शनिवार पेठ

Category:

पुण्याबाहेरुन येवून पुण्यात घर शोधण्याची वाईट वेळ अनेकांवर दैवदुर्विलासाने येते. त्यातलेच आम्ही एक. शिक्षण संपल्यानंतर पुढच्या जीवनक्रमणासाठी पुण्यनगरीत येणे क्रमप्राप्त होते ! तत्प्रमाणे आम्ही पुण्यात पाऊल टाकले. पण पुण्यात आल्यावर रहायचे कुठे हा मोठा प्रश्न होता. हा प्रश्न तात्पुरता जरी अभियांत्रिकीच्या सिनिअर मित्रांनी सोडवला असला तरी स्वत:ची व्यवस्था करणे भाग होते. काही मित्रांना मूळ पुण्यात रहायचे होते (ज्याचे त्याचे नशिब असते दुसरे काय!). मलाही ज्ञानप्रबोधिनीच्या जवळपास रहायचे होते पण सदाशिवपेठवाले काही पाड लागू देत नव्हते. घर शोधणे हे आमचे प्रथम कर्तव्य बनले होते. सकाळ मधल्या छोट्या जाहिराती धुंडाळणे, ब-या वाटतील तेवढ्या जाहिराती मार्क करणे आणि संध्याकाळी प्रत्यक्ष जागा पहायला जाणे हा आमचा नित्यक्रम बनला. बरेच दिवस मनासारखी जागा मिळत नव्हती. एके दिवशी राव्हल्या एक जाहिरात नाचवत आमच्याकडे आला. एरव्ही घर पहायला जायचं म्हटलं की अजगरासारखा पडून रहाणारा राव्हल्या एवढा इंटरेस्ट घेतोय म्हणजे जागा चांगलीच असणार असं मला वाटलं. पे. कालीन वाड्यात हवेशीर ३०० चौ फुटांची प्रशस्त जागा. विज, पंखा, गरमपाणी यांची उत्तम सोय. फक्त सुशिक्षित व चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी. शनवार मारुती जवळ शनि. फक्त सं ५ ते ७. नोकरदार, एजंट व वेळ न पाळणा-यांचा अपमान केला जाईल.

जाहिरात पाहून जरासा चमकलोच. ३०० चौरस फूट आणि प्रशस्त? पे. कालीन म्हणजे पेशवेकालीन म्हणजे वाडा तसा जुनाटच असणार. विज पंखा आणि गरम पाणी अशा चैनीच्या वस्तू उपलब्ध करुन दिल्यामुळे वाडामालक/मालकीण अगदीच उदारमतवादी मनोवृत्तीचे वाटले. सुशिक्षित विद्यार्थ्यांसाठी? अक्षर ओळख होई तोवर पहिल्या एक दोन इयत्ता जातात. त्या पहिल्या एक दोन इयत्तेचे विद्यार्थी सोडले तर अशिक्षित विद्यार्थी कधी असतो का असा प्रश्न कोणालाही पडेल. पुढे जाहिरातित लिहिलं होतं फक्त चांगल्या घरातील विद्यार्थ्यांसाठी....
समजा ही जाहिरात एखाद्या लौकिकार्थाने वाईट घरातील मुलाने वाचली तर तो म्हणणार आहे का, नको बा आपण कशाला? फक्त चांगल्या घरच्यांसाठी असं स्पष्टपणे लिहिलेलं असताना आपण कशाला जायच तिकडे? अशी जाहिरातिची खिल्ली उडवत उडवत मी जाहिरातिचं जाहिर वाचन सगळ्य़ांसमोर केलं. सगळे फिसकारुन हसत होते. राहुल म्हणाला "फक्त शनिवारी जा बरं का नाही तर अपमान करेल घरमालक". जाहिरातीतला शेवटचा शनि वाराचा नसून पेठेचा आहे हे जाहिरात वाचण्यात कम अनुभवी असलेल्या राहुलला मी समजावलं, "सदा,शनी,भवानी,रास्ता,नारा, नवी, घोर, निगो असले शॉर्ट फॉर्म वापरतात इकडे". राहुलने अज्ञान दाखवत विचारलं, "निगो पेठ? आयला ही कोणती पेठ आहे?" मी त्याला सांगितलं, "अरे गाढवा निगो म्हणजे पेठ नाय काय. निगोशिएबल". शब्द मर्यादा वाढूनही शेवटचं वाक्य छापायला दिलंय म्हणजे घरमालक एकतर शेट माणूस असायला हवा किंवा पूर्वानुभवातून बरीच पीडा सहन करुन कावलेला असावा, असा निष्कर्ष आम्ही काढला. जाहिरातीवरुन घरमालक कसा असेल ही उत्सुकता चाळावल्याने मालक भेटीस उद्याच दिलेल्या वेळेत जायचं ठरलं.

मी आणि राहुल तयारच होतो. सागर आला की आम्ही वाडामालकांना (वामांना) भेटायला जाणार होतो. साडे चारला सागर आला. इतर कोणी जायच्या आत ५ वाजता बरोबर टपकून घर पाहून घ्यावे असा विचार मनात होता. त्या प्रमाणे लगेचच आम्ही घर शोधायला निघालो. शनवार मारुती लगेचच सापडला. पण यांचा पे. कालीन वाडा काही केल्या सापडेना. घरमालकाने फोन नंबरही दिला नव्हता. मग काय पुण्यात पत्ता विचारण्याचं जोखमीचं काम आमच्यावर ओढवलं. पुण्यात पत्ता विचारला की विचारणारा आपोआपच केविलवाणा व बिचारा होतो. पत्ता ज्याला विचारला जातो तो प्रस्थापित बनतो व आपल्याकडे "हे कोण परप्रांतीय इथे आलेत" या अविर्भावात पाहतो. अगदी कोथरुडला राहणा-या माणासाने पेठेत जाऊन पत्ता विचारला तर तो पुणेकरांच्या दृष्टीने पुण्याचा असूनही पुण्याबाहेरचा ठरतो. पत्ता सांगणारे कधी उत्तर न देता तर कधी मुद्दाम चुकीचं उत्तर देऊन निघून जातात. अशाच एका महाभागाने मला लकडीपुलावर दुचाकी चालवायला लावून १०० रुपयांचा चुना लावला होता. लकडी पुलासमोरुन जाताना आजही तो कटु प्रसंग आठवतो.

