवून भागणार नव्हतं. अमेरिकेतल्या हेल्थकेअरविषयीचे ज्ञान यांना इथे बसून काय करायचेय? उगाच नसत्या चौकशा, आपल्या मनपाच्या नळाला पाणी का येत नाही, कार्पोरेशन मधला भ्रष्टाचार, फार फार तर नगरसेवक कसा लुच्चा आहे अशा चर्चांमध्ये सहभाग घ्यावा. पण नाय. गडी ऐकायला तयार नव्हते. त्यांना माझ्याकडून खरंच काही तरी उत्तर अपेक्षित होतं. "प्रिइक्सिस्टिंग कंडिशन्स कव्हर होतील पण डेमोक्रॅट्स जे कवहरेज टू ऑल महणतायत त्या फंड्ची लायबिलिटी कोणावर आहे ते क्लिअर करत नाहीएत. बट आय स्टिल थिंक द रिपब्लिकन्स शुड सपोर्ट द बिल" या एक दोन वाक्यांनी अपेक्षित परिणामस साधला होता. कार्लेकर व सावळेश्वर गप्प बसले. कोण रिपब्लिकन अन कोण डेमोक्रॅट्स असल्या भानगडीत आपलं पितळ उघडं पडेल असा विचार त्यांनी केला असेल. पोमा मात्र मला बोलण्याचा काही फारशा प्रयत्न करत नव्हत्या. एक तर मी त्यांना आवडलो नव्हतो अथवा काकूंचा तायडीवर सार्थ विश्वास असावा ते ठावूक नाही.

आता सगळेच कंटाळले होते. माझ्या बहिणीची चुळबुळ सुरु झाली होती. संध्याकाळाच्या स्वागत समारंभासाठी तिला घरी जाऊन नट्टापट्टा करायचा होता. त्यामुळे लवकर निघा असं ती मला खुणवू लागली होती. मी महाडेश्वरांकडे पाहून भुवया उंचावून खूण केली. पोबाला माझी ही खूण दिसावी याची योग्य ती काळजी मी घेतली.
पोबाने माझ्याकडे पहात व किंचित हसत विचारले, "मुलीला बोलवायच का?" च्यायला हा काय प्रश्न झाला का? "नाय काका इथे मी तुमचा ८०चा स्ट्रगल, लॉचं ज्ञान व ओबामाची क्रांती या विषयांअर बोलायला आलो होतो ! उगाच मुलीला मध्ये कशाला आणता, तुमचे अगाध ज्ञान पाहून माझं मन आदरानं भारून गेलं आहे. सासरा करीन तर तुम्हालाच अशी मी खूणगाठ बांधली आहे. तेव्हा फक्त मुहूर्त काढा, मुलीला पाहण्याचे सोपस्कार कशाला" असं बोलून दाखवावं असा विचार होता. तेवढ्यात महाडेश्वर मदतीला धावून आले व म्हणाले "बोलवा बोलवा आम्हाला जरा उशीर होतोय"

अचानक पोबा माझ्याकडे पाहून म्हणाले "उठा", मी म्हटलं च्यायला काय झालं पोग्राम संपला की काय. ह्यांना राग बिग आला की काय. पोबा उठले व मला हातानी उठण्याची खूण करु लागले. मी गोंधळून गेलो. मला म्हणाले "अहो उठा म्हणजे उठा व इकडे बसा". मला काही कळेना. मी म्हटलं "असू दे मी इथे कंफर्टेबल आहे". पोबा ऐकायला तयार नव्हते. महाडेश्वर म्हणाले "सांगतायत तसं करा". मी निमूटपणे उठून सांगितलेल्या ठिकाणी बैलाप्रमाणे जाऊन बसलो. च्यायला लग्न करायचे म्हणजे काय काय करायला लागते. असा विचार करत मी चरफडत बसलो. पोबा वदले. "अहो शुभकार्यासाठी तुम्ही पूर्वाभिमूख असणं महत्त्वाचं ! आमच्या गुरुजिंनी सांगितलंय." मनातल्या मनात गुरुजींचे मी आभार मानले. कारण फक्त पूर्व दिशेकडे तोंड करुन बसण्यावर भागलं होतं नाही तर गुरजींनी मुलाला डावा हात कमरेवर व उजवा हात शिखेवर ठेवून उजव्या पायाच्या अंगठ्यावर उभे रहायला सांगितलं असतं तर कार्ल्यानी मला तसा उभा केला असता.

पडदा हलला. माझं लक्ष तिकडे गेलं आणि एकदाचा तो महान क्षण उगवला. कन्या खाली मान घालून चालत येताना दिसली. ती येवून समोरच्या खुर्चीवर जावून बसली. म्हणजे मी खोलीच्या एका टोकाला व मुलगी खोलीच्या दुस-या टोकाला एकमेकांकडे तोंड करुन बसलो. जास्त डोळे फाडून बघतोय असं वाटू नये म्हणून तिच्याकडे बघायचे टाळत होतो. तेवढ्यात महाडेश्वर बोलले "मुली पेक्षा मुलगाच जास्त लाजतोय वाटतं ! हॉ हॉ हॉ" हा त्यांचा बाष्कळ विनोद कसा बसा पचवला. मुलीकडे धीर एकवटून पाहिले. ती मला स्माईल देत होती. आयला स्माईल ! "स्माईल दिली म्हणजे पोरगी फसली" हे ज्यूनिअर कॉलेज मधले गणित आठवले. पण इथे स्थळ काळ वेगळा होता. मी ही जबरदस्तीची एक स्माईल मुलीला फेकून मारली.

एक दोन मिनिट शांतता पसरली. कोणी काहीच बोलेना. पोबाने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाले "हं करा सुरुवात !" मी चपापलो. सुरवात? ही काय मिरवाणूक आहे की शर्यत? सुरुवात करा म्हणजे काय करा? पोबा माझ्याकडे पाहून म्हणाले "विचारा काय विचारायचे ते." मी थोडा हपकलोच च्यायला हे असं? अशा वातावरणात आपण काय विचारणार आणि ती तरी काय उत्तरे देणार. मी म्हटलं, "मला असां काही विचारायचं नाही !" तेवढ्यात महाडेश्वर सावरुन बसले. "मी विचारतो" म्हणाले. मी म्हटलं विचारा.

