कैरी

Category:

कैरी शिवाय उन्हाळा म्हणजे बायको शिवाय लग्न असे आमचे स्पष्ट मत आहे! जीवनात रस आणणा-या गोष्टींच्या यादीमध्ये प्रेयसी नंतर कैरीच! तात्पर्य आमच्या यादी मध्ये कैरी अग्रस्थानी विसावलेली आहे! तिचे प्रथम क्रमांकावरुन विस्थापन करण्याची मनीषा शिवडी- न्हावाशेवा पुलाच्या बांधकामा प्रमाणे चिरकालीन आणि अनादी काळापर्यंत चालणारी आहे.


हां तर आपला विषय आहे कैरी! ब्लॉग चे शीर्षक तरी तेच आहे. अमोल पालेकरांनी ह्या शीर्षकावर आक्षेप घेतला नाही म्हणजे मिळवली! या नावाचा त्यांचा एक चित्रपट असल्याने उचल प्रतिबंधक कायद्याचा आसुड माझ्यावर पालेकर उचलणार नाहीत अशी एक अपेक्षा.
("पालेकर कशाला कडमडातोय तुझा ब्लॉग वाचायलां.." हे टीकाकारांचे मनोगत आमच्या मनाला चांगलेच अवगत आहे!)

"कैरी" आमच्या बालपणीच्या सुखद आठवणींचे प्रतीक बनली आहे. वार्षीक परीक्षा जवळ आली की घरी कैरीची चटणी व्हायची. लहान पणी मला कुठचीही भाजी आवडत नसे. मुळात भाज्या हे मनुष्याने खाण्याचे खाद्य नाही असं माझं ठाम मत होतं. आई छान भाज्या बनवते पण ते वय असं होतं की भाजी खाणे म्हणजे माझ्या दृष्टीने शिक्षा तर आमुच्या ज्येष्ठ भ्रात्याच्या दृष्टीने अचिव्हमेंट असायची. भाज्यांचा शोध ज्या कुणी आजीने लावला असेल तिचा मी वारंवार मनोमन उद्धार करीत असे. अशा या नावडत्या भाज्यां मध्ये पानात पडणारी कैरीची चटणी म्हणजे एस्टी स्टँड वर झक्कपैकी जिन्स आणि फाकडू टॉप घालुन उभ्या असलेल्या मॉडर्न मुली सारखी लक्ष वेधून घ्यायची. कैरीची चटणी म्हणजे जीव की प्राण. तिच्या आधारावर आम्ही किती समरप्रसंगांना (भाज्यांना) तोंड दिले याला गिनती नाही ! मोसमातली पहिली कैरी हातात तिखट मीठ घेउन खाणे, कैरी विळीवर कापताना होणारा तो चर्र्र्र्र्रर आवाज, तो आंबट पणा, कैरीच्या छोट्या फोडींचे लोणचं हे सगळं आज आठवलं.

लोणचं! अहाहा.लोणच्याच्या कै-या आणणे हे एक काम मी आवडीने करायचो. या कै-या कापायची स्पेशल विळी असायची. मोठ मोठ्या फोडी कापणे आणि लोणच्याचे मिक्स तयार करने या कामात आईला मदत करायचो. कै-या कापल्यादिवशी जे लोणचं तयार होतं त्याची चव मदर्स रेसिपी किंवा केप्रची लोणची खाणा-यांना नाही कळायची.


पन्हं या पेयावर मात्र माझा आक्षेप आहे. कॉलेज मधला एखादा उडाणटप्पू नोकरी लागल्यावर जसा सरळ होतो किंवा एखादी स्वयंपाक घरात पाय न ठेवणारी "स्कॉलर" मुलगी लग्ना नंतर रांधायला लागते तसं काहिसं पन्ह्यात होतं असं मला वाटतं. कैरी उकडवून तिला मिळमिळीत करुन तिचा रंग फिका करुन हे प्येय बनविले जाते. चवीला चांगले असले तरी माला कैरीचे हाल केले गेले आहेत असंच वाटत राहतं.शक्यतो मी पन्हं टाळतो आणि प्रसंग आलाच तर चहाच्या गाळणीने गाळून पितो.