पत्ता सांगण्याचा असाच एक सत्य प्रसंग आठवला. मी एकदा पिएमटीने डेक्कन हून वनाज कॉर्नर ला निघालो होतो. बसमध्ये बरीच गर्दी असल्याने व कंडक्टरला विचारणे शक्य नसल्याने मी शेजारी बसलेल्या एका वृद्ध गृहस्थांना वनाज कॉर्नर चा स्टॉप माहित आहे का? असं विचारलं. "काही कल्पना नाही बुवा" म्हणून म्हातारबुवा खिडकी बाहेर पहायला लागले. थोड्या वेळाने मी इतर दोन तीन लोकांना विचारुन स्टॉपबद्दल माहिती काढली. स्टॉप वर उतरल्यावर पाहतो तर काय...हातात पिशव्या घेऊन ते गृहस्थ त्याच स्टॉप वर उतरले. माझं डोकं गरम झालं, मनात विचार आला वनाज कॉर्नरला उतरता उतरता म्हाता-याची हाडं झिजली असतील पण लोकांना मदत करायची म्हणजे यांची जीभ झिजते. तेवढ्यावर न थांबता मी त्या गृहस्थांना जाऊन जाब विचारला, "काहो वनाज माहित नाही म्हणालात आणि तिथेच कसे काय बरोबर उतरलात?" ते गृहस्थ क्षणभर वरमले पण तेवढ्यात सावरून घेत म्हणाले, "अच्छा तुम्ही वनाज म्हणालात का मला नीट ऐकू आले नसावे. अरेच्चा माझा मुलगा बोलावतोय वाटतं!" असं म्हणून निटसं ऐकू येत नसतानाही न मारलेली हाक ऐकून म्हातरबुवांनी पिशव्या बखोटीला मारुन रस्ता क्रॉस करुन पळ काढला सुद्धा!

पुण्यातल्या पत्ता सांगण्याच्या अशा अनुभवांना व एसटिडी वरच्या "पत्ता विचारण्याचे पैसे पडतील" अशा स्वरूपाच्या पाट्यांना मी फारसा भीक घालत नसे. वयोवृद्ध लोक शक्यतो टाळून कोणा तरुणाला पत्ता विचारता येईल का म्हणून मी इकडे तिकडे पहात होतो. शेवटी मनाचा हिय्या करुन एका जवळच्या दुकानात शिरलो. "काहो इथे शनवार मारुती जवळच्या कुठल्या वाड्यात भाड्याने जागा देतात का?" असा प्रश्न त्यांना विचारला. दुकानातल्या गृहस्थांनी आमच्याकडे पाहिलं आणि विचारलं "काय हो? सुशिक्षित आहात ना?" एखादी पाटी वाचायची राहिली काय असा विचार मनात चमकून गेला. मी पाट्या शोधू लागलो. ते पाहून गृहस्थ म्हणाले, "शनवार मारुती जवळ शेकडो वाडे आहेत. तुम्हाला कुठला हवाय? नाव काय आहे मालकांचं? मी म्हटलं "काही कल्पना नाही. सकाळला जाहिरात आहे". गृहस्थ म्हणाले," आहो मग त्यांनाच फोन करुन का नाही विचारत?", मी म्हटलं, "अहो फोन नंबर नाही दिला जाहिरातीत". त्यावर ते दुकानदार बडबडले, "च्यायला ह्यांचा ताप वाचावा म्हणून हे आमच्या सारख्यांच्या मागे ताप लावतात. बघु जाहिरात." मी व्हिजा ऑफिसरने डॉक्युमेंट मागितल्यावर ज्या तत्परतेने आपण कागद पत्रं देऊ त्या तत्परतेने आणि अदबीने त्यांच्या कडे जाहिरातीचा पेपर दिला. मी आशाळभूत नजरेनं त्यांच्याकडे पाहू लागलो. "ही तर बळवंत जोशीबुवांची जाहिरात आहे. जाहिरातीत एखादा शब्द वाढवून ब. जोशी एवढं सुद्धा टाकणार नाही हा *&%$##*" असं म्हणून त्यांनी बळवंतबुवांच्या वंशातील पूर्वजांचा उद्धार केला. "हे इथंच पलिकडे आहे, डावी कडे वळा", असा हात दाखवून दुकानदार कामाला लागले. दुकानदाराने सांगितल्या प्रमाणे आम्ही निघालो पण ते "हे इथंच पलिकडे" न सापडल्याने परत त्या दुकानात आलो. सांगून सुद्धा पत्ता न सापडणं म्हणजे सारंच संपलं ! हे म्हणजे घोर पातकच अशा नजरेने त्यांनी आमच्याकडे पाहिलं. ’काका एकवेळ मुस्काटात मारा पण ते तसल्या नरजरेनं पाहू नका’, असं सांगाव वाटलं. दुकानदार वैतागून बोलले, "अहो काय तुम्ही इथेच पलीकडे जो जुन्या संडासासारखा दरवाजा दिसतोय तो जोशांच्या वाड्याचा दरवाजा". दुकानदाराने संडासाचे दार म्हणून जरी अवहेलना केलेली असली तरी जोशांच्या वाड्याचे द्वार म्हणजे जणु स्वर्गाचे दार असल्यागत आमच्या चेह-यावर हसू पसरले व समाधानाने आम्ही तिकडे निघालो.