झालं काकांनी जंगलात आरोळी ठोकावी किंवा कॉपी करतना पकडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षक विचारतो तसं खडसावून विचारलं "हं, नाव सांगा?". या जोरदार प्रश्नाने मुलगी बिचारी एकदम भेदरून गेली. अगदी मंद आवाजात तिने आपलं नाव सांगितलं "कु. श्रद्धा कार्लेकर". कुमारी !!! इथे काय शाळेच्या गृहपाठाच्या वहिवर नाव टाकतेय की काय ही? असा विचार आला पण एकंदरित तिची भेदरलेली अवस्था पाहता ते मी फारसं मनावर घेतलं नाही. तिचं उत्तर येतं न येतं तेच महाडेश्वरांनी तोफेतून दुसरा प्रश्न त्याच ढंगात डागला "शिक्षण?", मुलीने तसंच भेदरलेल्या अवस्थेत "B.E. फ्रॉम अबकड इंजिनिअरिंग कॉलेज" असं उत्तर दिलं. मला काही हस्तक्षेप करु न देता काकांनी तिसरा प्रश्न सोडला "छंद काय काय आहेत?" अशा टेन्स वातावरणात काय छंद सांगणार कप्पाळ. सगळे जण मुली कडे पहायला लागले. मुलगी माझ्याकडे पहायला लागली. मी आता अस्वस्थ झालो होतो. न रहावून मी म्हणालो "छंद नसले तरी मला चालेल. आणि सध्यासाठी एवढे प्रश्न मला वाटतं पुरे आहेत". माझा तो पवित्रा पाहून सगळे जरा थंड पडले. कुठून दुर्बद्ध झाली व महाडेश्वरांना सोबत नेले असं झालं होतं.

पोबाने परिस्थिती ओळखून "तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही दोघे आत बसा" असं सांगितलं. पोबा तायडीस उद्देशून वदले "तायडे, यांना घेवून जा आत". तायडी माझ्याकडे न पाहता तडक चालायला लागली. मी तायडीच्या मागोमाग आतल्या खोलीत गेलो. तायडी अजूनही टेंशन मध्येच होती. तिला हलके करण्यासाठी मी म्हणालो "काका जाम सुटले होते ना बाहेर!" तायडी हसेल अशी माफक अपेक्षा होती. ती माझ्या या बोलण्यानेच भेदरल्य़ा सारखी वाटली. "काकांना असं कसं बोलतो हा !!!" असे भाव तिच्या चेह-यावर दिसायला लागले."नाही तसं काही नाही. सवय आहे मला अशा प्रश्नांची, मोठी माणसं असंच विचारत असतात" असा पाठ तायडीने आम्हाला पढवला. प्रत्यक्ष प्रश्नाला हात घालण्यापेक्षा. इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात म्हणून मी आपणहून स्वत:ची माहिती दिली. इथे वाढलो, अमुक कॉलेजात शिकलो, इथे इथे नोकरी करतो. तायडी काहीच बोलेना. माझं बोलणं संपलं. मग एक मिनीट शांतता. पुन्हा वातावरण टेन्स. अशा प्रसंगांमध्ये संवाद टिकवणे लय अवघड. खंड पडला की मुद्दाम विषय उकरुन काढल्या सारखे वाटते व वातावरण उगीच गंभीर बनते. ती अजून भेदरलेली दिसत होती. व स्वत:च्याच घरात इकडे तिकडे बघत होती. तिला प्रश्न विचारले तर अजून घाबरायची म्हणून मी इकडच्या तिकडच्य गप्पा मारल्या. मी कॉलेज मध्ये काय काय (अर्थात चांगल्या) गोष्टी केल्या ते तिला सांगितलं. एक दोन धमाल प्रसंग सांगितले. तरी तायडी अक्षरश: माठा सारखी बसून होती. चेह-यावरची एक रेष हालली नाही तिच्या. थोडा वेळ गेला होता. आता थोडं विचारायला हरकत नाही म्हणून मी जरा प्रश्न विचारायला सुरु केले. "(बयो)तुला विकांताला काय करायला आवडतं" तायडी: "मी लेक्चरर आहे. म्हणून फक्त रविवारची सुटी असते. त्यात मी सोम्मारच्या लेक्चरसाठी अभ्यास करते." मी म्हटलं ते ठीकाय गं पण कामाचं सोडून तुला समजा दोन आठवडे मोकळा वेळ दिला तर काय करशील? ’चक्रम आहे का हा?’ असे भाव घेवून तायडी माझ्याकडे पहायला लागली. माझी पहिलीच वेळ असल्याने आपण चुकीचे चेंडू तर टाकत नाही ना असं वाटायला लागलं. मी प्रश्न बदलला "कॉलेज मधे असताना काही ऑदर ऍक्टिव्हिटीज वगैरे?" तायडी ढिम्म मग एक मिनिटाचा पॉज घेवून "काही नाही". मी म्हटलं ठीके. "तुला काही छंद वगैरे". तायडी पुन्हा ढिम्म. मी पुन्हा तोच प्रश्न विचारला. ती मख्खपणे म्हणाली "नाही. मला काही छंद नाही". मला काय बोलाव कळेना. सगळेच चेंडू हिच्यासाठी वाईड तर मग च्यायला विचारायचं तरी काय? "तुला आवडते अशी एकही गोष्ट नाही?" तायडी "नाही." आता मात्र कमाल झाली असं मला वाटायला लागलं. मी म्हटलं "काही तरी करत असशील ना"? तायडी "हो करते ना, बाबा जेव्हा स्वामींचं पारायण करतात तेव्हा मी पण जप करते". मी तायडीच्या माईशी तर बोलत नाही ना असा भास झाला. क्षणात देवासमोर बसलेलं ते भक्तिमय कुटुंब नजरे समोर आलं. हातात चिपळ्या घेवून मी त्यांना सामील झालोय हे चित्र मनात उमटताच घाबरून मी ते पुसून टाकल. मी म्हटलं तुला काही विचारायचं असेल तर विचार. तायडीने एक दोन मिनिटं विचार केला व धीर एकवटून विचारलं "तुम्हाला कोणता देव आवडतो?" तिला "कपिल देव" असं उत्तर द्यावं असं मनात आलं होत. कुजकट विनोद करुन कशाल तिचा हिरमोड करावा म्हणून मीच तिला उलट प्रश्न केला "देव डी पाह्यलायस का?" ह्यावर कन्येचा चेहरा अगदी कोरा. "बरं ते जाऊ दे, तुझ्या मैत्रीणी काय करतायत, कुठे असतात त्या" विषय बदलायचा म्हणून मी म्हणालो कन्या वदली "मला फारशा कुणी मैत्रीणी नाहीत. एक होती मग नंतर पाचवीला आमच्या शाळा बदलल्याने नंतर तिचा फारसा संबंध आला नाही." पोरीकडून अशी मिळमिळीत उत्तरे आल्याने आपण इथून गाशा गुंडाळून लवकरात लवकर निघालेलं बरं असं मी ठरवलं. स्वागत समारंभाला तरी वेळेत उपस्थित रहावं असा विचार करुन मी एकदम कल्टी मारण्याच्या पवित्र्या मध्ये तिला म्हणालो "एका भेटीत व्यक्ति कळणं तसं खूप कठिण, आपण आजच भेट्लोय तेव्हा तुला उरलेले प्रश्न फोन वर विचारतो " असं म्हणून मी जागचा उठलो. तिने माझ्याकडे पाहिलं. मी लगेच "निघुया का?" असा प्रश्न केला व उत्तराची वाट न पाहता चालायला लागलो. बाहेर आलो तेव्हा यांच्या चर्चा झडत होत्या. मी चालायचं का असं विचारताच महाडेश्वर म्हणाले. अरे दोन मिनिटं बसं असं लगेच निघता येत नसतं असं म्हणून आपल्या गप्पांकडे वळाले. मी निमूट पणे बसलो.