शेजा-यांच्या कै-या चोरण्याचे भाग्य अनेकांच्या नशिबी असेल पण आमच्या दूरदृष्टी शेजा-यांच्या अवकृपे मु्ळे घराच्या आजु बाजुला एकही आंब्याचे झाड नव्हते.त्यामुळे कै-या चोरण्याचे ऍडव्हेंचर फारसे काही हाती लागले नाही. पण मामाच्य गावी जातानाच्या रस्त्याच्या दुतर्फा आंब्याची झाडं असायची, त्यांच्या कै-या रस्त्यावरनं ही हाताला लागायच्या. कायनेटिक होंडावरुन जाता जाता तोडलेली ती एखादी कैरी स्पेशल असायची. त्या कैरीला तोड फक्त शाळे समोर मिळणा-या कैरीलाच. तीन मित्रां मध्ये एक कैरी शेअर करायचो. दात आंबायचे. आता त्यातला एक लोकांचे आंबलेले दात दुरुस्त करतो.(दंतवैद्य आहे !)

शाळा संपली. घर सुटले (शिक्षणासाठी, कसल्याही उपद्व्यापामुळे नव्हे) तशी कैरीची चटणी विरळा जाहली. मेस वाल्या काकुंना एवढ्या पोरांसाठी चटणी करणे म्हणजे हाताचे तुकडे पाडुन घेण्याचेच काम होते त्यामुळे मेसवर ती मिळणे अवघड होते. "ती" या सर्वनामावरुन आम्ही चटणीस संबोधितो आहोत. मेस वर मुली फार कमी होत्या. असल्या तरी त्यांचं अस्तित्व अमेरिकेतील रशियन एजंट्स सारखं होतं. म्हणजे ते आहेत हे सर्वांना ठाउक होतं पण नेमक्या कोण? त्यांची नावं काय? कुठे राहतात? महाविद्यालय कोणते? जेवायला केव्हा येतात? नाही आल्या तर त्यांच्या घरी मेस वरुन डबा कोण पोचवतो? याचा थांग पत्ता लागायचा नाही. मेस च्या काकूही अगदी मुद्सद्दी राजकारणी नवख्या पत्रकारांच्या प्रश्नांना जसा उडवून लावतो तशा आम्ही काही माहिती काढायचा प्रयत्न केला की उडवून लावायच्या.
पुढे अमेरिकेस आलो (हे वाक्य छाती फुगवून नसुन खेदाने आहे याची कृपया नोंद घ्यावी) आम्ही ज्या ठिकाणी विद्याग्रहण कराण्यास आलो होतो तिथे कैरीचा आणि आमचा दूरान्वयेही संबंध नसें. (चतुर वाचकांना द्वयार्थ ध्यानी आला असेल).अशा प्रकारे मागच्या ७-८ वर्षांमध्ये चांगली चटणी तोंडी लावता आली नव्हती.(इथे द्वयार्थ अपेक्षित नाही!)
आज वेब कॅम वर आमच्या बंधुराजांनी आम्हाला डिवचण्यासाठी कैरीच्या चटणीचे वाडगे दाखवले. मग आम्ही ही पेटलो. ’पटेल ब्रदर्स” मधून मेक्सिकन कै-या आणल्या. खलबत्ता छोटा असल्याने चार बॅचेस मध्ये दीड तास झटून चटणी बनवली.
(कृती पुढील अंका मध्ये)! अशा मेहनती नंतऱ गरम पोळी सोबतचा चटाणीचा तो प्रथम ग्रास आम्हास स्वर्गीय न भासेतों नवल !
जेवणाच्या पानात निग्रहाने कैरीची चटणी आणाण्यास आम्ही यशस्वी जाहलो, आता जीवनाच्या पानात कैरीची चटणी पडते की पालकाची पातळ भाजी हे पहावयचे !!

आपला
शब्दश:आंबट शौकीन