दारावरची लोखंडी कडी वाजवणार इतक्यात राव्हल्याने माझा हात धरला व म्हणाला, "अबे वेडा बिडा झाला कि काय?". मी एकदम चपापलो. पुन्हा एकदा पाटी वगैरे वाचायची राहिली काय असं वाटलं. मी राहुलला विचारलं काय झालं? त्यावर तो म्हणाला, "अबे, ५ वाजायला ५ मिनिटं कमी आहेत. जोशा उगाच अपमान करायचा". "ठीक आहे" म्हणत शेवटी पाच वाजायची वाट पहात आम्ही तिथेच दाराशी थांबलो. आम्ही दाराशी घुटमळत असलेलं वाड्याच्या खिडकीतून कुणीतरी पाहिलं आणि तो चेहरा अदृष्य झाला. मला वाटलं आता ती व्यक्ति येवून दार उघडेल पण कसचं काय? काहिच हालचाल दिसेना. शेवटी एकदाचे पाच वाजले व राव्हल्याने पुढे जाऊन दरवाज्यावर ठकठक केली. ठक ठक मधला दुसरा ठक वाजायच्या आतच दरवाज्याच्या वरच्या अंगाची एक खिडकी उघडली गेली व त्यातून एक केस उडालेला, गंध लावलेला चेहरा डोकावला व त्याने तुम्ही पेठेत आहात याची जाणिव करुन देणा-या स्वरात विचारलं "काय हवंय?" घरमालक आतल्याबाजुने बहुधा दारातच उभे होते. राव्हल्याला हे अनपेक्षित होतं. तो तर पहिल्यांदा घाबरुन मागे सरला नंतर सावरून म्हणाला "रुम हवी आहे". मालकांनी म्हटलं "नाव काय तुमचं". राव्हल्याने लगेच "राहुल" असं उत्तर दिलं. "राहुल काय? द्रविड की गांधी?" म्हाता-याला आडनाव अपेक्षित असावं म्हणून मी त्याचं राहुल जोशी पूर्ण नाव सांगुन टाकलं ते ऐकून मालक वदले "रुम वगैरे काही नाही. आमच्याकडे एक प्रशस्त जागा आहे भाड्याने देण्यासाठी." काही तरी गफलत हो असावी म्हणून मी जाहिरातीचा पेपर पुढे केला. मालक म्हणाले, "हो आमचीच जाहिरात आहे ती". मालक दरवाजा न उघडता खिडकितून आमच्याकडे पहात बोलत होते व खिडकीच्या खाली आम्ही, असा हा इंटर्व्हूव्ह सुरु होता. आम्हाला टाचा उंचावून न्याहळत वामा म्हणाले "कुठुन आलात?" "एबीसी चौकातून" राहुल्या वदला.
वामा: "एबीसी? ते काय?" मी: "अप्पा बळवंत चौक म्हणायचं असेल त्याला".
वामा: "अरे कुठुन आलात म्हणजे पुण्यात कुठून आलात?" मी: "काका आम्ही औरंगाबादहून आलो आहोत."
वामा: "अच्छा. कशाला?" मी नोकरी म्हणालो असतो तर वामाने दरवाजा उघडला नसता म्हणून मी "पुढिल शिक्षणासाठी" असं सांगितलं.
वामांनी ठीक आहे. एवढंच म्हणून आमच्याकडे पहिलं. काहीही न बोलता दरवाजा उघडला व कुणिही दोघांनी आत या असं फर्मान सोडलं. च्यामारी आम्ही तिघे आलेलो असताना फक्त दोघांनी आत या म्हणणं म्हणजे कहर होता. तरी पण सागराने समजूतदारपणा दाखवला व तो बाहेर थांबला. मी आणि राहुल आत गेलो. बळवंतराव जोशी यांची देहयष्टी त्यांच्या नावाला पूर्णपणे विसंगत व आडनावाला साजेशी होती. गोरेपान, कपाळी गंध, केस उडालेले, काका कसले आजोबाच शोभावेत असे. खाली मळखाऊन खाऊन स्वरंग, स्वजात विसरलेले धोतर वर एखाद्या पारशीबुवा प्रमाणे अडकवलेली बंडी त्यातून डोकावणारे कळकट जानवे,कानात भिकबाळी सारखे काही तरी घातलेले होते. थंडीचे दिवस नसताना पायात लाल रंगाचे सॉक्स चढवले होते. ही वेषभूषा पाहून आपण पेठेत आलो आहोत याची खात्री पटली.




दरवाज्यातून आत गेल्यावर एक चौरसाकार मोकळी जागा व लगेचच दिवाणखाणा होता. त्याच चौकोनातून एका कोप-यात एक जिना होता. वाड्याच्या वरच्या मजल्यावर २-३ खोल्या होत्या. त्यातलीच एखादी आम्हाला दाखवतील असे वाटले. दिवाणखाण्यात वामा गेले त्यांच्या मागोमाग आम्हीही निघालो. आम्ही मागेच येत असल्याचे पाहून वामा मागे वळाले व ताडकन म्हणाले, "वहाणा काढून पाय धुवूनच वर या. मी वाड्यातच आहे तुम्ही बाहेरून आलात तेव्हा पाय हे धुतलेच पाहिजेत". चौकात एका घंगाळात पाणी भरुन ठेवलं होतं. तिथे जाऊन आम्ही चपला काढून पाय धुतले व दिवणखाण्यात प्रवेशकर्ते झालो. हा आमच वाडा. वामांनी सांगायाला सुरु केलं. दिवाणखाणा अगदी पेशवाई थाटातला होता. वर झुंबर, केळकर संग्राहलयात शोभला असता असा गालिचा, दिवाणखाणाभर आजवर वाड्यावर राज्य करणा-यांच्या तसबिरी, कोणाकोणाच्या पुणेरी पगड्या, भिकबाळ्या मांडून ठेवल्या होत्या. एक जुनाट टिव्ही कोप-यात पडला होता.