महाडेश्वर: "आहो ती काळ्यांची मुलगी आहे ना ती तिकडे महाजनांकडे दिली आहे. आमचे साडूचे सख्खे चुलत भाऊ आहेत ते. ते लग्न मीच जमवलं होतं. मीच होतो तिकडे मध्यस्त. इथंच पलिकडाच्या बोळात घर आहे त्याचं. हो आता परवाच घेतलं त्यांनी. तो प्लॉट आमच्या ऑफिस मधले व्हवहारेसाहेब आहेत ना त्यांचा होता. मीच मध्यस्ती केली तिकडे" महाडेश्वरांची बडबड काही थांबत नव्हती हे पाहून
अशनं मे वसनं मे जाया मे बन्धुवर्गो मे |
इति मे मे कुर्वाणं कालवृको हन्ति पुरुषाजं ॥

या सुभाषिताप्रमाणे मे मे करणा-या महाडेश्वररुपी बोकडाचा मीच बळी घेतो आहे असा भास मला झाला. एव्हाना सगळे कंटाळले होते. उशीर झाल्याने बहिणाबाई तर आता चिडून लाल झाल्या होत्या. शेवटी एकदाचा नमस्कार चमत्कार करुन आम्ही तिथून काढता पाय घेतला. सावळेश्वर सोडायला येतो म्हणाले पण मी रिक्षा करुन जातो म्हणून सांगितलं व घराबाहेर पळतच बाहेर पडलो. रिक्षात बसल्या बसल्या हास्याचे स्फोट झाले. व आत घडलेली हकीकत मी सगळ्यांना सांगितली. स्वागत समारोह कसा बसा गाठला. तो व्यवस्थित पार पडला व दोन दिवसांनी मी घरी परत आलो.

घरी विषय निघाल्यावर आईने मला विचारलं "काय रे तिकडे काही आगावू बोललास की काय तू?" मी म्हटलं "नाय ब्वा. का काय झालं?" आईचं उत्तर ऐकून मी उडालोच " चांगलं स्थळ घालवलंस बघ तू. त्यांनी नकार कळवलाय! " मी म्हणालो "काय? नकार? काही तरीच काय बोलतेस आई, तासाभरात कुठे काय कळतं आणि बरं झालं त्यांनी नकार दिला ते, सुंठीवाचून खोकला गेला." आईला माझ्याबद्दल काय वाटलं काय माहित आई म्हणाली. "अरे एवढं वाईट वाटून घेवू नको. तुला दुसरं एक स्थळ आलंय." मी: "हो का? कुठलंय?". आई म्हणाली "आटपाट नगरात राहतात. वडील एमएसईबीत अभियंते आहेत" मी विचारल, "काय नाव काय" आई "सावळेश्वर का असंच काही तरी आहे बघ" मी मोठ्याने चित्कारलो, "आई त्यांना लगोलग होकार कळवा !! जस्ट क्लोज यूवर आईज ऍंड टेल देम आय एम रेडी टू गेट मॅरिड!" आईने मला ताप बिप चढला की काय म्हणत माझ्या गळ्याला हात लावून पाहिला.

तायडीचे पोहे १

Category:

प्रतिक्रीया 

कांदा पोहे या विषयावर अत्ताच काही लिहायचे नाही असे ठरवले होते. मुख्य म्हणजे उगाच ब्लॉगवाचून आमचे (दिव्य) विचार जर समजा उपवर मुलीला समजले आणि तिला ते एखाद्यावेळी पटत नसले तर ती उगाच काढता पाय घ्यायची. पण सध्या ब्लॉग जास्त प्रिय असल्याने एक तरी प्रकरण लिहावेच असं ठरवलं आहे. बायकोचं काय आहे? आयुष्य पडलं आहे तिच्यावर प्रेम करायला ! (ही ओळ तात्पूर्त्यास्वरुपाची असून ! नंतर अदृष्य झाल्यास
आश्चर्य मानू नये)

हीच गोष्ट कथाकथन स्वरुपात उपलब्ध असून. ऐकण्यासाठी इथे टिचकी मारा.
व्हिडो चे ५ भाग आहेत व लेखाचे दोन.निवांत वेळ असेल तर कथाकथन ऐका, अन्यथा लेख आहेच!

लेख: भाग १ (हाच), भाग२



भाग १
कथा घडते एका अटोपशीर व ब-यापैकी मोठ्या पण पुण्यापेक्षा छोट्या शहरात. त्याला आपण आटपाटनगर म्हणूया. माझा आते भाऊ जो माझ्याच वयाचा आहे त्याचं लग्न ठरलं होतं. त्याच्या लग्नसमारंभास उपस्थित राहता यावं म्हणून मी भारतात गेलो होतो- हे आजवर सगळ्यांना सांगितलेलं कारण तुम्हाला सांगणार नाही! खरं तर मी गेलो होतो स्वत:च्या लग्नासाठी मुलगी पहायला. उगीच ताकाला जाऊन भांडं कशाला लपवा? त्याच्या लग्नाला माझ्या दृष्टीने वेगळं महत्त्व प्राप्त झालं होतं. एक तर त्या निमित्ताने भारतात जाऊन स्वत:च्या लग्नासाठी मुली पहायच्या होत्या, शिवाय त्याच्या लग्नाकडे रंगीत तालमीच्या दृष्टीनेही पाहता आलं असतं. त्यामुळे त्याचं लग्न जणू काही माझंच लग्न असल्यासारखं मी मनावर घेतलं होतं. कपडे खरेदी पासून मांडव परतणी पर्यंतचे सगळे विधी लक्ष देवून पाहायचे असं ठरवलं होतं. शिवाय बारकाईने सगळीकडे लक्ष दिल्यास एखादवेळी हवा तो "गड" ही सर झाला असता. म्हणून इथून निघतानाच सर्व शक्यतांचा विचार करता चांगले कपडे खरेदी केले. नखशिखांत बदल असे संबोधन देता यावे म्हनून केसांचीही नवी रचना करून आम्ही स्वत:मध्ये अमूलाग्र बदल घडवून आणला होता. भले भले कधीही स्क्रॅप न करणारे मित्र व अर्थातच काही (पश्चातदग्ध) मैत्रिणी आश्चर्याचा पारावार न राहिल्याने मला स्क्रॅपून तो मीच असल्याची खात्री करुन घेत होते. त्यामुळे या हंगामात आमचे जय बजरंगा होवून जाईल अशी खात्री वाटत होती!

