भरली वांगी

Category:



ही रेसिपी खास माधवी साठी. भाजीला सुरुवात करण्या पूर्वी एकदा अटॅच केलेले फोटो मोठे करुन पहा.
वांगी(वांगे काही म्हणा) देठ काढून देठाच्या बाजूने उभ्या चार चिरा देउन पाण्यात टाकावीत. आता थोडावेळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही(वॉल मार्ट मध्ये वांगं म्हनूण नुसतंच साईझ ने मोठं आणि चवीने शून्य असं काही मिळतं त्यावर हा प्रयोग करु नये.)
या भाजीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाला प्रिपरेशन.
मसाला:
दोन मोठे कांदे (अमेरिकेत/इतरत्र असल्यास एकच मोठा कांदा)बारीक चिरावे. ते तसे न चिरल्यास मसाला नीट होत नाही. बारीक चिरा अथवा किसा (कांद्याला! पावभाजीवाला कसा बारीक चिरतो अगदी तसं. तदनंतर मुठभर किसलेले सुके खोबरे व २ चमचे तीळ (नसले तरी चालतं)तव्यावर भाजून घेणे. हे किसलेल्या कांद्यात मिसळा.

लाल तिखट १ चमचा, काळा मसाला, मीठ, खवलेला ओला नारळ, कोथिंबिर, एक चमचा तेल, दाण्याचे कूट २ चमचे, थोडा गूळ घालून मस्त मिक्स करुन घ्यावं. वांगं वातुळ असतं म्हणून त्यात गूळ घालावा हे "मातीच्या चुली" पाहून एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं असेलच.
आता मसाला वांग्यात भरुन घ्यावा. थोडा मसाला बाजुला काढून ठेवावा.

भाजी:
जाड बुडाच्या पातेल्यात तेल,मोहरी,हिंग,हळद घालून फोडणी करावी. त्यात मसाला भरलेली वांगी टाकुन फ्राय करुन घ्यावीत. चांगली फ्राय झाली पाहिजेत.थोड्या वेळाने थाळीत पाणी भरुन ते भाजीच्या भांड्यावर ठेवावे.गॅस बारिक ठेवावा. दोन वाफा येउ द्याव्यात. म्हणजे वांगी शिजतील.(अमेरिकेतली वांगी शिजायला जास्त वेळ लागतो. कधी कधी बाहेरचं आवरण करपतं आणि आत कच्चं राहतं. सो मंद गॅस इज द की)

आता सिंपल आहे मघाशी थाळ्यात ठेवलेलं पाणी आत टाकावं, चिंचेचा कोळ करुन तो त्यात टाकावा. आणि सुरुवातीला काढून ठेवलेला मसाला आता टाकावा. अभी मिक्स करनेका आणि थोडा ढवळनेका. पण वांगी तोडनेका नही.मग झाकण ठेवणेका.
रस किती पाहिजे त्यानुसार पाणी टाकून वांगी पूर्णपणे शिजवावीत.

सजावट:
ओलो खोबरे आणि कोथिंबीर घालून छान सजवावे.

टीप:
१. जाड बुडाचे पातेले नसेल तर तवा ठेवावा त्यावर भांडे ठेवावे.
२. पाणी घालण्या आधी वांगी परतणे महत्त्वाचे आहे अन्यथा भाजी पाणचट होते.