वामांनी त्यांच्या व बहुतांश ज्येष्ठांच्या आवडीचा "ओळखी काढा" हा खेळ सुरु केला. मग आडनावे विचारणे, नातेवाईकांची आडनावे विचारणे, कोण नातेवाईक कुठे आहेत याची प्राथमिक चौकशी करुन झाली. कुठुनच ओळख लागत नसल्याचं पाहून वामा थोडे खट्टू झाले. त्यांनी मग स्वकुळाची बख्तरे आमच्यासमोर उलगडायला सुरु केलं. दिवाणखाण्यातील एकेका तसबिरीवर वामांनी भाष्य करायला सुरु केले. बळवंतराव, एकनाथराव, विष्णुपंत, हरिपंत, भिकाजीपंत अशी त्यांची वंशावलि त्यांनी संक्षेप वगैरे संकल्पनांना फाटा देत आम्हाला ऐकवली. त्यानंतर त्यांनी वाड्याचा इतिहास, वाडा बांधणारे पंत, त्यांचे पेशवे दरबारचे वजन व कर्तबगारी कथन केली. हे वर्णन ऐकून आम्ही पेशवे दरबारात विराजमान आहोत असा क्षणभर भास झाला. ही अगाध माहिती ऐकून झाल्यावर राहण्याच्या जागे संबंधी जाणून घेण्यासाठी आमची चुळबुळ सुरु झाली. आम्ही काकुळतीला येऊन म्हणालो थोडं राहण्याच्या जागे विषयी सांगता का?
वामा: "हो सांगतो की. माझ्याकडे सगळं नियमांनुसार होतं इथे रहाणा-याला नियमांचं पालन हे अत्यावश्यक आहे. अन्यथा गच्छंती अटळ आहे. सर्व नियम तुम्हाला समजावून सांगतो. पण सर्वात महत्त्वाचे सर्वात आधी. तर सांगा आपण घर भाड्याने कशासाठी देतो?"
मी: "सोबत व्हावी, जागा वापरात रहाते वगैरे वगैरे".
वामा: "सोबत वगैरे ते ठिक आहे हो पण मुख्य कारण म्हणजे घरभाडं. त्यासाठी आम्ही घर भाड्याने देतो. तेव्हा तिथे कुचराई मान्य नाही. नियम क्रमांक १: महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पैसे इथे सदरेवर आणून दिले पाहिजेत".
मी: "हो चालेल ना. काही अडचण नाही".
वामा: "अहो बाकी नियम पुढे आहेत ते सर्व ऐका आणि मग काय ते ठरवा".
मी: "ठिक आहे. सांगा".
वामा: "हां तर मग भाड्यानंतर येते ती वाड्याची शिस्त. वाड्याची शुचिर्भूतता कायम राहील असे वर्तन ठेवावे लागेल".
राहुल: (वाड्याकडे नजर फिरवत) "हो राहिल ना. शुचिर..चिर..शुचिरब्रूता कायम राहिल ना".
शुचिर्भूतता उच्चारताना होणारा राव्हल्याचा चेहरा पाहून मला हसू आवरेना. हा शब्द त्याला पहिल्यांदाचा पुस्तकाबाहेर भेटला असावा. मनतल्या मनात मी मला उच्चार करता येतो का ते पाहून घेतले.
वामा: "नियम क्रमांक २:जाता येता दिंडी दरवाजा लोटून कडी लावून मगच आत येणे किंवा बाहेर जाणे".

कडकट्ट कुजलेल्या व लाथ घातली तर कोसळेल असा तो लाकडाचा सापळा म्हणजे दिंडि दरवाजा !!! हे जरा अतिच होत होतं. हा सापळा जर दिंडी दरवाजा होवू शकतो तर खुद्द वामाही स्वत:ला राघोभरारी समजत असतील असा विचार मनात येवून गेला.