आजकाल अमेरिका म्हटल्यावर जसं काही अमेरिकेने भारतावर १०० वर्ष राज्य केलं होतं व अमेरिकेत पाय ठेवले की परकीयांचे डोके छाटले जाते असा समज करुन घेतल्यागत सगळ्या पोरींचे मायबाप व खुद्द पोरी "नको रे बाबा ती अमेरिका" चा सूर लावत आहेत. शिवाय अमेरिकेतल्याच ज्यांची लग्ने ३०-३५ वर्षांपूर्वीच आटोपली आहेत अशा काही फितूर आज्यांनी "मैत्रीण" सारखे उपक्रम सुरु करुन विमानात बसतानाच त्यांच्या या नव्या मैत्रिणीला नव-याची तक्रार कुठे करायची अशी माहिती पुरवणारी पत्रके वाटायचे उपक्रम हाती घेतले आहेत. आज्यांना आपण आपल्याच नातवाच्या पायावर धोंडा हाणीत आहोत हे कुणीतरी सांगाय पायजे. असो.

तर माझ्या स्थळांच्या यादी मध्ये आटपाटनगरातल्याच एका मुलीचे स्थळ होते. अनायसे मी आटपाटनगरात आलोच होतो तर मुलगी पाहून घ्यावी असं सगळ्यांच म्हणणं पडलं आई बाबा आटपाटनगरात नव्हते म्हणून मुलगी पहायला जाताना सोबत कोणाला न्यावे हा गहन प्रश्न पडला होता. आतेभावाच्या लग्नाचा स्वागत समारोह संध्याकाळी साताला सुरु होणार होता. पाच वाजता जाऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटपून संध्याकाळच्या कार्यक्रमाला हजर व्हावे असा बेत ठरला. बाकी सगळी जवळची मंडळी स्वागत समारंभाच्या तयारीत व्यस्त असल्याने सोबत येण्यासाठी म्हणून कोणी उपलब्ध नव्हते. मग आमच्या बाबांनी एका काकांचे नाव सुचवले. "महाडेश्वरकाका !". मी त्यांना या पूर्वी कधी भेटलो नव्हतो, पण बाबा म्हणाले "एक तरी वयाने थोर पुरुष माणूस सोबत पाहिजे", मग निमूटपणे मी पूर्णत: अनोळखी महाडेश्वर काकांना सोबत नेण्याचे कबूल केले. महाडेश्वर काकांना कधी येताय हे विचारण्यासाठी फोन केला तर काकांनी पलीकडून मलाच प्रश्न केला "काकूला येऊ दे का रे?" काका बरेच काकूंच्या आज्ञेतले दिसत होते. किंवा काकूला नेले नाही तर संध्याकाळी घरात मानापमानाचा फड रंगायचा, अशी काही अवस्था काकांची झालेली दिसत होती. आता हो म्हणावे तरी आणखी एका अनोळखी व्यक्तीला घेऊन जाणे आले. नाही म्हणावे तर काकांची पंचाईत व्हायची. शेवटी हो नाही करत मी काकूंना घेवून या काही अडचण नाही असं म्हणून फोन ठेवला.

पाच वाजता आम्ही तुम्हाला घ्यायला येतो असा पोबाचा (पोरिचया बाबा(पा)चा) निरोप आला. मी संध्याकाळी मुलगी पहायला जायचे म्हणून तयारीला लागलो. माझी ही पहिलीच वेळ असल्याने थोडं टेंशन होतं. आपल्याला कोणी तरी पाहणार अशी जीवनातली पहिलीच वेळ होती. कॉलेजमध्ये मला पाहून तोंड वळवणा-या किंवा अगदी रस्ताबदलून जाणा-या मुलीच आजवर माहित होत्या. वाहतूक सिग्नल लागला तर मागे आम्ही आहोते हे पाहून सिग्नल तोडून जाणा-या वीरांगणाही पाहिल्या आहेत. तेव्हा मला "भावी नवरा" या नजरेने पाहणारी कन्या पहिल्यांदाच पाहणार होतो. त्यामुळे वाईट दिसून आपला चानस का घालवावा या विचाराने मी जरा केस वगैरे व्यवस्थित करत होतो. नेमका मी आरशात बघताना मला माझ्या आते बहिणेने बघितले व ती हसत हसत पळत सुटली. तिने सगळ्यांना "दादा कसं करतोय" ते अगदी साभिनय करुन सांगितलं. सर्वांनी मग चेष्टा करण्याचा आपापला वाटा उचलला. आतेबहिणीला दादाची आणखी मजा बघायची होती म्हणून तिकडे मला पण यायचं म्हणून आमच्या मागे लागली. आणखी न चिडवण्याच्या अटीवर मी तिला नेण्याचं कबूल केलं.