वामा: "हा नियम काटेकोरपणे पाळला पाहिजे. इथल्या शेवटल्या भाडेकरुनी या नियमाचं पालन करण्यात कुचराई केली म्हणून त्यांना हा वाडा सोडावा लागला. वेळेवेळी बजावूनही दरवाजा उघडा ठेवायचे व कहर म्हणजे वरुन असत्य बोलायचे. दरवाजा आम्ही उघडा ठेवला नाही म्हणून मलाच दटावून सांगायचे. पाहिले पाहिले आणि दिले एक दिवस घालवून".
मी: "बरोबर आहे. नियम तर पाळायलाच हवेत".
वामा: "आता नियम क्रमांक ३: आमचे कडे पहिल्या प्रहरी सडा संमार्जन होते. त्यामुळे वाडा पवित्र होतो. त्यामुळे सडा संमार्जनानंतर झोपून राहणे नाही".
वर खोलीत झोपून राहिलेलं ह्यांना काय कळणार आहे असं मी मनातल्या मनात विचार करत आहे हे ओळखूनच वामांनी पुढचा नियम सांगितला.
वामा: "नियम क्रमांक ४: सकाळच्या आरतीला वाड्यात उपस्थित असलेल्या सर्वांनी हजर रहायचे".
नियम ऐकून मी जरा चपापलोच!
वामा: "त्याचं काय आहे हा नियम करावा लागला. अहो व्हायचं काय की आमची आरती सुरु असताना जुने भाडेकरु उठायचे आणि आळसावलेलं तोंड घेऊन दारात तोंड धुण्याकरित उभे रहायचे. अजिबात चालायचं नाही ते. अपवित्र वाटतं".
मी: "अहो, ती मुलं वर रहायची ना मग खाली कशाला येतील तोंड धुवायला?"
वामा: "अहो, ते पुढच्या नियमात कळणारच आहे. गडबड कशाला करता?"
मी: "बर".
वामा: "हां तुम्ही काढलाच आहात विषय तर सांगतो. नियम क्रमांक ५:
वर शौच व स्नानाची सोय नाही. वरच्या मुलांनी हे वापरायचे", असं म्हणून वामांनी दोन कवाडांकडे बोट केले.
मी: "इथे? खाली?"
वामा: "हो मग. त्यात काय? वाड्याचे ऐतिहासिक स्वरुप जपून रहावे म्हणून आम्ही वर शौचालय बनवले नाही".
मी मनात म्हटलं, ’अहो ऐतिहासिकच रुप जपायचे होते तर हे तरी शौचालय कशास बांधले? जायचे होते नदिपात्र रस्त्याच्याकडेला सकाळी सकाळी’. पण काय करणार? गरजवंताला अक्कल नसते या उक्ति नुसार मी मुकाट्याने पुढचे नियम ऐकण्यास सज्ज झालो.
वामा: "नियम क्रमांक ६: जिने चढताना धावत पळत जिने चढायचे नाहीत. धावत गेल्याने जिन्यांचं आयुष्य कमी होतं. पाय न वाजवता सावकाश जिने चढायचे, कितीही घाईत असाल तरिही".
हा नियम ऐकून एखाद्या रात्री हतोडी घेऊन त्या खिळखिळ्या जिवाला एकदाची शांती द्यावी असा विचार मनात येवून गेला. हा विचार जिना व वामा राघोबादादा पेशवे दोघांसाठी येवून गेला होता. पण इरिटेशन फेज संपून आता मला म्हातारा इंटरेस्टिंग वाटु लागला होता. श्रीमंतांनी पुढचे नियम सांगावेत म्हणून आता पर्यंतच्या नियमांना सहमती दर्शवणे भाग होतं. मी मुद्दाम चेहरा आनंदी ठेवला होता. वाडा मस्त असल्याचे मधून मधून मी श्रीमंतांना सांगत होतो.
वामा:
"नियम क्रमांक ७: कमीत कमी ८ महिने रहाण्याचा लिखित करार करावा लागेल. करार मोडल्यास पुढील भाडेकरु येईपर्यंतचा जाहिरात खर्च व भाड्याची रक्कम, करार मोडणा-यास देणे बंधनकारक राहिल. त्याचं काय होतं, आहो भाडं राहिलं एकिकडे. जाहिरात खर्चातच अर्धे भाडे निघून जाते. त्यात वर नुसतीच माहिती घेऊन येतो येतो म्हणणा-या उपटसुंभामुळे वेळ दवडला जातो. रात्री अपरात्री येणारे महाभागही काही कमी नाहित. त्यामुळे भेटायची वेळ छापावी लागते. तो खर्च वाढतो. एवढे करुनही काही हरामखोर अपरात्रीच यायचे. तुम्ही त्यातले वाटत नाही म्हणूनच एवढी सखोल माहिती देतोय".
पेशवे आता आम्हाला त्यांच्या गटात ओढू पहात होते.
राहुल: "तुम्ही त्याची काही काळजी करु नका. आम्ही एक वर्ष तरी कमीत कमी राहूच".
वामांनी राहुलकडे समधानाने व मी रागाने पाहिलं. वामांनी नियमावली चालूच ठेवली होती.
वामा: "नियम क्रमांक ८: दिंडि दरवाजा रात्रौ ९ नंतर बंद राहील. एकदा दरवाजा बंद झाला की बंद. गाडी पंक्चर झाली होती, रिक्षा मिळाली नाही, बस वेळेवर आली नाही अशी कारणे चालणार नाहीत. पोचायला उशीर होत आहे असे लक्षात आले तर वाड्यापर्यंत येण्याचे कष्ट घेऊ नका. बाहेरच कुठे तरी सोय बघा व दुस-या दिवशी वाड्यावर या.
नियम क्रमांक ९: रात्रौ ११:०० नंतर दिवे घालवले पाहिजेत. दिवे न घालवल्यास वरच्या खोल्यांचा फ्य़ूज काढण्यात येईल
नियम क्रमांक १०: कोणत्याही प्रकारचे मद्यपान धुम्रपान निषिद्ध. सिगारेटची थोटुके लपवण्याचा प्रयत्न करु नये. मी सिगारेट पिणारा मनुष्य एक मैलावरुन ओळखू शकतो".
वामासमोर बसलेला राहुल्या एका वेळी पाच बोटात पाच सिगरेटी धरून ओढतो हे वामांना सांगितले असते तर वामा झीट येवून पडले असते. मैलभराहून ओळखण्याची थाप आम्ही वामांचे वय पाहता पचवून घेतली. वामा आता थांबायला तयार नव्हते.
वामा: "नियम क्रमांक ११: वाड्यावर मुलींना आणण्यास तीव्र मनाई आहे. मग ती सख्खी बहीण का असेना. मागे एक मुलगा होता रहायचा एकटाच पण इथे येणा-या गोपिका पाहून लोक आमच्या वाड्याची चारचौघात नालस्ती करायला लागले. शनिवाराचा बुधवार केला म्हणू लागले. जेव्हा केव्हा त्याला टोकलं की मामे बहिण आहे, आते बहिण आहे, चुलत बहिण आहे, मावस बहिण आहे असे बहाणे करायचा. एका भल्या पहाटे त्याच्या दारावर थाप मारुन तुझ्या पुण्यातल्या बहिणिचा फोन आला आहे असे सांगितले. झोपेत असल्याने "पुण्यात कोणी बहिण रहात नाही" असं तो गाफिलपणे म्हणाला. दिला त्याच दिवशी घालवून त्या नीच माणसाला. तेव्हा आताच सांगतो मुलींना वाड्यात प्रवेश नाही".
या अटीमुळे सागराची थोडी पंचाईत होणार होती. पण काही तरी मॅनेज करता आले असते.
वामा: "नियम क्रमांक १२: वाहने फक्त रात्री वाड्यात घेण्याची परवानगी आहे. सकाळी सडासंमार्जना आधी वाहने बाहेर काढलीच पाहिजेत. दिवसा दुचाक्या बाहेरच राहतील.
नियम क्रमांक १३: वाड्यात कसल्याही प्रकारचे अभक्ष्य बाहेरुन आणून खायचे नाही. तसे काही आढळल्यास ते जप्त केले जाईल".
अभक्ष्य जप्त करुन बळवंतबुवा त्यावर ताव मारणार की काय अशी शंका मनाला चाटून गेली.
वामा पुढे वदले, "नियम क्रमांक १४: वाड्यात स्वयंपाकाचे प्रयत्न करायचे नाहीत. स्वयंपाक करायचा प्रयत्न केल्यास शेगडी व इतर साहित्य जप्त केले जाईल".
नियम क्रमांक १५: "वाड्याचे बाह्य सौंदर्य अबाधित रहावे यासाठी कसल्याही प्रकारची वस्त्रे वा अंतवस्त्रे राहत्या जागेच्या बाहेर वाळत घालू नयेत".
या नियमा चा भंग केल्यास वामा जप्तीची धमकी देतात की काय असे वाटून गेले पण त्यांच्या सुदैवाने ते तसं काही बोलले नाहीत. आमच्याकडे पाहुणे येतात व ते खूप वाईट दिसतं एवढंच सांगून त्यांनी नियमाचं महत्त्व विषद केलं.
वामा: "नियम क्रमांक १६: मित्रांचा गोतावळा आणून चकाट्या पिटत बसायचे नाही. घरात दोनच्या वर व्यक्ती राहता कामा नयेत. मी अधून मधून याची पडताळणी करत असतो. मागच्या वेळी अशीच पडताळणी केली तेव्हा डझनभर जोडे व बाथरुम मध्ये ५ टूथ ब्रश सापडले. मला फसवू पहात होते लफंगे. दिले घालवून बोडकिच्यांना".
आम्हाला तिघांना रहायचे होते. सागराचा टूथ ब्रश पाहून वामा आम्हालाही एकदिवस हाकलणार असे वाटून गेले. पण पकडले न जाण्यासाठीचा उपाय वामाच सुचवून गेले होते.
वामा: "नियम क्रमांक १७: खाली आम्ही रहात असल्याने वरती जोरजोरात चालणे आदळ आपट धांगड धिंगा चालणार नाही".
नियम क्रमांक १८: "मोठ्या आवाजात टेप वगैरे लावल्यास फ्य़ुज काढला जाईल. रात्र भर अंधारात बसावे लागेल".
नियम क्रमांक १९: "भाडे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इथे राहणा-या प्रत्येक व्यक्तिच्या छायाचित्रांच्या २ प्रती पोलीस चौकीत देण्यासाठी लागतील. शिवाय पुण्यातील ओळखणा-या दोन व्यक्तिंचे कायम स्वरुपी पत्ते दूरध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे.
नियम क्रमांक २०: कच-यासाठी घंटागाडी येते. घरात खिडकीत कुठेही कचरा ठेवू नका. बुद्धिचा वापर करा.
नियम क्रमांक २१: कुलुप लावून बाहेर जाताना दिवे व पंखा बंद करुन जाणे.
नियम क्रमांक २२: उन्हाळ्यात फ्रिजमध्ये पाण्याची बाटली ठेवण्यास आग्रह करु नये.
नियम क्रमांक २३: पाच हजार रुपये डिपॉजिट म्हणून जमा करावे लागतील. जागा सोडताना काही नुकसान झालेले असल्यास त्याची भरपाई डिपॉजिट मधून वसूल केली जाईल.
नियम क्रमांक २४: शेजा-यांशी काही वाद भांडण झाल्यास तुम्ही एकटे नाही हे ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे सर्व नियम शिरोधैर्य मानत असाल तरच तुम्हास इथे प्रवेश दिला जाईल".

हा शेवटला अपवादात्मक नियम सांगून वामा शमले. एवढे नियम सांगत बसण्यापेक्षा वामांनी लिहून ते बाहेर लावावेत असं मला वाटत होतं. वामांचं बोलणं ऐकून वाटलं एवढे नियम लक्षात ठेवायचे असते तर च्यायला चांगला वकील झालो असतो. इंजिनिअर होवून कशाला असे हाल सोसले असते? पेशव्यांनी आतापर्यंत आमच्यावर नियमांचे चार राऊंड म्हणजे २४ गोळ्या झाडल्या होत्या. आता तरी पेशव्यांची मॅगझीन रिकामी झाली असेल या विचाराने आम्ही आवराआवरीच्या हालचाली सुरु केल्या. मी पेशव्यांनाच विचारले,
"नियम संपले असतील तर आम्ही येतो, आता उशीर होतोय".
वामा: "ठीक आहे. पण शौचालया संबंधी आणखी काही नियम आहेत ते मी तुम्ही रहायला आल्यावर सांगेन".
शौचालयात पण नियम ! आधी उजवा पाय ठेवा मग डावा, कडी लावा पाणी टाका असले नियम वामा सांगतात की काय वाटायला लागले. जे काय असेल ते सगळे हलाहल आजच पचवून घ्यावे म्हणून मी म्हणालो, "नको नको जे काय असेल ते आताच सांगा".
वामा: "नियम क्रमांक २५: रात्रीच्या वेळी वाड्यात शांतता असते. रात्री शौचालयाचा वापर करायचा झाल्यास तो उभ्या ने करु नये".
मी हा नियम ऐकून मी उभ्या उभ्या उडालो! पेशव्यांची इच्छा काही उमजेना.
मी: "म्हणजे"?
वामा: "स्पष्ट सांगायचे म्हणजे उभ्याने शौचालयाचा वापर केला असता रात्रीच्या शांततेत वाड्यात विचित्र आवाज होतो व घरात लेकी सुना असल्याने ते चांगले वाटत नाही".
बळवंतरावांच्या वाड्यात निसर्गाच्या हाकेला मोकळ्या मनाने ओ देण्याची चोरी होती. तिथे पण नियम होते. अशा नियमांच्या दडपशाहीने वाड्यात राज्य करणा-या या पेशव्यास मी गारदी बनून ठार मारण्यास मागे धावतो आहे व वामा दिंडी दरवाजा उघडून धोतर सावरत बाहेर पळ काढत आहेत असे चित्र मनासमोर तरळून गेले.