थोड्याच वेळात महाडेश्वर काका आमच्या घरी आले. वय झालेलं असलं तरी केस एकदम काळेकुळकुळीत छान मागे फिरवून व्यवस्थित बसवलेले, जाड चौकोनी चष्मा. पण हा व्यवस्थितपणा फक्त चेह-यापर्यंतच मर्यादित होता. पूर्णबाह्यांचा फिकट रंगाचा उभ्यारेषांचा शर्ट पहिलं बटण न लावता तसाच मोकळा सोडलेला. अस्तन्या मोठ्यामोठ्या घड्याकरुन वर चढवलेल्या, शर्टाच्या खिशाला रेनॉल्ड्सचा पेन, कसली कसली कागदं पावत्या व डायरी यांनी भरल्यामुळे पोटुशाबाई सारखा दिसणारा खिसा ! काका असे तर काकू कशा असतील असा विचार करत होतो तेव्हड्यात महाडेस्व्हर काकू परस्पर तिकडे येतील असं काकांनी सांगितलं व ऐसपैस बसले. होता होता ५ वाजले. गाडी काही येईना व मी तयार होवून बसलो होतो. त्यामुळे थोडासा वैताग झाला. पोबाला फोन लावला. तर त्यांनी "गाडी पाठवलिये येईलच इतक्यात" असं सांगितलं. शक्य तितकं गोड बोलून मी काही हरकत नाही म्हणून फोन ठेवून दिला. शेवटी एकदा हो नाय करत साडे पाचला आमच्या दारात एक पांढरी मारुती उभी राहिली. त्यातनं एका व्यक्ती बाहेर आली व आमच्या घराकडे चालायला लागली. त्यांनी ब्लेझर चढवलेलं होतं. होता तो सूटच पण ब्लेझर सारखा लटकवून आले होते ते काका. पन्नाशीच्या आसपास असावेत. सुटलेले नसले तरी ब-यापैकी स्थूल. अजूनही उभ्या रेघांचा पिवळट शर्ट व गडद निळी पॅंट हाच पोषाख सर्वेत्तम आहे असे मानणारे. आल्या आल्या काकांनी वाघिणीचे दूध असलेल्या भाषेत पहिले वाक्य ठोकले "माय सेल्फ मिश्टर सावळेश्वर, केम हिअर फ्रॉम मिश्टर कार्लेकर टू रिसिव्ह मिश्टर ग्रूम" एका वाक्यातले तीन मिश्टर, व्याकरणातल्या चुका व इंग्रजी बोलण्याचा अट्टाहास पाहून साहेब नक्की सरकारच्या कुठल्यशा खात्यात (BE नसूनसुद्धा पाय-या चढत झालेले) अभियंते किंवा होवू घातलेले हापिसर असतील असा कयास बांधला.

आपल्याला काय करायचेय कोणी का असेनात भावाकडे आलेत म्हणून मी भावाला हाक मारली. तो बाहेर आला व मी पोबाच्या नावाने बोंबा मारत घरात गेलो. थोड्यावेळाने भाऊ आत आला व म्हणाला "अरे ते तुझ्याकडेच आले आहेत." क्षणभर काहीच कळेना. नंतर मला साहेबी ईंग्रजीचा उलगडा झाला. मला त्यांनी ’उमेदवाराचा’ ’ग्रूम’ करुन टाकला होता. मी बाहेरच्या खोलीत गेलो. मला पाहून सावळेश्वर जागचे उठले माझा हात बळंच हातात घेतला व हात पुढे विकट हास्य करत म्हणाले " हॅ हॅ सॉरी वि कुड नॉट कम हिअर इन अमेरिकन टाईम ", सावळेश्वरांच्या वाक्यचा अर्थ लावण्याचा मी प्रयत्न करतोय असे भाव माझ्या चेह-यावर दिसताच त्यांनी पुढचं वाक्य टाकलं " हॅ हॅ, वि आर इंडिअन सो वि कम ऑन इंडिअन टाईम, हॅ हॅ हॅ. वि आर नो डिसिप्लिन्ड लाईक अमेरिका." माणूस मराठी न बोलण्याचा व चुकीचं इंग्रजी बोलण्याचा विडा घेवून आला होता वाटतं. पोरीचा बाप असा मग पोरगी कशी असेल असे विचार करायला लागलो. पण थोड्या वेळाने त्यांनीच उलगडा केला की ते मिश्टर कार्लेकरांचे शेजारी असून मला फक्त न्यायला आले होते. कार्लेकर म्हणाजे ज्यांची कन्या आम्हाला सागून आली होती ते. हा असला सासुरवास फक्त १० मिनिटांचा होता म्हणून मी देवाचे आभार मानले.

"शॅल वी लीव्ह?" अस सावळेश्वर म्हणाले व आम्ही कारच्या दिशेने निघालो. मी विचार करता करता चाललो होतो सवयीमळे दरवाजा चुकलो व चालकाच्या दिशेने गेलो तर सावळ्या "हॅ हॅ हॅ" करुन चित्कारला, "वि हॅव राईट हॅंड ड्राईव्ह इन इंडिया" मी पण म्हणालो "होय होय विसरलोच होतो" हे वाक्य मी बोले बोले पर्यंत सावळेश्वरांनी अदबीने कारचा दरवाजा उघडून दिला. आत बसल्या बरोबर मी (भारतातला दुसराच दिवस असल्याने) बेल्ट लावला. तेव्हा सावळेश्वरच्या जोडीने महाडेश्वर पण "हॅ हॅ हॅ" करुन हसायला लागले. सावळ्यानी भारताची माहिती द्यायला सुरु करण्यापूर्वी मी ताबडतोब बेल्ट काढून टाकला व बेल्टची छोट्या शहरांमध्ये कशी आवश्यकता नसते याचे आख्यान मीच सुरु केले. मला मध्येत आडवत सावळ्याने "हाउ मच द पोलीस चार्जेस यू फॉर नॉट विअरिंग बेल्ट?" प्रश्न केला. मी म्हटलं "तिकडे काय आपला ट्राफिक पोलीस नाही त्यामुळे पटवापटवीची भानगड नसते. २५ डॉलर पासून ७५ डॉलर दंड होवू शकतो" सावळेश्वरांनी गणित करायला एक दोन मिनिट घेतले व म्हणाले "थ्री थाउजंड रुपिज?" मी म्हटलं "हो" लगेच महाडेश्वरांनी आपले म्हणणे मांडले "बरोबर आहे हो तिकडे लोकांचे पगार पण जास्त असतात त्यामुळे त्यांना परवडत असेल". मला आता असल्या चर्चाकरुन पकायला लागलं होतं. तेवढ्यात एक बाईकवर पोरगा आडवा गेला सावळेश्वरांना ब्रेक मारावा लागला. "नॉनसेन्स!" माझ्याकडे बघून "सॉरी हां !, दिज यंग बॉईज जस्ट डोन्ट नो हावू टू ड्राईव्ह !" मग भारतातली पोरं कशी टुकार आहेत यावर त्यांची रसना रचना कराययला लागली. एकूणात सावळ्याने माझा जन्म अमेरिकेतच झाला असून मला भारताची अजिबात माहिती नाही असा ग्रह करुन घेतला असावा. कारण मिळालेल्या प्रत्येक संधीवर सावळ्या भारतातल्या प्रत्येक गोष्टीवर तोंड्सुख घेत होता. मला भारतात येवून दोनच दिवस झाले असल्याने मी मला न पहायला मिळणा-या गोष्टी पाहण्यात गुंतलो होतो. रस्त्याने मध्येच एक खड्डा लागल जो की सावळ्याला दिसला नसावा. "सो मच करप्शन दिज डेज आय टेल यू. दिज गर्व्हमेंट सर्व्हंट्स" असं म्हणून काकांचा वरवंटा सरकारी अधिका-यांवर फिरायला लागला. त्यांच्या तोंडचा पट्टा त्यांच्याच गळ्यात बांधावा म्हणून मी "काका तुम्ही पण गव्हर्नमेट सर्वंट आहात ना" अशी आठवण करुन दिली. काकानी आधी थोडंसं रागानं माझ्याकडे पाहिलं व "यूवर सेन्स ऑफ हूमर ईज गुड हां ! असं म्हणून पुन्हा हॅ हॅ हॅ करुन हसले."

काकाची गाडी भारतावरुन स्थळाची माहिती व मार्केटिंगवर यायला लागली. "आय टेल यू, मी ऍंड मिष्टर कार्लेकर व्हेरी क्लोज फ्रेन्ड्स. जस्ट लाईक फॅमिली. बॅक इन १९८० ऑन फर्स्ट ऑफ ऑगस्ट वि जॉइनड अवर सर्विस ऑन द सेम डे!" मी मनातल्या मनात काका तुम्हाला नोकरी लागली तो सुवर्ण दिवस १५ ऑगस्ट असो वा २६ जानेवारी वा १४ नोव्हेंबर मला काय फरक पडणार होता त्याने? तरी काका सुरुच होते: "देन मी ऍंड मिश्टर कार्लेकर बॉट द प्लॉट ऑन द सेम अरिआ. एकदम साईड बाय साईड." काका तुमची व कार्लेकरांची कबरही अगदी साईड बाय साईड खोदतो असा विचार बोलून दाखवावा अशी खुमखुमी आली होती पण फोटोतल्या सुंदर कन्येचा चेहरा आठवून मी तो विचार मनातच ठेवला. काका आता जाम सुटला होता. "देन वि बोथ बिल्ट द हाऊस ऑन द सेम प्लॉट. विथ सेम प्लॅन. वि फिनिश ऑन सेम डे बरं का. देन द क्वश्चन केम. विच होम टू हूम. बट आय सेड टू मिस्टर कार्लेकर. यू आर लाईक माय येंगर ब्रदर टेक विचेवर वन यू वांट. बट रिअल ब्यूटी इज अहेड. वि बोथ हॅव टू डॉटर्स बॉर्न अरांउड सेम टाईम. काका इथे चुकलात तुम्ही सेम डे असायला हवं होता. असं मी नेहमी प्रमाणे मनातच म्हणालो. काका काही आवरत घ्यायला तयार नव्हते ! "आय टेल यू फर्दर. दे स्टडिड इन सेम स्कूल. बोथ ऑफ देम गॉट ऍडमिशन इन द सेम इंजिनिरिंग कॉलेज". काका आता जाता जाताल आमचीही पोरगी बघून जा म्हणतात की काय असं वाटाय्ला लागलं ! म्हणजे पुढच्या वेळी एखादा बकरा आणायला ते कार घेऊन गेले असते तर त्यांना सांगता आलं आसतं "बोथ ऑफ देम हॅड पाहण्याचा कार्यक्रम बाय ए सेम गाय ऑन द सेम डे" ! (ऍन्ड बोथ ऑफ देम गॉट रिजेक्टेड!)

आता जसं जसं घर जवळ येवू लागलं तसं काका आता रुळ बदलून पोरीवर आले. "आय टेल यू व्हेरी इनोसंट गर्ल्स. आय सीन देम ग्रो. आय टेल यू , व्हेरी व्हेरी इंटेलिजंट. देअर फॅमिली इज फुल्ल ऑफ जंटलमेन". आम्ही मनात "का हो फॅमिलीत फक्त झंटलमनच का, झंटलमनांच्या बायका कायमच्या माहेरी गेल्या का काय?" आता गाडी मुख्य रस्ता सोडून आतल्या गल्ल्यांमध्ये घुसत होती. ते पाहून जरा मला हायसं वाटत होतं. पण सावळेश्वर भलतेच पेटले होते. घर येईपर्यंत मुलीचं व त्यांच्या खानदानाचं वर्णन ठरल्याप्रमाणे संपत नव्हतं. व काका तावातावाने खडान खडा माहिती सांगायला लागले. मध्येच महाडेश्वरांनी थोडा विषय बदलायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांना अजिबात दाद लागू न देता आपलं राहिलेलं आख्यान सुरु केलं. काका आता मुलीच्या पाचवी पासूनचे परीक्षेत मिळालेले मार्क सांगत होते. काहीही म्हणा काकांच्या स्मरणशक्तीची दाद द्याययला हवी होती. उपवर मुलीचे मार्क, स्वत:च्या मुलीचे मार्क, मार्क कमी असतील तर त्या त्या वर्षीची कारणे शिवाय जोडीला कार्लेकरांच्या धाकट्या मुलीचे मार्क व स्वत:च्या धाकट्यामुलीचे मार्क खाड खाड सांगायला लागले होते. "व्हेरी स्कॉलर गर्ल्स आय टेल यू, आय हॅव मेड हॅबिट ऑफ रिडिंग इंग्लिश न्यूजपेपर्स टू माय गर्ल्स. एव्हरी मॉर्निंग दे मस्ट रीड न्यूज पेपर. ऑदरवाईज आय हॅव टोल्ड देअर मदर नॉट टू गिव्ह देम ब्रेक फास्ट." एका हातात टाईम्स व एका हातात प्लेट घेवून ब्रेकफास्ट मागत असलेला काकांचा भावी जावई माझ्या डोळ्या समोर तरळून गेला.
"सोशली व्हेरी ऍक्टिव्ह गर्ल. शी राईड्स हर ओन स्कूटी. यू गेस्ड इट राईट. मिष्टर कार्लेकर ऍन्ड आय पर्चेस्ड टू स्कूटीज ऑन द सेम डे "!
माझ्या मनात मुलीची प्रतिमा तयार होत होती. फोटो मध्ये अगदी निरागस दिसणारी कन्या व तिच्या सारखेच सेम सेम आयुष्य असणारी सावळेश्वरांची कन्या दोघी एकाच रंगाच्या स्कूटीवर बसून एकाच रंगाचा ड्रेस घालून कॉलेज ला निघाल्या आहेत. तेवढ्यात एकाच वेळी दोघींच्या आया (अर्थात सारख्यच रंगाची साडी घातलेल्या) एकाच वेळी ओरडत बाहेर येतात व पोरीला विसरलेला डबा (ज्यात एकच भाजी आहे) देतात. व पोरी एकाच वेळी टाटा करुन एकाच वेळी गाडी सुरु करुन निघून जातात असे स्लो मोशन मध्ये एक चलचित्र माझ्या डोळ्यासमोर घडून गेले.