एवढे सहज पाळण्याजोगे सामान्य नियम ऐकल्यावर मी काय किंवा कुणीच बुद्दि जाय न झालेली व्यक्ति इथे राहणार नाही हे स्वच्छ होते. पण एवढा वेळ घातला होता असे मधेच उठून जाता येईना. मला हे असे नेहमी होते. जिथे गोष्ट पटत नाही तिथून निघणं जरा अवघड होतं. कपड्यांच्या दुकानात मना सारखे कपडे नाही मिळाले तर सगळे कपडे पाहून काहीच न घेता त्या दुकानातून निघताना जरा अवघडल्या सारखंच होतं तसं मला होत होतं.

’वाडा आम्हाला तर खूप आवडला आहे. आम्हाला लवकरात लवकर यायचे आहे’, असे असत्य वचन सांगून निघावे व पुढले काही महिने शनिवाराचे नावही काढायचे नाही अशा विचारात मी होतो. राहुल्याचा निघण्याचा काही बेत दिसत नव्हता. पेशव्यांच्या वाड्यावर आतल्या खोलीत त्याला लाल तांबडे काही तरी फडफडताना दिसले. तिकडेच त्याचे लक्ष लागून राहिले होते. लाल तांबड्याचीही राहुलशी नजरानजर झालेली दिसली. असले अघटित पेशवांच्या नजरेखाली चाललेले पाहून मलाच धस्स झाले. ह्या नियमांचे जोखड घेऊन इथे राहण्यासाठी राहुल्या आम्हाला कनव्हिन्स करतो की काय असं वाटून मी हवालदिल झालो. ’आम्ही कळवतो नंतर’ असं म्हणून निघायच्या विचारात असताना राव्हल्याने "आम्ही रहायला येतोच आहोत ऍडव्हान्स कधी देऊ?" असं विचारुन बॉंबच टाकला. तिथून निघून आम्ही रुमवर परतलो. राहुल आणि लाल तांबडा यांची काही तरी ष्टोरी सुरु होणार असे दिसु लागले होते. राहुल्या तिथे जाण्यासाठी वाटेल ते करायला तयार झाला होता. राव्हल्याचा मूड वेगळाच दिसत होता. माझा लाल तांबडा किंवा कुठल्याही रंगाशी संबंध नसल्याने व अजून बुद्धिभेद झालेला नसल्याने शनिवारातल्या त्या घाशीराम कोतवालाच्या घरात रहायला जाण्याचा अजिबात मानस नव्हता. पुढचे काही दिवस राहुलबाबा कागदपत्रे जमवणे, करार तयार करणे, फोटो काढणे असल्या कामात होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यात त्याला ओळखणा-या (पक्षी ओळख दाखवण्या-या) दोन पुण्यात्म्यांच्या शोधात तो बरेच दिवस होता. शेवटी ज्यांच्या कडे इमाने इतबारे वडे खात होता त्या जोशी वडेवाल्यांनी ह्या राहुल जोश्याला जोशी वाडेवाल्यांकडे राहण्यासाठी मदत केली. राहुल्याचा दुसरा पुण्यात्मा मलाच बनावे लागले होते. शेवटी एकदाचे त्याचे घोडे गंगेत न्हाले.

एके दुपारी निवांत बसलो असताना एका क्षणभरात आजवर झालेल्या सगळ्या गोष्टी भराभर माझ्या डोळ्या समोरून तरळून गेल्या. थोडा वेळ विचार केला आणि माझं मलाच हसू आलं. आता मला राव्हल्याच्या चेह-यावरचा ओसांडून वाहणारा आनंद, राहुल्यानेच दाखवलेली जाहिरात, राव्हल्या आधीपासूनच तासनतास जिच्याशी गुलुगुलु बोलायचा ती व्यक्ति व जुन्या भाडेकरुंकडून सतत उघडा रहाणारा दिंडी दरवाजा या सगळ्य़ा गोष्टींचा क्षणात उलगडा झाला! गेमर राव्हल्या आता भावी सासुरवाडीत ऑफिशिअली रहायला जाणार होता. आम्ही मात्र छोट्या जाहिरातीची कात्रणे काढून त्यावर लाल तांबड्या रेषा मारत भर उन्हात भर पेठांमधून घर शोधत वणवण हिंडत होतो.

Comments (26)

nice. tipical puneri..

डी के प्रतिक्रिये बद्दल अत्यंत आभारी आहे ! पहिली प्रतिक्रिया नेहमीच म्हत्त्वाची असते. धन्स.

शेवटी राव्ह्ल्या गेला कि नाही रहायला?
Jokes Apart ..खूपच अप्रतिम लेखन..पुण्यात कधीही न गेलेल्या माणसालासुद्धा पुण्याचे दर्शन घडवण्याचे कसब आहे तुझ्या लेखनात..जोशी (राहुल,वडेवाले,वाडेवाले) सगळेच भावले..

@Vedant प्रतिक्रियेबद्दल धन्स.शेवटची ओळ खासच. (राव्हल्या गेला म्हणजे जायचंच होतं त्याला तिकडे).