सावळ्यावर स्थाळाची माहिती देण्याचे काम सोपवले आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे माझी माहिती तिकडे गेल्यावर पोबा काढणार आहे हा अंदाज आम्ही बांधला.
सावळ्याचा रेडिओ मिर्चीच्या आरजे प्रमाणे अखंड बडबड करीत होता. आता मी सावळेश्वरांच्या मार्केटिंग कडे दुर्लक्ष केले व मनात विचारायच्या प्रश्नांची यादी सुरु केली. पहिलीच वेळ असल्याने थोडं टेंशन होतंच. मुलगी खरंच फोटो प्रमाणे असेल का? फारच तोफखाना निघाली तर आपण आपला किल्ला कसा लढवायचा? आपणही हुशार आहोत हे दिसावे म्हणून कोणते विषय काढायचे? मुलीच्या स्वभावाचा ढंग समजून घेण्यासाठी व तिच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळेल असे कोणाते प्रश्न विचारायचे? महत्त्वाच्या विषयावर तिची काय मते आहेत हे जाणून घेण्यासाठी काय करता येईल? अशा प्रश्नांची उजळणी माझ्या मनात चालू होती.
सावळेश्वर आता मुलीच्या आईच्या माहेरावर आले होते. "आय टेल यू. देअर मदर इज फ्रॉम बस्वकल्याण. ए वन टाउन आय से. बसवकल्याण गर्ल्स व्हेरी कल्चर्ड. नॅचरल ब्युटी आय विल से. दे विअर द आबोली गजरा ऍंड लॉंग वेणी. व्हेरी डिसेन्ट". काकांना कदाचित भूतकाळ आठवायला लागला होता! "व्हेन मि. कार्लेकर गॉट अ मॅरेज प्रपोजल. आय आस्कड हिम. व्हेअर इज द गर्ल फ्रॉम. ही टोल्ड मी शी इज फ्रॉम बसवकल्याण. आय सेड क्लोज यूवर आईज ऍंड गेट मॅरिड !!! आय एम ग्लॅड ही फॉलोड माय ऍडवाईज, नाऊ सी हाऊ हॅपी ही इज. सो माय ऍडवाईज नेव्हर गोज फेल.माय मिसेस इज ऑल्सो फ्रॉम बसवकल्याण !" असं म्हणून सावळ्याने स्वत:च्या बायकोचं अप्रत्यक्षपणे कौतुक करुन घेतलं होतं.

तेवढ्यात त्यांनी एकदम फोन काढला हॉलो वगैरे काही न बोलता "टू मिनिट्स टू अराईव्ह" एवढंच बोलून फोन ठेवून दिला. आमची कार आता एका घरापाशी येवून थांबली. हिंदी कौटुंबिक सिनेमात अमिताभ, त्याचे दोन लेक, दोन्ही सुना व नातवंडे एकाच रंगाचे कपडे घालून जशी फोटोसाठी उभी राहतात तसं एक एख्खं कुटुंब एका घराच्या मुख्य दाराच्या आत उभं असलेलं दिसलं. कपडे मात्र त्यांनी मराठी सिनेमाच्या हिशोबाने घातले होते. तेवढ्यात त्यांच्यातला अमिताभ म्हणजे कुटुंब प्रमुख सरसावून घराच्या द्वारापाशी आला व बाकी मंडळी माझ्याकडे पाहून आत निघून गेली. बहुतेक मला पाहून त्यांचा उत्साह मावळला असावा. मी कारचा दरवाजा उघडून बाहेर आलो. कुटुंबप्रमुख माझ्याजवळ आले. मध्यमवर्गीय हेड्क्लार्क किंवा विद्यापीठात आपल्याला माहित नसलेल्या हुद्द्यावरचे अधिकारी दिसावेत तसे दिसत होते. केस अर्धे पिकलेले व अर्धे कलप करुन काळे, कलप लावायचे खेळ संपवून आता वय स्वीकारल्या सारखा चेह-यावर भाव. कपाळाला अष्टगंधाचा एक छोटासा ठिपका. त्यांनी पुढे येवून हस्तांदोलन केलं गृहस्थ मराठीत बोलले "फार उशीर नाही ना झाला आम्हाला गाडी पाठवायला" त्यामुळे जरा बरं वाटलं

घरात पाय ठेवला वर स्वामींची भव्य तसवीर. त्याच्या समोरच्या भिंतीवर दुस-या कुठल्यातरी स्वामींची त्याहूनही भव्य तसवीर. माणूस धार्मिक दिसतो असा विचार करत स्थनापन्न झालो. घरातला शोकेसवर नजर गेली. कायद्याची व धार्मिक पुस्तकांचा ढीग लागला होता. काका धार्मिक असून कायद्याचं पालन करणारे असावेत असा एक निष्कर्ष आम्ही काढला. घरात पोरीने केलेल्या कलाकृती लटकवल्या होत्या. कधीकाळी दोन्ही कन्या लहान असताना काका काकू मनालीला गेले असावेत तिथला एक फोटो मोठा करुन लावला होता. मोठी कन्या लहानपणी फारशी स्मार्ट दिसत नव्हती हे लक्षात आल्यावर थोडंसं मन खट्टू झालं. पण त्यात काय एवढं असं म्हणून आणखी कुठे काही तिचा फोटो दिसतो का ते पहात होतो. पोबाने प्रवासाची चौकशी केली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. मग पोबाने माझी प्राथमिक परेड घ्यायला सुरुवात केली. शिक्षण कुठे झाले, नोकरी केव्हा लागली, कंपनीचं नाव, कोणत्या क्षेत्रात कार्य करतो, तंत्रज्ञानाचे नाव वगैरे वगैरे माहिती विचारली. मग आमचे कार्यक्षेत्र असलेले तंत्रज्ञान समजून घेण्याचा निष्पळ प्रयत्न पोबाने केला. पण गडी हार मानायला तयार नव्हता. त्यांच्या शंकांचा मेरु अर्धा वगैरे पार करण्यात १०-१५ मिनीटे गेली.
चर्चा अर्धवट सोडून पोबाने बसल्या जागी "पोहे झाले असतील तर पाठवा बाहेर" अशी आज्ञा केली. मी पोबाच्या कोणत्यातरी प्रश्नाला उत्तर देण्यात मग्न होतो इतक्यात समोर पोह्याची डिश आली. खोबरं, कोथिंबीर घालून सजवलेले पोहे बाजुला व्यवस्थित चिरलेली लिंबाची फोड व एका चमचमत्या बर्फीचा तुकडा अशी सजवलेली डिश पाहून जरा बरं वाटलं. आधी डिश हातात घेतली व वर नजर करुन पाहितो तर काय अजबच! साफ अपेक्षाभंग......






दमलेल्या बाबाची कहाणी ~ निल्या

Category:

प्रतिक्रीया 

दोस्तहो,
तुमच्यासाठी खास एक विडंबन सादर करत आहे ! "दमलेल्या बाबाची कहाणी", मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे गाणं ठौक असेल. ठाऊक नसेल तर तुम्ही (टिपिकल) पुणेरी नाही !! (हे विधान आहे की टोमणा हे तुम्हीच ठरवा !)
घाई करु नका ! खालील क्रमाने गोष्टी करा

१. पयले शांत चित्ताने ते मूळ गाणं ऐका.
२. भावना समजून घ्या.
३. आमच्या विडंबनाचा विडो पहा. (विडंबन वाचण्या पेक्षा ते अनुभवा.)
४. ज्यांना वेळ आहे व ऑफिसात काम नाही ते एक ओळ या व्हिडोची व एक ओळ त्या व्हिडोची असं पाहू शकतात.
५. आवाजाला माफ करा. आम्ही काही अजून गायक बनलेलो नाही.
६. प्रतिक्रिया लिहा !

नोंद:
१. आमच्या विडंबनालाही एक पूर्णत्व यावे म्हणून आमुची सवताची काही कडवी भरीस टाकली आहेत. तेवढी गोड मानून घ्यावीत.
२. वापरलेली छायाचित्रे गुगलने आम्हाला दिली आहेत. यात कोणाचे चित्र आले असेल तर त्याने ते मागून परत घेवून जावे.
३. माझा व्हिडो पाहिल्या शिवाय प्रतिक्रिया देण्यास मनाई आहे.

मूळ व्हिडो:




आमचा विडंबनाचा व्हिडो:



दमलेल्या बाबाची कहाणी ~ निल्या

मार खाऊन निजलेला एक मी हा प्राणी
सुजलेले तोंड डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागु बापा मला तोंड नाही

झोपेतच बाप मारी लाथ पेकाटात
उठ भाड्या कर अभ्यास म्हणे तो घुश्श्यात
सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

आटपाट नगरात पोरी होत्या भारी
घामाघूम बाबा करी गल्ल्यांची वारी
रोज सकाळीस बाप निघताना बोले
चार विषय तुझे का राहुनिया गेले
जमलेच नाही पास होणे मला जरी
बाप म्हणे पाय ठेवू देणार नाही घरी

स्वप्नातल्या गावामध्ये पटवल्या लय पोरी
खर्या खुर्‍या पोरी साठी गेलो तिच्या घरी
पोरीच्या भावांनी लय मारीले मला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

कधी कुठे सुत आमचे जुळलेच नाही
पटव पोरगी असं मन बोंबलत राही
दिले फूल एकीला तिने घेतलेच नाही
अपमान केला इज्जत ठेवलीच नाही
झाला पचका कॉलेज मध्ये आमुचा उगीच
आलं पीक गव्हावानी कॉंमेंट्सचं सुगीचं
दोस्तांनी पण आमचा उडवला फज्जा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

पोरीच्या नादात कॅंपस गेला हो निघून
नोकरीची आशा सारी गेली ती संपून
कंपन्यांनी घेतली होती कवाडे मिटून
टेस्टिंग कोर्स केला शेवटी पैशे भरुन
लावले लग्गे जिथे तिथे दोस्तांनी मिळून
लढविला किल्ला सा-या बाजू सांभाळून
तवा कुठे लागला जॉब हा मला
दमलेल्या बाबाचीही कहाणी तुला

बॉस म्हणे कर काम वा प्रमोशन नाही
केले जरी काम तरी न मिळते हो काही
ऑनसाईट सुद्धा बॉस जाऊ देत नाही
कान भरी कलीग त्याचे सांगून काहीबाही
अंगाचीया माझ्या होतसे हो लाही लाही
"गोड बोला" मंत्र जपला मी हा बारमाही
बटर संगे स्कॉच त्याले मारिले पुन्हा
दमलेल्या बाबाचीही कहाणी तुला

तुझ्यासाठी बाळा मी शोधतोय आई
धुंडाळले मॅट्रिमॉनी हाती काही नाही
तुज्यासाठी फिरे आजा तुझा दिशा दाही
तुझा रंग गोरा व्हावा सो गोरी हवी आई
अशी पोरगी त्याले तरी गवसत नाही
मिळे कन्या लग्ना जरी उभी न ती राही
कधी येते नाड एक कधी मंगळ आडवा
दमलेल्या बाबाची ही कहाणी ऐक गाढवा
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

ऑफीसात उशिरा मी असतो बसून

भंडावले डोके जाड पोरी या बघून
तास तास जातो चांगली पोरगी शोधून
एक एक स्थळ जाते हळूच निघून
अशावेळी काय सांगु काय काय वाटे
तिचा फोटो बघून पाणी डोळ्यातून दाटे

वाटते की उठुनिया भारतात जावे
शोधून कन्या एक पुन्हा प्रेमात पडावे
गुंतुन एकीत लग्न करावे दुजिशी
जीवघेणे खेळ काही मांडावे आपुल्या देशी

गोष्ट माझी सांगताहे ऐक बाळा काही
जोडीदार महत्त्वाचा करिअर होत राही

कॉलेज मध्ये जास्त नखरे करु नको रे मुला
मिळेल त्या पोरीशी सेटिंग करुन टाक रे पोरा

कुणा एकी साठी नको होवू रे खु्ळा
एक जाता दुसरी शोधून काढ तू बाळा

बाबा सांगे चांगल्या पोरीवर असो डोळा
भाळी तुझ्या योग्य वेळी लागेल हा टिळा
हनिमूनला बाबा तुला आठवेल का रे?
बाबासाठी येताना काही आणशील का रे?

सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

तरुणपणी बाबा तुझा होता आंधळा
दिसले न प्रेम त्याला आले किती वेळा

बाबापरी नको करु माती आयुष्याची
काढ डोळ्यातून तुझ्या गाठ अहि-याची
सोड भीती जाईल हे आयुष्य मजेत
हवी कोणी तरी संगे येशील खुशीत

सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला

~निल्या