सुपर्ब लिहले आहेस.मी पाच वर्षे सदाशिवात राहीलो आहे.आमच्या आजी खूप चांगल्या होत्या. त्यामुळे मला काही त्रास झाला नाही. पण असे पुष्कळ नमुने मी पाहिले आहेत.
तुझ्या या ब्लॉगमुळे पुन्हा एकदा त्या सर्व वाड्यात फिरुन आल्यासारखे वाटले.

सही. माझे दिवस आठवले,पुण्याला असतांना सदाशिवात कॉट बेसीस वर रहायचो तेंव्हाचे.. जेंव्हा इतर ठिकाणी रुम १०० रुपयात मिळायची तेंव्हा पण १५० रुपये महिना टिच्चून द्यायला लागायचा, कारण घरमालकाची सुबक ठेंगणी! :)
बाय द वे.. अप्रतीम लेख. जूने दिवस आठवले. काहीव्यक्तीरेखा अगदी नजरेसमोर आल्या. नॉस्टेलजिक वाटायला लागलं.. मस्त लेख!

@onkardanke उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे ! सदाशिवात चांगले लोक मिळणं म्हणजे ईबी थ्री मधून एक वर्षात ग्रिनकार्ड मिळण्यासारखं आहे! माझे आता पर्यंत ५ घरमालक होते. घरमालकांवर मालिकाच लिहावी का काय असे वाटत आहे.

@महेंद्र! १५० रुपये देण्याचं कारण गोड असेल तर द्यायला काही हरकत नसते माणसाची! प्रतिक्रियेबद्दल धन्स !

Fantastic re nilya..mi ani amya gelo hoto...tech tu khupach chan lihele ahes!! apratim!! awesome...mi ani amya khup haslo hoto re tya diwshi...ultimate exp hota...!!
bayko geli maheri..nilya kam kari blog vari..! :)
keep writing..!! :)

Punhaa Pu. La. jaga kar.....

Chaan lihit aahes

Mast re Nilya !!! Dhnaywad , wade aani wadevale dhakavalyabaddal !!!

interesting...last paragraph madhe sagala ulagada hoto..that was amazing ! pune belly

झकास! खूप दिवसांनी लिहिलंस,पण नेहमीप्रमाणे भन्नाट!

गेमर राव्हल्या

असे कुत्रे सगळ्यांच्याच नशिबी असतात तर......

पण एकदम झकास असतात......

:-)

आपले लिखाण एकदम आवडले
झकास

छान लिहिले आहेस ! मजा आली वाचून !

खूप मस्त! नियम संपू नये अस वाटत होत! शेवट अतिशय उत्तम!!

Rahvlya rocks!

जहबहर......:D :D :D

full to धिंगाणा!! प्रचंड आवडलं!

mast ch .....awadale :)

नमस्कार, ’रेषेवरची अक्षरे’साठी (http://reshakshare.blogspot.in/) तुमच्याशी संपर्क साधायचा आहे. तुमचा ईपत्ता मिळेल काय?
- संपादक (resh.akshare@gmail.com)

’रेषेवरची अक्षरे’ वर तुमचा हा पोस्ट वाचला.
ख त र ना क.. मला कधी या पोस्ट ची लिंक मित्रांना पाठवू असे झालय.
अप्रतिम.

प्रतिक्रिया लिहिण्यास उशीर झाल्याने मी दिलगीर आहे. सर्वांना प्रतिक्रिया लिहावी असे वाटूनही ब-याच वेळा वेळचे वेळी तसे करणॆ जमत नाही. त्या बद्दल क्षमस्व.

@Nilesh प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. तुमच्यामुळेच ही कथा लिहिता आली.
@Nitin नित्या रे एवढ्या मोठ्या उपमा देवू नकोस. तो माणूस फार उच्च कोटीचा होता.
@Anonymous प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
@अचंबित. शेवटचा पॅरा आवड्ल्याचे पाहून छान वाटले. धन्यवाद.
@नंदन कौतुका बद्दल आभारी आहे मालक.
@Kunal चालायचंच ! हलकेच घ्या कथा. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
@Gauri धन्यवाद गौरी. लेख वाचल्याबद्दल व उन्मुक्त वर शेअर केल्याबद्दल.
@Abhineha अशा प्रतिक्रियांमुळॆ हुरुप वाढतो.
@PRatik हा हा !
@अपर्णा :) प्रतिक्रियेबद्दल धन्स.
@Akhildeep धन्यवाद भौ !
@Trupti प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
@संपादक मंडळ रेषेवरची अक्षरे मध्ये हा लेख समाविष्ट केल्याबद्दल आभारी आहे.
@Ashish अशा प्रतिक्रियांमुळे लिहिण्याचा उत्साह वाढतो. खूप खूप आभारी आहे.

i feel , p l is back !!!

i feel p l is back !!!

निल्या,
रात्रीचे १२ वाजून गेले तरी ब्लोग वाचायची इच्चा मेली नाही!
मस्त लिहिला आहे! बरेच योग योग आहे. सकाळीच पु ला देशापान्देंचा video पहिला youtube
वर. आणि तोही पुणे मुंबई आणि नागपूर च्या लोकांबद्दल. त्याचाच भाग वाटून गेला हा लेख.
दुसरा योग मंजे, मी गेली ७ वर्षे बंगलोर ला ,आणि पुढच्या महिन्यात पुण्याला नवीन नोकरी जॉईन कर्तोय. आणि आज हा अप्रतिम लेख वाचायला मिळाला ! तुझा योघर शोधायची भीती वाटू लागली आहे! :)
youtube वरची विडंबना पहिली - दमलेल्या बाबांची कहाणी वाली! हाहाहा ! खूप हस्लो. लिहित राहा!

Pramod Gurav